तत्त्वज्ञानातील माझी वाटचाल

रसेल यांना जर कुणी विचारले असते – रसेल यांचे नाव केवळ उदा-हरणादाखल आहे की, तत्त्वज्ञानात तुम्ही कुणाचे अनुयायी आहात तर हा प्र न त्यांनी रागाने झिडकारला असता. जरा शांत झाल्यावर त्यांनी बहुधा असे उत्तर दिले असते की मी कुणाचा अनुयायी नाही, पण अनेक तत्त्ववेत्त्यांची मते विचारात घेऊन आणि इतर अनेक गोष्टींचा विचार कस्न मी माझे स्वतःचे तत्त्वज्ञान घडविले आहे. ते एखाद्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या मतांच्या जवळ येते का हे इतरांनी ठरवायचे आहे. कुणीही लहान मोठ्या तत्त्ववेत्त्यानेही असे उत्तर दिले पाहिजे. तत्त्वज्ञान हा ज्ञानप्रांतच असा आहे की प्रत्येक तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे त्याचे तत्त्वज्ञान असते, त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी, वैयक्तिक दृष्टिकोनाशी ते अविच्छेद्यपणे संलग्न राहते. न्यूटनचे सिद्धान्त भौतिकीमध्ये (physics) निमज्जन पावतात, त्याच्यापासून तुटून भौतिकीच्या सामान्य उपपत्तीचे ते भाग बनतात. तत्त्वज्ञान असे त्या त्या विशिष्ट तत्त्ववेत्त्यापासून तुटत नाही. तत्त्वज्ञानाच्या परंपरेचा ते भाग बनते, पण त्याच्या निर्मात्याच्या व्यक्तिमत्त्वाशी ते निगडितही राहते.
ह्यामुळे एका बाजूला काव्य आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान–तर्कशास्त्र, इ. ह्यांच्या दरम्यान तत्त्वज्ञानाच्या परंपरेचे स्थान असते. एखाद्या महान तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान-उदा. प्लेटो, स्पिनोझा, कांट, हेगेल, बुद्ध, ईश्वरकृष्ण (सांख्य), शंकर, रामानुज, इ.—-हे बौद्धिक महाकाव्य असते असे म्हणता येईल. ते प्रामाण्याचा, सत्यतेचा दावा करते व म्हणून ते बौद्धिक असते. पण विश्वव्यापी, मानवव्यापी अशी दृष्टी आणि ह्या दृष्टीवर आधारलेली एक आदर्श जीवनसरणी त्यात प्रकट झालेली असते व म्हणून ते महाभारतासारखे महाकाव्य असते. त्याचे बौद्धिक खंडन केले, तरीही विश्वदर्शन म्हणून नवीन बलिष्ठ तर्कशास्त्राची रचना करणाऱ्या रसेल यांनी लालिट्झ ह्या तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानावर पुस्तक लिहिले आणि त्यांचा जीवन-विषयक दृष्टिकोन स्पिनोझावादी राहिला.
मी स्वतःचे वर्णन कसे करीन? मी मूलतः कांटवादी आहे. ज्ञानशास्त्रात आणि नीतिशास्त्रात. नीतिशास्त्रात स्वायत्त असा, म्हणजे ज्याला संकल्पस्वातंत्र्य आहे आणि स्वतःच्या कल्याणाची (हिताची, चांगल्या अवस्थेची) कल्पना आहे असा, मानवप्राणी हा नैतिक कर्ता (moral agent) असतो, त्याला (त्याच्या कल्याणाला) स्वतोमूल्य असते आणि म्हणून तो स्वतःसाध्य (end-in-himself) असतो, असा नैतिक कर्ता अशाच प्रकारे स्वतःसाध्य असलेल्या नैतिक कर्त्यांच्या मंडळाचा (kingdom of ends) सदस्य असतो, त्यामुळे स्वतःचे हित साधताना इतर सदस्यांच्या हिताच्या आड येणारे कोणतेही कृत्य आपण करणार नाही ही मर्यादा तो स्वतःच स्वतःसाठी आणि इतरांसाठी घालून घेतो आणि घालून देतो, प्रत्येक सदस्य अशीच मर्यादा स्वतःसाठी व इतरांसाठी घालतो. स्वायत्त अशा माणसांनी स्वतःच्या संकल्पा-नुसार ह्या ज्या सार्वत्रिक मर्यादा स्वीकारलेल्या असतात ते म्हणजे नैतिक नियम होत ही कांटची नीतिविषयक भूमिका मला मान्य आहे.
असे सार्वत्रिक नियम स्वतःसाठी आणि इतरांसाठी घालून देण्यात माणसाची विवेकशक्ती (Reason) प्रकट होते. प्राणी म्हणून ज्या वासना, प्रेरणा, इ. मानवी प्रकृतीत सामावलेल्या असतात ते ह्या प्रकृतीचे एक अंग होय. आत्मनियमन आणि आत्मदिग्दर्शन करणारी त्याची विवेकशक्ती हे तिचे दुसरे अंग. ह्या दोन अंगांतील ताणाने मानवी जीवन व्यापलेले असते आणि त्यांच्या सुसंगतीतून नैतिक कृती जन्माला येते. माणसाच्या नैतिक जीवनाच्या संदर्भात विवेकशक्ती आणखी एक कार्य करते. नैतिक जीवनाचा आशय—-माणसे जी कृत्ये करतात त्यांची साध्ये ही माणसाच्या स्वाभाविक प्रकृतीतून लाभलेली असतात, तर त्यांचा आकार (form) त्याच्या विवेकशक्तीपासून लाभलेला असतो असे आपल्याला म्हणावेसे वाटेल. पण हा आकार हे विवेकशक्तीचे साध्यच असते. विवेकाने आकारित केलेले नैसर्गिक प्रेरणेचे जे साध्य असते ते नैतिक कृतीचे साध्य असते. भूक लागली की अन्न खाणे ही स्वाभाविक कृती होय. पण जे अन्न उपलब्ध असेल ते समप्रमाणात सर्वांना वाटून देणे किंवा प्रत्येकाच्या गरजेच्या प्रमाणात सर्वांना वाटणे आणि आपल्या वाट्याला जेवढे येईल त्याच्यावर तृप्त होणे ही नैतिक कृती होय.
विवेकशक्ती ज्याप्रमाणे सर्व साध्यांचे नियमन करते त्याप्रमाणे ती स्वतः काही साध्ये माणसाला देते. ज्ञान किंवा सौंदर्य—सौंदर्याचा आस्वाद आणि निर्मिती—ही विवेकजन्य साध्ये होत. मानवी प्रकृतीचे जे घटक आहेत त्यांचा विकास आणि अविष्कार ज्या जीवनात होतो ते चांगले मानवी जीवन ह्या अॅरिस्टॉटीलियन कल्पनेचा पुनरुद्धार कांटने आपल्या ‘क्रिटिक ऑफ जज्मेन्ट’मध्ये केला. धारणा शक्ती (faculty of understanding)आणि विवेकशक्ती हे ज्ञानशक्तीचे घटक आहेत आणि त्यांचा आविष्कार ज्ञानाच्या निर्मितीत आणि सौंदर्याच्या आस्वादात आणि निर्मितीत होतो. प्राणी म्हणून माणसाला ज्या संवेदना आणि वासना लाभतात त्यांना आकार देणारी, त्यांचे नियमन करणारी शक्ती म्हणून विवेकशक्ती त्यांच्याहून श्रेष्ठ आहे. तेव्हा, (इतर गोष्टी समान असल्या तर), ज्या जीवनात ज्ञानाची साधना आहे ते जीवन, ज्याच्यात ज्ञानसाधनेला स्थान नाही अशा जीवनापेक्षा अधिक चांगले असते. हीच गोष्ट सौंदर्याचा आस्वाद आणि निर्मिती ह्यांच्या बाबतीत खरी आहे. पण अशा ‘चांगल्या’ जीवनाचा चांगुलपणा हा नैतिक चांगुलपणा नसतो. विवेकशक्ती-पासून लाभणाऱ्या ज्ञान, सौंदर्य इ. ‘मूल्यांची’ साधनाही नीतीच्या चौकटीत केली पाहिजे. मूरची ‘स्वतोमूल्ये’ कांटने सुरक्षित राखली आहेत.
वैज्ञानिक ज्ञानाचा विषय होणारे जे अस्तित्व आहे त्याच्या पलीकडे असलेले अस्तित्व आहे, पण मानवी ज्ञानशक्तीला त्याचे ज्ञान होऊ शकत नाही. एक नैतिक प्राणी म्हणून आचरण करताना ह्या ‘परतत्त्वा’चे आकलन होते, पण हे आकलन म्हणजे श्रद्धा असते, ज्ञान नसते असे कांटचे मत आहे आणि ते मला तत्त्वतः मान्य आहे. हा धूसर प्रांत आहे आणि त्याविषयी धूसरपणे लिहिणे क्रमप्राप्त आहे. माणूस अपूर्ण आहे, पण आपण अपूर्ण आहोत हे भान त्याला आहे. म्हणून पूर्णाची संकल्पना त्याला आहे आणि ह्या पूर्णाची ओढही त्याला आहे. ह्या पूर्णा-विषयी परिकल्पना (कांटने वापरलेला शब्द Idea’) करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती मानवी प्रकृतीत आहे. अशा अनेक भिन्न, परस्परविसंगत परिकल्पना मानवी संस्कृतीत विकसित झाल्या आहेत. त्यांची संकल्पनात्मक मांडणीही तत्त्वज्ञानाच्या इतिहासात झालेली आढळते. उपनिषदांत संकल्पना आणि प्रतिमा यांना जोडणाऱ्या सीमेवर ही मांडणी झाली आहे. पण बुद्ध, शंकराचार्य, रामानुज, प्लेटो, प्लॉटिनस, स्पिनोझा इत्यादींनी संकल्पनात्मक व्यूहांच्या द्वारे अशी मांडणी केली आहे. परतत्त्वाविषयीची जी परिकल्पना-प्रतिमा विशिष्ट मानवी समूहाने किंवा व्यक्तीने केलेली असते तिच्याशी काही भावना आणि आचरणाची काही स्पे निगडित असतात. परंपरागत किंवा शास्त्रपूत विधी, संस्कार, व्रते, ध्यान, पूजा इ. ह्या आचरणात अंतर्भूत असतात. हा धार्मिक–आध्यात्मिक आचरणाचा, साधनेचा प्रांत होय. भक्ती, पूज्यभाव, प्रेम, वैराग्य इ. भावनांनी ही साधना प्रेरित झालेली असते आणि ह्या साधनेने ह्या भावनांना बळकटी येते. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, अहिंसा, अपरिग्रह ह्या आध्यात्मिक साधनेत फुललेल्या नीतीपलीकडे जाणाऱ्या पण नीतीशी सुसंगत असलेल्या भावना होत. परतत्त्वाच्या परिकल्पनेशी जर ह्या भावना आणि साधना संलग्न नसल्या, तिचा आविष्कार त्यांच्यांत होत नसला, तर ती परिकल्पना केवळ तार्किक, शुष्क संकल्पना राहते. अशा आध्यात्मिक जीवनाची अनेक रूपे आहेत. ह्या सर्व भिन्न साधनांची परिणती एकाच ‘अनुभवात’ होते असे एक भारतीय मत आहे.
स्चीनां वैचित्र्याजुकुटिलनानापथजुषाम् । नृणाम् एको गम्यस्त्वमसि पयसां अर्णव इव ।।
असे असेलही. पण कदाचित् असे असणारही नाही. जर असा अनुभव कुणाला असेल तर तो आपल्याला आला आहे हे तो सांगू शकणार नाही. पण त्याच्या जगण्याच्या रीतीतून तो प्रकट होईल. अध्यात्माचा प्रांत हा बहुविधतेचा प्रांत आहे. कदाचित् हे परिकल्पित गूढतत्त्व कायमचे गूढच राहील. आणि तरीही त्याचा स्पर्श ज्याला झाला आहे त्याला त्याच्या छायेतच जगावे लागेल. गूढाची ही जाणीव ही एका परीने माणसाचे एक ओझे आहे. पण त्याच्या मुक्तीचे बीजही तिच्यात आहे. मी स्वतः आध्यात्मिक साधक नाही. पण आध्यात्मिक साधनांच्या सर्व स्पांचा मी आदर करतो.
[प्रा. मे. पुं. रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले. ८ ते २३ डिसेंबर ह्या काळात नागपुरकरांनी रेग्यांचा सहवास आणि मार्गदर्शन याचा लाभ घेतला. खाजगी व जाहीर व्याख्याने, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी कार्यशाळा, औपचारिक व अनौपचारिक चर्चा, अशा वेगवेगळ्या मार्गांनी प्रा. रेगे आम्हाला भेटले. १० डिसेंबरला दोनेक तास खास आजचा सुधारक परिवाराशी रेग्यांनी चर्चा केली—-विषय, उपयुक्ततावाद आणि त्याच्या मर्यादा. प्रा. रेग्यांबद्दल आजचा सुधारक परिवाराला आदरही फार आणि जिव्हाळा तर त्याहूनही अधिक. ते आमचे लाडके विरोधक आणि टीकाकार होते. ते नेमके मुद्दे मांडून आम्हाला आमच्या भूमिका तपासायला लावत—-आणि हे हस्ते-परहस्ते बरीच वर्षे सुरू होते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान या ग्रंथातील त्यांनी केलेले त्यांच्या स्वतःच्या भूमिकेचे वर्णन वर देत आहोत. आमच्या विचारांना दिशा देणारे आणि ‘धार लावणारे’ हे व्यक्तिमत्त्व. त्यांचा अभाव आम्हाला पदोपदी जाणवेल—- ‘आजचा सुधारक’]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.