मराठी विज्ञान संमेलन स्मरणिका-एक परामर्श

औद्योगीकरणाच्या प्रारंभापासूनच जगात सर्वत्र लोकसंख्या-केन्द्रीकरणात झपाट्याने वाढ झाली. जी ठिकाणे औद्योगिक दृष्टीने सोईची आणि मोक्याची होती तेथील लोकसंख्येची घनता सतत वाढत राहिली व तेथे महानगरे उत्पन्न झाली. भारतातील मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, पुणे, इंदूर, कानपूर, पाटणा, अहमदाबाद यांसारखी महानगरे गेल्या शतकात ४०-५० पटीने मोठी झाली आहेत. ज्या प्रमाणात या शहरांची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात या शहरांजवळ भूमी, धन, जलसंपदा, योजनाकौशल्य व कार्यक्षम स्थानिक शासन याचा कायमचाच अभाव राहला, त्यामुळे ही महानगरे मानवी समूहांचे कोंडवाडे झाल्याची आजची परिस्थिती आहे. उपरोक्त दहा महानगरांमध्येच भारतीयांची सुमारे ७-८ टक्के लोकसंख्या राहते हे लक्षात घेतल्यास या महानगरांची भीषण अवस्था हा नि िचतपणे एक राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरतो.

मुंबई हे केवळ महाराष्ट्राची राजधानी म्हणूनच महत्त्वाचे शहर नसून भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण आहे. जागतिक स्तरावरही मुंबई शहर हे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे एक प्रमुख केन्द्र आहे. भारतात कोणत्याही क्षेत्रात होणाऱ्या उलाढाली मुंबईला वगळून होऊच शकत नाहीत. ‘बम्बई नगरी बड़ी बाका’ असे म्हणतात ते काही खोटे नाही! मुंबई हे नागरी जीवनाचे प्रातिनिधिक शहर असून या शहराचे स्वास्थ्य आणि प्रगती हा आधुनिक भारताच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जरी मुंबई महाराष्ट्रात असलो आणि ती महाराष्ट्रातच राहावी यासाठी रक्तरंजित संघर्ष झालेले असले तरी मुंबईचा विकास प्रामुख्याने अमराठी लोकांकडूनच झालेला आहे हे सत्य नाकारता येत नाही. या इतिहासावर खूप काही लिहिले गेले आहे. मुंबईची द्वारे सदैव मुक्त राहिलेली असल्याने येथील विकास पुर्तुगीज, इंग्रज, गुजराथचे मुसलमान शासक, पारशी, कच्छी, गुजरायी, राजस्थानी, पंजाबी, मोपला व उडपी इत्यादी दाक्षिणात्य, सिंधी व अलीकडे उत्तर भारतीय यांच्यामुळे झाला आहे व आजही मुंबईत यापैकी विदेशींचा अपवाद वगळता याच समाजांचे वर्चस्व आहे. मुंबईत मराठी माणसाचे स्थान गौण आहे हे कटु सत्य मराठी माणसांना वैषम्यकारक आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था तेवढ्याच मराठी मंडळीच्या हाती उरल्या आहेत आणि हा मराठी लोकांपुढील संवेदन-शील मुद्दा आहे.

मुंबईचा इतिहास, सार्वजनिक जीवन, व्यापार उदीम, उद्योग आणि नागरी समस्या याविषयी सातत्याने लिहिले गेले आहे. वृत्तपत्रे, नैमित्तिक प्रकाशने, गौरवग्रंथ, स्मरणिका या विविध माध्यमातून मुंबई विषयी चर्चा होत असते. याच परंपरेत अलीकडेच ‘मराठी विज्ञान परिषद’ या संस्थेचे ‘३५ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन’ भरले असताना प्रसिद्ध झालेली स्मरणिका असून तिचा विषयही—-‘मुंबई आजची, उद्याची?’ असाच आहे. ही स्मरणिका हाती पडल्यावर, मराठी विज्ञान परिषदेचा आजीव सदस्य, जुना कार्यकर्ता आणि परिषदेच्या नागपूर विभागाचा संस्थापक कार्यवाह या नात्यांनी, स्मरणिका वाचून बरेच विचार मनात आले ते स्पष्टपणे परंतु थोडक्यात व्यक्त करण्याची इच्छा आहे. आजचा सुधारक हे मासिक वस्तुतः मराठी विज्ञान परिषदेच्या प्रमुख उद्देशाशी सहमत असून या मासिकात विवेकवाद, स्त्रीमुक्ती, स्त्रीपुरुष समानता, धर्म व श्रद्धा यांचा विरोध, सामाजिक कुप्रथांवर टीका यासारखे विषय सतत चर्चिले जाऊन आता गुळगुळीत झाले आहेत. या सामाजिक सुधारणांसाठी मूलभूत असलेल्या प्र नांखेरीज सार्वजनिक जीवनात सतत निर्माण होणाऱ्या, विकासासंबंधी तसेच व्यवस्थापनासंबंधीच्या समस्यावर आ.सु.मध्ये चर्चा होणे योग्यच नव्हे तर आवश्यकही आहे. म्हणूनच अमर्याद शहरी-करणाच्या संदर्भात मराठी विज्ञान संमेलनाच्या स्मरणिकेचा परामर्श आजचा सुधारक ने घेणे सयुक्तिकच ठरावे.

मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेच्या वेळी संस्थापकांनी जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली होती ती काहीशी घाईघाईने योजिलेली होती हे परिषदेच्या प्रारंभीच्या वाटचालीतच ध्यानात आले होते. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हे मुख्य उद्दिष्ट बाजूला पडून केवळ एक शैक्षणिक उपक्रम स्वरूप ‘म. वि. प.’ ला प्राप्त झाले. वास्तू निर्माण करणे विज्ञान संमेलने भरविणे, विज्ञान पत्रिका प्रकाशित करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे यासारखे विज्ञानाशी संबंधित लोकांपर्यंत पोचणारेच कार्यक्रम राबविल्यामुळे, सामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक वृत्तीचे संगोपन होत नाही हे कटु सत्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना जाणविले. परंतु एक संस्था उभी राहिली आहे, तिला अनुदाने मिळत आहेत, आजीव सदस्य आहेत म्हणून संस्था जिवंत ठेवणे एवढेच मर्यादित कार्य संस्थाचालक पार पाडीत आहेत असे दिसते. परिषदेचे सदस्य नसलेल्या, तसेच विज्ञानाशी संबंध नसलेल्या सामान्य जनतेमध्ये वाढीस लागलेले धार्मिक उत्सवांचे आकर्षण, कौटुंबिक समारंभांचा बडे-जाव, फलज्योतिषाचा पगडा यासारख्या कुप्रथांविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न म. वि. प. ने कधी केलेला दिसत नाही आणि चुकूनमाकून केला असला तरी तो संपूर्णपणे फसलेला आहे ही शोकांतिका आहे.

मुंबईला भरलेल्या ३५ व्या संमेलनाचा स्मरणिकेतही मराठी विज्ञान परिषदेची ही अगतिकता स्पष्टपणे जाणवते. अखिल भारतीय संमेलन म्हणावयाचे परंतु स्मरणिकेत मात्र केवळ मुंबई शहराबद्दलच लेख प्रसिद्ध करणे अपुरे आहे. वस्तुतः अमर्याद व अनिर्बंध शहरीकरणाची समस्या सार्वत्रिक आहे. दिल्लीसारख्या राष्ट्रीय राजधानीतील नागरी वस्त्यांमध्ये प्रदूषण पसरविणाऱ्या लघु-उद्योगांची समस्या लोकसभेमध्येसुद्धा गाजली. अशा सार्वत्रिक शहरीकरणाच्या भयानक समस्येविषयी समग्र ऊहापोह करण्याची उत्तम संधी म. वि. प. स्मरणिकेने गमाविली असून एखाद्या पर्यटन-स्थळाविषयी पुस्तिका असते तसेच स्वरूप या स्मरणिकेला प्राप्त झाले आहे.
मुंबई शहराच्या विकासाचा उत्तराखडा, पाणी पुरवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, दूरसंचार यंत्रणा इत्यादी उपक्रम कसे आदर्शपणे चालू आहेत असा आभास निर्माण करणारे संबंधित अधिकाऱ्यांचे लेख हे त्या त्या विभागांच्या वार्षिक प्रतिवृत्तासारखे वाटतात. त्यात नवीन क्रांतिकारी विचार, योजना वगैरे काहीही आढळत नाही. जणु काही सगळे काही ‘आलबेल’ चालू आहे असा आभास निर्माण करण्यात आला आहे. चर्चा व्हावी, लोकमत जागृत व्होव असे या लेखांमध्ये काहीही नाही. त्यामानाने श्रीमती सुमती कुळकर्णी यांचा लोकसंख्याशास्त्रा वर (Demography) आधारित लेख, शहरीकरणाच्या समस्येची कारणे सांगून काही उपाय सुचविणारा आहे.

मुंबईचा सागरकिनारा, मुंबईतील उद्याने, व्यायाम संस्था तसेच मुंबईत आढळणारी वृक्षसंपदा यावरील लेख अभ्यासपूर्ण आणि संग्रहणीय असून त्या त्या लेखकांचा सखोल अभ्यास दर्शविणारे आहेत. तरीपण हे लेख माहितीवजाच आहेत. उद्यानांची व व्यायाम संस्थांची आवश्यकता व त्यासाठी लोकजागृती करणारे फारसे मार्गदर्शन या लेखातही आढळत नाही. वृक्षसंपदेचा विकास करणे व ती जतन करणे यासाठी सामान्य जनतेचे काय कर्तव्य आहे याविषयी अधिक ऊहापोह होणे आवश्यक होते पण तसे झालेले नाही. प्रभादेवीच्या दोन शिरीष वृक्षांना तोडणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईत मोठा वाद झाला. कोर्टकचेऱ्यापर्यंत प्रकरण गेले. या बाबतीत लेखकाने अवैज्ञानिक असा भावनात्मकच पवित्रा घेतला आहे! पुण्याला भांबुर्थ्यावरील ज्ञानेश्वर व तुकाराम पादुका मंदिरे बाजूला सारू पाहणाऱ्या प्रकरणासारखेच हेही प्रकरण होते. शहराच्या योजनाबद्ध विकासासाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी काही अडथळे, वृक्ष आदी हटविणे हे इष्ट असतानाही या विषयी एखाद्या वैज्ञानिक संस्थेने लोकांच्या भावनिक संवेदनांना प्रोत्साहन देणे अयोग्य आहे. पूर्वी पुण्यात रस्ते रुंदीकरणासाठी अनेक देवळे हटविणाऱ्या बर्वे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांना तसेच नागपूरला वर्धामार्गावरील उड्डाण-पुलासाठी असंख्य प्राचीन वृक्ष तोडण्याच्या निर्णयाला लोकांनी खपवून घेतले कारण त्याविरुद्ध जनतेच्या भावना भडकविण्याचे अवैज्ञानिक प्रयत्न विफल झाले होते. नर्मदा बचाव आंदोलन काय, बहुगुणांचे चिपको आंदोलन काय अथवा प्रभादेवीचे शिरीष वृक्ष वाचविण्याची चळवळ काय, ही सर्व अवैज्ञानिक जनहितविरोधी आंदोलने आहेत अशी ठाम भूमिका मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थांनी घ्यावयाची नाहीत तर मग कोणी?

श्री. अंबरिष मिश्र या वृत्तपत्र-लेखकाचा मुंबईतील करमणूक विश्वावरील लेख अतिशय उथळ आहे, एखाद्या वृत्तपत्रातील वृत्तांतासारखा आहे. केवळ एखाद्या नामवंत लोकप्रिय लेखकाला स्मरणिकेत स्थान देण्याचे ठरवूनच हा लेख लिहून घेतल्याचे जाणवते! वस्तुतः मुंबईला नाट्यकलेचा आणि संगीताचा उज्ज्वल इतिहास आहे. आणि आजही मुंबईला सर्व प्रकारचे नाट्यप्रवेश आणि संगीताच्या मैफली भारतातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा अधिक संख्येने होतात. मुंबईला असंख्य रंगकर्मी व गायकवादक वस्ती करना आहेत व या क्षेत्रातही अनेक समस्या आहेत. सिनेमा सृष्टीतही मुंबईचे स्थान अनन्यसाधारण आहे. या क्षेत्रातील समस्या, कला-कारांचे अनि िचत जीवन, गुन्हेगारीतून मिळणाऱ्या पैशाचा या क्षेत्राला लागलेला गळफास यासारख्या समस्याबद्दल वाचकांचे उद्बोधन करणे हे लेखकाला न पेलणारे आव्हान होते असे स्पष्टपणे जाणवते.

डॉ. आनंद नाडकर्णी या हरहुन्नरी लेखकाचा मुंबईतील जनतेच्या मानसिक तणावाविषयी लेख आहे तो फारच वरवरचा आहे. मानसिक तणाव काय फक्त मुंबईतील लोकांवरच असतो असे का लेखकाला म्हणावयाचे आहे? एकूणच हल्लीच्या चढाओढीच्या आणि धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव ही सर्वव्यापक समस्या आहे. या तणावाचे कोणते घटक असतात व हा तणाव सुसह्य होण्यासाठी सामान्य व्यक्तीने काय करावे याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित होते परंतु तसे करण्याची संधी लेखकाने गमावली आहे. कदाचित् हा लेख स्मरणिकेत आलाच पाहिजे अशा हव्यासापायीच, तगादा लावून लेख लिहून घेतला असावा असे वाटते!

एकूणच मराठी विज्ञान परिषदेच्या ३५ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनानिमित्त प्रकाशित केलेली स्मरणिका ही अपेक्षाभंग करते असेच म्हणावे लागते. आपल्या मूळ उद्दिष्टांविषयी संभ्रमात पडलेल्या संस्थेने, संमेलनाचा एक भाग म्हणून प्रथेनुसार स्मरणिकेचे संयोजन व संपादन केले आहे. लोकजागृतीचे कोणतेही लक्ष्य संपादकांसमोर नसणे व तसा प्रयत्नही त्यांनी केलेला नसणे हे या स्मरणिकेचे उणेपण आहे असेच खेदपूर्वक नमूद करणे भाग आहे.

१०२, उत्कर्ष-रजनीगंधा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.