संप, सत्य आणि इतिहास

मराठीतील बहुतेक नियतकालिकांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात आजचा सुधारक आपल्या वाचकांच्या लेखनावर चालतो, पत्रांमधून आणि लेखांमधून, आणि असे वाचक जगभर पसरले आहेत, त्यामुळे लेख प्रकाशित झाल्यानंतर त्यावर प्रतिसाद येण्याला मध्ये एखादा अंक जावा लागतो. नुकतेच हे एक-सोडून-एक चक्र अडखळण्याचा अनुभव आला—-पण तो मात्र लागोपाठ दोनदा! नोव्हेंबरचा (११.८) हा अंक ऐन दिवाळीत छापखान्यात पोचला. मोठ्या सुट्ट्यांनंतर वेळेवर परत कामावर रुजू होण्याची वृत्ती भारतात कमी आहे. आगेमागे एखादा आठवडा उशीरा येणे फारसे गैर मानले जात नाही. पण अनेकांच्या सहभागातून घडणाऱ्या क्रियांना हे फार मारक ठरते. एखादाही काम करणारा हजर नसेल तर साराच ‘ताल’ बिघडतो. छापखाना आणि आ.सु.चे कार्यालय या दोन्ही जागी ही ‘बेताल-बेसूर’ परिस्थिती उपजली. ‘पुन्हा असे व्हायला नको!’, असे एकमेकांना बजावत आम्ही डिसेंबरचा अंक (११.९) अगदी वेळेवर छापखान्याबाहेर काढला—-तो टपाल कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस होता! संपांचे अभ्यास दाखवतात, की संघटित क्षेत्रातच कामगार संपावर जाऊ शकतात. ही क्षेत्रे एकूण रोजगारापैकी तीसेक टक्केच व्यापतात, पण सोईसवलती, पगार आणि संपांमुळे होणारी इतरांची गैरसोय, ह्या सर्व बाबतीत ही क्षेत्र प्रमाणाबाहेर ‘जीवन’ व्यापतात. योग्य वेळ साधली तर संपांच्या नुसत्या धमकीनेही संपकरी आपल्या मागण्या ‘कमावू शकतात. ह्यात असंघटित क्षेत्रांच्या मागण्या, गरजा वगैरेंबाबत मात्र ‘अडजीभ खाई आणि पडजीभ बोंबलत राही’, असा प्रकार घडतो. पण माध्यमेच संघटित असल्याने हा ओरडा एकूण समाजाच्या कानावर पडणेही दुरापास्त होते. सध्याच्या आर्थिक मंदीने तर असंघटित क्षेत्राला फारच दुर्बल आणि हळवे करून सोडले आहे. असो.

एकूण आ.सु.वरचा परिणाम असा की अंक २१ डिसेंबरला पोस्टात पडला. आता हा पोचणार केव्हा, त्यावर प्रतिक्रिया येणार केव्हा आणि चर्चा पुढे सरकणार केव्हा!

मागच्या अंकात भ. पां. पाटणकरांचे एक महत्त्वाचे पत्र आहे. त्यात पाच ठोस मुद्दे होते, ज्यांची चर्चा व्हायला हवी आहे.
१. हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्मविपाक ह्या दोन मूलभूत कल्पना आहेत. त्या बुद्धिगम्य नाहीत आणि म्हणून हिंदूधर्मही बुद्धिगम्य नाही.
२. तत्त्वज्ञानाने चिंतन करून ब्रह्म, पुरुष-प्रकृती, the word of God, अशी अंतिम सत्ये घडवली. ह्या अर्थाने शास्त्रे (‘विज्ञान’ हा जास्त नेमका शब्द) अंतिम सत्याचा शोध घेत नसतात.
३. धर्म बुद्धिगम्य नाही, आणि विज्ञान अंतिम सत्यांपर्यंत पोचत नाही. पण मनुष्यस्वभावाला अंतिम सत्ये हवीच असतात.
४. बुद्धीने घडवलेले, सुखाच्या कल्पनेवर बेतलेले नीतिनियम ‘कोरडे’ असतात. त्याऐवजी सौंदर्यावर आधारित मिथके घडवून, जुन्या मिथकांचे नवीनीकरण करावे.
५. अवैज्ञानिक मिथकांपेक्षा इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या मिथकांवर टीकेचा रोख वळवावा.

आता हे मुद्दे तपासायचा प्रयत्न करतो.
काही कल्पना तरी बुद्धीने, विज्ञानाने कमावलेल्या ज्ञानाच्या थेट विरोधात असतात. पुनर्जन्म आणि कयामत का दिन (Day of Judgement) या अशा प्रकारच्या कल्पना आहेत. एखादी सजीव रचना कशी जन्माला येते, जगते आणि मरते, याचा जीवशास्त्रात खूप बारकाईने तपास झाला आहे. आणि या तपासात दिसणाऱ्या कोणत्याच क्रियेत किंवा क्रियेच्या टप्प्यात आज जगत असलेली व्यक्ती पूर्वी कधीतरी ‘जगून गेलेली’ आहे, असे दिसत नाही. आज मरणारी व्यक्ती पुढच्या एखाद्या तारखेपर्यंत कोणत्या तरी रूपात टिकून राहिली आहे, असेही दिसत नाही. बरे हा तपास एकूण जगण्याच्या क्रियेची जी काही माहिती देतो, तिच्यापासून व्यवहारात खूप उपयोगी पडणारी तंत्रे घडवता आली आहेत. म्हणजे ही माहिती परिपूर्ण नसली तरी भरवशाची आहे. अशा वेळी आपण पाटणकरांची भाषा वापरून पुनर्जन्म आणि कयामत यांसारख्या कल्पनांना मिथके मानायला हवे.

अशी मिथके माणसांना का आवश्यक वाटतात? एक उत्तर सुचते —- पहा पटते का, ते! जीवशास्त्र सांगते की प्रत्येक जीव स्वतःचे सातत्य टिकवायला धडपडतच असतो. प्रजोत्पादनाची आसही शेवटी स्वतःचा अंश तरी टिकावा, याचीच आस असते. हा गुण सजीवांच्या व्यवहारात केंद्रस्थानी असतो. मृत्यू म्हणजे सातत्यात खंड पडणे, आणि तोही स्वल्पविराम–अर्धविराम नव्हे, तर पूर्णविराम! मी संपणार — पण इतर विश्व ‘सुखी’ राहणार, हे माणसांना दुःखद वाटते, कुरूप वाटते, अनाकर्षक आणि अन्याय्य वाटते. मग ह्या कष्टप्रद प्रकाराभोवती मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे (संक्रांतीच्या हलव्यातल्या साखरेसारखे!) कवच लागते (पुनर्जन्म, कयामत) एवढेच. पण म्हणून काही त्या ‘खऱ्या’ ठरत नाहीत. उलट खऱ्या ठरलेल्या सर्व विज्ञानाला त्या काट मारतात. पण त्यांच्यावरचा विश्वास जिणे सुकर करतो, हा योगायोग नव्हे. उत्क्रांतीच्या तत्त्वातून असे सुचवता येईल, की ही मिथके (ही आत्मवंचना!) काही लोकांना आवश्यक वाटतात – भलेही ती पूर्णपणे अविवेकी असोत – कारण ती फार आत्मपरीक्षण करणे टाळतात.

पण धर्म ही ‘सुंदर’ मिथके घडवून थांबत नाही, तर त्यामध्ये नीतीचा विचारही घुसडतो. कर्मविपाक आणि ‘डे ऑफ जजमेंट’च्या दिवशी पापपुण्याचा होणारा हिशोब, ही मिथकांना धर्माने बहाल केलेली नीतीची ‘फोडणी’ आहे. विवेकाने पाहता वैज्ञानिक ज्ञानाला निरर्थक ठरवणारी मिथके नीतीशी जोडली जाण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मिथकांचे नवीनीकरण व्हायला पाहिजे, हे पाटणकर नोंदतात. मी ह्या ‘रीनोव्हेशन’चा पहिला टप्पा म्हणून मिथके मोडीत काढण्याच्या पक्षाचा आहे. जीवशास्त्राच्या कक्षेत येणाऱ्या भौतिक व्यवहारातील गोष्टींची नीतीशी गल्लत करणारी पुनर्जन्म-कर्मविपाक मिथके मला घातक वाटतात. जातीजातींच्या उच्चनीच भावाला आधार पुरवणे, प्रयत्नवादाबद्दल मनात संभ्रम उत्पन्न करणे, अशी काही ‘दुष्कृत्ये’ ह्या मिथकांच्या खात्यावर जमा आहेत. आता त्यांना बाद करणेच बरे.
तत्त्वज्ञानाने अंतिम सत्ये चिंतनातून घडवली, हे म्हणताना तत्त्वज्ञानाची अध्यात्माशी गल्लत तर होत नाही? बरे, ब्रह्मासारख्या कल्पना ‘सत्य’ आहेत, हे तरी कशाच्या आधारावर म्हणायचे? ती कधी तपासली गेलेली नाहीत. त्यांचा वापर करून माणसांना प्रश्न सोडवता आलेले नाहीत. ती ‘अंतिम’ आहेत, असेही दाखवता येत नाही. ती फक्त ‘व्यापक’ असण्याचा आभास उत्पन्न करणारी पुनर्जन्म, कयामतपेक्षा वेगळ्या पातळीची, असे का म्हणू नये?

अंतिम सत्य असणे-नसणे हा विषय अवघड आहे. पण त्या कल्पनेचे आकर्षण आणि तसे ‘सत्य’ नाही असे मानण्यातला ‘कोरडेपणा’ मात्र पाटणकर मानतात तितका सार्वत्रिक नाही, असे मला नोंदवावेसे वाटते. ते म्हणतात, ‘(अंतिम सत्याची कल्पना नाकारणे) मनुष्यस्वभावात बसत नाही’. हे व्यापक सामान्यीकरण मला पटत नाही. एखादेवेळी विज्ञानातल्या कल्पनांचे सौंदर्य, त्या ज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांची संस्कृती, ह्याची ओळख असणाऱ्या कोणालाच हे सामान्यीकरण पटणार नाही. मला कल्पना आहे, की पंधरा (तरी!) विचारवंत इथे आईन्स्टाईनची (चुकीची) साक्ष काढतील. पण आईन्स्टाईनचा Unified Field Theory चा पाठलाग हे त्याच्या आयुष्यातले सर्वांत भाकड, अ-सर्जनशील प्रकरण होते, असे बोर वगैरे अनेक ‘तुल्यबल’ वैज्ञानिकांचे मत होते. फाईनमन, कार्ल सेगन, स्टीफन जे गूल्ड, जेम्स वॉटसन, अशा अनेकानेक शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक लिखाणातून दिसणारे सौंदर्यभान आणि सुसंस्कृतपणा, यांची चव घेतल्यावर विवेकवादी विचार आणि असुंदर कोरडेपणा यांचे समीकरण मांडता येत नाही. सुखाच्या कल्पनेत सौंदर्यानुभवही येतो, हे मानायला कोणती अडचण आहे? १० डिसेंबर २००० रोजी आ.सु.च्या लोकांबरोबर प्रा. मे. पुं. रेगे यांची चर्चा झाली. तिचा ‘गाभा’ म्हणजे खालील ‘जुगलबंदी’:

प्रा. रेगे : तुमची सुखाची व्याख्या फार रुंद (व्यापक) आहे.
दियदे : तुमची सुखाची व्याख्या फार अरुंद (कोती) आहे.
ह्यावर टिप्पणी करणेही ध्राष्ट्याचे आहे! पण सौंदर्य, ज्ञानप्राप्ती, ‘त्यागी’ वर्तन, यांच्यामुळे सुख मिळते, हे नाकारणे मला जमलेले नाही. उलट्या दिशेने सुखी असण्यात सौंदर्यही आहे, असेही नाकारता येत नाही. इथे “काका! मला वाचवा!”, म्हणून गप्प बसावे, हेच बरे!

अशास्त्रीय ठरलेल्या पुनर्जन्म-कर्मविपाकाच्या मिथकांनीच तर भारताला जातिभेदाच्या ‘नॅरो डोमेस्टिक वॉल्स’नी विभागले ना? मग त्या मिथकांविरुद्ध ऐतिहासिक मिथकांइतक्याच जोराने ओरडायला हवे. इतिहासाचा विपर्यास करणारी मिथके घातक तर आहेतच. त्यांची चर्चा करणारे लेखही आ.सु.त येत असतात. मागे मुखपृष्ठावर १८५७ च्या सुमाराला गोडसे भटजींना रामजन्मस्थान कसे दिसले होते, हे नोंदले होते. त्यांना तेथे मशीद किंवा तत्सम ‘रचना’ दिसलीच नव्हती. ब्राह्मणांचे मांसभक्षण वगैरे विषयांवरही ‘ऐतिहासिक’ सत्य काय, यावर चर्चा झाल्या आहेत.
(गोडसे भटजींना चूक ठरवणारे काही पुरावे मात्र कोणी पुरवलेले नाहीत!)

पण आम्हाला तसल्या मिथकांविरुद्ध लिखाण मिळत नाही, म्हणून आम्ही जातिभेदाचे मूळ असलेल्या मिथकाकडे दुर्लक्ष करावे, असे नव्हे. पाटणकर व त्यांच्या संपर्कातील ऐतिहासिक सत्याचा अपलाप दाखवून देणारे कोणी लेखक असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. पाटणकरांनी अग्रक्रमाबद्दल मांडलेले मुद्दे आम्हाला पूर्णपणे मान्य आहेत. पण आमचे अग्रक्रम, आमच्या वाचक-हितचिंतकांचे अग्रक्रम, आम्हाला उपलब्ध होणारे साहित्य, ह्या साऱ्यांचा परिणाम कोणालाच पूर्ण समाधान देत नाही, याला नाईलाज आहे!
– संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.