औषधाविषयी

प्रत्येक मनुष्याला स्वतां औषधीशास्त्र समजावें हेच उत्तम. आत्मज्ञाना-पेक्षांहि ह्या शास्त्राच्या ज्ञानाची आवश्यकता जास्त आहे. पण आत्मज्ञान मिळविण्याची मनुष्ये जितकी खटपट करतात तिच्या शतांशहि औषधिज्ञान मिळविण्याची खटपट मनुष्ये करीत नाहीत. फार काय सांगावें, तज्ज्ञ डॉक्टर म्हणविणारेहि जशी खटपट करावी तशी करीत नाहीत. तशी त्यांनी खटपट केली असती तर आलोपथी, होमिओ-पथी, नेचरोपथी, हकीमी अशी अनेक औषधीशास्त्रे न राहातां एकच औषधिशास्त्र राहिले असते. कारण ईश्वरनिर्मित नियम सांगणारें असें औषधिशास्त्र गणितशास्त्रा-प्रमाणे एकच असले पाहिजे. तें एकच खरे शास्त्र कोणतें हे ठरविण्यापुरता तरी अभ्यास सामान्य माणसांनी करून त्या शास्त्राप्रमाणेच चिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांचा आश्रय त्यांनी करावा; नाहींतर अनेक प्रयोग आपल्या शरीरावर करवून घेण्याची व शेवटी निराश होण्याची व खरा वैद्य भेटला असतां त्याविषयींहि साशंक असण्याची आपत्ति उत्पन्न होते.
[के. ल. दप्तरी यांनी ११ मार्च १९४३ ला परमहंस परमानंद यति यांना लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर. संदर्भ : विश्रब्ध शारदा : पहिला खंड, ह. वि. मोटे प्रकाशन, १९७२]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.