लैंगिक वाङ्मय — एक तुलना (उत्तरार्ध)

कामविषयक वाङ्मयाचे साहजिकच दोन भाग पडतात. एका अर्थी सर्वच ललितवाङ्मयाचा समावेश त्यांत होईल हे वर सांगितलेंच, व दुसरा भाग म्हणजे कामशास्त्रावर शास्त्रीय दृष्ट्या लिहिलेलें वाङ्मय. अशी पुस्तकें संस्कृतांत पुष्कळ आहेत, परंतु ती जुनी असल्यामुळे त्यांतील पुष्कळ विधानें आज पटणे शक्य नाही, व मराठींत आमचे स्वतःचे पुस्तकाशिवाय खरोखर आधुनिक शास्त्रीय दृष्टीनें, म्हणजे त्यांत नीति, धर्म वगैरे फालतू गोष्टी न आणतां, लिहिलेले दुसरें एकही पुस्तक आमचे माहितीत नाही, कारण डॉ. लेले व डॉ. मराठे यांच्या गुप्त रोगांवरील पुस्तकांचा यात समावेश करावा की काय हा प्र नच आहे. इंग्रजीत अशी पुस्तकें अलीकडे पुष्कळच झाली आहेत. फ्रेंच लेखकांची या विषयाकडे पाहण्याची दृष्टि अगदी अलीकडेपर्यंत शास्त्रीय नव्हती. कामुक चेष्टा व विनोद फ्रेंच भाषेत हवा तितका सापडेल. किंबहुना यांत फ्रेंचची बरोबरी कोणतीही भाषा करूं शकणार नाही. परंतु शास्त्रीय दृष्टीने लिहिलेली पुस्तकें फ्रेंचमध्येही अगदी अलीकडेच होऊ लागली आहेत. जर्मन भाषेत शास्त्रीय दृष्टीने कामशास्त्रावर लिहिण्यास सुरुवात बरीच लवकर झाली. मराठीत मात्र जननेंद्रियांची नांवें न घेतां शक्य तितका वाहियातपणा करणारे काही लेखक आहेत व प्रेमविषयक काव्ये लिहिणारे कविहि आहेत, परंतु शास्त्रीय लेखक फारच कमी. या बाबतींत वेगवेगळ्या देशांतल्या आचारविचारांचे प्रतिबिंब तेथील अ लीलतेच्या कल्पनांवर पडलेले दिसते. इंग्लडांत एका काळी स्त्रियांचा झगा रस्ता झाडीत असे आणि स्त्रीला पाय असतात हे कल्पनेनेच जाणावे लागत असे. नुकतीच झग्याची खालची मर्यादा गुडघ्याच्याही वर गेली होती, आणि झगा वाऱ्याने आणखी वर उडूं नये म्हणून तो खाली ओढून धरण्यांत यूरोपीय स्त्रियांचा एक हात गुंते (अलीकडे झग्याची लांबी पुनः वाढू लागली आहे). याचा परिणाम म्हणजे पूर्वी स्त्रीचे पाऊल देखील ‘अ लील’ असे, पण आतां गुडघ्याच्याहि किंचित् वरपर्यंत दिसले तरी चालतें. हा फरक आरोग्याचे दृष्टीने बरा आहे, असें लोक म्हणूं लागतात तोच उलट दिशेला फरक होत चालला!
एका काळी झगा जरी लांबच होता, तरी रात्री जेवणाचे व नाचाचे वेळी स्तनांचा चूचुकांच्या वरचा भाग उघडा असला पाहिजे असा शिष्टाचार असे, आणि तो कोणी झाकणे म्हणजे अ लीलता होती. हिंदुस्थानांत प्रांतभेदाने स्त्रीला चालती राहुटी बनवण्यापासून तो केवळ मध्यभाग झाकण्यापुरतें एक फडकें कमरेला गुंडाळण्यापर्यंत सर्व प्रकार सापडतात.
पुरुषांचा वेश पाहिला तर यूरोपांत त्यांना स्त्रियांचे मानाने फारच थोडी मोकळीक आहे. मात्र सकाळी नदीवर पोहायला जाणारे लोक पूर्ण नग्न असले तरी चालतात, इतकेच नव्हे तर कोणी सर्व कपडे न काढल्यास त्याची चेष्टा होते. या वेळी स्त्रिया त्या बाजूला जात नाहीत अशी समजूत आहे, आणि गेल्या तरी त्या न पाहिल्यासारखें करतात! मात्र इतर वेळी खमीसाची गळपट्टी नीट बांधलेली नसेल तर तशा स्थितीत स्त्रीशी बोलणे हा घोर अपराध होतो. फ्रान्समध्ये पोहतांना पूर्ण नग्न होण्याची पद्धत नाही, परंतु रशियांत पूर्वीपासून होती. अलीकडे यूरोपांत व अमेरिकें तही पुष्कळ ठिकाणी स्त्रीपुरुषांचे मिश्र नग्नसंघ निघाले आहेत, तेथे स्त्रीपुरुषांनी नग्न स्थितींत एकत्र पोहण्याची किंवा व्यायाम करण्याची पद्धत आहे. मात्र दंडुकेशाहीं-तील देशांत याला बंदी झाली आहे. जपानमध्ये लोकांना नग्नतेची सवय आहे आणि अशा स्थितींतहि स्त्रीपुरुष एकमेकांना लाजत नाहीत. घरांतील यजमान किंवा पाहुणा नग्न होऊन स्नानास गेला असतां नोकरिणीने येऊन पाणी बेताचें आहे की नाही असे विचारणे व त्याचे अंग चोळणे या नेहमीच्या सरावांतल्या गोष्टी आहेत. अलीकडे मात्र यूरोपीय लोकांस अशी सवय नसते हे समजल्यापासून तेथील नोकरिणींस, अशा पाहुण्यांचे स्नान चाललें असतां तेथे जाऊं नये, असा इशारा देतात. सार्वजनिक स्नानगृहांत स्त्रीपुरुष एकत्र नग्न स्नान करतात, फक्त मध्ये एक कांचेचा पडदा असतो, पण हल्ली कदाचित् हेही बदलले असेल. यामुळे इतर ठिकाणी नग्नतेचा जो बाऊ करतात तो जपानांत नसतो, आणि त्यामुळे जपानचे नुकसान तरी खात्रीने झालेले नाही. परंतु जपानांत नग्न चित्रांना मात्र मागणी नाही. फाजील निर्बंध असल्यामुळे काही विशिष्ट वेळी पाट फोडावा लागतो असें जें वर सांगितले, त्याचे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील बोलपटांतील चुंबनांची लांबी अतोनात वाढत चालली, परंतु जपानांत ती लांबी किती असावी यावर निर्बंध घातला.
या सर्वांचा वाङ्मयावर परिणाम अप्रत्यक्षच होतो असें नाही, तो प्रत्यक्षहि निःसंशय होतो. जेथे नग्न देह नेहमीच पाहायला मिळतो, तेथे नग्न देहाचे वर्णन देत बसण्यांत मुद्दा नाही. परंतु जेथे स्तनांचा भाग पदराने पूर्णपणे झाकलेला असला पाहिजे असें तत्त्व मान्य आहे, तेथे तो चित्रांत किंचित् बाजूला सरलेला दाखवणे किंवा लेखनांत तसें वर्णन देणे, यांत कांही अर्थ आहे. परंतु वरील तत्त्व मान्य असेल तेथे देखील तपशील बहुधा वेगळाच असतो, आणि कधी कधी पदर आखूड काढून तो नेहमीच बाजूला सरेल अशी कायमची योजना केलेली असते, तर कधीकधी जुन्या पद्धतीची चोळी असल्यास झिरझिरीत पदरांतून स्तनांचा काही भाग दिसतो, व ती किनखापाची असल्यास चकाकीमुळे अधिकच लक्ष जातें; आणि यामुळे कोणी पाहिल्यास ‘लोक पाहतात’ अशी तक्रारही करतां येऊन सर्वच हेतु साधतात.
अशा प्रकारची वर्णने देऊन वाचकांना खुष करणे हा पुष्कळ लेखकांचा हेतु असतो. प्रत्यक्ष संभोगाचे स्पष्ट वर्णन कोठेही सापडत नाही, याचे एक कारण कदाचित् अ लीलतेचा कायदा असूं शकेल, परंतु सामान्यतः रसिक वाचकांना त्यांत स्वारस्य वाटणार नाही, हेच त्याचे मुख्य कारण आहे. अशा त-हेचे वर्णन व काम-वासनेच्या अनैसर्गिक प्रकारांचेंहि स्पष्ट वर्णन आम्ही एकाच ठिकाणी पाहिले आहे व ते एका चोस्न विकल्या जाणाऱ्या इंग्रजी पुस्तकांत होतें. अ लील समजली जाणारी पुस्तकें फ्रेंचमध्ये पुष्कळ आहेत, व या बाबतींत कांही शिष्ट लेखक कालिदासाचेही कान उपटायला तयार होतात, परंतु त्यांना आम्ही अरसिकच समजतो. कालिदासाने काही लिहिले तरी त्यांत काव्य असते, व तसेंच फ्रेंच वाङ्मयासंबंधीहि म्हणता येईल. अशा प्रकारचे वाङ्मय आम्ही त्याज्य समजत नाही, आणि ज्यांना शिमग्यांत आपल्या शिष्टपणाला थोडासा विसावा देण्याची जरूर भासते, त्यांना तें त्याज्य वाटण्याचे कारण नाही. अर्थात् तथाकथित अ लीलतेचा आस्वाद घेण्याची पद्धत व्यक्तिशः वेगवेगळ्या प्रकारची असते. काही संभावित लोक सोवळेपणाचा आव आणूनहि असें वाङ्मय राजरोस वाचतात, कारण अ लील लिखाण हुडकून काढून त्यावर फिर्याद करण्याचा आपला उद्देश असतो, अशा बहाणा केल्याने चोस्न वाचण्याचे कारण
राहत नाही. नग्न शरीर पाहण्यांत आपल्याला आनंद होतो, हे प्रामाणिक लोक कबूल करतात. परंतु काही शिष्ट लेखक, नृत्याचे वेळी स्त्रीच्या शरीराचा कोणता भाग हलला तरी त्यांत अ लीलता येत नाही, व कोणता हलला असतां अ लीलता येते, याचे बारकाईने वर्णन देतात आणि तरी आपला शिष्टपणा कायम राहिला असे समजतात! स्त्रीच्या झग्याची लांबी किती असावी हे पोप जेव्हा फूटपट्टी वस्न ठरवतो तेव्हा तो ‘अ लीलतेचाच’ आस्वाद घेतो.
हिंदुस्थानांत हे अ लीलतेचे ढोंग इंग्रजी अंमलापासूनच आलेले असावे असे दिसते. त्यापूर्वी मराठी लेखक बिलकूल सोवळे नव्हते, आणि जुन्या मराठी कवींचे बहुतेक लिखाण जरी धार्मिक स्वरूपाचे असले तरी रामायणमहाभारतावस्नच मराठीत बरीच काव्यरचना झाली असल्यामुळे ललितलेखनास जागा नव्हती असें नाही. ज्या एकनाथाने श्रीकृष्णाच्या गोपींसमवेत क्रीडांना व सक्मणीवरील प्रेमालाही आध्यात्मिक कलाटणी देण्याचा प्रयत्न केला, त्याच एकनाथाच्या लिखाणांतून एक ‘अ लील’ उतारा आणि तसाच एक वामनाचे लिखाणांतीलही उतारा एकाने आमचे-कडे पाठवला होता, आणि हे तर सर्वमान्य लेखक आहेत. परंतु नंतर इंग्रजी शिकलेल्या लोकांची प्रवृत्ती इंग्रजांचे अनुकरण करण्याकडे होऊ लागली, आणि या प्रवृत्तीची मर्यादा कोठपर्यंत जाईल याचा निगम नसतो. उदाहरणार्थ जननेंद्रियें अ लील म्हणून युरोपांत नग्न पुतळ्यांची इंद्रियें अश्वत्थपत्रांनी झाकण्याची लाट आली, आणि यामुळे ती गरीब बिचारी झाडाची पाने अ लील झाली! तसेंच ‘परसाकडे’ हा शब्द प्रथम शिष्टांनीच सुरू केला असला पाहिजे. पुढे तो अ लील वाटू लागला म्हणून ‘शौच’ हा पवित्र शब्द वापरांत आला. तोहि आता काहींना अ लील वाटतो!
कशा प्रकारची भाषा वापरावी, हे नेहमी वाचकांच्या व लेखकांच्या अभिरुचीवरच अवलंबेल, आणि जें लोकांना खरोखरच नापसंत असेल ते कोणी लिहिले तरी त्याचा खप न झाल्यामुळे आपोआपच मागे पडेल. त्याकरतां कायदे कस्न निरर्थक निर्बंध घालण्यात कोणतेहि तत्त्व साधत नाही. आमचे मतें मनुष्यास शक्य तितकें स्वातंत्र्य दिल्याने व निरर्थक नियम न केल्यानेच मनुष्याचा सर्व दृष्टींनी विकास होईल, आणि हेच ध्येय कायदे करणारांनी लक्षात ठेवले पाहिजे. नपेक्षा टपालखात्या-सारखे काहीतरी नियम करायचे म्हणून केले, म्हणजे त्यांचा कोणालाहि उपयोग न होतां सर्वांसच त्रास होतो. (समाजस्वास्थ्य, मूळ शीर्षक : पौरस्त्य व पा चात्त्य लैंगिक वाङ्मयाची तुलना,
एप्रिल १९३८ वस्न, पृ. ३२५ ते ३२९)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.