पुतळा धुणारे आजचा सुधारकचे सल्लागार !

मी संपादकांना लिहिलेले पत्र व आ. सु. चे एक सल्लागार प्रा. भा. ल. भोळे यांनी त्यास दिलेले उत्तर संपादकांनी जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्याबद्दल संपादकांचे आभार मानतो. मी उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्याला प्रतिमुद्द्याने उत्तर देण्याऐवजी प्रा. भोळ्यांनी आपली राजकारणी संधिसाधू भूमिका विस्ताराने मांडून आम्हाला “अलबत्या गलबत्या’ संबोधून आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व मात्र अधिक उत्तुंग करून घेतले आहे ! मी प्रा. भोळ्यांचा शिवाशिवीवरील विश्वास व त्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झालेला तथाकथित विटाळ (?) धुऊन काढण्याची त्यांची कृती आ. सु. च्या वाचकांच्या निदर्शनास आणल्यामुळे त्यांचा तथाकथित तत्त्वचिंतकाचा व सुधारकाचा मुखवटा ढासळून त्याखालील त्यांचा उचापती संधिसाधू राजकारण्याचा चेहरा उघडा पडल्यामुळे, प्रा. भोळे फार व्यथित होऊन त्यांचे संतुलन बिघडल्याचे दिसते. आपल्या आ. सु.च्या सल्लागारपणाचा चेंडू त्यांनी फार चतुरपणे आ.सु.च्या सूत्रधारांच्या (?) पाटीत ढकलला आरे. ज्या बाबासाहेबांनी नासिकच्या काळाराम मंदिरातील मूर्तीच्या चरणी डोके ठेवण्याच्या सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रदीर्घ संघर्ष केला त्याच बाबासाहेबांच्या मूर्तीला एका विशिष्ट व्यक्तीचा स्पर्श झाल्याबरोबर तो पुतळा बाटला अशी हाकाटी पिटणाऱ्या स्वयंसिद्ध पुरोगामी विद्वानांच्या बुद्धीचे महाराष्ट्र दीर्घकाल कौतुक करील यात संशय नाही !
प्रा. भोळे यांनी, त्यांना सल्लागार मंडळावरून बरखास्त करावेच असे गर्भित आव्हानच आ. सु. च्या संचालकांना दिले आहे. यापूर्वी प्रा. कु. स्या बोधी (पूर्वाश्रमीच्या कुलकर्णी), प्रा. विश्वास कानडे, प्रा. विवेक गोखले यांची नावे सल्लागार- मंडळावरून काढून टाकलेली आहेतच. तेव्हा तोच उपाय प्रा. भोळे यांच्या बाबतीत करणे आ. सु. च्या संचालकांना जड जाऊ नये.
या प्रसंगी एक वाचक व एक विवेकी नागरिक म्हणून आ. सु.च्या संचालकांना माझे आवाहन आहे की त्यांनी प्रा. भोळे यांचेसारख्या उद्दाम, गर्विष्ठ व अंधश्रद्धा जोपासणाऱ्या आणि सवंग राजकारणी व्यक्तीला आपल्या सल्लागार-मंडळा-तून दूर सारावे.
आ. सु. ने आपली विवेकी, पुरोगामी, न्यायसंगत भूमिका बळकट करावी, अन्यथा आ. सु. ची संचालक मंडळीही तत्त्वनिष्ठेला वाऱ्यावर सोडून, राजकारण्यांना घाबस्न केवळ सोईस्कर बोटचेपे धोरण स्वीकारतात आणि नरसिंहरावांसारखे नाकर्तेपणाचे व बाजपेयींसारखे “जो जे वांछील, तो तें लाहो’ असे धोरण अवलंबितात असे वाचकांचे मत झाल्यास
आ चर्य वाटणार नाही.
संजीवनी खानखोजे, नासिक रोड, ४२२१०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.