श्री. ह. चं. घोंगे ह्यांच्या लेखाला (ऑ. २०००) हे माझे उत्तर

स्त्रियांच्या योनिशुचितेला दिल्या गेलेल्या अवास्तव महत्त्वाची स्त्रियांनी जबरदस्त किंमत मोजली आहे. माझ्या मते स्त्रियांना योनिशुचितेच्या कल्पनेच्या बेडीतून मुक्त करण्याची अत्यंत जरुरी आहे. त्यामागचे हेतू श्री. घोंगे लिहितात त्या लेखापेक्षा पूर्ण वेगळे आहेत.
१. विवाहपूर्व, विवाहित अथवा वैधव्यात कामेच्छा पूर्ण करण्यास संधी स्त्रीला मिळावी हा माझा हेतू नाही.
२. “अनोळखी स्त्रीपुरुषांनी जवळीक साधायची कशी?” “साठी उलट-लेल्या स्त्रीपुरुषांना परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झाले तर रतिक्रीडेत गुर-फटण्याचे क्षण शोधायचे कसे?’ हे प्र न श्री. घोंगे विचारतात. हे प्र नही मला अप्रस्तुत (irrelevant) वाटतात. लैंगिक मुक्तीचा हेतू मुक्त कामजीवन (माझ्या मते) आज तरी नाही.
३. “सखीबंधन’ ही वाचक-मेळाव्यातली कल्पना स्वप्नरंजन करण्यासाठी ठीक आहे. पण माझ्या सख्यांना, बहिणींना, मुलींना व त्यांच्या सख्यांना सखीबंधनात अजिबात रस नाही.
आता लैंगिक मुक्तीची जरूरी मला का वाटते हे थोडक्यात लिहिते —-
१. योनिशुचितेची कल्पना ही स्त्रियांवर जन्मल्यापासून मृत्यू होईपर्यंत रोखलेली बंदूक आहे. समाजातील कुठलाही पुरुष (अथवा स्त्री) एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यहननासाठी (हा दिवाकर मोहनींचा शब्द) ती वापरू शकतो.
२. स्त्रीला इच्छा नसताना योनिशुचितेच्या कल्पनेमुळे पुरुषांच्या वासनेस बळी पडावे लागते. या पुरुषांत नवरा व इतर कुटुंबातील पुरुषांचा समावेश आहे. पुष्कळदा चारित्र्यहननाच्या भीतीमुळे स्त्री पतिव्यतिरिक्त पुरुषाच्या वासनेची परत-परत शिकार होते.
३. स्त्रीला स्वतःच्या शरीरावर ताबा हवा. (शरीरात मी योनीचा सामावेश करते.) तिला इच्छा नसल्यास कोठल्याही पुरुषाला, कुणाचीही भीती न बाळगता लैंगिक संबंधांना ‘नाही’ म्हणता आले पाहिजे. आज योनिपावित्र्याच्या कल्पनेमुळे स्त्रियांची मुस्कटदाबी होते. त्या इच्छेविरुद्ध लग्न करतात, जुलमी नवऱ्याच्या व सासरच्या जाचात छळ सोसतात, इच्छेविरुद्ध समागमास सामोऱ्या जातात.
वर मांडलेली समाजातील परिस्थिती बदलण्यासाठी मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे. श्री. दिवाकर मोहनींच्या लेखात (ऑ. २०००) शेवटून दुसऱ्या प्याऱ्यात या प्र नाचा उत्तम ऊहापोह आहे. सोने मूल्यवान म्हणून कुलुपात बंद होते तशी स्त्री योनिपावित्र्याच्या कल्पनेमुळे कुलुपात बंद झाली आहे.
श्री. दिवाकर मोहनी यांनी या विषयावर (खऱ्या स्त्रीमुक्तीसाठी योनि-शुचितेची नीतिबद्धता नाहीशी होण्याची आवश्यकता आहे.) परत परत आजच्या सुधारकमध्ये लेख लिहिलेले आहेत. तरीसुद्धा स्त्रीच्या योनिशुचितेचा उल्लेख आला की ‘स्वैराचार’ ‘सखीबंधन’ अश्या धर्तीची चर्चा चालू होते.
आजचा सुधारकच्या सुशिक्षित वाचकवर्गाला आपल्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती दिसत नाही का? त्यांच्या घरातील बायकांशी, मुलींशी ते बोलत नाहीत काय? योनिशुचितेच्या कल्पनेने आजच्या सुधारकचा शिक्षित (enlightened) वाचकही एवढा भास्न गेलेला आहे का, की त्याला योनिशुचितेच्या कल्पनेमुळे समाजात प्रचलित असणारी अन्याय्य परिस्थिती डोळसपणे बघता येत नाही?
“दिवाकर मोहनींच्या लेखात पुस्पी कामवासनातृप्तीचा सोस अधिक जाणवतो” असे विधान श्री. घोंगे करतात. मला तो सोस दिसला नाही. मला “बहुतेक पुरुषांना व अनेक सुरक्षित स्त्रियांना न ओळखता येणारी, स्त्रीवर होणाऱ्या अन्याया-विरुद्धची कळकळ” त्यांच्या लिखाणात दिसत आहे. ह्याच मुद्द्याची दुसरी बाजू आहे. “एखाद्या स्त्रीने जर लैंगिक मुक्तीचा पुरस्कार केला तर ‘तिला स्वैराचार मान्य आहे’ असे गृहीत धरले जाते’ असा माझा अनुभव आहे. ‘स्त्रियांना लैंगिक मुक्ततेबद्दल प्र नावली कुणी दिली आहे का?’ या श्री. घोंगे यांच्या प्र नाला माझ्याकडे उत्तर नाही. पण ‘स्त्रिया स्वैराचाराच्या आरो-पाला भिऊन ह्या प्र नाला मुक्तपणे उत्तर द्यायला घाबरतील’ असे माझे मत नव्हे, खात्री आहे. एका पुरुषाला अनेक मैत्रिणी असल्यास ‘तो वुमनायझर आहे’ असे म्हणतात. तो आरोपही पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग आहे. आपल्या समाजाच्या योनिशुचितेच्या कल्पनांमुळे पुरुषांवरही अन्याय होतो.
ज्या देशात योनिशुचितेचे महत्त्व नसते किंवा कमी असते त्या देशात (निदान प्रवासात तरी) स्त्रियांना धक्के मारणे, चिमटे काढणे असे प्रकार कमी प्रमाणात होतात. उदा. उत्तर युरोपमधून (जर्मनी, इंग्लंड, स्कँडेनेव्हिया) इटलीत पोचले की हे प्रकार सुरू होतात. ग्रीसमध्ये हा प्रकार वाढतो. अरब देशांत (काही) स्त्री एकटी प्रवास करूच शकत नाही. दक्षिण अमेरिकेत मेक्सिको व ब्राझिलमधला फरक लक्षणीय आहे. मेक्सिकोत स्त्रीच्या लैंगिक पावित्र्याला अजून महत्त्व आहे. ब्राझिलची संस्कृतीच वेगळी आहे. तिथे एकट्या स्त्रीला लैंगिक कारणाने त्रास होत नाही. (भारतात काय चालते ते वाचकांनी स्वतःच्या घरातील स्त्रियांना विचारावे). योनिशुचितेची कल्पना नसते त्या देशात पुरुष वखवखलेले वाटत नाहीत. योनिशुचितेच्या कल्पनेने स्त्रीपुरुष ह्या दोघांचीही मने विकृत झालेली आहेत. लैंगिक भूक ही जर नैसर्गिक मानली व ती भूक आपण मारत राहिलो तर दुसरे काय होणार? आपल्याला स्त्रीमुक्तीचीच नव्हे, मनुष्यमुक्तीची जरूरी आहे. श्री. दिवाकर मोहनी यांच्या लिखाणाचा विचार करणारे वाचक नाशिकमध्ये आहेत हे वाचून आनंद झाला. त्यांनी सर्व दृष्टिकोनांतून हे लिखाण वाचावे अशी मी विनंती करते. वाचकांना मी काही प्र न विचारते.
१. तुमचे (किंवा तुमच्या नातेवाईकाचे) लग्न ठरत असले व ‘मुलीवर बलात्कार झाला होता’ असे तुम्हाला समजले व ती मुलगी तुम्हाला इतर सर्व दृष्टीने पसंत असली तर तुम्ही लग्नाला होकार द्याल का?
२. कॉलेजात मुलींना ‘चालू’ केव्हा म्हटले जाते? मुलगे का ‘चालू’ नसतात?
३. एखाद्या मुलीचे लग्न ठस्न, ती त्या मुलाबरोबर हिंडल्याफिरल्यावर मोडले, तर तुम्ही त्या मुलीशी लग्न कराल का?
मुलाचे मोडले तर त्याचे लग्न होईल का?
४. तुम्ही विधवेशी, घटस्फोटित स्त्रीशी लग्न कराल का? हे सर्व प्र न योनिशुचितेच्या कल्पनेशी निगडित आहेत.
(विविध देशांतील पर्यटनपुस्तकात स्त्रियांना सल्ले देणारे असे भाग असतात. त्या देशात स्त्री ‘लैंगिक दृष्ट्या सुरक्षित असते की नाही’ ह्या विषयाची चर्चा असते. ती वाचकांना उद्बोधक वाटेल.) 65 Oxford Road, Newton, MA 02454, U.S.A.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.