खादी (भाग १)

: एक प्रकट चिंतन

आपल्या नोव्हेंबर २०००च्या अंकात खादी एका तत्त्वप्रणालीमधली कडी राहिली नसून तिचे आता फडके झाले आहे असे वाचले. पण त्यात संपादक नवीन काही सांगत नाहीत. खादीचे फडके कधीचेच झाले आहे. त्या गोष्टीला ५० वर्षे उलटून गेली आहेत. रिबेटची कुबडी ज्या दिवशी खादीने स्वीकारली त्या दिवशी किंवा त्या अगोदरच खादी निष्प्राण झाली होती. खादीचे फडके झाले आहे ही गोष्ट सर्व वरिष्ठ खादीवाल्यांना माहीत होती. अण्णासाहेब सहस्रबुद्धे खादीच्या क्षेत्रातले एक श्रेष्ठ कार्यकर्ते. त्यांना फार पूर्वीपासून निराशा आलेली होती आणि ‘खादी अ-सरकारी केल्याशिवाय ती असर-कारी होणार नाही’ असे मत विनोबाजी त्यांच्या लिष्ट शैलीत मांडत असत. मिलचे कापड वापरणे म्हणजे इंग्रज सरकारचे हात मजबूत करणे हे गांधीजींनी ओळखले होते. स्वदेशीच्या चळवळीची अपरिहार्य परिणती खादी वापरण्यात होते हे त्यांनी जाणले होते. ‘स्वदेशीचे तत्त्व समाजाला लागू केल्यावर खादी सहजच निष्पन्न होते’ असे त्यांचे एक वाक्य आहे. राणीचा जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर इंग्रज सरकारने नेटिवांचा रोजगार नष्ट करण्याचा चंग बांधला असला पाहिजे. कारण विसाव्या शतकाच्या आरंभीच खादीचे कापड हद्दपार झालेले होते आणि त्याची जागा मांजरपाटाने घेतली होती.
इंज्रजांच्या आधिपत्याखाली असलेल्या मुलुखात ते (इंग्रज) येण्यापूर्वी जे परस्परावलंबन होते ते मोडून काढल्याखेरीज त्यांचे राज्य टिकणार नाही हे इंग्रज उमजून होते. कितीही विषम स्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या मांडलिक राज्यांच्या अर्थकारणा-वरची पकड सैल होऊ दिली नाही. अशा देशांमधले आयात-निर्यातीचे निर्बंध नेहमीच इंग्रजांना अनुकूल असे राहिले.
इंग्रजांच्या आगमनापूर्वीचा आपल्या देशातला अर्थव्यवहार पुष्कळसा वस्तुविनिमयावर अवलंबून असे, निदान खेड्यापाड्यांतला. नाणेटंचाई ही आमच्या पाचवीलाच पुजली होती. लहान खेड्यापाड्यांमधली बारा बलुत्यांची पद्धती पैशांचा कमीत कमी वापर करणारी होती. इंग्रजांच्या राज्यात पहिल्याने करभरणीसाठी आणि नंतर बाजारातल्या विनिमयासाठी पैशाचा वापर सुरू झाला आणि वस्तुविनिमय कायमचा मागे पडला. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून आपली सुटका व्हावी म्हणून, आपल्या स्वावलंबनाचे, स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून गांधीजींनी खादीचा वापर केला. १९२०–२१ आणि १९३० सालच्या असहकाराच्या आंदोलनात खादीला अभूतपूर्व आणि अनन्यसाधारण प्रतिष्ठा प्राप्त झाली. खादीला राजकारणात जरी मोठी प्रतिष्ठा असली तरी अर्थकारणात तिचे स्थान नगण्यच होते, कारण खादी मिलच्या कापडाच्या तुलनेत नेहमीच महाग किंवा अतिशय महाग राहत आलेली आहे. खादीपेक्षा मँचेस्टरहून तयार होऊन येणारे कापड नेहमीच फार स्वस्त राहिले आहे. मिलचे कापड सुरुवातीला भारतात बनत नसे. पहिल्या महायुद्धानंतर भारतातल्या गिरण्यांची संख्या झपाट्याने वाढली. परंतु त्यापूर्वी बरेचसे कापड इंग्लंडातून बनून येई. कापूस पिकवणाऱ्या प्रदेशातून वॉल्कर्ट ब्रदर्स, रॅलीज, अशा काही ब्रिटिश कंपन्या आपल्या गुमास्त्यांमार्फत कापूस खरेदी करीत आणि गलबतांतून हा कापूस इंग्लंडमध्ये मँचेस्टरपर्यंत जाई. तेथे सर्व प्रकारच्या प्रक्रिया होऊन तयार कापड आल्या वाटेने परत भारतात परत येई. ते इतके सारे सव्यापसव्य करून भारतात येथील स्थानिक कापडाच्या मानाने अतिशय कमी किंमतीला विकले जाई.
भारतातल्या दक्षिणेतल्या प्रदेशात जेथे एकूण थंडीचे मान कमी, तेथे वस्त्रांचा वापरही फार मोजका होता. पुरुषांना सहसा उत्तरीयाची गरज नसे आणि त्यांचे खालचे वस्त्र पंचासारखे आखूड असून भागत असे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चित्रे गेल्या ६० वर्षांपूर्वीपर्यंत अंगावर लंगोटी, खांद्यावर कांबळे आणि हातात काठी अशीच असत. १९४० सालापर्यंत भारतातल्या सर्व लोकांचा कापडाचा सरासरी वापर वर्षाला २० वारांपेक्षा जास्त नव्हता. घरातल्या प्रौढ स्त्रियांना महाराष्ट्रात वर्षाला माणशी अंदाजे २५ वार कपडा लागे आणि मुले बहुधा उघडीनागडीच राहत. उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय पुरुष जो माणशी थोडा अधिक कपडा वापरीत त्याची भरपाई गरिबांना आपली गरज एका लंगोटीवर भागवून करावी लागे. गांधींजींनी स्वतःसाठी इतके कमी कपडे वापरायचे ठरविले याचे कारण त्यावेळी कापडाची सरासरी निर्मितीच माणशी २० वारांपेक्षा अधिक नव्हती. अंगरखा, बंडी, कोट हे क्वचित सणासुदीला वापरण्याचे किंवा शहरी लोकांच्या चैनीचे वस्त्र होते असे म्हणायला हरकत नाही.
आशिया आणि आफ्रिका येथे पिकणारा कापूस युरोपात जाऊन परत येई आणि तरी तो स्वस्त पडत ह्याची कारणे आपण ह्यानंतर पाहू.
इंग्लंडात स्पिनिंग जेनीचा शोध लागला, १७३३ मध्ये धावत्या धोट याचा शोध लागला. त्यामुळे विणकामाला सूतच कमी पडू लागले. म्हणून त्यानंतर water frame, mule अशी यंत्रे तयार झाली. हे सारे १७७९ पूर्वीच घडले आणि कापडनिर्मितीतल्या सर्व क्रिया यंत्राच्या सहाय्याने होऊ लागल्या. ही यंत्रे कितीतरी माणसांचे काम करीत आणि अत्यंत अल्प मजुरीत कापड विणून तयार होई. कापसापासून सूत कातण्याचा आणि कापड विणण्याचा खर्च इतका अल्प असे की, त्यामध्ये कापूस गोळा करण्याची दलाली, त्याचा वाहतुकीचा खर्च इतकेच नव्हे तर गलबतांच्या विम्याचा खर्चदेखील करणे कापड-उत्पादकांना परवडत असे. युरोपातून येणाऱ्या तयार कापडाचे प्रमाण जसजसे वाढू लागले तसतसे येथे हाताने सूत कातण्याचे आणि कापड विणण्याचे प्रमाण घसरू लागले. इतके की गांधीजींना सूत कातणारा चरखा देखील शोधून काढायला पुष्कळ प्रयास पडले.
राजकीय कारणांमुळे खादीचा वापर वाढू लागला आणि खादीची मागणी झपाट्याने वाढली. ठिकठिकाणी खादी उत्पत्तिकेंद्रे स्थापन झाली. खादीसाठी विणकर जास्त कुशल लागत. ते हुडकून काढून त्या-त्या ठिकाणी ती उत्पत्तिकेंद्रे सुरू करावी लागत. खादी तयार करण्याची जी पद्धत होती तीत रेचाई, पिंजण, पेळू करणे, सूत कातणे आणि त्यानंतर विणकामातील सगळी कामे, ही हातानेच करावी लागत असल्या-मुळे खादीच्या मागणीपेक्षा तिचे उत्पादन कमी होत असे. नंतर ठिकठिकाणी खादी विद्यालये सुरू झाली आणि खादीमधला कुशल कामगारांचा तुट वडा कमी झाला. आपली वस्त्राची गरज पूर्ण करण्याकरिता खादी वापरणारे लोक फार थोडे होते. पण जे खादी वापरीत त्यांना बलाढ्य इंग्रजांच्या साम्राज्याला धुडकावून लावल्याचे मानसिक समाधान लाभत असे. १९३० पासून ४२ पर्यंतच्या १०-१२ वर्षांत खादीची वाढ अतिशय जोमाने झाली. जशी खादी वाढू लागली तसा इंग्रज सरकारचा तिला विरोधही कमी होऊ लागला आणि खादीचा राजकीय प्रभाव क्षीण होऊ लागला. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर इंग्रज सरकारने येथून पाय काढता घेण्याचे ठरविले आणि ४६ पर्यंत स्थानिक लोकांची सरकारे स्थापन झाली. ४७ मध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. जसजसा खादीला होत असलेला इंग्रजांचा विरोध मावळत चालला तसतसे राजकारणामधले खादीचे महत्त्व कमी होऊ लागले आणि त्याच सुमाराला खादीचे फडके झाले असे म्हणायला हरकत नाही. खादी अंगावर घातल्याने घालणाऱ्याला बंडखोरीची नशा चढत असे ती नशा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उतरली आणि खादीच्या व्यवसायाला एका पोटभरू रोजगाराचे स्वरूप प्राप्त होऊ लागले.
ज्या लोकांनी खादीसाठी इंग्रज सरकारचा छळ सोसला होता त्यांच्या मनात खादीचे माहात्म्य कायम होते. खादी हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांना खादी सोडवत नव्हती, ती जगवलीच पाहिजे असे वाटत होते. तेवढ्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात खादी जगवण्यासाठी सरकारने काही पावले टाकावयास सुरुवात केली. तिरंगी झेंडा (भारताचा राष्ट्रध्वज) हा निर्माण करण्याचा अधिकार फक्त खादी भांडारांना दिला. खादीचा वापर नवीन ग्राहकांमध्ये वाढावा म्हणून हातकताई, हातविणाई एवढ्या दोन क्रिया सोडून बाकीच्या छपाई करणे, कॅलेंडरिंग करणे अशा कामांसाठी गिरण्यांची मदत घेण्यात येऊ लागली. खादीच्या कापडाचे तयार कपडे विविध फॅशन्सचे करून घेऊन ज्यांच्याजवळ आधीच पुरेसे कपडे आहेत अशांना तिचा मोह पडेल असे प्रयत्न सुरू झाले. पण हे सारे कृत्रिम उपाय. रोजगारनिर्मितीसाठी भारतातल्या लक्षावधी बेरोजगारांना पोटापाण्याला लावण्याच्या हेतूने खादी कमिशनसारख्या संस्थांनी सरकारचा पुष्कळ पैसा ओढला. प्रत्यक्ष ग्राहकाला ती स्वस्त पडावी म्हणून तिच्या निर्मितिमूल्यापेक्षा तिचे विक्रीमूल्य कमी ठेवण्यात येऊ लागले. वर्षातून काही ठराविक दिवस कधी १५,२०,२५,३०,३५% पर्यंत भाव-उतार करून ती विकली जाऊ लागली. त्यामुळे खादीचा खप कृत्रिमपणे काही वर्षे टिकवून धरता आला. सरकारी कचेऱ्यांमधल्या शिपायांसाठी गणवेश खादीचे बनवून सुद्धा खादीची विक्री पुरेशा प्रमाणात वाढू शकली नाही. भारताच्या अर्थकारणात खादीची छाप कधीच पडली नाही. स्वातंत्र्योत्तर काळात खादीच्या वापरामागील प्रमुख कारणे: पहिले – रोजगार-निर्मिती आणि दुसरे वस्त्र-स्वावलंबन. या दोनही क्षेत्रांत खादीला पुरेसे यश मिळालेले नाही. थोडक्यात काय तर खादीचे कधीचे फडके झालेले आहे. खादी ज्यावेळी ऐन भरात होती त्यावेळी म्हणजे जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधींचा मृत्यू झाला. खादी कमिशन, खादी बोर्ड यासारख्या संस्थांना फारच थोड्या दिवसांत नगरपालिकांची कळा आली. गांधीजी असेपर्यंत म्हणजेच देश स्वतंत्र होईपर्यंत महात्मा गांधींचा आग्रह हा स्वावलंबनाचा होता. त्यांचा स्वावलंबनावर असलेला भर हा परकीय राष्ट्राच्या गुलामगिरीतून आपली सोडवणूक करण्याचे साधन म्हणून होता. ह्या दृष्टीने ते खादीकडे पाहत होते. कातो। समझबूझकर कातो। जो काते वो पहने। जो पहने वो काते । ही दोन वाक्ये वस्त्रस्वावलंबनाच्या हेतूने त्यांनी वापरली होती.
कोणत्याही मानवी व्यवहारात आणि त्यातही अर्थकारणात स्वावलंबन कधीही यशस्वी झालेले नाही. सगळे मानवी व्यवहार हे परस्परावलंबनावर आधारित आहेत. परकीय राज्यकर्त्यांशी व्यवहार करताना परस्परावलंबन अवलंबिणे अशक्य होते. आणि स्वावलंबन पराकोटीला नेल्याशिवाय परकीय राज्यकर्त्यांशी विरोध करण्यासाठी आवश्यक ती धार आंदोलनाला येणार नाही म्हणून स्वावलंबनाचा आग्रह गांधीजींनी धरला त्यामुळे परस्परावलंबनाकडे आम्हा मंडळीचे पूर्ण दुर्लक्षच झाले. स्वातंत्र्योत्तर काळानंतर, परदेशातला इंग्रज निघून गेल्यावर, भारत विरुद्ध इंग्लंड असे खादी ग्रामोद्योगाचे आणि स्वावलंबनाच्या कल्पनेचे स्वरूप न राहता ते शहरे विरुद्ध खेडी असे झाले. मोठी यंत्रे विरुद्ध लहान यंत्रे असे स्वरूप त्या आंदोलनाला प्राप्त झाले. गांधीजींचा स्वावलंबन हा शब्द त्यांचे अनुयायी पकडून बसले आहेत. म्हणून परावलंबनाचा पर्याय स्वावलंबन नसून परस्परावलंबन आहे ह्याकडे आमचे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.
(अपूर्ण) नम्बी (Not In My Back-Yard!)
१९९७ साली संयुक्त राष्ट्र महासंघाच्या एका अहवालात म्हटले गेले की पंचगंगा नदी ही जगातल्या सर्वांत प्रदूषित अशा दहा नद्यांपैकी एक आहे. ह्या आधारावर कोल्हापूरच्या काही नागरिकांनी कोल्हापूर नगर-परिषदेवर (कोनप) फिर्याद केली. प्रदूषण कमी करण्यासाठी कोनपने काही उपाय योजले, ज्यांपैकी एक म्हणजे गावाचा पाणी पुरवठा नदीच्या वरच्या भागातून घेणे. यासोबत मलनिस्सारणाचे इतरही काही उपाय होते. न्यायालयाने पाणी तपासून या तपासाचे निष्कर्ष वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करायचीही सक्ती केली.
ह्याच सुमाराला इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकाऱ्याने प्रदूषणाच्या कारणामुळे गावाचा पाणी पुरवठा तोडला. आता इचलकरंजी नगर परिषदेने (इनप) न्यायालयाकडे धाव घेऊन आरोप ठेवला कोनप वर! प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने पंचगंगेच्या पस्तीस किलोमीटर (कोल्हापूर ते इचलकरंजी) पट्ट्याचा अभ्यास करायला एक समिती नेमली. आणि हा अभ्यास फक्त कोनपचाच नव्हता तर इनपचाही होता. आरोपी आणि फिर्यादी, दोघांच्याही गुन्ह्यांची तपासणी करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने एकूण पंचगंगेच्या ‘स्वच्छते’वर दृष्टी रोखली आहे.
समितीचे एक सदस्य पर्यावरण तज्ज्ञ श्याम आसोलेकर म्हणतात, “पर्यावरणाचा विचार करताना एकत्रित आदर्श उत्तरे शोधायला हवीत. असे उपाय योजावे की समाज आणि त्यांची नैसर्गिक साधने यांच्या संबंधाने सुनियंत्रण साधेल.”
[टाईम्स ऑफ इंडिया (२७ डिसें. २०००) वरून वरील बातमी घेतली आहे. तिरप्पा ठशात लिहिलेले वाक्य एका ‘खोट्या’ उपायाकडे लक्ष वेधते. इथे जी वृत्ती दिसते आहे ती अशी की ‘मी घाण पाणी वापरणार नाही, भलेही माझ्यामुळे पाणी घाण होत असेल.’ असे समजा की मी माझ्या आवारातली घाण फक्त दुसऱ्याच्या आवारात टाकणार आहे! अशा वृत्तीला पर्यावरणवादी ‘निम्बी’ वृत्ती म्हणतात. आपणही असे करतो—-आणि फक्त पर्यावरणाच्या बाबतीतच नाही, तर इतरही बाबतीत! —- संपादक]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.