निष्ठा : दोन पैलू

अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा पुढे चालविली होती.
अॅरिस्टॉटल एकदा आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गात तत्त्वज्ञानाची चर्चा करीत असताना एका विद्यार्थ्याने प्लेटोचे विधान त्याच्या तोंडावर फेकून अॅरिस्टॉटलला पेचात आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण पुन्हा त्या विद्यार्थ्याने प्लेटोचा आधार घेऊन आपला हेका जेव्हा चालूच ठेवला तेव्हा मात्र अॅरिस्टॉटलने आपल्या मनाचा तोल जाऊ न देता त्याला शांतपणे सुनावले, “मला सॉक्रेटीस प्रिय आहे, प्लेटोही प्रिय आहे, (amicus Socrates, amicus Plato : Sed Magis Amica Verites) पण सत्य सर्वाधिक प्रिय आहे”.
आज जगाला अॅरिस्टॉटलच्या ह्या उपदेशाची फार जरूरी आहे. कारण आज आपल्या नेत्यांची मर्जी संभाळून आपला स्वार्थ साधून घेणाऱ्या लाळघोट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यात गर्क झालेल्या ह्या महाभागांना तत्त्वनिष्ठेचा बळी देताना जराही लाज वाटत नाही. पण जागतिक इतिहासात स्वार्थाने अंध होऊन देशद्रोह करणारे अथवा आपल्या नेत्यांना सरकारच्या हवाली करणारे भारतीय जसे पाहावयास मिळतात तसेच पा चात्त्य देशांतही असे सत्यनिष्ठेचा अभाव असलेले पुरुष आढळतात. संताजी घोरपडेवर छापा टाकून त्याचा शिरच्छेद करून त्याचे मुंडके औरंगजेबाच्या स्वाधीन कस्न त्याबद्दल इनाम उपटणारा नागोजी माने हा संताजीसारखा मराठाच होता. पण स्वराज्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या संताजी घोरपडे व धनाजी जाधव ह्या शूरवीरांवर नागोजीच्या स्वार्थाने व सूडाने मात केली. तीच गत तात्या टोपे ह्याची झाली. तो झोपला असताना त्याला पकडून देऊन ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्याचा पराक्रम करून दाखविणारा हाही भारतीयच होता. येशू ख्रिस्ताला रोमन अधिकाऱ्याच्या हवाली करणारा ज्यूडस व त्याला वधस्तंभावर लटकविण्याचे पाप करणारा हा येशूच्या १२ शिष्यातील एक पट्टशिष्यच होता. त्याने ३० सोन्याच्या नाण्यांसाठी देवमानव असलेल्या आपल्या गुरुला दगा दिला होता. नंतर पापक्षालनासाठी त्याने आत्महत्या केली! आपल्या स्वार्थासाठी देश, मित्र व आपलेच बांधव ह्यांचा बिनदिक्कत-पणे बळी देणाऱ्यांना कसलेच सोयरे-सुतक नसते. स्वार्थ हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव झालेला असतो. त्यासाठी ते कुणाचीही पर्वा करीत नाहीत. राजकारणांत अशा लोकांचा बुजबजाट झालेला असतो. आ चर्याची गोष्ट म्हणजे अत्यंत बुद्धिमान अन् उच्च हुद्द्यावर असलेल्या व्यक्तीसुद्धा ह्या मोहाला अनेकदा बळी पडलेल्या आढळतात. अमेरिकन इतिहासातील एक अत्यंत लांछनीय प्रकरण म्हणजे वॉटरगेट प्रकरण. माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन हा अनेक अर्थाने चाणक्याचा शिष्य होता. साम, दाम, दंड व भेद ह्याचा उपयोग करून आपले राजकीय हेतु साधण्याची कला त्याने राष्ट्रपती होण्यापूर्वीच उत्तम प्रकारे साध्य केली होती. आपल्या सिक्स क्रायसिस ह्या पुस्तकात नेत्याला लागणाऱ्याला अनेक गुणांची यादी तयार करून त्यांत एक महत्त्वाचा गुण म्हणजे व्यक्तिनिष्ठा ह्याचा प्रामुख्याने उल्लेख येतो. अन् राष्ट्रपती होताच त्याने त्याच्या हाताखाली काम करणाऱ्यांकडून तशाच प्रकारच्या आंधळ्या निष्ठे ची अपेक्षा ठेवली होती. अन् वाटरगेट प्रकरणाचे बिंग जसजसे बाहेर पडू लागले तसतसे त्याने एकामागून एक त्याला शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या साऱ्या साथीदारांचे बळी दिले. त्यावेळचा उपराष्ट्रपती, अमेरेकेचा कायदामंत्री, निक्सनचे दोन सल्लागार व त्याचा मुख्य शासनाधिकारी ह्या सर्वांना वॉटरगेट प्रकरणी शिक्षा करण्यात आली होती. ही सगळी बुद्धिमान माणसे निक्सनवरील आंधळ्या निष्ठेने स्वतःचे सिद्धान्त व स्वतःची अक्कल गमावून बसले होते. नंतर हीच मंडळी निक्सनवर उलटली. पण व्हाईट हाऊसमध्ये सत्ताधारी असताना ह्या मंडळींना निक्सनचे दोष दिसत असूनही ते मूग गिळून चूप राहिले. ह्या लोकांच्या लज्जास्पद वर्तनाचा अर्थ कसा लावावयाचा? त्याचे उत्तर एकच : स्वार्थ!
ह्या स्वार्थापायीच दुर्योधन व त्याचा आंधळा बाप हे दोघेही आपण होऊन पांडवांवर सूड घेण्यास प्रवृत्त झाले. जेव्हा विदुराने दुर्योधनास समजविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दिलेले उत्तर अविस्मरणीय असेच होते. “जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः । जानामि अधर्मम् न च मे निवृत्तिः।” आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या शोकांतिकेचे वर्णनच जणू काय दुर्योधन करीत होता. “कळतं पण वळत नाही” तशातलाच हा प्रकार! स्वार्थाचा अतिरेक माणसाला सन्मार्गावर जाऊ देतच नाही. तरीही वैयक्तिक स्वार्थावर मात करून सिद्धान्ताची मशाल हातांत धस्न जगाला न्यायमार्गावर येणारे नेतेही जगाच्या इतिहासात काही कमी नाहीत. इंग्लडच्या राजाला आव्हान देऊन त्याला धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध करणारा १२ व्या शतकांतील कँटरबेरीचा धर्माध्यक्ष बेकेट हा आपली कातडी वाचविण्या-ऐवजी येशूचे नाव घेत घेत सरळ मारेकऱ्याच्या हवाली आपला देह अर्पण करून ह्या जगाचा निरोप घेतो. त्याने राजनिष्ठा व व सत्यनिष्ठा ह्यांमध्ये संघर्ष होताच श्रेष्ठ, नैतिक असा सत्यनिष्ठेचा अत्यंत धोक्याचा मार्ग पत्करून जीवनदान केले. आज इंग्लडच्या इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. १७६१ च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा तोफखाना संभाळणारा इब्राहीम गारदीही हा आपल्या स्वामिनिष्ठेसाठी स्वखुषीने शहीद झाला होता. तो मुसलमान असूनही शेवटपर्यंत मराठ्यांना एकनिष्ठच राहिला. शत्रूवर तोफांचे गोळे फेकून त्याने । अबदालीच्या जास्तीत जास्त मुस्लिमांना ठार केले होते. त्याला लाच देऊन व सोईस्करपणे इस्लामची आठवण करून देऊन आपल्या पक्षात खेचण्याचा अटोकाट प्रयत्न अबदालीने नजीबच्या मार्फत केला होता. पण त्याला इब्राहीम मुळीच बळी पडला नाही. पण शेवटी त्याच्या जखमांत मीठ चोळून त्याची हत्या करण्यात आली. इब्राहीमच्या निष्ठेने जात, धर्म ह्यांची बंधने उल्लंघन केली होती. त्याची निष्ठा पेशव्यांशी एकरूप जरी झाली होती तरी आपण ज्या बाजूने लढाई करीत आहोत ती बाजू न्यायाची आहे अशी त्याची खात्री झालेली असल्याने तो पैशाच्या मोहाला बळी पडला नाही.
ह्याच्या उलट आमचे भीष्म पितामह! पांडवांची बाजू न्यायाची आहे हे जाणूनही व द्रौपदीच्या चारित्र्याच्या कौरवसभेत चिंधड्या उडविल्या जात असताना आणि “माझा नवरा जो द्यूतात हरला आहे त्याला आपल्या पत्नीला द्यूतात पणाला लावायाचा अधिकार आहे काय?” ह्या तिच्या प्र नाला सरळ उत्तर देण्याऐवजी भीष्म तो तमाशा मुकाट्याने पाहत मल्लीनाथी करतात, “अर्थस्य पुरुषो दासः, दासः अर्थो न कस्यचित.” भीष्म ह्यांचे वर्तन निव्वळ पैशासाठीच झाले होते असे जरी वाटत नाही तरीही त्यांचे वर्तन नैतिकदृष्ट्या समर्थनीय नव्हतेच. पण त्यांची कौरवपक्षावरील निष्ठा नकली व आंधळी नक्कीच होती. भीष्मांनी स्वतःची कातडी वाचविण्यासाठी असे लज्जास्पद वर्तन केले असेही म्हणता येत नाही. कारण त्यांचे शौर्य अलौकिक होते. मग भीष्माने असे अशोभनीय वर्तन का केले ह्याचे उत्तर मिळत नाही. एक गोष्ट मात्र नि िचत. त्यांनी आपल्या स्वामिनिष्ठेपायी सत्याचा बळी दिला! आपला अन्नदाता हा धडधडीत अन्याय करीत आहे हे दिसत असताना त्याचे अन्न खाल्ले म्हणून त्याला नमकहलाल राहून व सत्याचा बळी देऊन नंतर शरपंजरी पडल्यापडल्या आपल्या आवडत्या शिष्यांना नीतीचे पाठ देणे हे त्यांना कसे जमले?
सॉक्रेटीस ते अॅरिस्टॉटलपर्यंतच्या साऱ्याच ग्रीक नेत्यांनी सद्गुणांचे बीज पेरण्यासाठी शिक्षणावरच जादा भर दिला होता. गेल्या ५० वर्षांत भारतात प्राथमिक शिक्षणापासून ते विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक सुधारणेसाठी नेमण्यात आलेल्या साऱ्याच चौकशी समित्यांनी नेहमीच चारित्र्यसंवर्धनावरच भार दिला. तरीही आज प्रत्यक्षात सार्वजनिक क्षेत्रात (विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात) प्रकर्षाने चारित्र्याचा अभाव दिसून येतो. स्वार्थाने बुजबुजलेल्या लोकांनी आज शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र विटाळून टाकले आहे. ह्याचा अर्थ काय? हा शिक्षणाचा दोष की आमचे “सुशिक्षित” स्वतःच्या स्वार्थापायी त्यांना मिळालेल्या शिक्षणावर “शी” करीत आहेत?
ह्याचा अर्थ इतकाच की लोकांना सत्यनिष्ठ करण्यासाठी व त्यांच्या स्वार्थाला आळा घालण्यासाठी शिक्षण कुचकामाचे जरी नसले तरी अपुरे पडते हे नि िचत. मानसशास्त्राचा महान् सिद्धान्त कोणता असा प्र न मला कोणी जर केला तर मी त्याला सांगेन : “माणसाच्या वागण्यावर व त्याच्या वर्तनावर बवंशी त्याच्या स्वार्थाचाच पगडा जास्त असतो. त्याच्या दृष्टीने बाकी साऱ्या गोष्टी गौण असतात.” ह्या नियमाला फक्त बेकेट व गॅलिलिओ सारखे काही महात्मे अपवाद असतात. त्यामुळेच अॅरिस्टॉटल-सारख्या व्यक्तीपेक्षा सत्यनिष्ठेवर भर देणाऱ्या पंडितांचा सार्वजनिक जीवनात पराभव झाल्यासारखे वाटते व आंधळ्या व्यक्तिनिष्ठेचा उदोउदो करणाऱ्या निक्सनसारख्या नकली नेत्यांचे पारडे जड ठरते ही एक सार्वजनिक शोकांतिकाच नाही का? म्हणूनच सत्यनिष्ठेसाठी “बट इट डझ मूव्ह’ असे त्याच्या धर्मगुरुला शेवटपर्यंत सुनावून आपल्या शास्त्रीय सिद्धान्तालाच चिकटून राहून दीर्घ कारावासाची शिक्षा भोगण्यास तयार झालेला गॅलिलियोसारखा मानव मला श्रेष्ठ वाटतो. पण मला एक प्र न पडतोः कोणत्या रसायनाने अशी माणसे घडविता येतात?
श्रीकृष्ण अपार्टमेन्टस नं. २, पोलिस परेड ग्राउंड समोर, खारीबाब, वडोदरा — ३९० ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.