जातींचा उगम — एक दृष्टिकोन

कोठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलानें उचलला नाही, असें क्वचित् दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेंच पाहाण्यांत येते की बाप वैद्य असला तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहादर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वांत असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते शिकण्याची साधनें व सोयी विपुल व मुक्तद्वार असतांना जर आज आपणाला असे स्पष्टपणे दिसते की, मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो, मुलाने आपला धंदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो, आणि त्याप्रमाणे उभयपक्षी तयारी करतात; तर जेव्हां धंदे थोडे आणि त्यांचे ज्ञान मिळविण्याची सार्वजनिक साधने व सोयीही थोड्या व एक घरी होत्या, अशा प्राचीन काळांत बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळ्यांत सर्रास पडे, ह्यांत नवल ते कोणतें? पुष्कळ धंदे वंशपरंपरेने चालतात ह्याचे मुख्य कारण हे की, मुलाला वडिलार्जित मिळकत आयती मिळते, त्याचप्रमाणे वडिलार्जित धंद्याचे बरेचसे ज्ञान त्याला बसल्याजागी अनायासें प्राप्त होते. जातां येतां वडिलांचे काम नजरेखालून जाते, त्या संबंधाने ते काय बोलतात हे उंबरा न ओलांडतां कानी पडतें, आपण तें काम करूं म्हटल्यास सर्व सामुग्री घरच्या घरी सिद्ध असते, आणि त्याचे वर्म समजून घेण्याचे मनांत आणिल्यास कळकळीचा सांगणारा तत्पर असतो. म्हणतात ना, जांवयाबरोबर जेवावें व मुलांबरोबर शिकावें. प्रत्यक्ष बापापेक्षा अधिक हितचिंतक विद्यागुरु कोण भेटणार? धंद्याला काय लागते, खरी मेहनत व कूस किती ह्याचा खडान्खडा माहीत असल्यामुळे, आणि धंद्याची सर्व प्रकारची पूर्व-तयारी करून बसल्यामुळे नव्हे तो अगोदरच रेघाख्यास आणिल्यामुळे वडिलांनाही असे वाटणे सहाजिक आहे की, मुलाने तोंडांत आलेला घांस टाकून नवा पाव नवा डाव न करता आपल्याच धंद्यांत पडावें. ह्याप्रमाणे सौकर्याच्या दृष्टीने वडिलार्जित धंदे चालविण्यास चालू व भावी पिढ्या सारख्याच आतुर असतात, आणि समाजही ह्या स्थितीस अनुकूल असतो असे म्हटले तरी चालेल. विशेष कारण नसतांना कारखानदार आणि कारखाने वरचेवर बदलले तर, कालावधीनें, अनुभवाने किंवा अनुवंशानें प्राप्त होणाऱ्या कसबास व प्रावीण्यास समाज मुकतो. जोपर्यंत कसब सोपे व साधे असते आणि त्यांत कलाकुसरीचा व व्यक्तिसंपादित प्रावीण्याचा भाग फारसा नसतो, तोपर्यंत वंशपरंपरेनें धंदे अव्याहत चालले तरी समाजाच्या गरजा विशेष अडचण किंवा तोटा न येतां भागतात. आमच्यांत अशा प्रकारे पिढ्यानपिढ्या धंदे चालविणारी विवक्षित घराणी केवळ समाजसुव्यवस्थेसाठी निघालीं, आणि जरी ती मूळची एकाच समाजांतली किंवा त्या समाजांत अंतर्लीन झालेली असली, तरी कालांतराने आद्य ऐक्याची भावना कमजोर आणि विभक्तपणाची भावना बलवत्तर होत जाऊन त्यांचे वेगवेगळाले संघ झाले. हेच आमचे वर्ण होत. पूर्वीची वर्णव्यवस्था सैल असून तिच्यामध्ये धंद्याची अदलाबदल करण्यास किंवा अमुक धंदा करणाऱ्या आईबापांच्या पोटी जन्म घेतल्या-मुळे त्यांचा धंदा सोडून दुसरा धंदा करण्यास मनाई नव्हती; म्हणजे वर्णव्यवस्था जन्मसिद्ध नव्हती. पुढे जसजसा समाज वाढला व पांगला, तसतशी ह्या संघांची बंधनें एकमेकांपासून दुरावत गेलीं, आणि भिन्न भिन्न आचार स्ढ होत गेले. त्यांपैकी काहीं आचार केवळ यदृच्छेनें, कांहीं व्यवसायपरत्वे, कांहीं देशकालमानानें व कांहीं मत-भेदानें प्रचारांत आले असले, तरी त्या सर्वांना व त्यांना मूलभूत जो व्यवसाय त्याला धर्माचे स्वरूप येऊन वर्णाश्रमधर्म सर्वसामान्य धर्माच्या जोडीला येऊन बसला. सामान्या-पेक्षां विशेषाचे जेथल्या तेथें माहात्म्य जास्त असते, ह्या नियमानुसार ज्या त्या वर्णां-तले लोक सामान्य धर्मांपेक्षा आपापल्या वर्णविशेष धर्माला जास्त भजू लागले. धंद्याच्या स्वरूपावरून एक धंदा दुसऱ्या धंद्यापेक्षा अधिक पवित्र व मानार्ह अशी धंद्यांची प्रतवारी लागून अखेर एकाच धंद्यांतील–अमुक काम उच्च व शुद्ध किंवा सिद्ध अशी त्यांतल्या त्यांत कामांची वर्गवारी लागली. ह्यामुळे वर्णाश्रमधर्माची विभक्तता दृढ होऊन पूर्वीच्या एकजीव समाजाचे लोक निरनिराळ्या वर्णांत व उपवर्णांत एकमेकांपासून तुटक नांदू लागले; आणि ज्याने त्याने आपापल्या वर्णांतच शरीरसंबंध व अन्नव्यवहार केला पाहिजे, ज्याचा ज्या वर्णांत जन्म त्याच वर्णाचा व्यवसाय त्याने वर्णधर्म म्हणून केला पाहिजे, इतर व्यवसाय करणे अधर्म होय, असले कडक नियम अमलात आले. त्यांनी प्रथम समाजांतील सर्व वर्णांत होणारा बेटीव्यवहार, नंतर रोटीव्यवहार, नंतर शिवताशिव कमी केली; आणि चार वर्णांतून अनेक उपवर्ण ऊर्फ जाती उत्पन्न केल्या. वर्णांप्रमाणे जातिजातींचेही विवक्षित धंदे व आचार पडत गेले, आणि ते जातिधर्म म्हणून ज्या त्या जाती पाळू लागल्या. जातींतल्या कांहीं लोकांनी काही धंद्यांतून किंवा मूळ धंद्याच्या घाणेरड्या किंवा त्रासदायक भागांतून अंग काढून घेतले. तसें ज्यांनी केलें नाही किंवा असली कामें ज्यांनी पत्करली, त्यांच्या कमी दर्जाच्या पोटजाती बनूं लागल्या. वर्णांतून ज्या कारणांनी जाती निघाल्या, त्याच कारणांनी जातींतून पोटजाती निघाल्या, आणि स्टीने सर्व व्यवसाय, पोटव्यवसाय व त्यांतील निरनिराळी कामें ह्यांना जातिधर्माचे स्वरूप देऊन टाकले. ही समाजविभंजक परंपरा जाति पोटजातींवर मुक्काम करती तरी बरें होतें. एखाद्या जातीने दुसऱ्या एखाद्या जातीचा किंवा पोटजातीचा व्यवसाय किंवा आचार उचलला, किंवा जाणून बुजून अथवा नकळत आचारस्खलन केलें, किंवा मूळ धर्माहून किंचित् भिन्न असा एखादा उपधर्म किंवा संप्रदाय पत्करला, किंवा शेजारी नांदत असलेल्या परधर्माच्या मतांपैकी किंवा उपासनेपैकी एखादा भाग स्वीकारिला, की त्या जातीत अगर पोटजातींत तट पडत; व तेवढा आचार, व्यवसाय, संप्रदाय, धर्ममत अगर उपासना ह्यांपुरता स्वतंत्र पंथ निघे, व अजूनही हेच चालले आहे. इतर व्यवहारांत सामान्य जात त्याला दूर धरीत नसे व नाही. परंतु अल्पसंख्याक समाज आपले हितास अतिशय जपतात असा नियम आहे, त्याप्रमाणे नवीन पंथच जातीच्या सामान्य हितापेक्षा आपल्या हिताकडे जास्त लक्ष देतात व वेगळे होण्याचे तयारीस लागतात. ह्याप्रमाणे समाजाचे तुकडे होतां होतां शेवटी निरनिराळे कुलाचार पडत जाऊन ते कुलधर्म होऊन बसले; आणि एरवीं सर्व प्रकारें एक अशा कुळांत सुद्धां फूट पडली व बारा पुरभय्ये आणि चौदा चुली अशी समाजाची स्थिति झाली. जातींच्या किंवा पंथांच्या विभक्तपणाच्या सहस्रावधि कारणांचा शोध केला तर तो अतिशय बोधप्रद व मनोरंजक होईल, आणि त्याची छाननी करून त्यांतील तथ्यांश समाजापुढे सप्रमाण मांडला तर जातिभेदाची तीव्रता कमी करण्यास त्याचा पुष्कळ उपयोग झाल्यावांचून राहणार नाही.
[त्रिंबक नारायण आत्रे यांच्या ‘गांव-गाडा’ या १९१५ साली प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकातून वरील उतारा घेतला आहे.]
जातिभेद ही भारतीय समाजाला फार इजा पोचवणारी बाब आहे, असे आम्ही मानतो. बरेचदा असे सांगितले जाते की ही संस्था घडली तेव्हा फार उपयुक्त होती. ही धारणा आम्हाला मान्य नाही, परंतु वादासाठी जरी हे मान्य केले, तरी आज जाति-संस्था ही समाजात विकृती उत्पन्न करते, असे दिसत आहे.
ह्या संदर्भात श्री. आत्रे यांच्या ‘वंदन’ या प्रस्तावनेतील हे मत मननीय आहे —- “कारण जे काही दोष म्हणून दाखविण्यांत आले आहेत ते व्यक्तींचे नसून कालोदधींत वाहत येतांना त्यांतील खडकांवर आदळतां आदळतां छिन्नविच्छिन्न व बेस्प झालेल्या संस्थांचे आहेत, आणि त्यांची जबाबदारीही ज्या त्या संस्थेवर आहे”.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.