डॉ. आंबेडकर पुतळा-प्रक्षालन : एक लाक्षणिक कृती

विवेकवाद वाढवावयाचा असेल तर बौद्धिक लढ्यांबरोबर लाक्षणिक कृत्यांच्या माध्यमातूनही जनजागरणाचे प्रयत्न करावयाचे असतात ह्या श्री. भा. ल. भोळे यांच्या मताशी मी सहमत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर पुतळा धुण्यामागे हेच कारण होते. आ. सु.च्या सल्लागार–मंडळातून श्री. भोळे यांना काढण्याची चूक आजचा सुधारक करणार नाही याची मला खात्री वाटते.
भारताला पाकिस्तानसारख्या धार्मिक व फासिस्ट राज्यकारभाराकडे घेऊन जाण्याचा संघाचा मानस आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध लिहिणाऱ्या श्री. बा. के. सांवगीकर व श्री. रवीन्द्र विरूपाक्ष पांढरे यांना समजला नसेल असे नाही. विवेकवादाचा मुखवटा घालून संघिस्ट प्रवृत्तीला पोषक अशी कृती करणारे हे अरुण शौरी यांचे चेले भारतात व इथे अमेरिकेतही कमी नाहीत.
भारतीय घटना बाबासाहेबांनी लिहिली म्हणून त्याज्य म्हणणारे व “गंगेचे पाणी गटारातून वाहिल्यामुळे जसे अपवित्र होते तसेच घटना आंबेडकरांनी लिहिली म्हणून टाकाऊ” असे सांगणारे उच्चवर्णीय हिंदू १९५० सालीच होते व आज नाहीत असे नाही. अशी आंबेडकरद्वेषी मंडळी इथे अमेरिकेतही कमी नाहीत. दोन वर्षांअगोदर न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात — जिथून डॉ. आंबेडकरांनी १९२० साली Ph. D. घेतली — इथल्या भारतीयांनी पैसे जमवून इंडिया चेअर सुरू केली. डॉ. आंबेडकरां-सारखा बुद्धिमान नेता कोलंबियाचाच विद्यार्थी होता म्हणून त्या चेअरला डॉ. आंबेडकरांचे नाव द्यावे असे कोलंबिया युनिवर्सिटीनेच सुचविले, पण बाबासाहेबांच्या द्वेषामुळे इथल्या भारतीयांनी ती सूचना फेटाळून इथल्या भगवती नावाच्या एका प्रोफेसरचे नाव दिले. कुठे प्रो. भगवती व कुठे डॉ. आंबेडकर !
भारताची घटना बदलण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट फार जुना आहे. घटना बदलण्याकरता लागणारी २/३ मते नसताना घटना Review चे काम त्यांनी सुरू केले. आंबेडकर अनुयायांचा घटना बदलताना फार विरोध होईल हे ओळखून त्या अनुयायांची मानसिक क्षती करण्याची कारस्थाने बरीच अगोदर त्यांनी सुरू केली. श्री. अरुण शौरी यांच्याकडून Worshipping False Gods हे पुस्तक लिहून घेतले व त्याकरता त्यांना — लबाड्या कस्न खोटेनाटे लिहिले म्हणून — मंत्रिपद बहाल केले. अल्पसंख्यकांच्या भावना दुखवू नयेत म्हणून प्रत्येक देशातील बहुसंख्यक लोक काळजी घेतात. पण “Freedom of expression’ चा उदोउदो कस्न दलितांचे नुकसान, भारतीय बहुसंख्यकांनी व संघाने केले. आणि आता त्यांच्या सुरांत सूर मिळवून श्री. पांढरे व सावंगीकर तेच करीत आहेत.
श्री. अरुण शौरी यांची विधाने किती लबाड आहेत याचे दाखले श्री. य. दि. फडके यांनी त्यांच्या डॉ. आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी (लोक वाङ्मय गृह– एप्रिल १९९९) या पुस्तकात दिले आहेत. पांढरे, सावंगीकर यांनी ते वाचावे. श्री. फडके लिहितात :
“चुरचुरीत पण उथळ लेखन करणाऱ्या अरुण शौरी या धंदेवाईक पत्र-काराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चारित्र्यहनन करणारे एकतर्फी लेखन केलेले आहे.’ हे पुस्तक लिहिण्याचे कष्ट घेण्याचे कारण सांगताना ते म्हणतात, “महा-पुरुषाच्या पुतळ्यावर कावळे शिटतात तेव्हा कावळ्यांनी केलेली घाण काढून मूर्तीची साफसफाई करण्याचे कर्तव्य कोणाला तरी पार पाडावेच लागते.” (पाहा– या पुस्तकाचे मलपृष्ठ)
अनायासे त्यांचे हे वाक्य पुतळा धुण्याच्या या संदर्भात अगदी बरोबर बसते. श्री. सुदर्शन यांनी भोळे म्हणतात त्याप्रमाणे, पुतळ्याला हार घालण्याचे नाटक कस्न दलित — बहुजनांची दिशाभूल करण्याची जी स्टंटबाजी केली होती ती उघडकीस आणून पुतळा धुण्याचे कार्य करण्याची ज्वलंत गरज त्यांना भासली. पुतळा धुतला म्हणून श्री. भोळे व इतर मंडळीचे मी आभार मानतो.
विटाळ, शिवाशीव बौद्ध धर्मात नाहीत:
जुलैच्या आ. सु.च्या अंकात पुन्हा पांढरे, संजीवनी खानखोजे, गं. र. जोशी यांची पत्रे बाबासाहेबांचा पुतळा विटाळ झाल्यामुळे धुतला अशा आशयाने भरलेली आहेत. डॉ. आंबेडकर बुद्धधर्मीय होते. आम्ही व प्रा. भोळे व त्यांचे अनुयायी हिंदुधर्मातील शिवाशिवीच्या समजुतीवर विश्वासच ठेवत नाही. विवेकवादावर आधारित असलेला बौद्ध धर्म आ. सु.च्या या पत्रलेखकांना समजलाच नाही. म्हणून “उलटा चोर कोतवाल को डाँटे’ या प्रमाणे ते सर्व भोळ्यांवर तुटून पडले आहेत. शिवाशिवीची हिंदूंची शस्त्रे घेऊन हिंदूंवरच वार करण्याची किमया पुतळा धुवून केल्याबद्दल भोळे प्रभृतींनी विवेकवादाला साजेसेच काम केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. डॉ. बाबासाहेब, बौद्धधर्म व दलित यांच्याविरुद्ध विचारसरणी व कृती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चालकांस दीक्षाभूमीवर येऊ देऊन आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालू देण्याचा मान दिल्याबद्दल दीक्षाभूमी-कमिटीचे अभिनंदन करावयास पाहिजे. पांढरे, खानखोजे, जोशी यांच्या हिंदुधर्मात तर हिंदूंच्या अस्पृश्य बांधवांना बऱ्याच मंदिरात शिरकाव देखील करू देत नाहीत. त्यांच्या देवांच्या पुतळ्यांना पददलितांचा हात लागणे तर दूरच !
पांढरे म्हणतात तसे दीक्षाभूमी काही सार्वजनिक स्थान नाही. दीक्षाभूमीस लोकलाजेखातर सरकारने थोडीशी आर्थिक मदत दिली असेल पण अशी आर्थिक मदत सरकार बऱ्याच धार्मिक संस्थांना देते. परवाच मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुखांनी पंढरपूरयात्रा अनुदानासाठी पुढील वर्षापासून २५ लाखां ऐवजी ५० (पन्नास) लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा केली. मी ते “सकाळ’च्या जुलै १३, २००० च्या अंकात इंटरनेटवर वाचले. हजारो वर्षे आमचे जे दलित-पूर्वज यांच्याकडून सवर्णांनी फुकट काम करवून घेऊन व स्वातंत्र्यानंतर त्यांच्या labour ला फारच तुच्छ मोबदला देऊन हिंदुधर्मीयांनी व भारतीय सरकारने आमच्यावर अन्यायच केला आहे. आमचे देशाकडे अब्जावधी रुपये घेणे लागतात. तेव्हा दीक्षाभूमीला सरकारी मदत दिली तर त्यात काही विशेष नाही.
डॉ. आंबेडकरच घटनेचे खरे शिल्पकार :
डॉ. बाबासाहेबांसारख्या घटनातज्ज्ञांचे निधन होऊन जवळजवळ अर्धे शतक लोटले असले तरी त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याच्या कामात भारतीय विद्वान आज देखील गुंग आहेत, महाराष्ट्रीय त्यात अग्रेसर वाटतात. मला सावंगीकरांना हे सांगावयाचे आहे की आम्ही हे जाणतो की घटना लिहिण्यास बऱ्याच लोकांचा हातभार लागला. ते एक team-work होते. बाबासाहेबांनी तसे सर बी. एन. राव व एस्. एन्. मुकर्जीचे आभार मानलेच आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय घटना बनविण्यात मोठा वाटा होता म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कितीतरी लोकांचा हातभार लागला, भगतसिंगासारख्या कितीतरी शहिदांना मरावे लागले; सुभाषचंद्र बोसांसारखे कितीतरी नेते कामी आले, पण शेवटी नाव महात्मा गांधींचेच झाले ना? याचे कारण हेच की महात्मा गांधीचा वाटा, त्यांचे मार्गदर्शन हे सगळ्यांपेक्षा जास्त होते. तसेच घटना-निर्मितीच्या कामात बाबासाहेबांचे प्रयत्न जास्त होते; व घटना बनविण्यास लागणाऱ्या कायदेकानूंच्या ज्ञानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्रवीण होते. दलितांकरता १९२०-१९५६ पर्यन्त राजकारण करत असताना भारताच्या भावी संविधानाबद्दल डॉ. आंबेडकरांनी १९३० सालापासूनच अध्ययन व मनन सुरू केले होते. १९३० सालीच पहिल्या गोलमेज परिषदेत लंडनमध्ये भाषण करताना, “जोपर्यन्त येथे (भारतात) इंग्रजांचे राज्य आहे तोपर्यन्त आम्हास सत्तेत सहभाग मिळणार नाही. स्वराज्याच्या घटनेतच आमच्या हाती काही सत्ता येण्याचा संभव आहे’ अशा शब्दांत भारताच्या भावी घटनेच्या दृष्टीने त्यांनी आपला विचार मांडला होता. भारतीय समाजव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी अहर्निश झटणारे समाजसुधारक, विवेकवादाचे खंदे पुरस्कर्ते व लोकशाहीचे सर्मथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महापुरुष होते. अशा महापुरुषाने एकट्यानेच घटना लिहिली काय अशा वादात विवेकवादी सावंगीकर व पांढरे व त्यांच्या बंधूनी पडू नये. तसा काथ्याकूट करण्याची ही वेळ नव्हे. आजची बंधुभाव, स्वातंत्र्य व समता यांचे पुरस्कार करणारी घटना फेकून त्या जागी एक-चालकानुवर्ती व फॅसिस्ट घटना आणण्याचे संघाचे प्रयत्न सफल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याविरुद्ध घटनाकार आंबेडकारांच्या अनुयायांनी “घटना बचाव’ आंदोलन सुरू केले आहे. बुद्धिजीवी व विवेकवादी लोकांनी ह्या लढ्यात आंबेडकर अनुयायांची साथ द्यावी व देशास हुकूमशाहीकडे नेण्याचे संघाचे हे प्रयत्न हाणून पाडावेत.
16802 Shipshaw River Dr. Leander, TX 78641, U.S.A.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.