दुर्दशा

१. संगणकासारख्या अत्याधुनिक विषयात भारतीय अग्रेसर दिसतात व त्यात भारताचे काही लोक लक्षाधीश, कोट्यधीश व अब्जाधीशही होऊ लागले आहेत.
२. भारताचे अन्नधान्य उत्पादन वाढत्या प्रमाणावर आहे व त्यात भारत निर्यातक्षम होणार आहे.
भारताचे संरक्षणसामर्थ्य कमी लेखण्यासारखे नाही व भारताची विदेशी चलनाची गंगाजळी समाधानकारक आहे अशा काही मोजक्या बाबी भारताच्या जमेच्या बाजूने असल्या तरी भारताचे केंद्रशासन हिंदुत्वाच्या अहंकाराकडे झुकलेले, विस्कळीत, दुर्बळ व अकार्यक्षम झाले आहे.
राज्य-सरकारे अर्धशिक्षित व स्वार्थी मंत्र्यानी भरलेली आहेत, देशभर शिक्षण-क्षेत्रात भयानक दुरवस्था आहे. सर्व शासकीय व निमशासकीय पातळ्यांवर पराकोटीचा भ्रष्टाचार माजलेला आहे.
अंधश्रद्धांच्या बुजबुजाटातून बालकांचे, मुलींचे व स्त्रियांचे बळी जात आहेत. १०० कोटी नागरिकांतले ५० कोटी अशिक्षित आहेत, शिक्षित/अल्पशिक्षित ५० कोटी नागरिकांपैकी बहुसंख्य उदासीन किं-कर्तव्यमूढ व ध्येयहीन आहेत, प्रचंड राष्ट्रीय कर्जात देश बुडालेला आहे. परतंत्र आर्थिक धोरणापायी बहुराष्ट्रीय कंपन्याचे अर्थशोषक आक्रमण प्रतिक्षणी वाढत आहे. बहुसंख्य नागरिक स्वतःचा, कुटुंबाचा, जातीचा विचार करतात.
राज्यातील मंत्री राज्याचा विचार करतो असे भासवतात व १६. देशाचा विचार करणारे फार थोडे आहेत. अशा अनेक बाबी देशाची किती दुर्दशा झाली आहे ते दाखवणाऱ्या आहेत.
या परिस्थितीत देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल, तळागाळाचे अज्ञानी अशिक्षित नागरिक सुद्धा विकसित देशांतील नागरिकांप्रमाणे भौतिक जीवन केव्हा मिळवू शकतील या प्र नांचा विचार निदान सुबुद्ध म्हणविणाऱ्या नागरिकांनी तरी केला पाहिजे.
अनेक बाबतीत जगातले कित्येक देश भारताहून अविकसित, मागासलेले, दरिद्री व दुर्बल असले तरी त्यामुळे भारतीयांनी समाधान मानणे चुकीचे होईल. आपले असंख्य देशबांधव कमालीच्या भयंकर परिस्थितीत कसेबसे जगत असताना काही थोड्या लोकांनी चैनीत राहावे, अजीर्णाने आजारी पडावे आणि देशप्रेम विसस्न देशबांधवाविषयी ‘ते नि त्यांचे नशीब’ अशी त्रयस्थाची भूमिका घ्यावी हे अगदी लज्जास्पद म्हणावे लागेल.
नशिबावरून आठवते, देव, दैव आणि नशीब हे काही निराधार कल्पना व्यक्त करणारे तीन शब्द मानवजातीचे व विशेषतः भारतीयांचे परवलीचे शब्द आहेत. अडचणी, अपयश, दुःख, संकट, विनाश, वाईट गोष्टी वाट्याला आल्या की भारतीयांना यांची हटकून आठवण होते. त्या गोष्टीचे खापर या तिघांवर फुटते. वस्तुतः वृद्धावस्थे-नंतर येणारा नैसर्गिक मृत्यू आणि ज्यांची कारणे व वेळ मानवाला अजून अज्ञात आहेत ते भूकंप वगळता, माणसाच्या वाट्याला येणारी सर्व दुःखे केवळ मनुष्यकृत आहेत. मानवांच्या सामाईक आणि बुद्धीवर आधारलेल्या प्रयत्नांनी ती टाळता येण्यासारखी किंवा नाहीशी करता येण्यासारखी आहेत असे म्हणता येईल. दारिद्र्य, आजारपण, व्याधी, साथीचे रोग, भांडणे, युद्धे, दुष्काळ व अति-वृष्टी यांनी होणारे नुकसान, अपघात, पिकांवरचे रोग, बालमृत्यू, अपत्यहीनता अशा दुःखांना जन्म देणाऱ्या सर्व गोष्टी मानवांच्या प्रयत्नांनी टाळता तरी येतील किंवा त्यांच्यामुळे होणारी मानवजातीची हानी तरी टाळता येईल. मात्र या सर्व गोष्टी देव, दैव व नशीब यांच्या स्वाधीन आहेत या चुकीच्या कल्पनेला चिकटून राहून मानव हतबल होऊन बसला तर मात्र तो दुःखीच राहील. प्रत्येक दुःखकारक, हानिकारक घटनेमागे कोणती कारणे आहेत याचा अभ्यास करून ती कारणे दूर करण्याचा प्रयत्न करीत राहणे व ती दूर होईपर्यंत त्या दुःखाला व हानीला धैर्याने तोंड देत राहणे व दुःखितांना सर्व सहाय्य व आधार देत राहणे हे मनुष्यत्वाचे लक्षण आहे व हेच मानवाला अभिमानास्पद ठरेल. निसर्गाने मानवाला प्रचंड बुद्धिसामर्थ्य व प्रतिभा बहाल केली आहे त्यांच्या जोरावर मानव मानवजातीला सुखी दीर्घायुष्य प्राप्त करून घेऊ शकेल. भविष्यकाळात भूकंपाचे अचूक निदान करू शकेल. फार काय मृत्यूवरही मात करू शकेल. पण त्यासाठी शहाणपणा दाखवून त्याने संघटितपणे प्रयत्न करायला हवेतच.
“भारत भौतिक दृष्टीने विकासाच्या बऱ्याच खालच्या पायरीवर असला तरी अध्यात्म-तत्त्वज्ञानाच्या बाबतीत फार वरच्या पायरीवर आहे. फार प्राचीन काळापासून त्याचे ते स्थान अबाधित आहे व त्या बाबतीत जगातील कोणताही देश त्याच्या जवळपास येऊ शकत नाही” असे बऱ्याच भारतीय तत्त्वज्ञांचे व श्रद्धाळू सुशिक्षितांचे आवडते, लाडके मत असावे. जगातील अनेक विचारवंतांनी व काही भौतिक शास्त्रज्ञांनीही भारताची त्या बाबतीत प्रशंसा केली आहे. असेही प्रतिपादन काही भारतीयांकडून केले जाते व ते अगदी खोटे नसावे. मात्र ते निर्विवाद खरे नाही व महत्त्वाची बाब अशी की या तथाकथित उच्च तत्त्वज्ञानामुळेही भारताच्या तळा-गाळातील लोकांना भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही मानाने वागविण्यात आलेले नाही अथवा भारताचे सर्व नागरिक भौतिक दृष्टीने समृद्ध झालेले नाहीत.
संपूर्ण मानवजात संघटितपणे एका ध्येयाने कार्यरत होण्याची कल्पना जरी अति आशावादी असली तरी संपूर्ण भारतीयांनी, निदान त्यातील सुबुद्ध नागरिकानी तरी एक दिलाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न झाले तर भारताचा अधःपात फार दूर नाही. त्यातून काही थोडे भारतीय निसटतीलही. पण ते निंदेचे धनी होतीलच. व्यक्तिगत स्वार्थाचा विचार करून देशहितावर निखारे ठेवणारे, डोळे झाक करणारे अशीच त्यांची संभावना होईल.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे एक वर्णन भारतांतील शासनाच्या प्रकारचे केले जाते. मात्र या प्रकारात १०० कोटी लोक सामावतात व ते मधून मधून मतदान करून प्रतिनिधी निवडून देतात एवढ्याच अर्थाने ते वर्णन योग्य आहे. बाकी ही लोकशाही या प्रकाराची मोठी चेष्टा आहे असे कधीकधी स्पष्ट जाणवते. कारणे—-
१. १०० कोटी लोकसंख्येत ७० ते ८० कोटी मतदार असतील. त्यांपैकी सुमारे ३५ ते ४० कोटी मतदारच मतदान करतात. त्यांपैकी एक कोटी मते विविध कारणांनी फुकट जात असतील.
२. ३५/४० कोटींपैकी १० कोटी मतदार निरक्षर असावेत. मतपत्रिकेवरील उमेदवारांची नावेही त्याना वाचता येत नसतील.
३. बहुसंख्य मतदाराना योग्य प्रतिनिधी कोण होऊ शकेल हे ठरविण्यासाठी आवश्यक अशी बौद्धिक क्षमता नसते.
४. पक्षपद्धतीमुळे नागरिकांच्या प्रतिनिधी निवडण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडते. अ या पक्ष उमेदवारापेक्षा ब हा इतर उमेदवार अधिक लायक वाटला तरी मत अ लाच द्यावे लागते.
५. वस्तू, पैसे, अगदी दारू देऊनसुद्धा मतदार विकत घेता येतात.
६. प्रतिनिधी म्हणून निवडून जाण्यासाठी अधिकृत रीतीनेही प्रचंड खर्च करावा लागतो. अनधिकृत खर्चही केला जातो. निवडून आल्यावर हा पैसा भ्रष्टाचारी मार्गानी वसूल केला जातो. अनेक लायक उमेदवार हा खर्च करू शकत नाहीत.
७. मतदार ओढून घेण्यासाठी धर्म, जात, जबरदस्ती, पूर्ण करता येण्यास अशक्य अशी आश्वासने यांचा वारेमाप उपयोग केला जातो. प्रसंगी मतदान केंद्र ताब्यात घेणे. अनधिकृत मत पत्रिका वापरणे हे ही प्रकार अमलात आणले जातात.
८. जे प्रतिनिधी म्हणून निवडून जातात त्यांत अल्पशिक्षित, गुंड, भ्रष्टाचारी, स्वहितासाठी अथवा पक्षासाठी कंपूशाही करून राजकीय अथवा आर्थिक निर्णय घेणाऱ्यांचा मोठा भरणा असतो.
९. बहुसंख्य प्रतिनिधींत निर्भेळ शास्त्रीय दृष्टी व अभ्यासू वृत्ति आढळून येत नाही. त्यामुळे अभ्यासू शास्त्रीय दृष्टीने शासन चालविण्याची परंपरा भारतात निर्माण झालेली नाही. निदान तसा विश्वास सुशिक्षित नागरिकांना वाटत नाही.
१०.वरील सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून व इतर अनेक कारणांनी कार्यक्षम, निष्पक्ष अधिकारीवर्ग भारतात निर्माण झालेला नाही. आरंभापासून अत्युच्च दर्जाच्या सचिवापासून चतुर्थ श्रेणीतील नोकरापर्यंत विश्वासार्ह व्यक्ती
शासनात अपवादानेच दिसतात.

या सगळ्यांचे अनेक दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहेत. उदाहरणार्थ
१. शासनाकडून कोणत्याही एका जनकल्याणाच्या कामासाठी अब्जावधी रुपयांपैकी फक्त १५ टक्के रक्कम त्या कामासाठी उपलब्ध होते. बाकीची ८५ टक्के भ्रष्टाचारी लोक वाटून घेतात असे भारताचे एक माजी पंतप्रधानच म्हणाले. आता एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी भ्रष्टाचार वाढलेलाच असेल.
२. भारताच्या नागरिकांची व पुढील पिढीचीही शैक्षणिक दुरवस्था वर्णन करायला एक मोठा ग्रंथ लिहावा लागेल. प्राथमिक शिक्षणापासून तथाकथित उच्च शिक्षणापर्यंत सर्व पातळ्यांवर शासकीय निधी अपुरे आहेत. संस्थाचालक गल्लाभरू आहेत, कार्यक्षम शिक्षक तुटपुंजे आहेत. पालक उदासीन व अल्पशिक्षित आहेत. शिक्षण-साधने, प्रयोगशाळा अपुऱ्या आहेत, वर्गखोल्या अपुऱ्या आणि वर्गातील विद्यार्थिसंख्या मात्र खूप मोठ्या आहेत. तरीही शेकडो विद्यार्थी पदवीधर होतात कारण पदव्या विकत देणारे दुकानदारही मोठ्या संख्येने आहेत. विकासाच्या सर्व क्षेत्रांत ज्ञान व संशोधन यांचा भयानक तुटवडा आहे.
यातून भारताला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर जाणे अशक्य नसले तरी खूप अवघड आहे. मात्र त्यासाठी सर्व सुविद्य व सुबुद्ध नागरिकांनी एखाद्या संस्थेची स्थापना करून सहकार्याने विचार आणि कार्य करण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्य भारतीयांनी त्यांना सर्व प्रकारे पाठिंबा द्यावा. थोडीशी आनंदाची वस्तुस्थिती अशी आहे की भारतात आजही लोकजागृतीचे काम प्रामाणिकपणे करणारे शेकडो कार्यकर्ते आहेत. मात्र ते विखुरलेले आहेत. त्यांच्या काही संस्था आहेत. त्या संस्थाशी संलग्न असलेले थोडे फार लोकप्रिय, देशप्रेमी, निःस्वार्थी नागरिकही आहेत. परदेशांत स्थायिक झालेले अनेक धनवान भारतीय भारतात लोकजागृती व्हावी अशी इच्छा बाळगणारे आहेत. माननीय ग. प्र. प्रधान, मधु दंडवते यांसारख्या दक्ष व सुजाण नेत्यांनी एकत्र येऊन वरील संस्था व देशस्थ-परदेशस्थ नागरिकांना एका ध्वजाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला तर त्याना यश येण्याची शक्यता आहे. मला माहीत असलेल्या दोन व्यक्ती म्हणून ही दोन नावे घेतली आहेत. त्यांच्यासारखे ते दोनच नसतील. खुद्द त्यांनाही तशा दुसऱ्या व्यक्ती माहीत असतील. त्या सर्वानी प्रारंभ करायला हवा. तरुणांनी त्यांना साथ द्यायला हवी. अशी संघटना व तिचे कार्य उभे राहण्यासाठी बरीच पथ्ये पाळावी लागतील. माझ्या कल्पनेनुसार त्यातील काही पथ्ये ही असतील :—-
१. बहुसंख्य भारतीय लोक पैशाला लालचावलेले असले तरी बहुतेक भारतीय अजूनही स्वार्थत्यागी व्यक्तींना मानतात. संस्थेचे नेते त्यागी असावेत व दिसावेत सुद्धा.
२. संस्थेच्या व्यवहारात किंचितही भ्रष्टाचार असू नये. सर्व हिशेब चोख आणि व्यवहार पारदर्शक असले पाहिजेत.
३. कोणाही धनवंताकडून धन घ्यावे. पण संस्था अथवा संस्थेतर्फे धन घेणारी व्यक्ती त्याची मिंधी होऊ नये. त्याचे धन काळे असले तरी देताना पांढरे म्हणूनच द्यायची त्याची तयारी हवी. संस्थेकडे एकही काळा रुपया असता कामा नये. तिने तो निर्माणही करू नये.
४. ठिकठिकाणच्या कार्यकर्त्याकडून देणग्या गोळा कराव्या लागतील. त्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ते/संस्था नेमाव्या. शक्य तो हे काम स्थानिक संस्थांकडेच सोपवावे. पावती दिल्याशिवाय वर्गणी स्वीकारली जाता कामा नये.
५. प्रारंभी गावागावातून लोकांनी ठराविक दिवशी व वेळी एकत्र येऊन प्रतिज्ञा उच्चारावी. गावोगावी साधे स्वच्छतेचे वगैरे कार्यक्रम योजावेत. यात शासकीय/निमशासकीय संस्थाचे सहाय्य मिळवले जावे.
६. काम खूप मोठे, दीर्घकाळ करावे लागणारे आहे. देशासाठी काम करावयास सिद्ध होणारे तरुण वयोवृद्ध नेत्यांनी व इतरांनीही मिळवावे. आवश्यक तर त्यांना गरजेनुसार धन द्यायला हवे.
भारताची अधिक दुर्दशा टाळायची असेल तर हे किवा असे काही घडवावेच लागेल.

खेड, जि. रत्नागिरी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.