सुधारक कुसुम शर्मा

१९४९ चा तो काळ होता. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन वर्षे झाली होती. आता स्वराज्याचे सुराज्यात स्पान्तर करावयाचे म्हणून पुष्कळसे देशभक्त धडपड करीत होते. कुसुमताई शर्मा त्यांच्यांतल्याच एक होत्या. विचाराने त्या साम्यवादी होत्या; आणि जाज्वल्य देशाभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत सळसळत होता. त्या दिवशी नागपूरच्या भंगीपुयाच्या सर्व घरांतील लोक बाहेर येऊन निचितपणे बसले होते. त्यांना कुसुमताईंच्या अटकेची कुणकुण लागली होती. तेवढ्यात अटक वॉरंट घेऊन आलेले पोलीस कुसुमताईंचा बारकाईने शोध घेत तेथे येऊन पोचले. त्यांनी घराघरांतून पुष्कळ तपास केला. पण व्यर्थ. खूप वेळ घालवूनही त्यांना काही त्या गवसल्या नाहीत. आणि हात हालवत त्यांना परत जावे लागले, कारण आमच्या कुसुमताई एका भंगिणीचा वेष परिधान करून त्यांच्यांतच बसलेल्या होत्या असे अनेकदा झाले. नागपुरात तेव्हा भंगी किंवा मेहेतर जातीच्या लोकांना घरोघरी जाऊन संडासातील मैला काढून डोक्यावर वाहून दूर नेऊन टाकावा लागे. व ती स्टी असल्यामुळे ते हे काम सवयीने करीत. पण कुसुमताईंच्या संवेदनशील मनाला ती गोष्ट सतत स्तू लागली व त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून ह्यात काहीतरी सुधारणा केलीच पाहिजे ह्या संकल्पाने त्या भंगीपुऱ्यात जाऊन त्या लोकांच्यात मिसळून त्यांच्यात स्वाभिमान-जागृति करू लागल्या. पोलिसांचा ससेमिरा आपल्या मागे लागत आहे हे लक्षात येताच त्यांची नजर चुकविण्यासाठी त्या त्यांचा वेष परिधान करून त्या वस्तीत जाऊन आपले काम करू लागल्या. त्यांनी ह्या लोकांना शिकवून संप करण्यास तयार केले व “इतःपर आम्ही मैला डोक्यावरून वाहणार नाही — आम्हाला त्यासाठी गाड्या द्या” असे म्हणून भंगी लोक हटून बसले. शेवटी हा संप यशस्वी झाला आणि मानवतेला कलंक लावणारी ही दुष्ट रुढी कुसुमताईंच्या नेटाच्या व अथक प्रयत्नांनी नागपुरातून कायमची नष्ट झाली. हे त्यांचे सर्वांत मोठे कार्य. भंगी नावाच्या अस्पृश्य जातीशी अशा प्रकारे एकरूप होऊन, त्यांच्या उत्थानाचे काम करणारे तसे विरळाच. कुसुमताईंनी हे काम काया-वाचा-मने केले. इतकेच नव्हे तर त्यांच्या लहान मुलांसाठी त्यांनी त्यांच्या वस्तीत बालमंदिरे चालविली. त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे जातिसंस्थेच्या कडक निर्बंधांना झुगारून आपल्या मनाला योग्य वाटेल ते काम, इतरांचा विरोध पत्करूनही यशस्वी-पणे करण्याची धमक कुसुमताईंमध्ये होती. त्याचा प्रत्यय त्यांच्या लहानपणा पासूनच सर्वांना येत गेला.
त्या काळातल्या संपन्न, सधन अशा परांजपे कुटुंबात १९२० साली कुसुमताईंचा जन्म झाला. त्यांचे वडील तेव्हा सिव्हिल जज्ज होते. नंतर हे ते डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स जज्ज झाले. वर्धा येथे जमनालालजी बजाज ह्यांच्या घरासमोर ते काही वर्षे राहत असत. त्यांची परस्परांची मैत्रीही होती. त्यामुळे कुसुमताईंना म. गांधीजींसह त्यांच्या राजकीय परिवारातील अनेक मोठ्या मंडळींचा प्रत्यक्ष सहवास आपोआपच घडला. आणि देशभक्तीचे बाळकडू बालवयातच त्यांना मिळाले. त्याचा एक परिणाम म्हणून कुसुमताईंनी वयाच्या दहाव्या वर्षीच खादीचे व्रत घेतले व पुढे ते आजन्म चालविले.
संपन्न कुटुंबात कुसुमताईंचा जन्म झाला खरा; पण त्या संपन्नतेकडे त्यांचे अजिबात लक्ष नव्हते — याउलट समाजातील उपेक्षितांकडे — दलितांकडे त्यांचे मन स्वभावतःच सदैव ओढ घेत असे. समाजात सहजपणे दृष्टीस पडणारी त्यांची दुःखे कुसुमताईंच्या संवेदनशील मनाला अत्यंत अस्वस्थ करीत. आणि त्यांच्यात शिरून ती कमी करण्याचा त्या प्रयत्न करीत. ह्याच त्यांच्या स्वभावामुळे बालवयात जश्या त्या गांधीविचाराकडे ओढल्या गेल्या तश्या तारुण्यात साम्यवादी विचाराकडे आकर्षित झाल्या. त्यावेळी त्यांचे वडील नागपूरला होते. गरिबांसाठी प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळेल हेच त्यांना वाटणाऱ्या साम्यवादी पक्षाच्या आकर्षणाचे मुख्य कारण असावे असे आज वाटते. आपल्या उत्कट व क्रियाशील स्वभावामुळे लवकरच त्या कम्युनिस्ट पक्षाच्या निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्या झाल्या. पक्षाचे काम रात्रंदिवस करीत असताना वेदप्रकाश शर्मा नावाच्या, कम्युनिस्ट पक्षातीलच एका साध्या व बुद्धिमान तरुणाशी त्यांचे सामरस्य झाले व घरच्यांचा विरोध पत्करून १९४२ मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले. याप्रमाणे संपन्नतेशी असलेले जन्माचे नाते दूर सास्न विपन्नतेशी समजून उमजून त्यांनी प्रत्यक्ष नाते जोडले. येथेही त्यांच्या भावनाशील मनाचा व करारी स्वभावाचा प्रत्यय आला. त्यांचा गरिबीचा संसार सुरू झाला. शर्माजींनी पुढे शिक्षकी पेशा पत्करला व ते गणिताचे उत्तम शिक्षक बनले. त्यांना दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये झाली. कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून याप्रमाणे त्या देशकार्य करीत होत्या. त्यातच त्यांनी भंगीलोकांसाठी वरील मोठे काम केले. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या सायकलरिक्षाचालकांमध्ये जाऊन त्यांच्यांत स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले. आपले म्हणणे, आपल्या अडचणी शासनापुढे निर्भीडपणे मांडण्यास त्यांना शिकविले. परिणामतः रिक्षावाल्यांना ठिकठिकाणी रिक्षास्टँड लावण्यासाठी जागा मिळाली. पुढे रेल्वेकामगारांच्या संपातही त्या सहभागी झाल्या. असे संप करून त्यांनी नागपुरात धमाल उडवून दिली होती. त्यांत त्यांना २-३ वेळा कारावास भोगावा लागला. त्यावेळी त्यांची मुलगी जेमतेम एक वर्षाची होती. तिला घेऊन त्या कारागृहात जात तेव्हा तेथील लोकांचे व अधिकाऱ्यांचेही डोळे पाणावत. कुसुमताईंची कामाची तळमळप्रतिपक्षीयांनाही अशी हेलावून सोडत असे. तेथे तुरुंगातही तेथील बंद्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी त्या भांडत व आपले म्हणणे आपल्या वाक्कौशल्याने अधिकाऱ्यांच्या गळी उतरवत. मनाने अत्यंत संवेदनशील असल्या तरी वृत्तीने कुसुमताई करारी, धाडशी व बंडखोर होत्या. “मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदूं ऐसे।’ ह्या उक्तीचे कुसुमताई हे एक जिवंत उदाहरणच होते ! ह्या त्यांच्या गुणांचा प्रत्यय त्यांच्या विवाहाच्या वेळी जसा आला, तसा त्यापूर्वी व त्यानंतरही अनेकदा आला. नागपूरला मॉरिस कॉलेजमध्ये शिकत असताना कम्युनिस्ट पार्टीचे काम केल्यावस्न कॉलेजमधून रस्टिकेट केले जाण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. तेव्हा “मी कोणतीही चूक किंवा वाईट गोष्ट केलेली नाही. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे तुम्हाला उडविता येणार नाहीत.” असे त्यांनी त्यांच्या प्राचार्यांना ठणकावून सांगितले. त्यांची बाजू खरी असल्यामुळे त्यांचे वडीलही त्यांच्या पाठीशी उभे राहिले. ती केस त्या जिंकल्या आणि त्यांच्यावरील तो कठीण प्रसंग टळला. भीती हा शब्दच त्यांच्या गावी नव्हता! रात्री-अपरात्री केव्हाही कामाच्या निमित्ताने त्या एकट्याच जात. त्यांना कधीही सोबत लागत नसे. ज्या काळात ब्रिटिशांविरुद्ध ब्र काढणेही अशक्यप्राय होते, त्या काळात निधडेपणाने, बेडरपणे रोखठोक मतप्रदर्शन करण्याची हिंमत दाखविणारी, तरुणांना लाजविणारी जणु “जोन ऑफ आर्क’ अशी कुसुमताईंची प्रतिमा जनमानसांत ठसली होती. “हिंमतवाली बाई”, “विदर्भाची असणा असफअली’ इत्यादी बिस्दे त्यांच्या नावामागे वृत्तपत्रांतून झळकू लागली होती. स्वातंत्र्याच्या लढ्यातील त्यांच्या कारवायांमुळे पोलिसांची त्यांच्यावर नेहमीच करडी नजर असे. तरीही त्यांना गरीबांविषयी वाटणारा कळवळा व त्यांचा कार्यातील प्रामाणिकपणा ह्यामुळे पोलिसांनाही त्यांच्याविषयी आदर व सहानुभूती असे. त्यांना अटक करण्यासाठी ते येत तेव्हा ह्या गोष्टीचा प्रत्यय येई. पोलीस कुसुमताईंशी कडवेपणाने किंवा उद्धटपणाने अपमानास्पद असे कधीही वागले नाहीत. आदरानेच वागत. १९४५-४६ च्या सुमारास कुसुमताईंनी पुण्याला मादाम माँतेस्सोरी व पुढे ताराबाई मोडक ह्यांच्या हाताखाली बालमंदिराचे शिक्षण घेतले. त्यानंतरच भंगी-समाजातील लहान मुलांसाठी त्यांनी बालमंदिर सुरू केले. एकीकडे विपन्नावस्थेतील गरिबांची स्थिती सुधारण्यासाठी, त्यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी धडपड करीत असतानाच दुसरीकडे त्यांच्या व इतरांच्याही लहान मुलांवर चांगले संस्कार कस्न त्यांना शिकवावयाचे, त्यांना निरोगी, उद्योगी व जवाबदार नागरिक बनविण्यासाठी पाया रचावयाचा असे दुहेरी काम कुसुमताईंनी केले. पुढे १९६० नंतर कॉर्पोरेशनच्या प्राथमिक शाळेत त्या शिक्षिका झाल्या. वरच्या वर्गांना शिकविण्याची योग्यता असताना व तेथे नोकरी मिळण्याची शक्यता असतानाही त्यांनी कॉर्पोरेशनच्या प्राथमिक शाळेत नोकरी स्वीकारली व अनेक वर्षे ती अत्यंत आस्थेने व आनंदाने केली याचे कारण म्हणजे त्यांना उपेक्षितांविषयी वाटणारे अकृत्रिम प्रेम हेच होय. त्याच प्रेमापोटी त्यांनी त्या गरीब मुलांवर अपार माया कस्न अत्यंत जिव्हाळ्याने त्यांना शिकविले. यापूर्वी १९४८ मध्ये घरीही एक बालकमंदिर त्यांनी सुरू केले होते. बालकाला केंद्रस्थानी मानून, त्याच्यावर कसलीही जबरदस्ती न करता, त्याच्या गुणांचा व क्षमतांचा विकास करण्यास त्याला मदत करावयाची ह्या शिक्षण शास्त्राच्या नवीन भूमिकेतून त्यांनी हे शिक्षणाचे काम केले. सुरवातीला जरी कुसुमताईंनी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून समाजकार्य केले, तरी पुढे त्यांनी पक्षाच्या कक्षा ओलांडून मानवतेच्या मुक्तांगणात लवकरच प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या कार्याला पक्षीय राजकारणाचा उग्र दर्प न येता उत्स्फूर्त प्रेमाचा, जिव्हाळ्याचा व तळमळीचा सुगंधच येत असे. जुन्या दुष्ट रुढींच्या मागील विषमता व अंधश्रद्धा तटस्थतेने जाणण्याइतकी बौद्धिक क्षमता व संवेदनशीलता त्यांच्यात होती. आणि त्या रुढी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या कृतिशील विवेकवादी होत्या. ‘समता’ हे मानवी मूल्य त्यांच्या हृदयात सुप्रतिष्ठित झालेले होते. त्यामुळे “अवघे वि वचि माझें घर’ अशी त्यांची सर्वसमावेशक वृत्ती बनलेली होती. गोरगरीबांपासून साऱ्यांसाठीच त्यांचे मन व घर सदैव खुले असावयाचे; तेथे सर्वांचे उत्स्फूर्त स्वागत होत असे. घरच्या व घराबाहेरच्या सर्वांवर त्या प्रेम करीत. त्यांचे प्रेम “आक्रमक’ होते. कुणाची इच्छा असो-नसो — त्याचा सर्वांवर सतत वर्षाव होत असे! त्यांच्या उत्कटतेपुढे सर्व शिष्टाचार तुच्छ होते ! जो जे मागेल ते घरातून उचलून देऊन टाकण्याचा, स्त्रीमनाशी अगदी विसंगत असा त्यांचा स्वभाव होता. उद्याची चिंता त्यांनी कधीच केली नाही.
कुसुमताईंच्या ह्या विशाल मातृत्वात घरातले लोक अनेकदा भरडले गेले. पण त्यांच्या प्रामाणिक प्रेमाचा प्रत्यय त्यांनाही आलेला असल्याने त्यांनी उदारपणे सारे काही सोसले व त्यांचे घर अभंग राहिले. असे जगावेगळे जीवन जगल्यानंतर अव्यवहार्यतेचा शिक्का न बसला तरच नवल ! त्यांचे वागणे पुष्कळदा अशिष्ट व अव्यवहारी असे होई. तथापि गरिबां-विषयीचा कळवळा व प्रेम हाच त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळेच त्या सुरुवातीला गांधीविचाराने व नंतर साम्यवादी विचाराने प्रभावित झाल्या. आणि त्या दोहोंच्यातील चांगले घेऊन एक तिसरेच रसायन त्यांच्या ठिकाणी तयार झाले. मला वाटते त्या खऱ्या अर्थाने मानवतेच्याच उपासक होत्या. मानवतेला कुठे थोडाही धक्का पोचलेला त्यांना सहन होत नसे. व मग त्यासाठी त्या जीव तोडून धडपड करीत. राहणीने अतिसामान्य व वागण्यात असामान्य असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. आज असलेले जग अधिक सुंदर करण्यासाठी, जगातील मानवता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी आयुष्याच्या अखेरीपर्यंत सतत धडपडणाऱ्या कुसुमताई ह्या चैतन्यमूर्तीच होत्या. त्यांना हे जग सोडून २४ जुलै २००० ला दोन वर्ष झाली.
मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.