धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता

निसर्गसृष्टीतील घडमोडींविषयीचे वैज्ञानिक अज्ञान, त्यापोटी वाटणारे भय आणि येणारे दुबळेपण, निसर्गाच्या अनाकलनीय शक्तींना ‘संतुष्ट’ करून स्वतःचे जीवन आश्वस्त, सुरक्षित व समृद्ध करण्याची कांक्षा व धडपड यामधून ‘धर्म’ या गोष्टीचा उदय झाला, ही एक ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ वर्तुळातील प्रतिष्ठित व शिष्टमान्य मांडणी आहे.
आधुनिक विज्ञानाच्या युगाच्या उत्कर्षाने ज्ञानाची प्रभा सर्वदूर पसरल्या-नंतर, ज्ञानांधकारात भरभराटलेल्या धर्माची व धर्मसंस्थेची गरज संपुष्टात आलेली आहे. भौतिक विज्ञानांच्या जोडीला, सतराव्या शतकापासून, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानवस्वभावप्रकृतिशास्त्र, समाजशास्त्र अशी मानवी व्यापारांचे नियम, त्यांचे गतिशास्त्र यांची उकल करणारी शास्त्रे उत्कर्ष पावली आहेत. जे जसे वास्तवात आहे, वास्तवात जे घडते त्यांचा वैज्ञानिक (शास्त्रीय) विचारपद्धतीचा अवलंब करून अभ्यास करून निष्पन्न झालेले ज्ञान (‘पॉझिटिव्ह नॉलेज’) यावर ही सर्व मानवीय शास्त्रे रचलेली आहेत. धर्म व धर्मसंस्था दोन्ही आता अनावश्यक म्हणून अनिष्ट व घातक ठरल्या आहेत. असे हे मत आहे.
पण विसाव्या शतकाच्या या अखेरच्या वर्षी, धर्म व धर्मसंस्था यांचा जनमानसावरील व समाजजीवनावरील प्रभाव व पकड कमी झाल्याचे अनुभवाला येत नाही. उलटपक्षी धार्मिक अस्मिता चांगल्या घट्ट व प्रबळ असल्याचे, त्या अधिक कट्टर होत चालल्याचे आढळते. विभिन्न धर्मांनी आवश्यक व इष्ट मानलेले विधी, कर्मकांड, रूढी व रीतीभाती, धर्मसंस्थांनी रचलेले धर्मशास्त्र, दैवतशास्त्र, त्यांनी पसरविलेल्या समजुती, कथाकहाण्या, त्यांच्या यंत्रणा व त्यांचे इतिहास, त्यांचे व्यवहार या सगळ्यांमध्ये अनेकानेक रूढी आंधळ्या, अनिष्ट, घातक आहेत यामध्ये काही शंका नाही. या सगळ्याचे आध्यात्मिक, नैतिक व वैज्ञानिक अंगाने सर्वांगीण शुद्धीकरण व्हायला हवे हेही खरे. तसेच व्यक्ती व समाजजीवनाची सर्व अंगे, पुष्कळ तपशिलांमध्ये, धर्मसंस्था नियमित व नियंत्रित करीत असे. आज यांतील बहुतेक अंगे धर्म व धर्मसंस्था यांच्या अधिकारक्षेत्रात राहण्याची गरज उरलेली नाही. माणसांनी श्रद्धा व समजुती कोणत्या बाळगाव्यात, कोणत्या गोष्टी सत्य म्हणून स्वीकाराव्यात व कोणत्या गोष्टी भ्रामक, पाखंडी म्हणून धिक्काराव्यात यासाठी धर्मग्रंथांचा वा धर्मसंस्थेचा शब्द प्रमाण व अखेरचा मानणे विज्ञानाच्या उत्कर्षानंतर अनावश्यक व गैरही ठरले आहे. हे सर्व, व असेच आणखीही काही काही म्हणून झाल्यावरही, धर्म व धर्मसंस्था यांचे मानवी जीवनात असे काही एक प्रयोजन वा कार्य आहे असे दिसते, की ज्यामुळे धर्म व धर्मसंस्था या गोष्टी निर्मूल होणार नाहीत व होऊही नयेत, अशी भूमिका घेणे जास्त योग्य होईल, केवळ व्यवहारी शहाणपणाच्या अंगाने नाही, तर एका प्रगल्भ, सखोल जाणीवेपोटी, खऱ्या विवेकशीलतेपोटी. असे म्हणता येते का? मुळाशी जाऊन भिडणारी धर्म ही माणसांची गरज व भूक आहे का? असे प्र न आज अनेकांच्या मनांत उत्पन्न झालेले आहेत. अशा अनेकांच्या मनांत, जे कालपरवापर्यंत व्यक्ती व समाज यांच्या निधर्मीकरणाच्या पक्षाचे कार्यकर्ते होते.. धर्म व धार्मिकता यांचे मूळ केवळ अज्ञान, भय, दमन यांच्यात नाही वा ती एक केवळ अफूची गोळी आहे हे त्यांना अमान्य आहे. विज्ञान-तंत्रविज्ञान, मानवीय शास्त्रे यांच्यामध्ये कितीही प्रगती झाली तरी धर्म व धार्मिकता — या गोष्टी आणि म्हणून एक ना एका स्वरूपाची धर्मसंस्था पण — जिवंत राहतील व त्यांनी पार पाडावयाचे मौलिक कार्यही असेल असे त्यांना दिसते.
दि. के. बेडेकर हे अशा व्यक्तीचे एक चांगले नमुनेदार उदाहरण आहे. त्यांचे धर्मश्रद्धा—एक पुनर्विचार नावाचे एक छोटेखानी पुस्तक आहे. माणसाच्या ठायी स्वतःविषयीचे, भोवतीच्या माणसांचे, (त्यांच्यासह) जगत असलेल्या जीवनाचे, अनंत विश्वाचे, निसर्गसृष्टीचे भान व जाणीव असते. या भानाला आणि जाणिवेला विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, समाजजीवनाचे घाट यांसारखे ‘आकार’ माणूस देतो, ते निर्माण करतो. धर्म हाही माणसाने त्याचे भान व जाणिवा यांना दिलेला असाच आकार आहे असे बेडेकरांनी आरंभीच म्हटले आहे. धर्म नावाचा हा जो ‘आकार’ आहे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण कशात आहे? बेडेकर लिहितात, “जेव्हा मानवाच्या मनात अशी उल्लंधित सर्वंकष श्रद्धा उद्भवते, तेव्हा धर्माच्या बीजाचा, प्राख्याचा उदय होतो. ही श्रद्धा जर मानवी मनाच्या स्वभावात, वैशिष्ट्यातच असेल तर तिचा उदय मानवी प्राण्याच्या अस्तित्वाबरोबरच झाला असे मानणे रास्त होईल. मी तसेच मानणे योग्य समजतो.” ते असेही म्हणतात की, “ही श्रद्धा सर्वस्वी निःसंदेह असावी लागते; किंबहुना संदेहाला यत्किंचित कूस नसणे हाच श्रद्धेचा स्वभाव आहे.’ (पृ. ३)
‘उल्लंघित’ असा एक शब्द बेडेकरांनी वापरला आहे. याचे स्पष्टीकरण ते पुढीलप्रमाणे करतात. माणसाला जे अनुभव —- सुख-दुःख, आनंद-भीती अशासारखे अनेकविध —- येतात त्या अनुभवांच्या आधारेच, पण पलीकडे जाऊन, त्या अनुभवांना एक ना एका व्यूहात अर्थपूर्णरित्या बसविण्याचा उद्योग माणूस त्याच्या स्वभाव-प्रकृतीचाच एक भाग म्हणून करत असतो. उल्लंघित, सर्वंकष, निःसंदेह, श्रद्धा हा धर्माचा ‘आशयाकार’ आहे. आणि मानवी भान व जाणीव जे विविध आशयाकार स्वभावतः उत्पन्न करतात त्यांपैकी धर्म हाही एक आशयाकार आहे, असे बेडेकर म्हणतात. मानवाचे अस्तित्व आणि धर्म यांची उत्पत्ती या एकसमयावच्छेदेकरून अवतीर्ण झालेल्या गोष्टी आहेत, एक दुसरी-शिवाय शक्य नाही. असा एक ना एक उल्लंधित सर्वंकष श्रद्धाव्यूह स्वतःसाठी निर्माण करून तो स्वीकारणे, त्या आधारे जीवनाचा व विश्वाचा अनुभव घेणे, त्या व्यूहानुसार आचरण करणे, हे अधिष्ठान असल्याखेरीज माणसाचे माणूस म्हणून जीवन उभेच राहू शकत नाही, असे ते म्हणत आहेत.
माणूस जी जी काही निर्मिती करतो तिला मानवी व्यक्तित्व व समूह-जीवन यांच्या संदर्भात एक प्रयोजनही असतेच असते. व्यक्तित्व व समूहजीवन अधिक सुघटित, उन्नत, सुंदर व समृद्ध-संपन्न करण्याच्या शोधांत व प्रयत्नांत हे विविध आकार-निर्मितीचे कार्य चालते, ही बेडेकरांची समज व भूमिका आहे. बेडेकरांना वाट पुसत आपण धर्म या गोष्टीचा या लेखात थोडा अधिक विचार करू . बुद्धी-तर्क यांच्या आधारे ज्यांचा खुलासा होऊ शकत नाही, ज्यांची व्यवस्था लावता येत नाही, जे अनुभव अलौकिक असतात, अद्भुत असतात, चकित व चक्रावून टाकणारे असतात, ज्यांचे आपण स्वतःकडे कर्तृत्व व श्रेय अपश्रेय घेऊ शकत नाही, ते नुसते एकानंतर एक घेत राहण्याने माणसाचे समाधान तर होत नाहीच, पण त्याला निर्धास्तही वाटत नाही. स्वतःच्या बाहेर, समुदायाच्या पलीकडे, आपल्याला अनाकलनीय पण एक सुव्यवस्था विश्वामध्ये आहे; तसेच जे काही घडते त्याला काही एक शेवट आहे, लक्ष्य आहे, हेतू आहे; हे पायाभूत गृहीततत्त्व माणसाला व्यक्ती व समाज म्हणून उभे राहण्यासाठी व जगण्यासाठी घट्ट, अढळ भूमी उपलब्ध कस्न देते. या निःसंदेहपणे स्वीकृत गृहीततत्त्वाच्या आधारेच स्वतःच्या नि समूहाच्या जीवनाची उभारणी माणूस करू शकतो, जीवनाची व्यवस्था लावू शकतो. विश्वातील साऱ्या भौतिक-जैविक घडामोडी नियमांनुसार होतात, याचा ‘सत्य’, ‘अंतिम सत्य’ म्हणून निःसंदेह सर्वंकष स्वीकार आधुनिक विज्ञानवादी माणूस करतो तेव्हा त्यालाही, बेडेकरांच्या भाषेत, श्रद्धाव्यूहाचा आधारच माणसाने दिलेला असतो. तर्क, बुद्धी, विज्ञानाची रीत यांच्या आधारे काटेकोर, निर्मम तपासणी केल्यास, अस्तित्वाला अंतिमतः काही अर्थ नाही, प्रयोजन नाही, जीवन हा एक निरर्थक घटनाक्रम आहे याखेरीज अन्य कोणत्या निष्कर्षाला पोचता येत नाही; निखळ पण अर्थशून्य अस्तित्वच तेवढे आव्हान म्हणून जगणे उरते.
माणूस जे जे अनुभवतो, त्या अनुभवण्यामधून त्याला जे भान येते, जाणीव उत्पन्न होते त्यांना माणूस, धर्म, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान आणि समाजजीवन असे ‘आकार’ देतो असे बेडेकर म्हणतात. ‘आकार’ हा शब्द मोठा अर्थपूर्ण आहे. आकार आणि सुव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनुभवांचे ‘उल्लंघन’ करूनच आकार देता येतात ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी. पण हे उल्लंघन तेव्हाच शक्य आहे जेव्हा आकार असतात, सुव्यवस्था असते हे आधी निःसंदेह स्वरूपात गृहीततत्त्व स्वीकृत असते.
‘धर्म’ या आकाराचे वेगळेपण व विशेषण कशामध्ये आहे? “धर्म हा मनोव्यापार कशाबद्दलचा आहे? त्याला विषय कोणता?’ असे प्र न उपस्थित कस्न बेडेकर म्हणतात, “तो विषय माणूस ज्या विश्वात नांदतो ते विश्व आहे. विश्वाची उत्पत्ती कशी झाली? कशापासून झाली? कोणी केली? विश्वाचा निर्माता कोण? नियंता कोण? विश्वाच्या नियंत्याचे स्वरूप कसे आहे? तो विश्वात्मक आहे का विश्वाच्या पलीकडे आहे? का विश्वात्मक असूनही पलीकडे आहे? विश्वाला सर्वंकष नैतिक नियमव्यवस्था आहे, का ते नीतिनिरपेक्ष आहे ? विश्वात श्रेय-अश्रेय, सुखदुःख, वैषम्य आणि नैपुण्य अशी द्वंद्वे का आहेत? विश्व प्रेममय आहे, का प्रेमद्वेषाच्या द्वंद्वावर चालते आहे ? असे हजारो प्र न माणसांच्या मनात येऊन गेले व आजही नांदत आहेत. या सर्व प्र नांत ‘मानव व विश्व’ हा धर्माचा सामान्य विषय आहे.”
या प्र नांना जी उत्तरे माणसाने दिली —- प्राचीनतम काळापासून दिली —- त्या उत्तरांच्या अंगाने विचार करू या विश्वाचा एक निर्माता आहे आणि तो नियंताही पण आहे. माणसे आणि त्यांचे वैयक्तिक व सामाजिक जीवन यांच्या संदर्भात विश्वाला एक सर्वंकष नैतिक नियमव्यवस्था आहे. या नैतिक नियमांचे पालन करून जीवन व्यतीत करणे श्रेयस्कर आहे, ते माणसाचे कर्तव्यही आहे, आणि तसे करण्यात त्याच्या जीवनाचे साफल्य आहे. विश्वाचा निर्माता व नियंता हा सर्वांची काळजी करणारा, दयाळू असतो. त्याच्या इच्छेनेच, कृपेने वा अवकृपेनेच सारे काही घडते. पण तो कठोर शासनही करणारा आहे. त्याचा कोप भयंकर असतो. पण त्याची इच्छा, त्याचा न्याय, त्याचा भलेपणा, त्याची कृपा नेहमीच माणसाला आकलनीय असत नाही, अनेक गोष्टी गूढच राहतात. धर्माची बांधणी या वैशिष्ट्यपूर्ण उत्तरांच्या आधारे होते.
‘विश्वाला सर्वंकष नैतिक नियमव्यवस्था असते’ हे नियम बुद्धीच्या सहाय्याने, तर्काच्या आधारे माणसाला ज्ञात होत नाहीत. ते प्रकट केले जातात, ‘देववाणींच्या स्वरूपात, काही व्यक्तींच्या द्वारा. या व्यक्तींना आपण प्रेषित, साक्षात्कारी पुरुष, संत-महात्मे, ऋषि-मुनी इत्यादी नावांनी ओळखतो.’ ज्यांना कोणतीही बुद्धिगम्य, तर्कसंगत स्पष्टीकरणे व समर्थने देता येत नाहीत अशा आपत्ती, व्यक्ती व समुदाय यांच्यावर कोसळतात; क्लेश, नुकसान, प्राणहानी, दु:ख, दुर्भाग्यपरंपरा वाट्याला येते. असे का, व यांवर उपाय काय, या प्र नांची उत्तरेही ‘धर्म’ या आकाराचा आशय असतो. अनुभव व निरीक्षणे यांचा अर्थ लावणे, कार्यकारणसंबंधांचा शोध घेणे, तर्कशास्त्राचा वापर व तर्कसंगत निष्कर्ष काढणे. या क्षमतांच्या आधारे ज्याची उत्तरे देता येत नाहीत असे हे प्र न व ही उत्तरे आहेत. म्हणजे ‘बुद्धिप्रामाण्यनिष्ठे’च्या तसेच विज्ञानाच्या कक्षेत न बसणारे हे प्र न व ही उत्तरे आहेत. हे प्र न वा ही कोडी माणसाला पडतात आणि समाधान मानता येईल अशी उत्तरे दिल्याखेरीज आपण आपल्या लौकिक-ऐहिक जीवनाचीही व्यवस्था लावू शकत नाही, व्यवहार पार पाडू शकत नाही; पण, बेडेकरांच्या भाषेत, ‘उल्लंधित सर्वंकष श्रद्धेच्या’ चौकटीतच उत्तरे देता येतात व या चौकटीतली उत्तरेच मनाला संतुलन, शांती व समाधान प्राप्त करून देतात इतकेच नाही तर, दैनंदिन जीवनाचे व्यवहार कसे पार पाडावेत याचे मार्गदर्शनही करतात. अशा ‘उल्लंधित सर्वंकष श्रद्धे’च्या अधिष्ठानावरच व्यक्ती व समाज यांची निकोप व सुदृढ धारणा शक्य होते. बेडेकर म्हणतात, “विज्ञानाने निर्माण केलेले ‘ज्ञात-विश्व’ आणि कलावंताने निर्माण केलेले ‘स्प-विश्व’ या दोन्हींना ‘मानुष’ म्हणता येईल आणि या दोन विश्वांना एकवटून एकच ‘मानुष’ विश्व नांदते, असेही म्हणता येईल.” “विज्ञानाची जिज्ञासा-वृत्ती आणि कलेची सहृदय वृत्ती यांना आधार कोणता? तर माणसाची विश्वा-वरील नवी श्रद्धा. या विश्वाशी नाते जोडून आपण जे ‘मानुष’ विश्व निर्माण करीत आहोत ते विश्वसंवादी आहे, ही ग्वाही मानवाला मनोमन मिळाली पाहिजे. ती ग्वाही एकटे विज्ञान देऊ शकत नाही. एकटी कला देऊ शकत नाही. ती ग्वाही फक्त श्रद्धा देऊ शकते.” १५०, गंगापुरी, वाई, जि. सातारा (आंदोलन च्या विशेषांकावरून संक्षेपाने)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.