धर्माची बुद्धिगम्यता

जानेवारीचे संपादकीय महत्त्वाच्या मुद्यांवर प्रतिक्रियांचे आवाहन करते. त्यातले काही मुद्दे धर्माच्या बुद्धिगम्यतेबद्दलचे आहेत. त्यांचे मूळ डिसेंबर २००० च्या अंकातील पाटणकरांच्या अभिप्रायात आणि त्याचेही मूळ सप्टेंबर २००० च्या अंकातील ‘डॉ. दप्तरीचा अभिनव सुखवाद’ या माझ्या लेखात आणि त्याच अंकाच्या संपादकीयात आहे. जिज्ञासू वाचकांच्या सोयीसाठी हे संदर्भ दिले आहेत.
१. डॉ. दप्तरी धर्म बुद्धिगम्य आणि बुद्धिप्रधान मानतात. श्रद्धावादी किंवा शब्दप्रामाण्यवादी समजतात तसा धर्म मानला तर तो तोकडा पडतो असे त्यांचे म्हणणे. मनुष्याच्या आत्यंतिक सुखप्राप्तीसाठी धर्म आहे हा त्यांचा दावा आहे.
२. डॉ. दप्तरी व त्यांचे विरोधक ‘धर्म’ हा शब्द भिन्न अर्थाने वापरतात हे तेथेच स्पष्ट केले आहे. धर्म वेदात सांगितला आहे आणि वेद अपौरुषेय आहेत असे आद्य श्रीशंकराचार्य आणि श्री. शबरस्वामी हे मीमांसक मानतात. या भूमिकेतील त्रुटी दाखवून दप्तरी यावर भर देतात की धर्म बदलत आला आहे. मूळ वेदवचने आणि वेदकालीन धर्माचार बाजूला सास्न कालांतराने भिन्न भिन्न आचार धर्म्य ठरवणाऱ्या स्मृति आणि धर्मशास्त्रे झाली आहेत. महाभारतादी इतिहास ग्रंथात कालमानपरत्वे योग्य मानल्या गेलेल्या भिन्न आचारांचे आणि नियमांचे वर्णन आले आहे, विवेचन आहे. जुन्यातल्या जुन्या धर्मग्रंथाला चिकटून ‘धर्म्य-अधर्म्य’ यांचा निवाडा करणे ही वैदिक–सनातनी धर्मनिर्णयपद्धती झाली. उलट बदलत्या धर्माचारांच्या मागचे तत्त्व लक्षात घेऊन, ऐतिहासिक परिवर्तनाचा विचार करून केलेली धर्ममीमांसा ही तात्त्विक धर्ममीमांसापद्धती झाली. दप्तरी या दुसऱ्या पद्धतीचे धर्ममीमांसक होते.
३. धर्माचे ज्ञान श्रुति, स्मृति, सदाचारी सज्जनांचे वर्तन आणि स्वतःचे आत्मसुख अशा उगमस्थानांतून होते असे महाभारतात म्हटले आहे. ह्या चारही स्रोतांचे महत्त्व चढत्या पायरीने आहे, असे दप्तरींनी सविस्तर युक्तिवादाने दाखवून दिले आहे. धर्माचे प्रयोजन पाहून धर्म ठरवावा. केवळ शास्त्रवचन प्रमाण मानू नये. लोकाचार डोळे मिटून आचरू नये. ‘कारणात् धर्म अन्विष्येत्, न लोकचरितं चरेत्’ । एवढेच नाही तर, ‘पंडिताने उपपत्तीने परिपूर्ण धर्म सांगावा’ अशी भूमिका —- महाभारत, उपनिषदे यांच्या पाठबळाने दप्तरी घेतात. याला ते बुद्धिगम्यता म्हणतात. लोकयात्रा —- म्हणजे समाजाचे निकोप अस्तित्व, राहटी आणि व्यक्तीचे आत्यंतिक सुख हा धर्माचा विषय आहे, हेतू आहे, प्रयोजन आहे आणि अर्थही आहे. ही तात्त्विक पद्धती. ह्या अर्थी धर्म बुद्धिगम्य. फक्त वेदोक्त आज्ञा म्हणजे धर्म समजण्यात धर्माची व्याप्ति कमी होते, अधिकार कमी होतो, महत्त्व कमी होते हा सनातनी मीमांसेवर दप्तरीचा आक्षेप आहे. पुनर्जन्म हा कर्मविपाक सिद्धान्ताचा अंगभूत उपसिद्धान्त आहे. दप्तरींना पुनर्जन्म मान्य नव्हता, ऐहिक नाही अशी धर्माची मांडणी त्यांना वर्ण्य होती.
४. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म्य म्हणजे नीतीचे. धर्म्य काय अधर्म्य काय, याचा विचार म्हणजे धाधर्म्यनिर्णय. हे कर्तव्यशास्त्र आहे, Ethics आहे. दप्तरींचा ‘धर्म’ शब्दाचा हा अर्थ आणि श्री. शंकराचार्य, श्री. शबरस्वामी यांचा या शब्दाचा उपयोग (अर्थ) किती भिन्न आहेत हे लक्षात येईल. हिंदूधर्मात, धर्माच्या नावावर सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, कल्पना बुद्धिगम्य आहेत असे जणू दप्तरींना अभिप्रेत आहे असे पाटणकरांच्या भाषेवस्न वाटते. ते तसे नाही. वेदांचे अपौरुषेयत्व, अवतारवाद भक्ती, कर्मसंन्यास ह्याही गोष्टी दप्तरींना मान्य नव्हत्या. (त्यांचे म्हणणे या गोष्टी मूळात उपनिषदांतही नाहीत.) पाठीमागून धर्मात घुसडलेल्या अशा अनेक गोष्टी, धर्माच्या तात्त्विक मीमांसेद्वारे दूर करता येण्यासारख्या आहेत.
५. शिवाय ‘बुद्धिगम्य’ या शब्दाचा प्रतियोग ‘शब्दगम्य’ शी आहे. अमुक एक धर्म मला शास्त्रवचनाने कळला तर ते ज्ञान ‘शब्दगम्य’ झाले. मला माझ्या विचारशक्तीने, तर्काने कळला तर ते ज्ञान ‘बुद्धिगम्य’ होईल. शास्त्रवचनांमध्ये विरोध, विसंगती भरपूर राहू शकेल. बुद्धिगम्य मूळ आधारविधान किंवा प्रस्थानबिंदू उदाहरणार्थ धर्म प्रयोजन, हेतू याबद्दल एकवाक्यता असली तर पुढील उपसिद्धान्त किंवा तपशील यांत सुसंगती राखण्यात विवेकशक्तीचे साहाय्य होऊ शकेल. नीतिशास्त्रात अशा प्रकारची सर्व मान्यता मिळवण्याचा प्रयत्न असतो. मुळात आरंभाबिंदू कोणता मानायचा ह्यातून मात्र मतभेद होतात.
६. श्री. पाटणकरांच्या लेखनात विवेक आणि विवेकवाद या गोष्टी एकच समजून भाषा वापरली आहे. विवेक ही सत्यनिर्णय आणि नीतिनिर्णय (दप्तरींच्या भाषेत धर्मनिर्णय) करण्याची शक्ती आहे, एकमेव शक्ती आहे अशा मताला विवेकवाद म्हणता येईल. विवेकाचे सौंदर्याशी वैर नाही. पण सौंदर्य विवेकाचा विषय नाही असे म्हणता येईल. तसेच नीतिशास्त्र ‘नियमानुसार चाला’ असेही सांगत नाही. नीती सांगते. सांगू शकेल. नीतिशास्त्र आणि नीती एकच नव्हेत.
७. कर्मसिद्धान्त किंवा पुनर्जन्म ह्या कल्पना काही जीवनविषयक कोडी उलगडण्याकरिता सुचविलेल्या सिद्धान्तकल्पना, उपकल्पना किंवा Hypotheses आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक सार्वभौम होतील अशा कल्पना सुचवायला आपण मोकळे आहोत. परीक्षाकरण्यायोग्य असे ते सिद्धान्त नाहीत. ‘ब्रह्म’ देखील विश्वाचे स्वरूप आकलन करण्यासाठी मांडलेली एक सर्वकष अशी परिकल्पना आहे. ते अंतिम सत्य आहे असे एका संप्रदायाचे म्हणणे असू शकते, इतकेच. असो, तूर्त एवढे पुरे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.