तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे

(प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान ह्या ग्रंथ प्रकाशनसमयी दि. १७ डिसेंबरला, प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांनी केलेले भाषण)
हा गौरवग्रंथ आहे. रेग्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सिद्ध केलेला. रेगे तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या विद्यार्थिनी, नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख, प्राध्यापक सुनीती देव यांनी तो संपादित केलेला आहे.
प्रा. रेग्यांचे समग्र तत्त्वज्ञान या ग्रंथात नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा-बाहेरही रेग्यांना ओळखणारे, चाहणारे, त्यांच्या विचारांकडे आणि मांडणीकडे आस्थेने आणि आपुलकीने पाहणारे पुष्कळ विद्वान आहेत. त्यांना आवाहन केले असते तर अधिक सांगोपांग, अधिक भरीव ग्रंथ निर्माण होऊ शकला असता. अजूनही होऊ शकेल. पण प्रस्तुत निर्मितीला एक मर्यादा घालून घेतली आहे. एखादा अपवाद सोडला तर विदर्भातल्या तत्त्वज्ञानाच्या काही
अभ्यासकांनी, मराठीतून प्रसिद्ध झालेल्या प्रा. रेग्यांच्या लिखाणाचा परामर्श घेऊन, त्यांच्या चिन्तनाच्या काही अंगांवर परिचयात्मक किंवा टीकात्मक दृष्टिकोणातून केलेले लिखाण या ग्रंथात आहे. खरे म्हणजे ते या ग्रंथासाठी मुद्दाम तयार केले आहे. संपादिकेने ही मर्यादा सुरवातीलाच स्पष्ट केली आहे. ह्या ग्रंथासाठी साहित्य जमवताना डॉ. सुनीती देवांनी कष्टांची तमा बाळगली नाही. प्रा. रेग्यांच्या तत्त्वज्ञानावर निबंधलेखकांकडून साहित्य सहजगत्या मिळाले पण, आणि हा पण मोठा आहे, प्रा. रेग्यांच्या साहित्याची सूची करणे हे काम सोपे नव्हते. मुळात ते विखुरलेले—-इंग्लिश, मराठी, हिंदी नियत-कालिकांतून मोठ्या कालावधीत प्रसिद्ध झालेले. एवढेच असते तर हरकत नव्हती. पण मूळ लेखनाची प्रत आणि क्वचित काय, बरेचदा आठवणही रेग्यांजवळ नव्हती. जवळजवळ चारशे लेखांची सूची, अशा परिस्थितीत तयार करणे हे जित-श्रमता असलेल्या संपादकाशिवाय कोणाला शक्य नाही. पण पुढील अभ्यासकाला ती उपयोगी होणारच या खात्रीतून ही सूची आणि हा ग्रंथही त्यांनी सिद्धीस नेला आहे.
आता ग्रंथाबद्दल जुन्या त-हेने मांडायचे तर, ‘पाठक पुसती कोण ग्रंथ । काय वर्णिले जी येथ । पठण केल्याने प्राप्त । काय होय?’ समर्थांची क्षमा मागून, एका शब्दाचा बदल करून, असा प्र न मांडता येईल. प्रा. रेगे यांच्या विचारांची ओळख सुशिक्षित महाराष्ट्राला करून देण्यासाठी हा ग्रंथ आहे. सुशिक्षित याचा येथे अर्थ असा : ज्यांना पोटापाण्याच्या मूर्त प्र नां-इतकीच नसेल तरी त्या प्र नांच्या खालोखाल अमूर्त गोष्टींबद्दल जिज्ञासा आहे ते. ह्या जिज्ञासेत आध्यात्मिक-धार्मिक-सामाजिक असे प्र न येतात. या क्षेत्रातल्या मूल विचाराकडे म्हणजे तत्त्वांकडे जायची, खोलात शिरायची ह्यांची तयारी असते. एका शब्दात ही जिज्ञासा तत्त्वज्ञानाची जिज्ञासा आहे. प्रा. रेगे यांना, ह्या विषयात अधिकार आहे असे या ग्रंथाचे संपादक आणि सहायक मानतात. कारण पाटणकरांनी म्हटले तसे त्यांचे व्यक्तित्व, समाजातील सर्व थरांवर, काम करीत करीत स्वतंत्र, मुक्त होण्याचा एक प्रवास आहे. प्रा. रेगे एक तत्त्वज्ञ आहेत. तत्त्वज्ञ जगाकडे कसा पाहतो, समाजाबद्दल, मानवी जीवनाबद्दल, व्यष्टी आणि समष्टीच्या संबंधाबद्दल, व्यष्टीच्या सृष्टीतल्या स्थानाबद्दल त्याची दृष्टी कशी असते, याचे उदाहरण त्यांच्या रूपाने ग्रंथसाधकांना दिसले, ते सुशिक्षित मराठी वाचकाला दाखवावे यासाठी हा ग्रंथ आहे.
रेगे तत्त्वज्ञ आहेत. तत्त्वज्ञामध्ये निर्भयता हा मुख्य गुण असतो. त्याच्या सत्यनिष्ठेपोटी तो येतो. तत्त्वज्ञामध्ये मूळाकडे जाण्याची तीव्र प्रवृत्ती असते. सत्य-निष्ठेपोटी ती येते. तत्त्वज्ञ जीवनाभिमुख असतो. जीवनाला सामोरा जातो म्हणूनच तो धर्माचा आणि नीतिशास्त्राचा ऊहापोह करतो. ह्या ग्रंथात रेग्यांच्या ह्या विशेषांचा परिचय तर आहेच पण त्यांचे समीक्षणही आहे. तत्त्वज्ञाचा निर्भयपणा त्याच्या निःस्पृहपणातून येतो. सत्ताधीश म्हणा किंवा समाजधुरीण म्हणा, ग्रंथकार म्हणा की शक्तिशाली पत्रकार म्हणा यांना स्चेल की नाही याची पर्वा न बाळगता निर्भय, निःस्पृह विचारवंत बोलत असतो. सामाजिक चिन्तन हाच विषय घ्या. तत्त्व आणि व्यवहार या दोन्ही दृष्टींनी, हिंदू धर्म—-मुस्लिम धर्म— -ख्रिस्ती धर्म यांच्या वरचे रेग्यांचे जे भाष्य आहे ते लक्षात घेण्यासारखे आहे. म. ज्योतिबा फुले आणि बाबा-साहेब आंबेडकर हिंदू धर्माचे केवढे निंदक, स्वतः नव्या धर्मांचे प्रवर्तक! पण ते हिंदूंकरिता पोटतिडिकेने बोलत होते, हिंदूंकरिता हळहळत होते, हिंदुधर्मसुधारकच होते ते हे म्हणायला रेग्यांची हिंमतच पाहिजे. तत्त्वज्ञाची निर्भयता पाहिजे. या दोघांपैकी कोणीही भारतीय मुसलमानांना किंवा ख्रिस्त्यांना आपल्या नव्या धर्माचे, तुम्ही माझे अनुयायी व्हा असे आवाहन का केले नाही असा मार्मिक प्र न ते विचारतात. हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन, भारतीय मुसलमान व मंडल आयोग, इहवाद व सर्वधर्मसमभाव या विषयांवरच्या रेग्यांच्या लेखनाचा परामर्श प्रस्तुत ग्रंथात आहे. तो सुशिक्षित वाचकाने जरूर पाहावा.
विवेकवाद्यांचा एक मुद्दा असा की, हिंदु धार्मिक परंपरा श्रद्धेवर आधारलेली आहे. श्रद्धा आणि विवेक यांचे वैर आहे. विवेकवादी धर्मावर निर्दय प्रहार करतो. धर्मसुधारणा हा वदतोव्याघात आहे म्हणतो. धर्म मुळातच दैवी शब्द म्हणून आलेला असतो. म्हणून अपरिवर्तनीयता हे तर त्याचे लक्षण ठरते.
त्याचा दुसरा मुद्दा असतो : धर्म हा वाणिज्य व्यवहार आहे. देवाला लाच देऊन त्याला वश करण्याचा लाभमूलक आणि लोभमूलक खटाटोप—-मी तुला हे देतो, तू मला ते दे, असा व्यापार आहे. त्याचा तिसरा मुद्दा असतो, मोक्ष हा स्वार्थीपणाचा कळस आहे. माझा मोक्ष हा माझा परमपुरुषार्थ आहे. मला इतरांशी काय कर्तव्य? हा विचार नीतिविरोधी आहे. नीति स्वार्थनिरपेक्ष असते. तो परोपकारी आचार आहे. हे असे सगळे आक्षेप रेग्यांनी विवेकवाद्यांप्रती पूर्ण आदर ठेवून विचारांत घेतले आहेत. विवेकवाद्यांच्या ज्ञानमीमांसेचे परीक्षण केले आहे. मूले कुठारः या न्यायाने अनुभववादी ज्ञानमीमांसेच्या उणीवा दाखवून दिल्या आहेत. विस्तारपूर्वक, तरीही काटेकोरपणा कायम ठेवून हे झाले आहे. कारण प्र न सत्य-शोधनाचा आहे. ‘प्रमेयसिद्धिः प्रमाणात् हि ।’ म्हणून प्रमाण परीक्षणाचा आहे. तत्त्वज्ञाचा आहे. रेग्यांच्या अशा विविध विषयांवरील लेखनाची ओळख सुबुद्ध महाराष्ट्राला करून देण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथात आहे. रेगे जीवनाला सामोरे जाणारे तत्त्वज्ञ आहेत. म्हणजे समग्र जीवनाचे—-आणि त्यात सामाजिकही आले—-प्र न, त्यांचे दर्शनी स्वरूप पाहून, त्याचे वि लेषण करून उलगडलेले अंतरंग सांगणे, त्याच्यासंबंधी वर-अवर, बरे-वाईट, ग्राह्य कोणते, त्याज्य कोणते, असे अभिमत देणे आणि पुढे काय करावे याची दिशा दाखवणे असे (Reflective,
Evaluative and Prescriptive) तिहेरी स्वस्प त्यांच्या लेखनाचे आहे. कसे, ते या ग्रंथात दिसते. उदा. श्रद्धा आणि विवेक, धर्म आणि सुधारणा यांच्या बाबतीत पोथीनिष्ठ परंपरावादी, किंवा अनुभव-वादी ज्ञानमीमांसा तपासून झाल्यावर ते आणखी एक दृष्टिकोण मांडतात. त्यांना मान्य असलेला. वि व-जग यांच्याबद्दल त्यात निहित असलेल्या चैतन्याबद्दल त्यांना वाटते की, सारे व्यापून तो दशांगुळे उरला आहे. (स भूमिं विश्वतो वृत्वा त्यत्तिष्ठत् दशाङ्गुलम् ।). ज्याला वि व म्हणतात त्याचीच पुनरावृत्ती ‘मनुष्या’त आहे. विश्व एक पूर्ण आहे तसे मनुष्य हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण निघाले तरी खाली पूर्णच राहिले आहे [पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते ।। ] असा मनुष्य आणि विश्व यांचा संबंध आहे. व्यष्टीसमष्टीचा विचार न करता तुम्हाला तत्त्वज्ञान
आणि त्यातूनही जीवनाविषयक तत्त्वज्ञान सांगताच येणार नाही असा त्यांचा दावा. कारण मानवी जीवन हे एका चैतन्याचा आविष्कार आहे. मानव विश्वातला असला तरी विश्वाचा नाही हे बायबलप्रणीत, कांटद्वारा पुनरुच्चारित तत्त्व रेग्यांना मनापासून मान्य आहे. तत्त्वज्ञानाच्या आकाशात उंच विहार करताना आपल्या भूमीवरचे आपले ठिकाण ते क्षणभर विसरू इच्छित नाहीत. आपले मराठीपण, आपले भारतीयपण, आपले हिंदूपण त्यांना प्रिय आहे. महंमद इक्बालच्या या ओळी त्यांना आपले मनोगतच वाटतात.
ऐ आबरु दे गंगा, वह दिन है याद तुझको। उतरा तेरे किनारे जब कारवाँ हमारा। यूनान, मिश्र, स्माँ, सब मिट गये जहाँसे । अब तक मगर है बाकी हिन्दोस्तां हमारा।। तत्त्वज्ञ रेग्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या सर्व छटा प्रस्तुत ग्रंथात पकडल्या गेल्या आहेत.
१६, शांतिविहार, सिव्हिल लाइन, नागपूर — ४४० ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.