विद्यार्थी सहायक संस्था – एका कृतिशील विचारवंताचे कार्य

पुण्यामध्ये जवळपासच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असते. अशा विद्यार्थ्यांना मदत करणारी ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’ नावाची एक संस्था गेली चव्वेचाळीस वर्षे पुण्यात कार्यरत आहे. ह्या समितीची स्थापना ज्या कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे झाली त्यांतील प्रमुख होते डॉ. अच्युत शंकर आपटे. ७ जानेवारी २००० रोजी डॉ. आपटे यांचे पुण्यात वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले. बी. ए. व एम्. ए. ला गणित हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम आलेल्या अच्युतरावांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, तुरुंगवास भोगला व परिस्थिती निवळल्यावर पुन्हा अभ्यासाला सुरुवात करून न्युक्लीअर फिजिक्समध्ये आचार्य ही पदवी मिळवली. पुढील संशोधनासाठी ते फ्रान्समध्ये गेले व डी. एससी. ही सर्वोच्च पदवी घेऊन १९५४ ५५ च्या सुमारास भारतात परतले. परत आल्यावर त्यांनी ‘सेन्ट्रल वॉटर ॲण्ड पावर रिसर्च सेंटर’मध्ये कामाला सुरुवात केली.

१९८२ मध्ये समितीला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने समितीनेच चालविलेल्या मैत्रीच्या पलिकडे ह्या नियतकालिकात डॉ. अच्युतराव आपटे ह्यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. तिचा गोषवारा पुढे दिला आहे. कृतिशील विचारवंत फार क्वचित् दिसतात. ह्या मुलाखतीत अशा एका व्यक्तीचे विचार प्रकट होत आहेत म्हणून आ. सु. च्या वाचकांकरिता ती प्रकाशित करत आहोत.

प्रतिनिधी —- समितीच्या कार्याची सुरवात १९५६ साली झाली. अशा प्रकारचे काम इथे सुरू करावे असे आपल्याला का वाटले?
आपटे —- सामाजिक स्तरावरील प्रयोग फ्रान्समध्ये पाहावयास मिळाला. तेथे विद्यार्थ्यांना — मी विद्यापीठीय शिक्षणासंबंधी बोलत आहे — शिक्षणशुल्कात तर असेच पण मोठ्या प्रमाणात जेवणखर्चात सवलत असे. व्यावसायिक भोजनालयाच्या पावपट पैशांत शासनाने चालविलेल्या विद्यार्थिनिवासात सर्व विद्यार्थ्यांना जेवण मिळे. त्यात गरीब श्रीमंत असा भेद नसे. फ्रान्समध्ये विद्यार्थि-साहाय्याची शासकीय व्यवस्था फार विस्तृत प्रमाणावर आहे. आरोग्य, खेळ, प्रवास याही गोष्टीत शासकीय साहाय्य एवढे मिळे की या गोष्टी सामाजिक व्यवस्थेचा भागच झालेल्या आहेत. मला असे वाटू लागले की या सर्व सोयींची जरुरी भारतात तर अधिकच आहे. १९५५ मध्ये पुण्यात परतलो. शासकीय आधारावर विद्यार्थि-साहा-य्याचा प्रयोग करावा असा विचार मनात आलाच नाही. सामूहिक प्रयत्नांतून काय करता येईल याचा विचार करून १९५६ च्या सुरुवातीस कामाचा आराखडा ठरविला. तो अगदीच साधा होता. मुलांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था अल्प दरांत करणे.

प्रतिनिधी —- समितीचे हे प्राथमिक उद्दिष्ट काय होते आणि आता काय आहे?
आपटे —- समितीचे उद्दिष्ट तेव्हा व त्यानंतर अनेक वर्षे, किंबहुना आज-देखील विद्यार्थ्यांच्या राहण्या– जेवण्याची सोय स्वस्त दरात करणे हेच आहे. हे काम आम्हास पुस्न उरलेले आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये समितीची तीन वसतिगृहे बांधून झाली. अनेक महाविद्यालयांतून भोजनालये सुरू केली. आज सुमारे ५०० विद्यार्थी समितीच्या स्वस्त दराच्या भोजनालयात जेवण घेत असतात. या सर्व उलाढालींमध्ये समितीच्या कामाचे सूत्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रमुख खर्चाच्या बाबींची तरतूद करणे व त्याद्वारे गरीब परिस्थितीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे शक्य करणे हेच आहे.

मानव्य आणि वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांचे वर्ग जेमतेम ३-४ तासांचे असतात. त्यामुळे उरलेल्या वेळात या शाखांच्या गरीब विद्यार्थ्यांना अल्प वा पूर्ण वेळाचे काम कस्न अर्थार्जन करता येते. या विद्यार्थ्यांना फारशी मदत करण्याची जरुरी नाही. त्यांना समितीने वगळले आहे असे नाही; पण त्यांना सामान्यपणे साहाय्य देऊ नये असे मात्र समितीचे धोरण आहे. (या शाखांतील विद्यार्थी एकंदर विद्यार्थिसंख्येच्या पाऊणपट असतात), जे विद्यार्थी शेतकी, अभियांत्रिकी, वैद्यक, शास्त्र, पदव्युत्तर अभ्यासक्रम, व अन्य उपयोजित शास्त्रे यांचा अभ्यास करणारे असतात त्यांच्यापैकी गरीब विद्यार्थ्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न गेली २५ वर्षे समिती करीत आहे.

प्रतिनिधी —- एवढ्या काळात समितीने आपल्या भावी उद्दिष्टांबद्दल आणखी काही विचार केला?
आपटे —- होय, गेल्या २५ वर्षांत आणखीही काही घडले आहे. कोणाला साहाय्य द्यावे, किंवा योग्य विद्यार्थी कोण या प्रश्नाचे उचित उत्तर शोधणे समितीच्या कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

ढ शिक्षणपद्धतीत स्वावलंबन, सत्य, कामसूपणा यावर भर नाही असे आम्ही फक्त म्हणतो. हे गुण निर्माण करण्याकरता समितीने प्रयत्न करणे जरूर आहे असे मला वाटते. गेल्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासार्थ समितीने काहीना काही प्रयत्न चालविले आहेत. हा प्रयोग अधिकाधिक यशस्वी व्हावा हे समितीचे यापुढचे उद्दिष्ट असणे योग्य होईल.

प्रतिनिधी —- उद्दिष्टांमधील बदलांच्यामागे काही सामाजिक आणि शैक्षणिक संदर्भ आहे का?
आपटे —- समितीचे काम आपल्या अंत:करणातील जाणिवांना समाधान देणारे आहे, समाजातील गरजांचा मागोवा घेणारे आहे आणि जी शैक्षणिक उद्दिष्टे आज मागे पडली आहेत त्यांचा पाठपुरावा करणारी ही संघटना आहे असे समितीचे रूप लोकांनी मानावे व ते आपण टिकवावे यात मी समितीची धन्यता मानतो. हा आदर्शवाद आहे असे आपणास कदाचित वाटेल. उद्दिष्टांना आदर्श मानणे हे काही प्रमाणात सोयीचे आहे. कारण आदर्शाप्रत कधीच पोचायचे नसते.

प्रतिनिधी —- समितीच्या विस्ताराचे काही महत्त्वाचे टप्पे सांगता येतील का? हे टप्पे परिस्थितीनुसार पडले की विकासाच्या पायऱ्या म्हणून?
आपटे —- गेली २० वर्षे विद्यार्थ्यांची संख्या स्थिर आहे. समितीच्या भोजनालयांना साहाय्य म्हणून जे पैसे मिळतात त्यांतून ५०० विद्यार्थ्यांनाच मदत करता येते. तेव्हा संस्थेचा आकारिक विस्तार न करता तो गुणात्मक व्हायला हवा आहे. विस्ताराचे टप्पे म्हणून असे म्हणता येईल की, स्वतःची भोजनालये सुरू केली. वसतिगृहे बांधली, विद्यार्थ्यांसाठी आरोग्यकेंद्र, मार्गदर्शन केंद्र सुरू केले. आणि आता फक्त स्वावलंबी विद्यार्थ्यांना मदत द्यावी हा विचार हे समितीच्या प्रगतीचे टप्पे मानता येतील.

प्रतिनिधी —- हे आर्थिक मदतीवाचून अडते आहे का?
आपटे —- आर्थिक मदतीसाठी खासच अडले नाही. केव्हा ना केव्हा तरी आर्थिक अडचणीतून मार्ग निघतोच.

प्रतिनिधी —- मग कल्पनेचे दारिद्र्य आहे हे कारण प्रगतीच्या आड येते का?
आपटे —- मला वाटते तेही तितकेसे खरे नाही. धाडस — धैर्य — नसणे, चिकाटीचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. समितीने सुरू केलेले २-३ कार्यक्रम योग्य कार्यकर्त्यांच्या अभावी अडले आहेत. 

प्रतिनिधी —- समितीच्या कार्याच्या विस्ताराची दिशा सापडल्यावर आर्थिक मदत मिळविली की मदत मिळाल्यानंतर वेगवेगळ्या योजनांची कार्यवाही सुरू केली?
आपटे —- कोणतीही मदत, केवळ आर्थिकच काय, ती मिळेपर्यंत कोणतीच संस्था थांबू शकत नाही. संकल्प ही संस्थात्मक जीवनाची खरीखुरी शक्ती आहे.

मी एक उदाहरण देतो : आठ वर्षापूर्वीपर्यंत समितीला नित्य वर्गणीद्वारा मिळणारे वार्षिक साहाय्य स्पये १५ २० हजारांबाहेर गेले नव्हते. महिना रु. १५ देणाऱ्या साहाय्यकांतर्फे आज वर्गणीची रक्कम वार्षिक एक लाख रुपयांच्या पुढे गेलेली आहे. खरोखरीच साहाय्यक आपल्या मागे धावत आहेत असा अनुभव या दोन सहकाऱ्यांना आला आहे.

प्रतिनिधी —- तुम्हाला पैशाची चिंता कधीच नसते का?
आपटे —- एखाद्या माणसाला पैशाची चिंता नसते हे म्हणणे तितकेसे योग्य नाही. समितीबाहेर मला अस्तित्व नाही. तेव्हा समितीला ज्या अर्थाने चिंता आहेत त्या अर्थाने आपटे ह्या माणसाला पैशाची चिंता आहे; गेल्या २५ वर्षांत समितीला सुमारे ५० लाख रुपये मिळाले. म्हणजे वर्षाला २ लाख रुपये सरासरी मिळाले असे आपण मानू या. याचाच अर्थ समितीला लोकांनी योग्य पाठबळ दिलेले आहे.

प्रतिनिधी —- केवळ मित्रांच्या आश्रयामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य येते का? समितीची एखादी कायम स्वरूपाची आर्थिक योजना असावी असे वाटते का?
आपटे —- समिती कुणाच्या अनुदानाकरिता थांबलेली नाही हे योग्य झाले नाही का? आश्रय हा शब्दही मला अयोग्य वाटतो. मित्रांच्या सामूहिक इच्छेचे वाहन ती झाली. ज्या इच्छेतून आजपर्यंत लाखो रुपयांचे साहाय्य समिती कडे सुपूर्त केले गेले ती इच्छा प्रबळ नाही का? शासनाने केवढेही अनुदान दिले तरी त्या अनुदानास सामूहिक साहाय्याची सर कधी येईल का? चौदा वर्षांपूर्वी समितीचे विद्यार्थिनीगृह उभारण्याकरिता साडेतीन लाख रुपये लागले. त्यापैकी एक लाखाचे अनुदान केंद्र सरकारने दिले, त्याचा आनंद झाला. दहा वर्षांनंतर रु. १८ लाख खर्चुन नवे वसतिगृह बांधले. त्यावेळी कुणाच्याही अनुदानाकरता समिती थांबली नाही. मित्रांचा परिवार संस्थेने योग्य उपक्रमांच्या बळावर वाढवत राहावा हे मला अधिक श्रेयस्कर वाटते, आपली अहंता पूर्णपणे विरली तरच इतरांना उपयुक्त काम आपल्या हातून होऊ शकेल.

प्रतिनिधी —- काहींना वाटते अशा टोलेजंग इमारती बांधण्याऐवजी साधी निवासस्थाने बांधून अधिक विद्यार्थ्यांची सोय करता आली असती
आपटे —- दोन प्रकारच्या गैरसमजुती आहेत. पहिली : इमारती छोट्या असाव्यात. दुसरी : त्या साध्या असाव्यात. शहरातील जागेवर एकमजली झोपड्या बांधणे हा जागेचा अपव्यय आहे. शिवाय विद्यार्थ्यांना फक्त झोपायला जागा लागते ही चुकीची कल्पना आहे. टेबल, खुर्ची, पुस्तके देणे म्हणजे सुखासीनता नाही. मला तर वाटते की या भिंतीवर खूप व सारखी बदलणारी चित्रे लावावीत.

सौंदर्याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात नकळत झाली पाहिजे. आम्ही ज्या परिस्थितीत काम केले त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पुढच्या पिढीने काम करावे व अधिक यश मिळवावे या अपेक्षेत मुळीच गैर नाही.

प्रतिनिधी —- या संस्थेत कोणती मुले येतात? ती कोणत्या प्रेरणा घेऊन येतात? ती येथून गेल्यावर मागे समितीच्या वसतिगृहात जे राहून गेले त्यांनी —- पुढे समृद्धी आल्यावर लहान–मोठ्या देणग्या दिल्या का? वळून पाहतात का?
आपटे —- समितीत येणारे विद्यार्थी सामान्यतः गरीब कुटुंबातील पण बुद्धिमान असतात. गरीब असल्यामुळे काही प्रमाणात थोडेसे अधिक महत्त्वाकांक्षी असतील. त्याचमुळे कदाचित ते नवीन प्रेरणांचा स्वीकार कमी प्रमाणात करतात. त्यामुळे त्यांच्या समितीमध्ये येण्यापूर्वीच्या व समितीतून बाहेर पडतानाच्या प्रेरणांमध्ये काही विशेष गुणात्म फरक असेल असे मला वाटत नाही. काही अपवादात्मक विद्यार्थी सोडले तर समितीमधील वास्तव्याचा परिणाम मानसिक प्रेरणा बदलण्यामध्ये झालेला आहे असे वाटत नाही.

प्रतिनिधी —- आपली समिती गावोगाव वाढावी असे तुम्हाला वाटते का?
आपटे —- विद्यार्थ्यांना साहाय्य करणाऱ्या संस्था गाबोगावी त्या त्या गावच्या लोकांनी उभाराव्यात आणि पुण्याच्या समितीने त्यांना शक्य ते सर्व साहाय्य द्यावे असे मला वाटते.

प्रतिनिधी —- विद्यार्थी साहाय्यक समितीची वाटचाल चालू असताना ‘फ्रान्स मित्र मंडळ’ आणि ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन’ यांसारख्या नव्या संस्था गेल्या १०-१५ वर्षांत निघालेल्या आहेत. त्यांची कल्पना समितीच्या कामातून निघाली का?
आपटे —- ह्या प्रश्नाचे उत्तर काहीसे ‘होय’ आणि थोडेसे ‘नाही’ असे आहे. समितीमध्ये काम करणारी काही मंडळी ह्या संस्थांमध्ये काम करायला लागली. इतरही मंडळी ह्या कामास मिळाली एवढ्या अर्थाने हे उत्तर ‘होय’ आहे. पण ह्या संस्थांची उद्दिष्टे समितीच्या कामातूनच निघाली आहेत असे मानू नये.

युरोपीय समाजात नव्या कल्पनांचे स्वागत करण्याचे धैर्य व औदार्य आहे म्हणून युरोपमधील समाजजीवन समृद्ध झाले आहे. ‘फ्रान्स मित्र मंडळ’ गेली १५ वर्षे काम करीत आहे. फ्रान्समधील विविध व्यवसायांतील सुमारे हजार स्त्री-पुरुष महाराष्ट्रातील अनेक गावांत येऊन राहून गेले आहेत. ही कल्पना आमच्या अपेक्षेबाहेर पुणेकरांनी उचलून धरली आणि उत्स्फूर्त सहकार्य दिले. तेच ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन’ ट्रस्टचे. भारतीय पण भारताबाहेर राहिलेल्या मित्रांमुळे ही संस्था उभी राहिली. विद्यार्थी साहाय्यक समितीतील शेतकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना रुढ नोकरीच्या मार्गापेक्षा वेगळा असा कार्यक्रमच तयार करून द्यावा या उद्देशाने ही संस्था उभी राहिली. आज या संस्थेतर्फे प्रायोगिक शेती, दुग्धव्यवसाय, ३०-३५ खेड्यातील बालवाड्या आणि बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण केंद्र, तंत्रशिक्षण केंद्र, या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत. एका कामामुळे निर्माण झालेला आत्मविश्वास दुसरी कामे अंगावर घेण्याकरिता प्रवृत्त करतो.

प्रतिनिधी —- आजपर्यंतच्या समितीच्या कार्यानुभवातून काय निष्कर्ष निघाले?
आपटे —- काही उपयोगी काम दिसले की समाजाचा पाठिंबा मिळतो. समितीतील ५०० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी १ लाख रुपयांचे प्रत्यक्ष साहाय्य समितीतर्फे मिळवून देण्यात येते. त्यापेक्षा अधिक साहाय्य अप्रत्यक्ष असते. ह्या साऱ्यासाठी लागणारा आर्थिक पाठिंबा पुण्यासारख्या शहरात उभारणे शक्य आहे हा विश्वास सार्थ झाला आहे.

दुसरा निष्कर्ष : कुठलाही पूर्वपरिचय नसलेली मंडळी १०-२० वर्षे एकत्र काम करीत आहेत. ह्या स्नेहामुळे हे गद्य काम विशेष आनंददायी झाले आहे. त्यांच्या गुणांचे वैविध्य संस्थेच्या कामात विशेष रंग आणते.

तिसरा निष्कर्ष विद्यार्थ्यांबद्दल आहे. ज्यांना खरोखरीच गरज आहे असेच विद्यार्थी समितीत येतात असे नाही. ‘शक्य तो फायदा पदरात पाडून घे’ अशी शिकवण बहुसंख्य पालक आपल्या मुलांना देतात. धनवान लोकही समितीच्या सुविधांची अपेक्षा करतात हे पाहिले की मन खिन्न होते.

शेवटचा एक निष्कर्ष म्हणा किंवा स्वतःची घातलेली समजूत म्हणा, सांगतो. दुसऱ्याकडून अखंड शिकत राहावे, बोध घ्यावा, अशी माझी वृत्ती आहे पण प्रसंगी ‘जाउं कुणाला शरण’ अशी स्थिती होते. कारण तरुणांच्या हितासाठी केलेल्या कार्यांची, विचारांची व प्रयोगांची संख्या अल्प आहे. हित कशात व मार्ग कुठला याचा सुस्पष्ट व संवेदनापूर्ण विचार क्वचितच आढळतो.

प्रतिनिधी —- आणखी २५ वर्षांनी समिती कुठे असेल?
आपटे —- ज्या व्यक्तीस शिक्षणात काही प्रयोग करावयाचे असतील त्यांना समितीचा आधार मिळावा. तसे कार्यकर्ते समितीत नित्य येत राहावेत आणि त्यांच्या कामातून व विचारातून समितीतील विद्यार्थी समृद्ध व्हावेत. ‘समितीमध्ये येऊन माझा आत्मविश्वास व संवेदनक्षमता वाढली, सभोवारच्या जगाबद्दल मला अधिक आत्मीयता वाटू लागली’ असे विद्यार्थ्यांनी भावी समितीबद्दल म्हणावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.