लैंगिक वाङ्मय — एक तुलना (पूर्वार्ध)

(२२ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या विनंतीवजा लिहिलेला लेख)
या अवाढव्य विषयाचे समर्पक विवेचन करण्यास जरूर तितकें वाचन आम्ही केलेले नाही, हे प्रथमच सांगणे बरें. असे असूनहि असा विषय लिहावयास घेतला याचे कारण इतकेंच, की या विषयावर लेख लिहिण्याचे विनंतीला दुसऱ्या कोणीही मान दिला नाही. तेव्हा तो अपुरा वाटल्यास तो आमचा दोष नाही.
वाङ्मयांत सामान्यतः जरी फक्त लिखाणाचाच समावेश करण्याची पद्धत आहे, तरी त्या शब्दाचा मूल अर्थ पाहिल्यास त्यांत भाषणाचाही समावेश करणे जरूर आहे आणि कामविषयक बाबतींत याला महत्त्व आहे. कारण क्वचित् प्रसंगी जे बोललेले चालतें तें लिहिलेले चालत नाही, आणि कधीकधी जे लिहिलेलें चालतें तें बोललेलें चालत नाही. उदाहरणार्थ, नेहमी अचकटविचकट बोलण्याची ज्यांना संवय असते, ते आपल्या लिखाणांत तसले शब्द येऊ देत नाहीत आणि आजकालच्या कामविषयक शास्त्रीय लिखाणांत जरूर तेथे संस्कृत (किंवा यूरोपांत लॅटिन्) शब्द योजून जे लिहिलेले चालतें, तें शिष्टसमुदायांत बोललेले चालणार नाही. प्रसिद्ध इंग्रजी लेखक डी. एच्. लॉरेन्स याने एका कादंबरीत ‘समागम’ या अर्थाचा केवळ सुशिक्षितांसच समजेल असा लॅटिन् शब्द वापरण्याऐवजी सर्वांस कळेल असा चार अक्षरी इंग्रजी शब्द वापरल्याने त्याजवर खटला झाला. तेव्हा त्याने कोर्टात सांगितले की अशा प्रकारचे शब्द मला प्रचारांत आणायचे आहेत, कारण मी काय लिहितों तें सर्वांस कळावें अशी माझी इच्छा आहे. ही त्याची सबब न ऐकतां त्याला शिक्षा झाली. परंतु सर्वांस कळतील अशा शब्दांना ‘ग्राम्य’ अशी शिवी देऊन ते ‘अ लील’ कां ठरवायचे आणि त्याच अर्थाचे, फक्त शिष्टांसच कळणारे शब्द अ लील कां नव्हत हे कोणास सांगतां येईल काय? सोपी भाषा लिहिण्यासंबंधी आग्रह धरणाऱ्या श्री. भास्करराव जाधवांसारख्या लेखकांनी हा प्र न विचारांत घ्यावा. असे शब्द वापर-ण्याचा आग्रह धरून त्याकरितां शिक्षा भोगल्याचे लॉरेन्सचे एकच उदाहरण आमच्या माहितीत आहे. सामान्यतः अ लीलतेसंबंधी कितीही मतभेद झाला, तरी बहुतेक लोक अशा शब्दांना ‘अ लील’ म्हणतात. आणि जगांत अ लील असें कांहीं नसते असे आमचे स्वतःचे मत असले तरी, लीलतेसंबंधीच्या कायद्याची जर दुरुस्ती करायची झाली तर अ लीलतेची व्याख्या म्हणजे अशा शब्दांची एक यादी कस्न, हे शब्द वापरणे म्हणजे अ लीलता, असें म्हणावे लागेल. अर्थात् यालाही आम्ही मूर्खपणाच म्हणूं. मनुष्य आपल्या शैक्षणिक दर्जाप्रमाणे वेगवेगळी भाषा वापरतो, आणि अशिक्षित लोकांस कांही समजावून सांगायचे झाले तर ते त्यांना समजेल अशा भाषेत सांगावे किंवा लिहावे लागते, तेव्हा अशा भाषेलाही अ लील ठरविणे योग्य नाही. तेव्हा आमचे मते अ लीलतेचा कोणताही कायदा असूं नये. परंतु वरील प्रकारचा कायदा केल्यास त्याचा निदान अर्थ तरी समजेल आणि तो मोडायचा नसल्यास काय करायचे हे कोणालाही समजेल. हल्लीची स्थिति अशी आहे की आपल्या लहरीप्रमाणे वाटेल त्याला ‘अ लील’ म्हणण्यास न्यायाधीशांस मुभा असल्यामुळे, ते तसा निकाल देईपर्यंत, कोठे कायदेभंग झाला हे कोणास कळतही नाही. एखादा मनुष्य चालत असतांना त्याचे मागे रेघ काढून, ती मर्यादा ओलांडल्याबद्दल त्याला शिक्षा करा-यची, असें हल्लीच्या कायद्याने होत आहे. तें बदलणे इष्ट आहे याबद्दल दुमत होईल असे वाटत नाही.
लैंगिक वाङ्मय म्हणजे काय, आणि मथळ्यांत उल्लेखिलेली तुलना कर-ण्याची जरूर काय याचा प्रथम थोडा विचार करूं. वेगवेगळ्या समाजांत कामविषयक बाबतींत जे वेगवेगळे निबंध उत्पन्न झालेले आहेत, ते याच्या मुळाशीं आहेत, असें थोड्या विचारांती दिसेल. “हां! हात लावलास तर कापून टाकीन!” असें जेव्हा लहान मुलांना सांगतात, तेव्हापासून अशा निबंधांना सुरुवात होते आणि कामविषयक जीवन अनैसर्गिक होऊ लागते. तेव्हापासून अशा निषेधांमुळे त्या विषयाकडे विशेष लक्ष जाऊं लागते, आणि त्याची विशेष आवड उत्पन्न होते, आणि ही आवड वारंवार दाबली गेल्यामुळे ‘पातितोऽपि कराघातैस्पतत्येव कंदुकः’ (चेंडू हाताने खाली फेकला तरी जोराने वर उसळतो त्याप्रमाणे) या न्यायाने ती अधिकच वाढू लागते. ही आवड जरी नेहमी दाबावी लागते, तरी ती अगदीच बेफाम होऊ नये म्हणून तिला मधून मधून वाट द्यावीच लागते. ती आवड शिमग्याचे वेळी पुष्कळ लोक भराभर जननेंद्रियांची नांवें पुनः पुनः उच्चास्न पुरी करतात, किंवा साहित्य-संघाचे शिष्ट सभासद शरीरशास्त्रांत खोल शिरणाऱ्या लावण्यांची खासगी बैठक (स्त्रियांना आमंत्रण असेलसें वाटत नाही) कस्न पुरी करतात. परंतु अशा त-हेचा कांही पाट फोडल्या-शिवाय संभावित समजलेल्या लोकांच्या अंत:करणाला देखील शांति मिळत नाही असे दिसते. वास्तविक त्यांत गैर काहीच नाही. कोणत्याही कारणाने जर नैसर्गिक वासना दाबून ठेवणे जरूर पडत असेल तर अशा मार्गानीं तो दाब थोडा कमी न केल्यास त्या वासना मनाचा बांध फोडून, सामाजिक निर्बधांस न जुमानतां, मनुष्याला स्वैराचारास प्रवृत्त करतील. हे सामाजिक निर्बंध कशा प्रकारचे असावे किंवा मुळीच नसावे, हा प्र न अगदी वेगळा आहे. मॅलिनौस्की वगैरे लेखकांनी दिलेल्या वर्णनावरून असे दिसतें की असे निर्बंध फारच कमी असलेले प्राथमिक समाज जरी शास्त्रीय ज्ञानाचे दृष्टीने मागासलेले असले, तरी इतर कोणत्याही बाबतींत ते सुधारलेल्या समाजांस हार जाणार नाहीत. तथापि हा प्रस्तुत विषय नव्हे, तेव्हा तो येथेच सोडूं. सामाजिक निर्बधांतूनच लैंगिक वाङ्मय निर्माण होते, हे सहज समजण्यासारखे आहे. किंबहुना लैंगिक वाङ्मय म्हणजे काय याचा विचार केल्यास असे म्हणणे भाग आहे की ज्यांत कामवासनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे, ते सर्व लैंगिक वाङ्मय होय. त्यांत संभोगशृंगाराप्रमाणेच विप्रलंभशृंगार येईल, विवाहा-प्रमाणेच व्यभिचारही येईल, आणि उत्तानशृंगाराप्रमाणेच केवळ स्मिताचे वर्णन देखील त्यांत येईल. सारांश, शेकडा ९९ पेक्षाही अधिक नाटके, कादंबऱ्या, काव्ये, बोलपट वगैरे अशा वाङ्मयांत येतील; कामशास्त्राचे धडे देणारा ग्रंथ त्यांत येईल, व ब्रह्म-चर्याची महती सांगणारा ग्रंथही त्यांतच येईल. त्यांतील भाषा कितपत उत्तान असावी, याविषयी प्रत्येक भाषेचे नियम वेगळे सापडतील. सर्वांस न समजणारा शब्द ‘अ लील’ नव्हे, हा एक सामान्य नियम झाला. परंतु कोणत्या भाषेत कोठपर्यंत वर्णन चालतें, यासंबंधी मर्यादेत बराच फरक दिसतो, आणि या बाबतींत वेगवेगळ्या देशांतील लेखकांची मनःप्रवृत्तिही वेगवेगळ्या प्रकारची असते. इंग्रज व फ्रेंच लेखकांची तुलना केल्यास असे दिसते की ‘अ लील’ लिहिण्याची दोघांनाही मोकळीक दिल्यास सामान्यतः इंग्रज लेखकाची प्रवृत्ति शिमग्याच्या जातीच्या बीभत्सपणाकडे होईल, त्यांत कांही काव्य सापडणार नाही; परंतु फ्रेंच लेखक कितीही घसरला तरी त्यांत काव्य सापडेल. तसेच सामान्यतः उच्च दर्जाचा इंग्रज लेखक विनोदी लिखाणांत कामवासनेचा फारसा संबंध आणणार नाही; परंतु फ्रेंच लेखक कितीही सभ्य आणि कितीही उच्च असला, तरी तो हा विषय विनोदाला त्याज्य समजत नाही. अॅनॅतॉल् फ्रान्स् सारखा जगन्मान्य लेखक ज्या प्रकारचा विनोद सहज करून जातो, तसा विनोद इंग्रजाच्या लेखणीतून उतरणारच नाही. या दोन देशांतील लोकांच्या वृत्तींतील हा फरक सर्वत्र दिसतो. एका फ्रेंच नटीवर नग्न नृत्य केल्याबद्दल, व कंपनीच्या मालकावर या गुन्ह्यास मदत केल्याबद्दल फिर्याद झाली, तेव्हा तिने बचावाकरता सांगितले की मालकाने सांगितलेले काम केले पाहिजे अशी माझ्या नोकरीची अट आहे, त्याप्रमाणे मी केले. न्यायाधीशाने असा निकाल दिला की ती अटीप्रमाणे वागली, तेव्हा तिचा गुन्हा झाला नाही, आणि जो गुन्हा झालाच नाही त्याला मदत कशी करणार? म्हणून दोघांनाही सोडून दिलें! तसेंच एकदा रंगभूमीवर जिवंत नि चल चित्रे दाखवली, त्यांत एक स्त्री नग्न होती. तेव्हा व्यवस्थापकावर अ लीलतेबद्दल फिर्याद झाली. न्यायाधीशाने असा निकाल दिला की नि चल चित्रांत कांही अ लील असूंच शकत नाही, हालचाल असेल तरच त्यांत अ लीलता येईल. अशा प्रकारचे निकाल इंग्लडांतील कोणताही न्यायाधीश देणार नाही. हा केवळ कायद्यांतील फरक नाही, कारण कायद्यांतील शब्दांपेक्षा त्याचा अर्थ करणाऱ्या न्यायाधीशाच्या मताचे महत्त्व निदान असल्या बाबतीत जास्त असते.
इंग्लडांत देखील शेक्सपिअरच्या वेळच्या व त्याच्या अगोदरच्या लेखकांच्या नाटकांत कामविषयक फाजीलपणा पुष्कळ असे, आणि शेक्सपिअरच्या ‘ऑथेल्लो’-सारख्या प्रसिद्ध नाटकांत दोन पाठींच्या प्राण्याचा उल्लेख आहे. परंतु हा मनु पुढे बदलला, आणि कामविषयक बाबतींत शिष्टपणा आणि ढोंग वाढत गेले. ललित-वाङ्मयाचे बाबतींत हे ढोंग अजूनही कायम आहे, आणि त्यामुळेच वेल ऑफ लोन्लिनेस सारखें पुस्तक इंग्लडांत अ लील ठरले. वस्तुतः त्यांत कोणताही फाजील-पणा नाही. अगदी सभ्य भाषेत स्त्रियांचे समाकर्षण त्यांत दाखवले आहे, आणि केवळ एवढ्याच कारणावरून ते अ लील ठरवले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय दृष्ट्या लिहिलेली हॅवलॉक एलिस सारख्यांची पुस्तकें प्रथम इंग्लंडांत न छापतां अमेरिकेंत छापावी लागली आणि या लेखकाची पुस्तकें आता जरी इंग्लदांत चालतात, तरी नुकतेच एका डाक्तराने लिहिलेले कामविषयक पुस्तक अ लील ठस्न तें जाळून टाकले. या वेळी इंग्लंडांतील कांही बडे साहित्यिक पुस्तकाच्या बाजूने साक्ष देण्यास गेले होते आणि यांत कांही सामाजिक काम करणाऱ्या स्त्रियाही होत्या. पण जेथे जूरीने किंवा न्यायाधीशाने पुस्तक वाचण्याचे देखील कारण नाहीं असें उघडपणे म्हणणारे न्यायाधीश असतात, तेथे न्याय काय मिळणार? आणि असा न्याय असेल तेथे ज्ञानाचा प्रसार तरी कसा होणार? (अपूर्ण) समाजस्वास्थ्य, एप्रिल १९३८ वस्न, पृ. ३२१-२५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.