विद्वेषाने विद्वेष वाढतो

‘आजचा सुधारक’च्या जून २००० च्या अंकात नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात दोन पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. माझी ही प्रतिक्रिया.
विसाव्या शतकात भारतात (की हिंदुस्थानात?) लो. टिळक, गोखले, म. गांधी, पं. नेहरू स्वा. सावरकर, भारतरत्न आंबेडकर आदी थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्याविषयी सर्व भारतीयांना (केवळ हिंदूंनाच नव्हे) पुरेसा आदरभाव असणे अपेक्षित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी भारतीय घटनेच्या पुस्तकातच बंदिस्त आहे का? रा. स्व. संघाच्या प्रमुखांनी घटनेच्या समीक्षेच्या संदर्भात हिंदुत्वाची पुष्टी करणारे विधान करून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याबरोबर ब्राह्मणी पद्धतीने ‘शांत पापम्’ म्हणून पुतळ्याला स्नान घालण्यात कोणता पुरोगामीपणा आहे ? प्रा. भा. ल. भोळे विचारवंत आहेत. वादपटू आहेत. समयोचित भाषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. तरीही त्यांनी संघाचा एवढा द्वेष करावा हे पटत नाही.
हिंदुत्वात लांच्छनीय काय आहे? वर्णव्यवस्था? जातिव्यवस्था? अर्थात्! आधार भगवद्गीतेचा . . . ‘चातुर्वर्ण्य मया सृष्टं . . .’ हाच ना? मग ‘गुणकर्म- विभागशः’ या पदाचे काय? गीता सांगणारा कृष्ण काय ब्राह्मण होता?
हिंदूंची धर्मनिरपेक्षता तेवढी नाटकी ! का? सुदर्शनजींनी दीक्षाभूमीत येऊन तेथील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून एकात्मतेची जाणीव करून देण्यात दलित-बहुजनांची कोणती व कशी दिशाभूल केली यावर पत्रलेखकाने अधिक प्रकाश टाकला असता तर त्याला काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट झाले असते. धार्मिक आक्रमणां पासून हिंदूंचे सरंक्षण करण्याच्या हेतूने नागपुरातील हिंदू-मुस्लिम दंग्यांच्या पार्श्व-भूमीवर रा. स्व. संघाची स्थापना झाली हे सर्वश्रुत आहे. पण आमचे विवेकवादी पंडित हिंदू म्हणजेच ब्राह्मण असा गैरसमज करून घेऊन हिंदूंनाच तेवढे धारेवर धरतात. पुरोहितशाही नाही असा एखादा तरी धर्म अगर पंथ पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी दाखवून द्यावा. प्रत्यक्ष डॉ. आंबेडकरांनी भारतीय मुस्लिमसुद्धा कसे कट्टरपंथी आहेत हे त्यांच्या Why Pakistan? या पुस्तकातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुस्लिमां-विषयीची संघाची कटुता समजू शकते. पण बौद्ध धर्म (की धम्म?) हा हिंदू धार्मिक विचारांच्या विद्रोहातून उत्क्रान्त झाला. डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या दलितवर्गाला इस्लाम होण्यापासून परावृत्त करून बौद्धधर्माची दीक्षा दिली याबद्दल हिंदूंना त्यांच्याविषयी आपुलकी वाटण्यात अस्वाभाविक काय आहे? श्री. गंगाधर पानतावणे, श्री. रामानंद धेपे संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना अविचारी, निर्बुद्ध म्हणावे का? की बौद्ध आणि हिंदू यांच्या एकीकरणाचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिक्कार करायचा? की ‘संघं शरणं गच्छामि’ बौद्ध-प्रार्थनेतील वाक्याचा विपर्यास केल्याबद्दल त्यांना दोषी समजायचे?
भारतीय संविधानाच्या समीक्षेचा विचार हा राजकीय आहे. उभयपक्षी राजकीय आहे. वेगाने बदललेल्या परिस्थितीत आजवर घटनेला ज्या पाऊणशेहून अधिक दुरुस्त्या सुचविण्यात व मान्य करण्यात आल्या त्या अपुऱ्या पडत आहेत. म्हणून एकदा पुनरवलोकन करण्यात यावे, याला बऱ्याच पक्षांची संमती आहे. सर्वेक्षण समितीचा अहवाल लोकसभेपुढे ठेवला जाईल. मग याला विरोध कशासाठी? घटनेच्या गाभ्याला धक्का पोचवला जाणार नाही, असे पंतप्रधानांनी आश्वासन देऊनही अविश्वास? व्यक्ती मोठी की देश मोठा? घटनेच्या बळावरच आज देशात पक्षोपपक्षांचा बुजबुजाट झाला आहे. प्रादेशिक पक्षांना मान्यता देण्यात आली आहे. परिणामी कोणत्याही एका पक्षाला केंद्रात काय किंवा राज्यात काय स्वतंत्रपणे पाच वर्षे सुरळीत राज्यशकट चालवणे अशक्य झाले आहे. भ्रष्टाचाराला पायबंद घालणे अशक्य होत आहे. त्यासाठी केवळ कायदेशीर तरतूद अपुरी पडत आहे. यावर विचार व्हायला नको? सध्याचे कायदे अपराधाला पायबंद घालण्यात अडचणी निर्माण करणारे आहेत, असे पोलिस विभाग–प्रमुख बोलतात. घटनेने केवळ अधिकार (हक्क) प्रदान केले आहेत की कर्तव्याचा विचारही अभिप्रेत आहे? घटनेचे पुनरवलोकन करून यावर काही तोडगा काढता येईल का, हे ठरवण्याला विरोध का? ज्यांच्या धार्मिक श्रद्धा आणि निष्ठा भारताशीच निगडित आहेत त्या भगव्याला विरोध का? आपल्या देशात समान नागरी कायद्याला विरोध होतो. वेगवेगळ्या धर्माच्या समाजांसाठी वेगवेगळे कायदे कोणत्या तरी देशात अस्तित्वात असल्याचे ऐकिवात वा वाचनात आले नाही. कितीतरी बाबी आहेत ज्यांच्या निरसनासाठी, सोडवणुकी-साठी घटनेत काही तरतूद करता येईल का, यासाठी घटनेचे पुनरावलोकन, सर्वेक्षण केले जावे. स्वातंत्र्य लढ्यात लुप्त झालेली जातिविषयक अस्मिता स्वराज्यात अधिक बळावली. विषमतेला खतपाणी मिळाले. हे सर्व काय संघाने घडवून आणले?
आज राष्ट्रीय एकात्मता साधण्यात अनेक अडचणी आहेत. त्यांच्यावर मात करण्यासाठी समरसता मंच, दीनदयाल शोध संस्थान, वनवासी कल्याणाश्रम जे प्रयत्न करीत आहेत त्यामागे राजकीय हेतू असल्याचे निदान चुकीचे आहे. किंबहुना राजकीय असे लेबल लावायचेच असले तर यामागील राजकारण सामाजिक एकात्मतेचे म्हणावे लागेल. आदिम जाति सेवक संघाच्या कार्यापेक्षा वनवासी सेवाश्रमाचे कार्य सरस आहे. एक चांगले काम होत आहे म्हणून समाधान व्हावे की विद्वेष उफाळावा? डॉ. बाबासाहेब आणि दलित अशी त्यांची संलग्नता करणे हा त्या थोर विभूतीवर अन्याय होईल. म्हणून पुतळा धुऊन काढण्याची कृती ही प्रतीकात्मक म्हणूनही समर्थनीय ठरत नाही. प्रज्ञावंतांनी, पुरोगाम्यांनी आणि विवेकवाद्यांनी तरी हे विसरू नये.
‘भगवंत–निवास’
एल. बी १७, लक्ष्मीनगर, नागपूर — ४४० ०२२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.