अरवली गाथा

श्री. जयंत फाळके यांचे वरील मथळ्याखाली आ. सु.मध्ये दोन लेख छापल्याबद्दल अभिनंदन. बरेचसे सामाजिक बदल हे आर्थिक बदलांमुळे होत असतात. असे असूनही आ.सु.मध्ये तात्त्विक आणि तत्त्वज्ञानाच्या चर्चांना खूप जास्त प्रमाणात जागा दिली जाते असे माझे मत झाले आहे उ. ११ व्या वर्षातही ‘विवेकवाद’ कशाला म्हणायचे यावर लिखाण चालू असते.
जयंत फाळके यांनी कथन केलेले तरुण भारत संघाचे काम खरोखरच प्रशंसनीय आहे. एखाद्या दुर्गम भागात जाऊन, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजात आपली मते आणि स्व बाजूला ठेवून स्थानिक समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्याला एकसंध कार्यप्रवृत्त करणे खरोखरीच फार अवघड आहे. दोन्ही लेख वाचून माझ्या मनात काही प्र न निर्माण झाले आहेत ते इथे मांडतो.
अनेक वर्षांच्या चुकत माकत घेतलेल्या अनुभवातून निर्माण झालेले स्थानिक पातळीवरचे संचित ज्ञान पद्धतशीरपणे काम करून मिळविलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची जागा घेऊ शकेल का?
पूर्वी हा भाग खाऊन पिऊन सुखी होता. त्यावेळी या भागाचे Land/Man गुणोत्तर काय होते? आज यात काय बदल झाले आहेत? या भागातून किती माणसे स्थलांतर करीत? येथील नैसर्गिक संचित संपत्ती (दगड आणि वनातील किंवा शेतमाल) जर बाहेर जाणारच नसेल तर बाहेरून लागणाऱ्या अनेक वस्तू कशाच्या बदल्यात आणायच्या? पूर्वीचा येथील समाज समन्याय-वाटप तत्त्वावर आधारित होता का? शेती ही फक्त उपजीविकेपुरती होती. म्हणजे अतिरिक्त उत्पादन नव्हते. या ‘उपजीविकेत’ अन्न, जळाऊ लाकूड, चारा, धागा (वस्त्रांसाठी व इतर कामांसाठी) आणि इमारती लाकूड यापलिकडे कशा कशाचा अंतर्भाव गृहीत आहे? शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि इतर खर्च अतिरिक्त उत्पादनाशिवाय कसे शक्य आहेत?
माणूस दोन त-हेच्या जगात जगत असतो. एक जग हे नद्यानालेडोंगर-दऱ्या, झाड-झाडोरा, पशु-पक्षी अशा नैसर्गिक पण भौतिक वस्तूंचे बनलेले आहे. दुसरे जग हे भाषा, गणित, संगीत, नृत्य, चित्रकला, विज्ञान, न्यायसंस्था, धर्म संकल्पना . . . थोडक्यात ज्याला आपण संस्कृती म्हणतो त्या संस्कृतीचे जग. स्थिर, उपजीविकेपुरत्या (खाऊन पिऊन सुखी) उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्थेत समन्याय- वाटप तत्त्व स्वीकारल्यास ही संस्कृती किती प्रगत होऊ शकेल? ताजमहाल किंवा पिरामिडस् बांधले गेले पण त्या त्या काळात सर्वसामान्यांची फार पिळवणूक झाली. अनेकांना पशुवत् जीवन जगावे लागले. सर्व समाजाचे उत्पादन एकवटून मोजक्या लोकांच्या तैनातीला जुंपलेले असे. आणि मुळात उत्पादन जर सर्वात समान वाटले असते तर सर्वच भिकारी झाले असते. एकीकडे ऊर्जेचा शोध, तिची यंत्राला जोड आणि त्यातून प्रचंड उत्पादनाचे तंत्रज्ञान, दुसरीकडे व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उदय या सर्व घटना ‘चंगळवाद’ असे नाव देऊन बाजूस सारण्यासारख्या नाहीत. ‘ठाणागाझी’ तहसील आणि अवतीभवतीच्या भागातील समाजालाही हे प्र न येऊन भिडतीलच. थोड्याशा स्वास्थ्यानंतर त्यांची मुलेबाळे शिकतील, त्यांचा जगाशी संपर्क येईल. त्यातून काय होईल सांगणे कठिण आहे. आधुनिक संस्कृतीतील त्यांना काहीच नको असेल? आमचे आम्ही खाऊन पिऊन सुखी राहू असे पूर्ण अलग राहता येणार नाही. This is not the product of preferences but tyranny of circumstances असे गॅलब्रेथ म्हणतात. या भागाचे पाऊसमान, ज्या भूस्तरात पाणी साठवून ठेवले गेले त्याची माहिती लेखात आली असती तर उपयुक्त झाले असते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अपार्य खडक जमिनीखाली दहाबारा मीटरवरच लागतो. या दहाबारा मी. जाडीच्या कुजलेल्या प्रस्तरात पावसाचे सर्व पाणी धरून ठेवता येत नाही. पाऊसमानही कमी आणि अनियमित असते. तळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन दीड ते दोन मीटर इतके होऊ शकते. राळेगणसिद्धीला देखील कुकडी धरणाचे पाणी (पाणलोट क्षेत्राच्या बाहेस्न आणलेले पाणी) घ्यावे लागते.
असे अनेक प्र न आहेत. अर्थात् सर्वांत महत्त्वाचा आणि गौरवाचा भाग म्हणजे स्थानिक लोक जागृत होऊन आपले प्र न आपल्या हाती घेऊ लागले आहेत, बाहेरील लोक अतिशय संयमाने त्यांना मदत करत आहेत. लोक २५% पर्यंत स्वतः पैसा उभारून आपला पाण्याचा प्र न आपण सोडवायला तयार होत आहेत. आणि इकडे नळपाणी योजनांसाठी १०% जनवर्गणीपण नको म्हणणारा सुशिक्षित समाज आहे. त्यांचा हट्ट पुरवता येत नाही म्हणून दहा वेळा माफी मागणारे राजकीय नेतृत्व आहे. फक्त खुर्चीच्या हव्यासासाठी. हा सर्वांत भयानक स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे. भांबावलेला समाज आणि भयग्रस्त नेतृत्वाची ही चिन्हे आहेत. पुन्हा एकदा जयंत फाळके आणि त. भा. संघाला धन्यवाद.
६ सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विले पार्ले, मुंबई — ४०० ०५७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.