इतिहास लेखनाची शिस्त

[गजानन भास्कर मेहेंदळे यांचा “श्री राजा शिवछत्रपती (पुणे १९९६)” हा ग्रंथ सच्चा साधनांवर आधारित इतिहास लेखनाचा आदर्श व मानदंड म्हणून गौरवला गेला आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग, विवेकवादी शिस्तीची रूपरेषाच असावा, असा.]
शिवचरित्राच्या अभ्यासाची माझी ही वाटचाल चालू असताना सुस्वातीची दोन-तीन वर्षे मी चुकून भलत्याच वाटेला लागलो होतो. मी तेव्हा जी चूक केली तीच सध्या काही इतिहाससंशोधक, विशेषतः युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत असलेले संशोधक, करीत असल्याचे मला आढळून आले आहे. म्हणून, ते वेळीच सावध व्हावेत अशा हेतूने, इथे त्याविषयी थोडक्यात लिहितो. अलेक्झांडर, हॅनिबॉल, सीझर, बेलिसॅरिअस, मार्लबरो, फ्रेडरिक, नेपोलिअन, वेलिंग्टन इत्यादी पा िचमात्य सेनानींची युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून लिहिलेली अनेक चरित्रे मी शिवचरित्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी वाचली होती. तशाच प्रकारे युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचे चरित्र लिहावे असा माझा सुस्वातीस हेतू होता. जेव्हा उपलब्ध साधनांमधून त्याकरिता आवश्यक ती माहिती मला मिळेना तेव्हा, प्रतापगडचे युद्ध या पुस्तकाचे लेखक कॅप्टन मोडक यांचे अनुकरण कस्न, मी बखरींसारख्या साधनांमधून मला सोईस्कर वाटतील ते तुकडे तोडून काढून आणि त्यांत माझ्या कल्पनेने काही तपशील भरून शिवचरित्रलेखनाचा प्रयत्न करून पाहिला होता. हा खटाटोप करीत असताना आपले काहीतरी चुकते आहे असे अधूनमधून मला वाटत असे. पण आपले नेमके काय चुकते आहे, ती चूक टाळण्याकरिता नेमके काय केले पाहिजे, आणि उपलब्ध साधनांच्या मर्यादा कोणत्या आहेत, ते माझ्या ध्यानात येत नव्हते. तरीही तशाच पद्धतीने लिहिलेला एक लेख मी विद्वान इतिहास संशोधक श्री. ग. ह. खरे यांना दाखविला होता. खरे तर त्यांच्याकडून काही मार्गदर्शन व्हावे अशी माझी तेव्हा अपेक्षा नव्हती. तो वाचून ते माझे कौतुक करतील आणि एखाद्या संशोधनपर नियतकालिकाकडे तो छापण्याकरिता शिफारस करतील अशा तारुण्यसुलभ समजुतीने मी त्यांना तो लेख दाखविला होता. प्रत्यक्षात त्यांनी माझे कौतुक केले नाही याबद्दल मला तेव्हा थोडे आ चर्यही वाटले होते! आता मला त्याबद्दल काही आ चर्य तर वाटत नाहीच, उलट त्यांनी तो लेख वाचण्याचा संयम कसा दाखविला याचेच मला आ चर्य वाटते. मी साधनांची ग्राह्याग्राह्यता कशी विचारात घेतलेली नव्हती, त्यांतील मला सोयीचे वाटले ते तुकडे साधनांच्या विश्वसनीयतेचा विचार न करता तोडून काढून मी ते कसे जोडले होते, आणि मी केलेली कित्येक विधाने कशी निराधार होती, ते श्री. खरे यांनी मला अतिशय सौम्य शब्दांत आणि थोडक्यात समजावून सांगितले. आपण केलेले सर्व श्रम वाया गेलेले पाहून थोडा वेळ मी नाउमेद झालो. पण त्यांच्या त्या सांगण्याचा मी कोणत्या चुका करीत आहे ते समजण्यास मला फार उपयोग झाला. मी ज्या भलत्याच वाटेला लागलो होतो त्या वाटेवरून परत फिरलो, कल्पनेने शिवचरित्र लिहिण्याचा नाद सोडून दिला, आणि विश्वसनीय अशा साधनांच्या आधारेच शिवचरित्र लिहायचे असा नि चय करून पुन्हा नव्याने वाटचाल सुरू केली. तसे पाहिले तर मी श्री. खरे यांना दाखविलेल्या लेखात लिहिलेली हकीगत सकृतदर्शनी तरी सुसंगत होती, तिच्यात तर्कदुष्ट असे काहीच नव्हते. थोडक्यात, काय घडले असणे शक्य आहे हे सांगणारे ते एक सुसंगत, रेखीव, प्रमाणबद्ध, कल्पनाचित्र (मॉडेल) होते. त्याच प्रसंगाची आणि शक्यतेच्या कोटीतील अशी आणखीही अनेक कल्पनाचित्रे कोणालाही सहज जुळविता आली असती. पण अशी कल्पनाचित्रे सुसंगत असली, किंवा निदान सकृतदर्शनी दिसली, आणि शक्यतेच्या कोटीतली असली, तरी केवळ तेवढ्यावस्न काही ती खरी ठरत नाहीत. केवळ सुसंगती म्हणजे सत्य नव्हे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर केवळ तर्क करून इतिहास लिहिता येणार नाही. कारण व्यवहारात एकाला जी कृती तर्कशुद्ध वाटते ती दुसऱ्याला तशी वाटतेच असे नाही आणि आपल्याला जे तर्कशुद्ध व वाजवी वाटते तशाच प्रकारे माणसे वागतात असेही नाही. एखाद्या प्रसंगातून पुढे जाण्याकरिता तर्कशुद्ध असे पर्यायही अनेक असू शकतात आणि त्यांपैकी कोणताही पर्याय निवडला तरी त्यांतून अनेक प्रसंग, व पुन्हा अनेक पर्याय, उद्भवू शकतात. इतिहासाचा प्रवाह त्यांपैकी कोणत्या मार्गाने गेला हे कसे ठरविणार? त्या मार्गातील काही नेमके टप्पे आपल्याला ठाऊक असले तरी त्यांपैकी कोणत्याही टप्प्यापासून पुढील टप्प्यापर्यंत जाण्याकरिता केवळ तर्काने पहावयाचे झाले तर अनेक वाटा असू शकतात. म्हणूनच इतिहास नेमका कोणत्या मार्गाने गेला ते निव्वळ तर्क करून ठरविता येत नाही, विश्वसनीय अशा साक्षीदारांकडे, म्हणजेच इतिहासाच्या साधनांकडे, चौकशी करूनच ते ठरवावे लागते. पण कित्येकदा या साक्षीदारांनाच अधलीमधली काही माहिती नसते, किंवा असली तरी त्यांनी ती सांगितलेली नसते. अशा ठिकाणी, नेमके काय घडले ते माहीत नाही असे सांगणे म्हणजे इतिहास सांगणेच आहे. सारांश, सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाणारे चरित्र, म्हणजेच ऐतिहासिक चरित्र, लिहावयाचे असेल तर साधनांची ग्राह्याग्राह्यता विचारात घेऊन हिणकस साधने बाजूला काढली पाहिजेत आणि विश्वसनीय साधने दाखवित असलेल्या मार्गाने गेले पाहिजे. कल्पनेच्या वास्वर स्वार होऊन मनःपूत संचार करण्याचा मोह तर अगदी कटाक्षाने टाळला पाहिजे. [आणि ती शिस्त तोडणाऱ्या एका ग्रंथावरचा हा शेरा]
‘संशोधनात्मक स्वातंत्र्य’ या संज्ञेने त्या लेखकांना ज्या प्रकारचे स्वातंत्र्य अभिप्रेत आहे अशी माझी समजूत झाली आहे तशा प्रकारचे स्वातंत्र्य अभ्यासकाने घ्यावे असे मला वाटत नाही आणि ते घ्यावे असे जरी मान्य केले तरी त्या स्वातंत्र्याच्या मर्यादा उपर्युक्त शिवचरित्रात प्रमाणाबाहेर ताणल्या गेल्या आहेत असे मला वाटते. असे ‘संशोधनात्मक स्वातंत्र्य’ ज्या शिवचरित्रात घेतलेले आहे त्याला इतिहासही म्हणता येणार नाही आणि युद्धशास्त्रीय अभ्यासही म्हणता येणार नाही.
या प्रकारचे लेखन ज्यांनी केले आहे त्यांची कुचेष्टा करावी अशा हेतूने मी हे लिहिलेले नाही. उलट त्यांच्याविषयी माझ्या मनात सहानुभूतीचीच भावना आहे आणि म्हणूनच त्यांचा नामनिर्देश मी इथे केलेला नाही. कारण, ते जी चूक आज करीत आहेत नेमकी तीच चूक मी माझ्या तरुणपणी केलेली आहे. तशी चूक ज्यात होती असा माझा एक लेख मी तेव्हा कदाचित प्रसिद्धही केला असता. तो श्री. ग. ह. खरे यांना दाखविण्याची बुद्धी मला झाली आणि त्यामुळे मी वेळीच सावध होऊन त्या चुकीच्या वाटेवरून परत फिरलो. याच प्रकारची चूक जे अभ्यासक आज करीत आहेत त्यांनीही सावध व्हावे, आणि पुढील अभ्यासकांनी अशा प्रकारची चूक करण्यापासून आधीच परावृत्त व्हावे, एवढ्याच हेतूने मी हे लिहिले आहे. वास्तविक प्रस्तावनेत इतिहाससंशोधनाच्या शास्त्राबद्दल काही लिहिण्याची माझी इच्छा नव्हती. ज्यांनी इतिहाससंशोधनाचे शास्त्र अभ्यासले आहे त्यांना या सर्व गोष्टी ठाऊक असतातच, निदान असायला हव्यात. पण ज्या प्रकारच्या दोषाबद्दल मी लिहिले आहे त्या प्रकारचा दोष ज्यात आहे असे शिवचरित्रविषयक लेखन अलीकडे बरेच होऊ लागले आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील दहा-वीस वर्षांत शिवचरित्रा-विषयीच्या अशा काल्पनिक इमारतींची एक कल्पनानगरीच निर्माण होईल असे मला वाटू लागले आहे. म्हणून नाइलाजाने मी हे लिहीत आहे. या माझ्या लिहिण्याचा कितपत उपयोग होईल याविषयी मात्र मी साशंक आहे. कारण कल्पनाविश्वात दंग होऊन विशिष्ट चाकोरीत अडकलेल्या अभ्यासकांना त्यातून बाहेर काढणे ही फार कठीण गोष्ट आहे असा अनुभव मला आलेला आहे. म्हणून, ज्यांना शिवचरित्रांचे संशोधन करण्यास सवड नाही परंतु शिवचरित्रे वाचण्याची आवड आहे अशा वाचकांना मी असे सुचवून ठेवतो की त्यांनी शिवचरित्राविषयी कोणत्या प्रकारची साधने उपलब्ध आहेत आणि त्यांची ग्राह्याग्राह्यता कितपत आहे याची सर्वसाधारण माहिती शक्य तर मिळवून ठेवावी आणि या शिवचरित्रासह कोणत्याही शिवचरित्रातील निराधार विधानांवर विश्वास ठेवू नये.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.