भारताची संस्कृती फार उच्च दर्जाची आहे, पाश्चात्त्य देशांमध्ये नीती खालच्या दर्जाची आहे, अशी एक समजूत आपल्यात आहे. आजची नाही तर गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. आपली संस्कृती वरच्या दर्जाची असण्याची जी अनेक कारणे मानली जातात, त्यांत लवकर लग्न करणे हे एक, आणि स्त्रियांच्या बाबत ९९ टक्के स्त्रिया व पुरुष दोघांचीही दुराचाराची शक्यता कमी होते अशी एक भ्रामक कल्पनाही आहे.
नव्याण्णव टक्के लवकर लग्न करण्याला संस्कृती व दारिद्र्य दोन्हीही गोष्टी कारणीभूत आहेत. स्त्रीला रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसल्याने लग्न करणे प्राप्तच होते. ह्यात लग्न करण्याची इच्छा नसतानाही लग्न केले जाते. इतर बऱ्याच समाजांत ४ ते १२ नव्हे, जास्तही टक्के स्त्रिया लग्न न करता राहतात. आपल्याला हे परवडत नाही. कारण केवळ पोटासाठी सुद्धा लग्न करून मुली उजविल्या जातात व त्या अविवाहित राहिल्या तर समाजात त्यांचे बरेच हाल होऊ शकतात. हे हाल इतर समाजात होत नाहीत असे नाही, पण आपल्याकडे ते बरेच जास्त होऊ शकतात. लग्न करण्याची प्रथा पाचव्या वर्षी सुद्धा लवकर म्हणजे हिंदूंमध्ये केव्हा आली व का आली ह्याचे बरेच अंदाज समाजशास्त्रज्ञांनी केले तरी त्याला निश्चित स्वरूप कधी आले नाही. जगात इतरत्र फारच क्वचित असलेल्या ह्या परिस्थितीवर ह्या लेखात चर्चा करण्याचा विचार आहे. त्यात महाराष्ट्रासारख्या प्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यातील वीसएक वर्षांपूर्वीचा अनुभव, १९९२-९३ सालची भारताची ह्या विषयातील आकडेवारी व शंभरएक वर्षांपूर्वीचे एक चर्चासत्र ह्यांचा आधार घेतलेला आहे. हा विषय आजच्या सुधारकामध्ये चर्चेला घेण्याचे कारण आजही परिस्थिती बरीच बदलण्याची आवश्यकता वाटते हे होय.
१९८० सालच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या आरोळे कुटुंबाने (मॅगसेसे पुरस्कार मिळविणाऱ्या) मला निमंत्रण दिले होते. त्या वेळी जवळपासच्या पस्तीस खेड्यांतील लोकांना पाचारण केले होते. त्यांच्याकरिता बसची सोय केलेली होती. तीत तीन वर्गांची माणसे होती : शाळेत जाण्याच्या वयाची मुले — विशेषतः मुली — प्रौढ स्त्रिया व प्रौढ पुरुष. ह्या शेवटच्या वर्गाला तरुण मंडळी फार्मर्स क्लब असे संबोधीत. सुदैवाने मला ह्या तीनही वर्गापुढे वेगवेगळ्या वेळी विचारांची देवघेव करण्याची संधी मिळाली. ह्यात लहान मुलामुलींनी एकूण आहार व आरोग्य ह्याचे कौतुकास्पद ज्ञान मिळविलेले आढळले.
स्त्रियांपुढे मुलांना शाळेत पाठविण्याची, मुलींचे लग्नवय उंचाविण्याची, व मुले परवडण्यापलिकडे होऊ न देण्याबद्दल चर्चा केली. त्यात ह्या ग्रामीण स्त्रिया मुक्तपणे बोलताना आढळल्या. स्त्रियांनी “काही झाले तरी मुलींची लग्ने आम्ही लवकरच करणार, वयात येण्याच्या अगोदर जमल्यास उत्तम; हवे तर लग्न झाल्यावर किंवा एखादे मूल झाल्यावर आम्ही त्यांना कुलूपही (लूप) बसवू” असे ठामपणे सांगितले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र हे भारतातले प्रगत राज्य समजले जाते. केविलवाणी परिस्थिती म्हणजे आपल्या मोठ्या बहिणीच्या बाळंतपणाला मदत करण्यास गेलेल्या धाकट्या बहिणीला दिवस राहण्याची पाळी बऱ्याच वेळी येते व एकीकडे मुलगी व एकीकडे जावई अशी परिस्थिती असताना त्याला तोंड देणे कठीण पडते अशी तक्रार ऐकली. येथे दुसरा एक अनुभव सांगायचा म्हणजे मुली गावातच शाळा असेपर्यंत शाळेत जातात. पण दुसऱ्या गावी शाळेत जावे लागले तर त्यांचे शिक्षण थांबवावे लागते. मग मुलगे दुसऱ्या गावी शाळेत जातात का? तर बऱ्याच वेळा ‘हो’ असे उत्तर येते. साहजिकच मुलीही अशा शाळेतून जाऊ शकल्या असत्या. शाळा नसल्यास मुलींचे काय करायचे हा प्रश्न पडून त्यांची लग्ने केली जातात. असो. तरुण पुरुषवर्गापुढे विचारविनिमय करताना शेती-सुधारणा, कायदे, त्या संदर्भातले कार्यक्रम, त्यांची अंमलबजावणी यांवर ओझरता उल्लेख होऊन स्त्री-पुरुष-संबंधावरही चर्चा झाली. विशेषतः स्त्री पुरुषांनी जास्त मोकळेपणाने आपापसात मिसळल्यास स्त्रियांच्याबद्दल आज जो एक तऱ्हेचा आकस आहे तो नष्ट होईल व मुली दिसल्यास पारावर किंवा चावडीवर बसून शीळ घालणे, सिनेमातले गाणे मोठ्याने म्हणणे, थुंकणे किंवा वेडेवाकडे शब्द काढणे कमी होईल असे मला वाटले. कुटुंबात काय किंवा सामाजिक आयुष्यात काय स्त्री-पुरुष मिसळणे म्हणजे बहुतांशी शरीरसंबंधापुरतेच; एरवी फारसे नाही अशी परिस्थिती असल्यासारखी मला वाटते. याउलट शिक्षण व रोजगारी दोन्ही वाढल्यास स्त्रीपुरुषांचे संबंध बदलतील अशी माझी खात्री आहे. त्यामुळेही आपली संस्कृती उंचावायला मदत होईल. आरोळे युगलाच्या मते, ‘आजपर्यंत कोणीही स्त्री-पुरुषांनी सभ्यपणे पण मुक्तपणे एकमेकांत मिसळण्याबाबत कधी विचार मांडले नसल्याचे आढळले.
लग्नाचे वय उंचावण्याने दोन गोष्टी साध्य होतील. पहिली म्हणजे मुलांची जोपासना करण्यासाठी लागणारी परिपक्वता स्त्रियांचे ठिकाणी येईल. दुसरे म्हणजे वय १४ ते २० पर्यंत मुले न झाल्यास लोकसंख्यावाढीसही आळा बसेल व एकूण सामाजिक समजूत व जाणीव वाढू शकेल.
१९९२-९३ मधील लग्नाचे वय
१९७८ सालपासून कायद्याने वय १८ पूर्वी स्त्रियांना लग्न करता येत नाही. अर्थात असल्या कायद्यांचा कोठल्याही समाजात उपयोग होत नाही. बाहेरून बडगा दाखवून किंवा कायद्याने त्यात फरक पडत नाही. १९९२-९३ साली नागरी भारतात २० ते २४ या वयोगटातील ३३ टक्के स्त्रियांची लग्ने १८ पूर्वी तर ग्रामीण भागातील ६३ टक्के अशी लग्ने झालेली आढळली. २० ते २४ वयावरच्या सर्व वयोगटांत लग्नाचे वय कमीकमीच होत गेलेले दिसले. थोडक्यात आजही बरीच लग्ने १५ व्या वर्षी किंवा लवकर होताहेत. शंभर किंवा अधिकच वर्षांपूर्वीच्या चर्चा ऐकल्या की ही आकडेवारी विशेष प्रगती दाखविते की नाही हे वाचकांनीच ठरवावे. हे लक्षात ठेवायला हवे की १८८० च्या सुमारास एका मराठी लेखकाने, बाळाजी विठ्ठल गावस्कर यांनी, एक पुस्तक लिहिले. वेदांचा आधार देऊन मांडलेले त्यांचे म्हणणे असे की मुलगी वयात आल्यावर ३६ वेळा बाहेरची झाल्याशिवाय तिचा पतीशी शरीरसंबंध येऊ नये. ह्याचा अर्थ वयात आल्यावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ संबंध न येता गेला पाहिजे. हे आजही होत नाही. शंभर वर्षापूर्वी काय परिस्थिती होती ते बघू या.
१८८१ सालच्या शिरगणतीत जी आकडेवारी हाती आली तीत १० वर्षांपेक्षा लहान वयाचे बरेचसे म्हणजे लक्षावधी नवरे, विवाहित मुली व विधवा दिसून आल्या. हिंदुधर्मावर हा एक तऱ्हेचा कलंक आहे असे वाटून त्या वेळी एक चर्चासत्र घेतले गेले. ह्यात समाजसुधारक व परंपरानिष्ठ अशा दोघांनीही भाग घेतला. त्याचा वृत्तान्त १८८९ साली २३ मार्च ला दयाराम गिडुमल यांनी अहमदाबादला प्रकाशित केला. ह्या चर्चासत्रात मुंबई इलाखा, मद्रास इलाखा, बंगाल इलाखा, राजपुताना, मध्यप्रदेश, संयुक्त प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत, आसाम, पंजाब, ब्रह्मदेश, कूर्ग, हैद्राबाद (दक्षिण) अशा सर्व ठिकाणच्या पुढाऱ्यांनी व डॉक्टर मंडळींनी भाग घेतला. ही चर्चा मुख्यत्वे दोन विषयांवर झाली. एक म्हणजे बालविवाह व दुसरा म्हणजे जुलूम-जबरदस्तीचे वैधव्य किंवा पुनर्विवाहबंदी. ब्रह्मदेशातील परिस्थिती अगदी वेगळी असल्याने त्याबाबत चर्चा करण्याचे कारण नव्हते. पहिल्या प्रकरणात बालविवाहाबाबत वेगवेगळ्या पुढाऱ्यांची मते व्यक्त झाली. दुसऱ्या प्रकरणात अशा विवाहांची कारणे सांगितली गेली. तिसऱ्या प्रकरणात बालविवाहाबाबतच्या कायद्यांची चर्चा झाली. चवथ्यात असे विवाह थांबविण्याच्या उपायांची चर्चा झाली. अशीच बरोबर आणखी चार प्रकरणे पुनर्विवाहबंदीबद्दल होती. आणि नवव्या प्रकरणात ह्या विषयात सरकारी हस्तक्षेप न होण्याची कारणे दिलेली होती. ह्या चर्चेत झालेल्या वादविवादाचा तपशील येथे देण्याचा विचार नाही. किंवा वेदस्मृतींचा आधार घेऊन एकमेकांवर केलेली चिखलफेक जरी मनोरंजक असली तरी तीही तपशिलात दिली नाही. केवळ सुधारकांचे व परंपरानिष्ठाचे मुद्दे खाली दिलेले आहेत :
१. समाजात सर्वांना विवाह व पुनर्विवाह आपल्या इच्छेप्रमाणे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे व लोक त्याचा आपल्या हौशीप्रमाणे फायदा घेत आहेत. मात्र चळवळ करणारे लोक समाजाला आपले स्वातंत्र्य उपभोगू देत नाहीत.
२. सुशिक्षितांत बालविवाहांचे प्रमाण कमी होत आहे व शिक्षणाबरोबर पुढल्या दहा-वीस वर्षांत परिस्थिती पार बदलेल.
३. बालविवाह समाजात फारसे नाहीतच.
४. दक्षिण प्रदेशातल्या अनुभवाप्रमाणे दुसऱ्या तिसऱ्या वर्षी लग्न न केल्यास वैभवसंपन्न नवरा मिळणे कठीण जाते.
५. सुशिक्षित बापांना (आईबाप नव्हे – फक्त बापच) मुली वयात येईपर्यंत लग्न करू नका म्हटल्यास एकही बाप ते स्वीकारणार नाही.
६. शिक्षित वर्गाचीही परंपरा मोडण्याची छाती नाही.
७. कूर्गमध्ये १८७१ च्या शिरगणती कमिशनरांच्या मते गेल्या, चाळीस वर्षांत पूर्वी कधी होत नव्हती अशी लग्ने होताहेत.
८. असली लग्ने काही जातींतच होतात. (जातीचा निर्देश आज करीत नाही).
९. मुलीला ८ व्या वर्षी गौरी, ९ व्या वर्षी रोहिणी, १० व्या वर्षी कन्या म्हणतात व मग रजस्वला म्हणतात. ह्या चार तऱ्हेच्या मुलींची लग्ने होण्यात बाप (की आईबाप?) अनुक्रमे स्वर्गलोकात, वैकुंठात, ब्रह्मलोकात व रौरव नरकात जातात.
१०. वयात येईपर्यंत मुलगी बापाचे घरी राहिली तर भ्रूणहत्या होते मग तिला वृषाली किंवा शूद्र महिला म्हणावे लागते.
११. वयात येईपर्यंत मुलगी बापाचे घरी राहिल्यास तिची जात नाहीशी होते.
१२. भारतासारख्या देशात हवामानामुळे मुली बारा-तेरा वयाला बाहेरच्या होतात. कधी ११ वयालाही होतात. म्हणून १० वयाचे आत लग्न करावे.
१३. तेरा-चौदाच्या मुलींना ‘सांचा भारा’ म्हणत.
१४. लवकर लग्न करण्याने शरीर व मन कसे कमकुवत होते ते आम्हाला समजत नाही.
१५. शरीर दुबळे झाले तरी नैतिकदृष्ट्या आम्ही कणखर राहतो.
१६. इंग्लंड व इतर पाश्चात्त्य देशांपेक्षा आमच्या मुलांचे संसार सुरळीत व संघर्षरहित चालतात. त्यांची मने एक असतात. कुटुंबात शान्ति नांदत असते.
१७. वयात येणे म्हणजे निसर्गाची हाक आहे व तिला योग्य तो प्रतिसाद देणे जरूर आहे. माणसाने निसर्गाला धन चालण्यात हित आहे.
१८. लवकर लग्नामुळे शिक्षणात किंवा प्रगतीत व्यत्यय येत नाही.
१९. विधवांना कुटुंबात मानाचे स्थान असते. सर्व व्यवहार त्यांना विचारूनच होत असतात. त्यांना गुलामी सहन करावी लागत नाही.
२०. स्त्रिया हौसेने आपले केशवपन करून घेतात. त्यांच्यावर कोणी जुलूम करीत नाही.
२१. स्त्रियांना पुनर्विवाह नको वाटतो. उदाहरणार्थ सबंध हिंदुस्थानभर स्त्रिया सावित्री-आख्यान हौसेने ऐकतात व व्रत आचरतात. सत्यवान-सावित्री-आख्यान हे एक पुनर्विवाह नको असल्याचे व पहिलाच नवरा स्त्रियांना हवा असल्याचे उत्तम उदाहरण आहे. शिवाय दोन विवाह झाल्यास स्वर्गात गेल्यावर कोठच्या नवऱ्याशी संग करायचा हा प्रश्न पडेल. (पुरुषांना का बरे पडत नाही? एकापेक्षा जास्त बायका करण्याची परवानगी आहे म्हणून?)
२२. आपले लोक दुबळे होण्याचे कारण लवकर लग्न नव्हे तर ब्रिटिशांच्या राज्यात नोकरीसाठी इंग्रजी शिकण्याचा ताण पडतो हे होय.
२३. विधवांचे हाल होतात असे जर असेल तर उघडपणे त्या तक्रार का करीत नाहीत?
२४. विधवा आपल्या गतकर्मांची फळे भोगीत असतात.
२५. विधवांना कोठल्याही जातीशी, ख्रिश्चन-मुसलमान धर्मियांशीसुद्धा लग्न करण्याची परवानगी आहे.
२६. विधवा होऊन मुंडण केल्यावर विधवांना त्याग, सहनशीलता, परोपकार करून व स्वार्थ खाईत घालून अग्निदिव्य करण्याची संधी किंवा प्राणाहुती देण्याची संधी मिळते आणि हाच मार्ग उत्तम.
वरील प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे अस्थानी मान देणे होते. बऱ्याच मोठमोठ्या पुढाऱ्यांनी त्यांना उत्तरे दिली. तरीही न्या.श्री.म.गो.रानडे यांनी चर्चासत्राचा समारोप करताना त्यात ह्या बहुतेकांचा परामर्श आल्याने त्याचा गोषवारा खाली देते आहे :
चर्चेला असलेल्या विषयात हिंदुस्थानातला समाज इतर सर्व समाजापेक्षा फारच वेगळा दिसतो. हे प्रामाणिकपणे कबूल करावे लागेल की लवकर लग्न करण्याने शरीरसंबंध लवकर सुरू होतो. ह्यामुळेही मुली लवकर वयात येतात. पण हे वयात येणे वैद्यकीयशास्त्रान्वये आरोग्यदायी नव्हे तर तो एक तऱ्हेचा रोग आहे. त्याचा परिणाम मुलींना जन्मभर सोसावा लागतो व पुढची पिढी खुजी, कमकुवत व खालावलेली निर्माण होते. बऱ्याच डॉक्टरांच्या मते, लवकर लग्न करून नवऱ्याजवळ लवकर राहायला जाणाऱ्या मुलींना मासिक पाळी लवकर येते, नवऱ्यापासून दूर राहिलेल्यांना किंवा बालविधवांना ती उशिरा येते हे पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. काही डॉक्टरांच्या मते तर हा बलात्कारच होय. त्यामुळे जन्माला येणाऱ्या पिढीवर ताण पडतो, त्यांच्या महत्त्वाकांक्षांवर मर्यादा पडतात. तारुण्याचा बहर येऊन स्वैर व रोमांचकारी आनंदाच्या उपभोगाला खीळ बसते. एकूणच धडाडी व कणखरपणा कमी होतो, वाढ खुंटते नि दुर्बळ व रोगिष्ट प्रजा निर्माण होते. आणि सर्वांत शेवटी म्हणजे आपल्या बालविधवा ह्यातूनच निर्माण होतात. ही परिस्थिती कशी सुधारायची हा प्रश्न चर्चेला खुला राहतो. ज्यांना ‘आहे ही परिस्थिती उत्तम आहे’ असे वाटते त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. कारण ते इतिहासाकडे दुर्लक्ष करतात. किंवा, जे धर्मग्रंथ गांभीर्याने घेतले जावेत ते बाजूला सारतात, निसर्गाने दिलेला सदसद्विवेक बाजूला ठेवतात. भ्रष्टाचाराने योग्य-अयोग्य यातले भेद विसरतात. त्यांना माहीत असते की सत्ययुगात अशी परिस्थिती नव्हती. नंतरच्या काळात हे भ्रष्टाचार धर्मग्रंथातून घुसडले गेले आहेत. तरीही चांगली तत्त्वे ते पायाखाली तुडवितात. पुरुषांकरिता एक नियम लावून सर्व विचारस्वातंत्र्य त्यांना बहाल करतात. स्त्रियांच्या स्वातंत्र्याची आहुती पडते. बालविधवा गुदमरून जातात. त्यांना त्याग शिकवायला हेच लोक तयार होतात. त्यांच्यात वयात आल्यावर नीतिमत्ता ढळली तर नावे ठेवायला हेच लोक तयार होतात. विधुरांना ह्या विधवांसारखे वागविल्यावर खरी परिस्थिती त्यांना कळेल. सत्यवान-सावित्रीची गोष्ट हे सांगते की मुलीची बुद्धी परिपक्व असली व तिला आपला पती पसंत करण्याची मुभा असली तर त्यांची मने इतकी एकसंध होतात की त्यांना एकमेकाला सोडणे कठीण जाते. सावित्रीचा बालविवाह नव्हता. तारुण्यात गुण व जोश एकत्र नांदतात. हे त्यांच्या लग्नाने सिद्ध झाले. पण लहान बाळांची लग्ने करून त्यांचे आईबाप त्यांच्या जिवाशी खेळतात. लहानपणीच मुला-मुलींच्यावर लग्नाच्या गोष्टी सतत बिंबवून त्यांची मने कलुषित करतात, बुद्धी नष्ट करतात व महत्त्वाकांक्षांचा चुराडा होतो. यौवनस्वातंत्र्य धुळीला मिळते. दुर्दैवाची गोष्ट अशी की हेच स्वातंत्र्य हे प्रौढ आपल्या घोड्यांना किंवा गाईम्हशींनाही देतात, पण मुलांना त्यापासून पारखे ठेवतात. अशा समाजात काव्य, कला, नाटके, वाङ्मय यांची भरभराट कशी होईल? आनंददायी नाटके निर्माण झाली का? आपली खरी संस्कृती रसातळाला गेली. नको त्या गोष्टी मुलींना पाचव्या वर्षीही करायला आणि शिकवायला सांगणारी आपली संस्कृती! शारीरिक आनंदापेक्षा मानसिक आनंदाची थोरवी अधिक नाही का? असो.
मग प्रश्न असा निघाला की हे ‘सत्ययुग’ आपण कसे परत आणणार? रसहीन किंवा शुष्क अशा ब्रिटिशांकडे अर्ज करून? की त्यांच्याकडून ‘वर’ मिळवून? त्याला उत्तर मिळाले ‘प्रथम’ मी माझ्या लोकांकडे शब्द टाकीन. त्यांची मने वळवीन. ते न जमले तर ब्रिटिशांकडून ‘वर’ मिळवीन. स्वतः मिशनरी होईन. मिशनरी होण्यास इतरांनाही सांगेन व हे जीवितकार्य म्हणून करीन.
टी. माधवरावांनी यावर जे भाष्य केले ते येथे देण्याजोगे आहे. त्यांच्या मते आपल्याइतका असह्य परिस्थिती सोसणारा समाज नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही परिस्थिती सुधारली पाहिजे. जागोजाग अशीच सत्रे भरवू व लोकशिक्षणाने लोकांच्या वृत्तीत बदल घडवू आणि हा सोन्याचा दिवस आपल्याला दिसेल अशी आशा करू.
वरील चर्चेनंतर प्रश्न राहतो की ह्या शंभर वर्षांपेक्षा जास्त काळात आपली ह्या विषयात प्रगती झाली का? ही शंभर वर्षे म्हणजे साधासुधा काळ नव्हता. त्यातला निम्मा आपण ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळविण्यात खर्च केला. निम्म्यापेक्षा जास्त काळ स्वातंत्र्यानंतर उपभोगला. ह्या काळात लग्नाचे वय १० वरून १५ पर्यंत वर चढले. ह्याच शंभर वर्षांत म्हणजे १९३० पूर्वी, सारडा कायदा पास होऊन (१८८० ते १९३० म्हणजे) ५० वर्षे गेल्यावर गर्भागर्भातही लग्नाची आश्वासने दिली गेल्याचे आपण विसरून चालणार नाही. १९२७ सालच्या सुमारास मिस मेयोने लिहिलेले ‘मदर इंडिया’ पुस्तक भारतीयांना किती जाचक वाटले ते का हे कळणेही कठीण वाटते. त्यामुळे वरील अनुभवानंतर शंभर वर्षांत लग्नव्यवहारात प्रगती झाली किंवा नाही हे वाचकांनी आपल्या कुवतीप्रमाणे ठरवावे; मात्र लेखिकेच्या मते १८८० व आज ह्या दोन काळातील चित्रे म्हणजे एकाच संस्कृतीच्या १९ व्या शतकातील व जवळजवळ २१ व्या शतकातील दोन प्रतिमा आहेत. याच संस्कृतीच्या दोन आवृत्त्या आहेत. त्यांचा पिंड एकच आहे. अंतःस्वरूप आमूलाग्र बदललेले नाही.
८२०/२, शिवाजी नगर, पुणे ४११ ००४