फिटम् फाट: तस्लीमा नासरीनची कादंबरिका

तस्लीमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम ८७ पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळेच वाढवलेला. पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.

तस्लीमा ‘लज्जा’मुळे प्रकाश झोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी ६ महिने प्रकाशित झालेली. ‘फिट्टे फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’–‘सूड’ ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला. ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या ५ आवृत्त्या निघाल्या होत्या. हे भाषांतर ढाक्याच्या ‘अनन्या’ प्रकाशनाच्या ८ व्या आवृत्तीवरून केलेले आहे. तिचं हे स्वागत बंगाली वाचकाच्या प्रबुद्धतेचं द्योतक आहे. ही गोष्ट नवराबायकोतली आहे. बंगाली अन् मुसलमान कुटुंबातली असूनही तेवढीच ती राहत नाही. मध्यमवर्गातल्या कोणाही जोडप्याची ती असू शकते. पारंपारिक विचारांच्या विळख्यात अडकलेल्या पुरुषप्रधान समाजात आपल्या अवती-भोवती ती घडू शकते.

हरून एक ३५ वर्षांचा स्त्रीसुख चाखलेला तरुण, झुमूर या २४ वर्षांच्या अनाघ्रात पुष्पाला खुडतो. फसवत नाही, लग्न करतो. तिच्या आग्रहामुळे लौकर करतो. पण दीड महिन्यातच ती गरोदर कशी राहिली या शंकेने, निर्दयपणे तिचा गर्भ पाडतो. नीट चौकशी करत नाही. झुमूरची बाजू ऐकायची गरजच काय? ती शीलाला जपणारी अन् शरीरखेळ न खेळलेली आहे याची खात्री करून घेऊनच त्याने ती निवडलेली. तरी पहिल्या रात्री चादरीवर रक्ताचे डाग कसे नाहीत याचे त्याला आ चर्य वाटलेले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून कामावर निघणारा तो एक यशस्वी उद्योजक, ‘आता फुकट–फाकट घरी कशाला राहू, लग्न तर होऊन गेलंय’ असा हिशेब करणारा. ‘हाताशी असणं म्हणजे काही माणूस मनाशी असणं नाही’ हा धडा माहीत नसलेला बिझिनेसमन. झुमूरला फक्त शरीर आहे. ते परपुरुषापासून शुद्ध राखले पाहिजे. लग्नाआधीचा गर्भ पाडला अन् आता एकटीला बाहेर जाता येणार नाही याची खबरदारी घेतलेली. एम्. एस्सी. झालेली आहे म्हणून काय झालं? अडीच हजार फुटांचा फ्लॅट आहे. आईवडील, बहीण भावांनी भरलेले एकत्र कुटुंब आहे. झुमूरने त्यांची सेवा करावी. त्यांच्यात रमावं. तिला काय करायची नोकरी? असे विचार. वर्ष झालं तरी घरी पाळणा हलण्याचे चिन्ह का नाही हा वडीलधाऱ्यांना पडणारा प्र न. ‘पोरगं आण लवकर, पोरगं आण. आई होणं हेच स्त्रीजन्माचं सार्थक आहे’.

सक्तीच्या ॲबॉर्शननंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं, पंधरा दिवस पतिसंग चालणार नाही. हरूननं मात्र चौथ्या दिवसापासूनच संग मिळवलाय. झुमूरचा मूक संताप, उपरोध– ‘चारित्र्यानं संपन्न असलेल्या नवऱ्याला संभोगाला विरोध करायची हिंमत व्यभिचार करणाऱ्या कुणा बाईत काय असणार?’ प्रेमलग्न कस्न आलेली ही झुमूर, वर्षाभरात तिला वाटू लागते ‘मी म्हणजे हरूनच्या शरीरसुखाकरता ठेवलेला एक दोन पायांचा प्राणी आहे. सकाळी–दुपारी–रात्री पोटात काहीतरी ढकलून मला जिवंत राहावं लागतं, कारण रात्री तो मला भोगणार असतो. तिच्या मनात येतं, ॲबॉर्शननंतर मला नवऱ्याबरोबर सर्वोच्च सुख किंवा ऑरगॅझम कधीच मिळालेलं नाही. हरून अधनंमधनं विचारतो, झालं का?’ मी म्हणते, ‘हो’ . . . ‘का होत नाही? आधी तर व्हायचं . . . काही शारीरिक त्रुटी तयार झालीय ॲबॉर्शनपास्नं, का मानसिक पांगळेपण? मन आता पूर्वीसारखं प्रेम करत नाही हलवर. खूप आतमधे गुपचूप त्या भयंकर निष्ठुर माणसाबद्दल त्याला घृणा वाटते’. (पृ. ४३)

तिच्याच इमारतीत खालच्या मजल्यावर सेबती ही डॉक्टर राहायला आलेली. नवरा अन् चित्रकार दीर, झुमूरच्याच वयाचा. त्याला पाहून बेचैन झालेल्या झुमूरला वाटते हे प्रेम की ‘बेड्या घातलेल्या पायांचा नियम, पिंजऱ्याबाहेर जाण्यासाठी उतावीळ? . . . की एकाकडनं आघात झाल्यावर दुसऱ्याकडे ओढ, काहीसा आसरा शोधणे?’

ती ओळख करून घेते. वाढवते. चाकोरीबाहेरचे त्याचे मन तिला मोहवते. डोळ्यातली तहान तिला लुभावते. सेबती, तिचा हा दीर अफझल यांची सोबत मिळाल्यापासून झुमूरला — ‘माझ्या संसाराचा पिंजरा मला जगाएवढा अफाट पसरलेला’ — वाटतो.

तिला बरं वाटत होतं. विचार करते ‘मी जुन्या वळणाच्या घरातली मुलगी आहे. त्याहूनही जुन्या वळणाच्या घरची सून आहे. माझे मलाच समजेना की चांगला धडधाकट, कमावता नवरा असूनसुद्धा दुसऱ्या पुरुषाच्या स्पर्शानं आपल्याला आनंद कसा काय होतोय? एवढ्या काळचे सगळे संस्कार कुठे गेले? (५९) . . . अफझलनं थोडं थोडं करत माझं सगळंच घेऊन टाकलं. मी सुद्धा शरीर भरून त्याचा स्वीकार केला.’ (६०) . . . ‘मी ठरवून टाकलंय . . . अफझलच्या वीर्यानं आपण वीर्यवान व्हायचं.’ (६२) ही जाणीव पापाची आहे असं मला एकदासुद्धा वाटलेलं नाही. उलट वाटतं, हरूनचं जे देणं आहे तेच आपण त्याला परत करतोय. याचं नाव प्रतारणा नाही, व्यभिचार नाही. केवळ कर्जाची परतफेड आहे ही.'(६२). ‘शोध’.

आता गरोदर राहिलेल्या झुमूरची पत घरात एकदम वाढते. तिला कळून चुकते, ‘ही आपल्या पोटातल्या मुलासाठी. … संसारात बाईमाणसाला काहीच किंमत नाही.'(६८).

या प्रकारावर, झुमूरचं — तस्लीमाचं — भाष्य आहे — मननीय आहे. ‘हे लग्न नावाचं प्रकरण हनशी म्हणा की अफझलशी म्हणा की कुणा रहीम–करीमशी म्हणा की यदू-मधूशी म्हणा झालं, तरी परिस्थिती तीच राह्यली असती. ती एकच तर घाणी! बैल बदलल्यासारखं एकाच संस्काराचं पालन करत करतच गोल गोल फिरत राहून मरावं लागलं असतं.'(६८) झुमूरचे ध्येयवादी बाबा म्हणायचे, ‘आयुष्यात येणारी नाना प्रकारची वादळं सहन करायची ताकद आपल्यात असायला हवी. माणसाचे सामाजिक संबंध हेच त्याचं अंतिम ध्येय असणं काही बरोबर नाही. जो संबंध माणसाचे जन्मसिद्ध अधिकार छिनून घेतो, तो संबंध कधीच कल्याणकारी होत नाही.'(७१) आता स्थिती पालटली. झुमूरच्या मनात येतं, ‘लग्नानंतर याच्या किंचितशा दयेसाठी, किंवा करणेसाठी आपण आशेनं व्याकुळ व्हायचो. पण आता कशाची जरूर आहे? प्रेम वेळच्या वेळी नाही मिळालं तर अवेळी त्याचीसुद्धा चव कडवट होऊन जाते’. बाळंतपणाच्या वेळी हरूनचा व्याकुळलेपणा पाहून तिला हसू येतं. कुणाकरता तुला एवढा घोर लागून राह्यलाय? कुणाकरता? ते तर काही तुझं मूल नाही. तुझ्या मुलाचा तू स्वतःच खून केलायस. नि ज्याच्यावरच्या एवढ्या प्रेमापोटी तू बेचैन होऊन जातोयस, तो एका कणानंसुद्धा तुझा नाही’. (७५) दैवदुर्विलास हा की, मुलगा झाल्यावर सगळीजणं म्हणाली, हरूनपण म्हणाला, मुलगा दिसायला हरूनसारखा झाला. मुलाचं नाव अर्थात् वडलांच्या नावाशी मिळतं जुळतं ठेवलं गेलं. एवढ्या काळानंतर ‘आपण याच्या कुटुंबाचे एक सभासद बनलो. या मुलाकरवी’ याची जाणीव झुमूरला झाली. हनशी प्रतारणा केल्याबद्दल माफी मागण्याचा प चात्ताप करण्याचा प्र नच नव्हता. ‘त्या गुन्ह्याची सजा तर त्यानं देऊनच टाकलीय. एका गुन्ह्यासाठी दोनदा सजा मी का भोगावी?’ असा झुमूरचा सवाल आणि हरूनचे काय? त्याच्या ओठींच्या स्मितात बापपणाचा अभिमान झळकत असतो.

असे हे तस्लीमाचे कथाकाव्य आहे. आशयघन अल्पाक्षरी निर्मिती. स्त्रीपुरुष-संबंध, लग्न, पितृत्व, पुरुषप्रधान समाजातली विवाहसंस्था, स्त्रीची जागा यांवर मार्मिक भाष्य आहे. जागोजागी थबकून, अंतर्मुख होऊन तुम्ही विचारात पडता : खरंच, किती खरं आहे हे!

अशोक शहाण्यांच्या अनुवादाबद्दल दोन शब्द लिहिण्यासारखे आहेत. त्यांचा बंगालीचा व्यासंग आणि अनुवादाचा अनुभव लक्षात घेऊन सुद्धा. विचार करण्याची, प्रतिक्रिया व्यक्त करण्याची प्रत्येक समाजाची रीत वेग-वेगळी असते. हा वेगळेपणा दिसण्याइतकी अनुवादाची भाषा, वाक्यरचना वेगळी असू शकते. ती आपल्या कानांना कृत्रिम वाटू शकते. पण हे समर्थन लागू न पडण्या-सारख्या जागा या अनुवादात पुष्कळ आहेत ‘फिर्टेफाट’ शीर्षकापेक्षा ‘परतफेड’ ‘शोध’च्या जास्त जवळ जाते का? ‘ईंट का जबाब पत्थरसे’ एवढे त्यात यायला हवे. बोल-भाषेचा इथला आग्रह अस्थानी वाटतो. कबीराचा एक दोहा आहे :

माटी कहे कुम्हारको, तू क्या रोंढे मोय ।
एकदिन ऐसा आयेगा, जो मैं एंटू तोय ।।

आपल्याच बीजाच्या शुद्धतेबद्दल आग्रह धरणाऱ्या पुरुषाला ही माती-स्त्री-मनात आणले तर किती सहज थप्पड देऊ शकते! समजा ह्या गद्यकाव्यमय शैलीदार कादंबरीला ‘माटी कहे’ . . . असे नाव दिले तर? ही आपली एक सूचना.

इंग्रजी धाटणीच्या वाक्यरचना टाळता येण्याजोग्या आहेत. प्रस्तावनेतली ही एक पाहा. ‘या कादंबरीत हिंदू–मुसलमानांचा प्र न नाही. जरी तितकीच असहिष्णुता मात्र आहे.’ (पृ. ६)

आणखी काही नमुने : ‘चकरीच (चक्र, चक्री) जोपर्यंत हरूनच्या हाती आहे तेव्हा एक दिवस धाग्याला जरा ढील दिली तर काहीच फरक पडत नाही.’ (८३)
‘त्याच्या ओठांच्या ठेवणीत बापपणाचा अभिमान झळकून जातो.'(८०) ‘दोलनमधे पण एक अद्भुत हेवा चुळबुळ करायला लागलाय'(८०) आणि, ‘तुझं नाव आहे पापिया सुलताना. म्हणूनसाठी त्याचं नाव काय राफाएतुल सुलताना ठेवून चालेल का?’ (७६) तसेच, ‘हरूनचा हा सगळा व्याकुळपणा पाहून मला खूप हसू येतं.'(७५)

एकान्त ‘डिस्टर्ब’ करणारा, मराठीत ‘बेरंग’ करू शकतो. ‘बोहेमियन’ मन मराठीत ‘चाकोरीबाहेर’ जाऊ शकते. म्हणून वाटते, सिद्धहस्त लेखकांनी इंग्लिश शब्दाचा आश्रय का घ्यावा? असा मधून मधून प्रकार सोडला तर भाषांतर चांगले झाले आहे. मामा वरेरकरांचे वाचताना ठेचा लागतात. इथे तसे होत नाही. मराठीला तस्लीमाची — वंग वाङ्मयाची — आणखी एक मौल्यवान भेट दिल्याबद्दल अशोक शहाणेंना धन्यवाद.

(तस्लीमाचे झुमूरच्या तोंडून व्यक्त झालेले विचार येथे बरेच विस्ताराने दिले आहेत. वाचकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. संपा.)
[फिटम् फाट : तस्लीमा नासरीन, अनुवादक : अशोक शहाणे,
अक्षर प्रकाशन मुंबई-१६ :- पहिली आवृत्ती फेब्रुवारी २००० मूल्य : ७० रुपये]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.