विवेक म्हणजे काय?

‘विवेक’ हा शब्द ‘reason’ या इंग्लिश शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरत आहोत हे आमच्या वाचकांना माहीत आहे. Reason’ या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून ‘बुद्धि’ हा संस्कृत शब्द वापरला जातो हे खरे आहे. पण ‘बुद्धि’ या शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे तो शब्द वापरणे आम्हाला गैरसोयीचे वाटते. शिवाय आगरकरांनी ‘Rationalism’ ला समानार्थी म्हणून ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला होता. त्यामुळे ‘विवेकवादी म्हणजे rationalist’ हे आम्हालाही अभिप्रेत आहे याचे वाचकांना स्मरण देऊन या लेखाच्या विषयाकडे वळतो.
या लेखाचा विषय आहे ‘विवेक म्हणजे काय?’ याचे उत्तर विवेक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये “reason” म्हणतात ते’ हे उत्तर वर येऊन गेले आहे असे कोणी म्हणेल. परंतु ते उत्तर जरी एका अर्थाने बरोबर असले तरी त्याने ‘विवेक’ या शब्दाच्या अर्थाचा उलगडा होत नाही, आणि तो शब्दाला दुसरा समानार्थी शब्द दिल्याने तो होत नाही. तो देण्याचा आता प्रयत्न करू विवेक म्हणजे सत्य आणि असत्य यांत भेद करणारी आणि सत्य काय आहे हे ठरवू शकणारी मनाची शक्ती. विवेक हे काम कसे करतो ते आता पाहू.
सत्य विधान कोणते या प्र नाची दोन उत्तरे आहेत. पहिले उत्तर, कोणतेही उक्तवचन (tautology), आणि असत्य विधान कोणते याचे उत्तर, व्याघातपूर्ण विधान. उक्तवचन म्हणजे जे बोलले आहे तेच बोलणे. उदा. ‘जर मनुष्य मर्त्य असेल तर मनुष्य मर्त्य आहे’ हे विधान असत्य असू शकत नाही. व्याघात म्हणजे जे खरे आहे. आणि त्याच वेळी खोटेही आहे असे विधान. वरील पहिल्या प्रकारचे विधान स्वतःसिद्ध आहे, म्हणजे ते सत्य आहे हे सिद्ध करावे लागत नाही. आणि दुसऱ्या प्रकारचे विधान स्वतःखंडित आहे, म्हणजे ते असत्य आहे हे सिद्ध करावे लागत नाही. त्या दोन्ही विधानांचे सत्यत्व आणि असत्यत्व त्यांच्या स्वाधीन आहे, आणि हे त्यांचा केवळ विचार कस्न ठरविता येते. पण सगळीच विधाने वरील प्रकारची नसतात. उदा. ‘पोपट माणसासारखे बोलू शकतात’ हे विधान केवळ त्याचा विचार करून सत्य की असत्य हे सांगता येत नाही. तसेच ‘गायी बोलू शकतात’ हे खरे की खोटे हे केवळ त्या विधानाचा विचार करून ठरविता येत नाही. वरील दोन्ही विधाने सत्य आहेत की असत्य हे पोपट आणि गायी यांच्या निरीक्षणाने ठरवावे लागते. म्हणजे ती आनुभविक किंवा अनुभवाधीन (empirical) आहेत. पहिली दोन विधाने तर्कशास्त्रीय (logical) होती असे म्हणता येईल. तर्कशास्त्रीय विधानांना वि लेषक (analytic) विधाने असे नाव असून अनुभवाधीन विधानांना सं लेषक (synthetic) विधाने असे नाव आहे. वि लेषक विधानांची विधेये त्यांच्या उद्देश्यात समाविष्ट असतात, परंतु सं लेषक विधानांची विधेये उद्देश्याच्या बाहेर असतात. उदा. ‘मनुष्य प्राणी आहे’ या विधानाचे विधेय प्राणित्व उद्देश्याच्या, म्ह. मनुष्याच्या कल्पनेतच समाविष्ट आहे. मनुष्याची व्याख्या सामान्यपणे ‘विवेकशील प्राणी’ अशी करतात. ती बरोबर असल्यास एखाद्या पदार्थाला ‘मनुष्य’ म्हणायचे म्हणजे त्याला ‘विवेकशील प्राणी’ म्हटल्यासारखे होईल, आणि ‘मनुष्य प्राणी आहे’ या वाक्याचा अर्थ ‘विवेकशील प्राणी प्राणी आहे’ असा होईल, आणि ते सत्य आहे हे लक्षात येईल. सारांश हे विधान अपरिहार्यपणे सत्य होईल. तसेच ‘मनुष्य प्राणी नाही’ ह्या विधानाचा अर्थ, ‘विवेकशील प्राणी प्राणी नाही’ असा होईल, आणि ते उघडच व्याघातपूर्ण आहे.
वरील दोन्ही विधाने अपरिहार्यपणे सत्य किंवा अपरिहार्यपणे असत्य आहेत. म्हणजे त्यांची सत्यासत्यता त्यांच्या स्वाधीन असते. पण सर्वच विधाने या प्रकारची नसतात. त्यांची सत्यासत्यता केवळ विचाराने नि िचत करता येत नाही. त्याकरिता ती विधाने ज्या वस्तूंविषयी असतील त्यांचे निरीक्षण करावे लागते. अशा विधानांना सं लेषक विधाने म्हणतात. त्यांची विधेये उद्देश्यात समाविष्ट नसल्यामुळे एखाद्या वस्तूला उद्देश्यपद लागू असूनही तिच्यात विधेय आहे की नाही हे ठरविता येत नाही. कारण त्यांचे उद्देश्य एखाद्या वस्तूला लागू असूनही त्यांचे विधेय तिला लागू होण्यासारखे नसेल हे शक्य आहे. अशा विधानांना आयत्त (contingent) विधाने असेही नाव आहे. आयत्त विधानांचे निषेध शक्य, म्हणजे व्याघातमुक्त असतात. ते सत्य असू शकतात.
सं लेषक, आनुभविक आणि आयत्त विधाने सत्यही असू शकतात आणि असत्यही असू शकतात. उदा. ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ हे विधान सत्य आहे, आणि ‘काही मनुष्य अमर आहेत’ हे विधान असत्य आहे. ही विधाने सत्य आहेत की असत्य हे निसर्गातील वस्तुस्थितीच्या अवलोकनाने ठरते.
वि लेषक विधाने गणितीय आणि तर्कशास्त्रीय असतात. परंतु सर्वच विधाने गणितातील आणि तर्कशास्त्रातील नसतात. ती निसर्गातील वस्तूंविषयी असतात. वैज्ञानिक विधाने यांपैकीच असतात. ती सत्य आहेत की असत्य ते अनुभवाने ठरते. म्हणजे ती सर्व सं लेषक आणि आयत्त असतात. म्हणजे त्यांच्यापैकी काही सत्य असतात, आणि काही असत्य असतात. वस्तुस्थितीशी जुळणारी सत्य, व न जुळणारी असत्य.
पण एखादे आयत्त विधान निसर्गानुरूप आहे की नाही हे आपण कसे ठरवितो? कोणत्याही एका वस्तूविषयीचे विधान निसर्गाला धरून आहे की नाही हे ठरविणे सोपे आहे. उदा. अमुक वस्तू लाल आहे की नाही हे तिच्या दर्शनाने ठरविता येते. काही (म्ह. एकीहून अधिक) वस्तूंविषयीच्या विधानांची सत्यासत्यताही अवलोकनाने ठरविणे कठीण नाही. उदा. ‘काही गायी पांढऱ्या असतात’. पण काही विधाने एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंविषयी असतात. उदा. ‘सर्व कावळे काळे आहेत.’ हे विधान खरे की खोटे हे कसे ठरविता येईल? ‘सर्व कावळे काळे आहेत’ किंवा ‘सर्व वाघ मांसाहारी असतात’ ही विधाने सत्य की असत्य हे आपण कसे ठरवितो? ते केवळ निसर्गावलोकनाने आपण ठरवू शकत नाही. कारण निसर्गात अगणित कावळे आणि वाघ आहेत. त्या सर्वांची खानेसुमारी आपण करू शकत नाही. शिवाय सर्व कावळे आणि सर्व वाघ आज अस्तित्वात नाहीत. काही भूतकाळात होऊन गेले आहेत, आणि काही भविष्यात जन्माला येणार आहेत. त्यांची परीक्षा आपण करू शकत नाही. अशा परिस्थितीत सार्विक विधाने, म्हणजे एखाद्या प्रकारच्या सर्व वस्तूंसंबंधीची विधाने, खरी आहेत की नाहीत हे आपण कसे ठरवितो?
एखाद्या प्रकारच्या काही वस्तूंच्या अवलोकनावस्न सर्वोविषयींच्या विधानांचा अंदाज बांधणे या क्रियेला उद्गमनक्रिया (induction) म्हणतात. पण ही क्रिया आपण कशी करतो किंवा कशी करू शकतो हा प्र न आहे. अठराव्या शतकात होऊन गेलेल्या डेव्हिड ह्यूम या तत्त्वज्ञाने आपण उद्गमनक्रिया वैधपणे करू शकत नाही असा निकाल दिला. तो सामान्यपणे सर्वमान्य झाला आहे.
आपण उद्गमनक्रियेचे एक उदाहरण घेऊ. उदा. ‘सर्व कावळे काळे आहेत’ हे उद्गमन घेऊ. आपण अनेक, शेकडो, हजारो कावळे पाहिले आहेत ते सर्व काळे होते. यावस्न आपल्याला कल्पना सुचते की कदाचित् सर्वच कावळे (न पाहिलेलेही) काळे असतील. पण हे जसे शक्य आहे, तसेच न पाहिलेले काही कावळे काळे नाहीत हेही शक्य आहे. म्हणजे आजपर्यंत निरपवादपणे सर्व कावळे काळे आहेत असे आढळले, तरी तेवढ्यावरून सर्व कावळे (म्हणजे भूतकाळात होऊन गेलेले, आणि भविष्यात होणार असलेले धस्न) काळे असतील असे निष्पन्न होत नाही. म्हणून शहाणपणाचा मार्ग म्हणजे ‘सर्व कावळे काळे आहेत’ हे उद्गमन आपण पूर्ण नि िचत न मानता ते केवळ संभाव्य (probable) फार तर अतिशय संभाव्य आहे असा निष्कर्ष काढला पाहिजे, असे ह्यूमनंतर स्वीकारले जाणारे मत आहे.
निगामी आणि उद्गामी अनुमाने
अनुमान करणे म्हणजे एक किंवा अधिक विधाने सत्य असतील तर त्यांच्या आधारावर आणखी एक विधान सत्य असले पाहिजे असे म्हणणे. त्या विधानाला अनुमानाचा निष्कर्ष म्हणतात, आणि ज्या विधानांच्या जोरावर निष्कर्ष निष्पन्न होतो त्यांना साधक विधाने किंवा नुसतेच ‘साधके’ म्हणतात. जर साधके सत्य असतील तर त्यांच्यावरून निष्पन्न होणारा निष्कर्षही सत्य असतो. अशा अनुमानाला ‘निगामी’ अनुमान म्हणतात. पण काही अनुमाने अशी असतात की त्यांची साधके सत्य असली तरी त्यांपासून वैधपणे कोणताच निष्कर्ष निष्पन्न होत नाही. पण त्यांची साधके सत्य असतील तर ती निष्कर्षाला कमीअधिक बळकटी देतात असे म्हणता येईल. उदा. आपण पाहिलेले सर्व कावळे काळे होते, म्हणून सर्व कावळे काळे असले पाहिजेत हे अनुमान उघडच चुकीचे आहे; कारण न पाहिलेल्या कावळ्यांपैकी एखादा कावळा काळ्याहून वेगळ्या रंगाचा असू शकेल. त्यामुळे सर्व कावळे काळे आहेत हा निष्कर्ष निःसंदेह सत्य आहे असे म्हणता येत नाही. ते अनुमान संभाव्य आहे, ते अतिशय संभाव्य आहे असे म्हणण्यावर समाधान मानावे लागते.
एका अर्थाने निगामी अनुमानाचा निष्कर्ष त्याच्या साधकात समाविष्ट असतो, तर उद्गामी अनुमानाचा निष्कर्ष साधकांच्या पलीकडे जातो. म्हणून निगामी अनुमान पूर्ण नि िचत असते, तर दुसरे केवळ संभाव्य असते असे म्हणावे लागते.
विधानांचे समर्थन कसे करतात?
समर्थन निगामी किंवा उद्गामी असू शकेल. निगामी समर्थनात ज्याचे समर्थन करावयाचे असेल ते विधान ज्यांच्यापासून निचितपणे निष्पन्न होऊ शकेल अशी सत्य साधके द्यायची. पण आनुभविक विधानांच्या समर्थनाकरिता ज्यांच्या पासून साध्य विधान वैधपणे निष्पन्न होईल अशी सत्य साधकेच शक्य नसतात. म्हणून ज्यांच्यामुळे विधान संभाव्य
आहे असे म्हणता येते अशी संभाव्य साधके वापरावी लागतात.
एका अर्थाने पाहिले असता निःसंदेह सत्य असणारे विधानही संभाव्य आहे असे म्हणता येईल. संभाव्यतेच्या १००% पासून ०% पर्यंत मात्रा असू शकतील. पूर्ण सत्य विधान १००% संभाव्य आहे असे म्हणता येईल; आणि पूर्ण असत्य विधान ०% संभाव्य असते असे आपण म्हणू शकतो. या दोन टोकांमध्ये कमीजास्त संभाव्य विधाने असतात.
एक साधे उदाहरण घेऊ. परीक्षेत वरच्या नंबराने उत्तीर्ण होण्याच्या कारणा-मध्ये अनेक अटी असतात. उदा. बुद्धिमत्ता, मेहनत, परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची प्रकृति निरोगी असणे, इ. या अटी पुऱ्या होण्याच्या अनेक मात्रा आहेत. एक विद्यार्थी दुसऱ्यापेक्षा अधिक बुद्धिमान असेल. तसेच त्यांच्या मेहनतीत कमीजास्तीचे फरक असणार, आणि त्याचप्रमाणे परीक्षेच्या वेळी प्रकृति निरोगी असण्याच्याही अनेक मात्रा असतील. या सर्व अटींचे गणित करून कोणत्याही विद्यार्थ्यांच्या यशस्वी होण्याची संभाव्यता ठरते. या अटींची पूर्ती कमीजास्त प्रमाणात होत असल्यामुळे विद्यार्थांच्या क्रमांक ठरतो. म्हणजे विद्यार्थी उत्तम प्रकारे उत्तीर्ण होण्याची संभाव्यता कमीजास्त असणार. उद्गामी निष्कर्षाची संभाव्यता कधीही १००% असू शकत नाही, आणि वैध निगामी निष्कर्षाची संभाव्यता १००% पेक्षा कमी असू शकत नाही.
परंतु ‘उद्गमन’ हे नाव फक्त काहींवस्न सर्वांविषयी काढलेल्या निष्कर्षा-लाच लागू पडते असे नसून त्याने आणखी एका प्रकारच्या युक्तिवादाचा बोध होतो. या युक्तिवाद–पद्धतीला ‘औपन्यासिक-निगामी’ (Hypothetico-Deductive) असे नाव आहे. काहींवरून सर्वांविषयी अनुमान करणे याला ‘Induction by Simple Enumeration’ (सरल गणनेद्वारा उद्गमन) असे नाव आहे. विज्ञानामध्ये सरल-गणनेचा फारसा उपयोग होत नाही. ही क्रिया ज्ञानाच्या फारच प्राथमिक अवस्थेत वापरली जाते. विज्ञानाची सारी भिस्त औपन्यासिक–निगामी रीतीवर असते. आपण आता ह्या औपन्यासिक–निगामी रीतीचे स्वरूप काय आहे ते पाहू.
एखाद्या प्रकारच्या घटिताविषयी (natural phenomenon) त्याचे नियम काय असतील याचे उपन्यास (hypotheses) वर्तविणे म्हणजे त्यासंबंधी अंदाज बांधणे. हे करावे लागते कारण ते केवळ निरीक्षणाने साध्य होत नाही. घटितांचे नियम शोधून काढावे लागतात. उदा. वस्तूंचे मुक्त अधःपतन कोणत्या नियमानुसार घडते हे गॅलीलिओला शोधायचे होते. त्याविषयी प्रचलित मत असे होते की वस्तूंच्या अधःपतनाचा वेग त्यांच्या वजनाच्या समप्रमाणात असतो. एका सध्या प्रयोगाने हे मत चूक आहे असे गॅलीलिओने दाखवून दिले. एक मोठा शिलाखंड आणि एक लहानसा दगड त्याने एकाच उंचीवरून खाली टाकले. तेव्हा असे आढळले की, दोन्ही दगड एकाच वेळी जमिनीवर आदळले. म्हणजे वस्तूंच्या अधःपतनाचा वेग त्यांच्या वजनांच्या प्रमाणात असतो हे मत चूक आहे हे सिद्ध झाले. ही परीक्षा पुढील निगामी अनुमानाने केली. ते अनुमान असे होते. जर प्रचलित मत खरे असते तर एकाच क्षणी खाली सोडलेल्या भिन्न वजनाच्या वस्तू भिन्न काळी जमिनीवर पोचल्या असत्या. पण तसे घडले नाही. प्रचलित मत खरे नाही. याप्रमाणे प्रचलित मताचे खंडन झाल्यानंतर वस्तुस्थिती काय असावी या-विषयी गॅलीलिओला अन्य अनेक उपन्यास कल्पावे लागले, आणि त्यांची त्याने निगामी पद्धतीने परीक्षा केली. शेवटी त्याने कल्पिलेला उपन्यास असा होता : पडणाऱ्या वस्तूंनी आक्रमिलेले अंतर पतनकालाच्या समप्रमाणात नव्हे, तर पतन-कालाच्या वर्गाच्या समप्रमाणात असते. म्हणजे एका वस्तूचा पतनकाल एक सेकंद असेल तर दोन सेकंद पडणारी वस्तू पहिलीच्या दुप्पट नव्हे, तर २२ म्हणजे चारपट इतके अंतर कापील, तीन सेकंद पडणारी वस्तू तिप्पट नव्हे तर ३२ म्हणजे ९ पट my अंतर कापील. हा उपन्यास परीक्षेत उतरला. हा नियम Galeleo’s Law of Falling Bodies या नावाने प्रसिद्ध आहे.
या उदाहरणावस्न उपन्यास कशाला म्हणतात, त्याची कल्पना का करावी लागते, त्याची परीक्षा कशी करतात, आणि परीक्षेत उपन्यास यशस्वी किंवा अयशस्वी कसा होतो इत्यादि गोष्टी स्थूलमानाने स्पष्ट झाल्या असतील.
ज्या अनुमानाने उपन्यासाची परीक्षा केली जाते ते निगामी असते, म्हणून या रीतीला औपन्यासिक निगामी रीत असे म्हणतात.
याप्रमाणे निगामी आणि उद्गामी अशा दोन्ही प्रकारच्या अनुमानांनी एखादे विधान सिद्ध आहे किंवा संभाव्य आहे हे आपण ठरवू शकतो. सिद्ध विधाने १००% सत्य असतात, पण संभाव्य विधाने १००% सत्य आहेत असे आपण म्हणू शकत नाही. पूर्ण निःसंदेह विधाने केवळ गणितात आणि तर्कशास्त्रात शक्य असतात; पण ती आपल्याला वस्तुस्थितीविषयी कसलीही माहिती देऊ शकत नाहीत. परंतु प्रत्यक्ष जीवनांतील आपली मते निसर्गात केव्हा काय घडते याविषयी असल्यामुळे आपल्याला या क्षेत्रात निःसंदेह विधाने सापडू शकत नाहीत, आणि आपल्याला केवल संभाव्य विधानांवरच समाधान मानावे लागते. परंतु संभाव्यतेच्या अनेक मात्रा असल्यामुळे आपण सर्वांत अधिक संभाव्य विधानावर विश्वास ठेवावा. अशी विशेष संभाव्य विधाने कोणती हे आपल्याला विज्ञानात कळते.
आता विवेकवादाचा आग्रह असा आहे की आपण फक्त सत्य विधानांवर विश्वास ठेवावा, आणि ते शक्य नसेल तेथे उपलब्ध माहितीवरून जे विधान जास्तीत जास्त संभाव्य असेल ते आपण स्वीकारावे. आपल्या मतांचे परीक्षण करून जास्तीत जास्त संभाव्य विधानांचा आपण स्वीकार करावा. अधिक संभाव्य विधानांचा त्याग करून कमी संभाव्य विधानांचा स्वीकार करणे विवेकविरोधी आहे. म्हणजे कोणतेही विधान स्वीकारण्यापूर्वी त्याला पुरावा काय आहे याचा शोध केला पाहिजे. हे काम वस्तुतः वैज्ञानिकच समर्थपणे करू शकतात. सामान्य माणसाजवळ ते करण्याकरिता पुरेसा वेळ, सामर्थ्य नसते. मग त्याने काय करावे? पण निराश होण्याची गरज नाही. कारण हे काम वैज्ञानिकांनी अगोदरच केलेले असते, आणि एक विशाल ज्ञानभांडार त्यांनी उपलब्ध करून दिलेले असते. त्याचा पुरेपूर फायदा सामान्य लोकांनी अवश्य घ्यावा.
हे झाले आपण कोणती विधाने स्वीकारावी या प्र नाचे विवेकवादी उत्तर. पण विवेकवादाचा आणखी एक भाग आहे —- कोणती कर्मे करावीत हा. या प्र नाचे उत्तर वरील उत्तरापेक्षा बरेच भिन्न आहे. ते या लेखाच्या उत्तरार्धात देण्याचा प्रयत्न करू
३/४ कर्मयोग, सुशीला बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२

अभिप्राय 1

  • अत्त्यंत अभ्यासू लेख.पण नुसत्या शिक्षणाने माणूस विवेकी बनतो का? अनेक विज्ञानाचे निष्कर्ष अजून पुराव्यासकट नाही मिळत. मग ती डार्विन ची थेअरी असो किंवा नील्स बोहर चे आण्विक विधान. सुशिक्षित माणसे पण अविवेकी दिसतात. विषय नक्कीच पुढे नेहण्याजोग आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.