खादी (भाग २)

खादी ही जशी एक वस्तू आहे तसा तो एक परिपूर्ण विचार आहे. हा विचार समतेचा, स्वयंपूर्णतेचा तसा ग्रामस्वराज्याचा आहे. समतेचा अशासाठी की खादीमुळे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होऊन कातणाराला दरिद्रनारायणाशी एकरूप होता येते. स्वयंपूर्णतेचा अशासाठी की त्यामुळे कमीतकमी परावलंबन घडते; आणि ग्रामस्वराज्याचा अशासाठी की त्यामुळे परक्या देशांच्या किंवा शहरवासी भांडवल-दारांच्या शोषणातून ग्रामवासी मुक्त होतो. खेड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो. त्याशिवाय ग्रामवासीयाचा रिकामा वेळ त्यामुळे उत्पादक व्यवसायामध्ये कारणी लागू शकतो. त्याची आंशिक बेरोजगारीतून सुटका होऊन स्वकष्टांतून त्याचे जीवनमान वाढू शकते. आपल्यासारख्या भांडवलाची कमतरता असलेल्या कृषिप्रधान देशात वर उल्लेखिलेल्या गुणांमुळे खादी हे वरदान ठरू शकते. खादीमध्ये इतके सारे गुण असून गेल्या ७०-७५ वर्षांत तिची भरभराट झालेली नाही, उलट पीछेहाटच झाली आहे. त्या पीछेहाटीची कारणे ह्या पुढे पाहू.
गांधीजींनी खादीविचार सांगितला त्यावेळी भारताची स्थिती होती तशी आणखीही काही देशांची असावी. दक्षिण आफ्रिकेतले अनेक देश, चीनचा बराच मोठा भाग भारतासारखाच असावा. पण तो विचार भारताबाहेर कोठेही रुजला नाही. तसा कोणी यत्न केल्याचे देखील माहीत नाही. ह्याचे कारण अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या कामांत नवीन रोजगार निर्माण होऊ शकत नाही हे आहे. हे विधान मोठे धाष्ाचे आहे पण त्याचा अर्थ असा की त्या क्षेत्रात केलेल्या कामासाठी मिळणारा मोबदला अत्यल्प असतो. त्या मोबदल्याने जेमतेम पोट भरते. हा रोजगार नसला तरी लोकांचे पोट भरतच असते. कोणताही समाज आपल्या बांधवांना सहसा भुकेले राहू देत नाही. भीक देतो, अन्नसत्रे चालवितो, कसल्यातरी मिषाने, तो भलेही त्याला लाचार वाटेल अशी अपमानास्पद वागणूक देतो, पण भुकेल्यापर्यंत अन्न पोचवितो. त्यामुळे तकलीवर किंवा साध्या चरख्यावर सूत कातून वा न कातून सामान्य माणसाच्या उत्पन्नात आणि त्याचमुळे जीवनमानात भर पडत नाही. ह्याशिवाय त्या उद्योगांमध्ये उपयोगात आणले जाणारे तंत्रज्ञान सारखे बदलत, सुधारत असल्यामुळे, लोकसंख्या वाढती असली तरी नवीन रोजगाराची उपलब्धी त्या क्षेत्रात होत नसते. उलट ती कमी होत असते आणि त्या क्षेत्रातले लोक सतत बाहेरचा रोजगार शोधत असतात. परिणामी हाताने सूत कातण्याकडे कोणीही बेरोजगार वळत नाही.
अन्न-वस्त्र-निवारा ह्या क्षेत्राच्या बाहेर जो वेगळे उत्पादन करतो अथवा लोकांची करमणूक करतो त्याला बहुधा त्याच्या परिश्रमांच्या मानाने जास्त मोबदला मिळतो. आज आपल्या देशात सर्वांत जास्त उत्पन्न सिनेमाच्या क्षेत्रात काम करणाऱ्याला मिळत आहे. रिकामा वेळ आनंदात घालविण्यासाठी माणसे जास्त खर्च करतात; गरजा पूर्ण करण्यासाठी कमीतकमी खर्च करतात असेच आजवर आढळून आले आहे.
अन्नवस्त्रनिवाऱ्याच्या कामात कमीत कमी उत्पन्न मिळते हे जसे खरे आहे तसे त्यांची गरज भागल्यानंतर जसजशी त्यांची प्रत सुधारत जाते तसा त्यासाठी दिला जाणारा मोबदला वाढत जातो. चविष्ट अन्न, तलम वा रंगीबेरंगी वस्त्रे आणि अधिक सोयिस्कर घरे जशी उपलब्ध होऊ लागतात तसा त्यासाठी दिला जाणारा मोबदला वाढतो. कापसापेक्षा संत्री पिकविणे नेहमीच अधिक फायदेशीर मानले जाते. पण अशा वाढीव मोबदल्याला मर्यादा आहे. कारण तो एकदाच वाढवून मिळतो किंवा त्यात एकसारखे नावीन्य आणावे लागते. कापडाच्या गिरण्यांच्या मालकांना मिळणारा मोबदला ते सर्वसामान्य माणसाची वस्त्राची गरज पुरवितात म्हणून मिळत नाही. तो त्यांनी गुंतविलेल्या पैशांचा मोबदला असतो. त्या मोबदल्याचा विचार तूर्त प्रस्तुत नाही. सध्या आपण श्रमांच्या मोबदल्याचा विचार करीत आहोत.
जगाच्या आर्थिक व्यवहारांच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर सर्व समाज उत्तरोत्तर संपन्न होत गेलेले दिसतील. जे कोठलाच आर्थिक व्यवहार करीत नाहीत, जे आपल्या अन्नपाण्याच्या गरजा स्वतःच पुरवितात, जे आपल्या प्राथमिक गरजां-पुरतेच उत्पादन करतात ते समाज स्वयंपूर्ण असले तरी दरिद्री असतात. त्यांचे आयुर्मान कमी असते; त्यांच्या उपभोगात विविधता कमी असते; त्यांचे जीवन एकसुरी असते.
कंटाळवाणे काम एकमेकांच्या साह्याने उरकून टाकून रिकामा वेळ वाढवा-वयाचा आणि त्या रिकाम्या वेळाचा उपयोग करून आणखी कमी वेळात अधिक उत्पादन करण्याच्या पद्धती हुडकून काढावयाच्या असे ज्या समाजांनी केले त्यांचे समाज संपन्न झाले. आज जे समाज विपन्न आहेत तेही फार पूर्वीपेक्षा बदललेले आहेत, पण अतिशय मंद गतीने त्यांनी बदल स्वीकारला आहे असे लक्षात येते. त्यावरून असे म्हणावयाला हरकत नाही की सगळ्यांचाच कल फुरसतीचा वेळ वाढविण्याकडे आहे. त्यात कोणी मागे आहेत तर कोणी पुढे आहेत—-इतकेच. पायी चालण्याऐवजी घोड्यावर बसणे, कामचलाऊ रस्ते बनवून त्यांवस्न गाड्यांनी सामानाची वाहतूक करणे, पोहून नदी ओलांडण्याऐवजी नावेचा वापर करणे, ह्यांची सुरुवात बहुतेक माणूस पशुपालन आणि शेती करू लागला तेव्हाच झाली असली पाहिजे. पायी चालत जाण्याऐवजी घोड्यावर बसून जाणारे, ओझी स्वतःच्या डोक्याखांद्यांवर न वाहता गाढवाच्या पाठीवर आणि बैलांच्या गाडीने नेणारे त्यांच्या काळात चंगळवादी मानले जात असतील. आपले श्रम कमी करणे परंतु उपभोग कमी न होऊ देणे ह्यासच चंगळवाद म्हणावयाचे ना?
कंटाळवाणी कामे कोणती तर दररोज घरातले पाणी भरणे, इंधन गोळा करणे, दळणे, कांडणे, सडासारवण करणे, दिवाबत्ती करणे इ. ही मुख्यतः स्त्रियांच्या वाट्याला येणारी कामे. ह्या कामांमध्येच सूत कातणे हे सुद्धा मोडते. ते युरोपात प्रत्येक घरातल्या अविवाहित स्त्रिया मुली करीत आणि भारतात मुख्यतः एका विशिष्ट जातीच्या विवाहित अविवाहित स्त्रिया करीत. ज्या समाजांनी आपल्या गावात पाणी भरणे, कचरा साफ करणे, अशा कामांचे सार्वजनिकीकरण केले, त्यासाठी आपल्या समूहजीवनाचा घेर वाढविला, नेहमीसाठी तशा कामांची व्यवस्था लावली ते समाज संपन्न होत गेले. आणि जे ही कामे स्वतःची एकेकट्याची किंवा फार झाले तर एका कुटुंबातल्या सदस्यांची आहेत असे समजत राहिले ते विपन्न राहिले. नगरप्रशासनाची कल्पना आपल्याकडे अजून रुजली नाही. नगरप्रशासनाचा सांगाडा आपणावर इंग्रजांनी लादला त्यास शंभरावर वर्षे होऊन गेली पण आपण त्यामध्ये अजूनपर्यंत प्राण भरू शकलेलो नाही. युरोपात सूत कातण्याच्या कामात सोळाव्या शतकाच्या प्रारंभीच (१५१६) यंत्राचे साहाय्य होऊ लागले. फ्लायर नावाचे साधन लियोनार्डो दा व्हिंचीने बनविले. १७६९ मध्ये जलशक्तीवर चालणारे सूतकताईचे यन्त्र बनविले गेले. १७७९ मध्ये एकाच वेळी सूतकताई करणारे आणि कातलेले सूत चातीवर गुंडाळणारे यन्त्र बनविले गेले. १७८५ पासून बाष्पशक्तीचा उपयोग कातण्यासाठी होऊ लागला आणि गिरण्या द्रुतप्रवाही नद्यांच्या काठावरून दगडीकोळशांच्या खाणींजवळ सरकल्या. १८२५ मध्ये पॉवरलूम तयार झाला आणि वस्त्रोद्योगामधली सगळीच कार्ये मानवी स्नायूंपासून हिसकून घेतली गेली. १८३० पर्यंत हातमाग मागे पडून सगळे कुशल विणकर बेकारीच्या संकटात सापडले. त्यांनी यांत्रिक गिरण्यांची मोडतोड केली पण अखेरीस सर्वाना यन्त्रशरणता पत्करावी लागली.
वस्त्रोद्योगाचा हा इतिहास येथे सांगण्याचे प्रयोजन असे की हातकताई आणि हातविणाई युरोपात १८३० मध्येच नामशेष झाली. ती फक्त क्वचित हस्त- कौशल्याच्या स्वरूपात शिल्लक राहिली. एकसुरी, कंटाळवाणी कामे जमेल त्या ठिकाणी यंत्रांच्या स्वाधीन करणे हा मानवी स्वभावाचा विशेष आहे. त्यामध्ये काही राष्ट्रे मागेपुढे असतील पण त्यांच्या प्रगतीची दिशा नियत आहे. पावणे दोनशे वर्षांपूर्वीच खादीचा पराभव झाला आहे.
अंशकालिक बेरोजगारीवर उपाय म्हणून कातण्याच्या व्यवसायाचा इतिहास पाहिला तर तो अतिशय निराशाजनक आहे. ज्यांना उद्याची भ्रांत आहे, पर्यायी कोणतेही दुसरे काम नाही, दुसरा रोजगार मिळण्याची शक्यताच नाही अशा मोजक्या स्त्रिया कत्तिनीचे काम निस्पायास्तव करताना दिसतात. त्यांची बेरोजगारी अंशकालीन नाही. त्या पूर्णकालीन बेरोजगार आहेत. दिवसातून दोन तास नियमाने कातणारी जी कोणती मंडळी आहेत त्यांना कातण्यातून मिळणाऱ्या मजुरीने काहीच फरक पडत नाही. ती श्रीमंतांत गणली जात नसली तरी मध्यमवर्गीय खासच आहेत. स्वतः कातलेल्या सुताचे वस्त्र अभिमानाने घालणारी आहेत. त्यांची संख्या काही शहरांतून थोडी फार आहे. ती संख्या लाखात चार पाच पेक्षा अधिक खास नाही. नागपुरात सध्या जे ७०-७५ लोक काततात त्यांमध्ये बहुतेक सारे सेवानिवृत्त आहेत. गेले एक वर्षभर त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागले आहेत आणि विणाई फुकट करून देण्याऱ्या आमिषाचाही भाग ह्यामध्ये आहे.
उदरनिर्वाहाचे दुसरे साधनच नाही म्हणून विड्या वळण्याच्या कामाकडे जशा काही स्त्रिया वळतात तश्याच त्या बैठेसे बिगार भली म्हणून कातण्याचे काम करतात. दोनही कामांत अतिशय कमी मजुरी मिळते. त्यांतही कातणारणीला मिळणारी मजुरी अनुग्रह म्हणून मिळते. त्यांच्या श्रमांना मुक्त बाजारपेठेत अजिबात मागणी नाही. सध्याची खादीची मागणी ही कृत्रिम रीतीने निर्माण केलेली मागणी असल्यामुळे सुताची मागणी आणि सूतकताईचा दर पूर्णपणे खादीकमिशनच्या धोरणावर ठरतो. कातणाऱ्यांना सहकारी सोसायटी स्थापन करून किंवा संप करून आपली मजुरी वाढवून घेता येईल अशी परिस्थिती नाही; कारण त्यांच्या मालाला बाहेर मागणीच नाही. दुसरा ग्राहकच नाही. रोजगाराच्या नावावर त्या कत्तिनींना बेकारभत्ता दिल्यासारखे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास त्यांचे उत्पादन इतके थोडे आहे की ते बंद पडले तरी देशवासियांच्या उपभोगात काहीच फरक पडणार नाही असे वाटते. ज्या कामामुळे देशवासीयांच्या उपभोगात फरक पडत नाही असे काम रोजगार म्हणून गणणे गैर आहे. पैसे देऊन शोकप्रसंगी स्वाल्यांना रडावयास लावण्याला रोजगार म्हणणे किंवा दिवसभर ईश्वरचिंतन करण्यासाठी काही विधवांना तीर्थस्थळी पोसून त्यांच्या त्या नामस्मरणाला रोजगार म्हणणे यासारखेच कत्तिनीच्या कामाला रोजगार म्हणणे आहे असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यापेक्षा विड्या वळण्याचा उद्योग बरा.
खेड्यापाड्यांतून गावकऱ्यांच्या रिकाम्या वेळाचा उपयोग म्हणून कातकाम होऊ शकले नाही त्याचे कारण आता पाहू. ते कारण आहे शेतकऱ्याची विवंचना-ग्रस्तता. शेतकऱ्यांच्या श्रमांना असणारी अनियमित मागणी लक्षात घेतली तर गावकरी चिंताग्रस्त का असतो ते समजेल. ‘मला उद्या कोण बोलावील, कोणीच कामावर न बोलावले तर काय करू अशा विचारांत गढलेला शेतमजूर कातण्याला बसू शकत नाही. कोठलेही उत्पादक काम करण्यासाठी थोडेतरी मनःस्वास्थ्य लागते. ते मनः-स्वास्थ्य देऊन एकमेकांना पूरक असे काम कस्न, सर्वांनी मिळून उत्पादनात प्रत्येकाने अल्पस्वल्प भर घालण्याची आम्हाला सवय नाही. मनःस्वास्थ्य नसलेल्यांकडून साध्या उत्पादक कामाची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही. आम्ही भारतीय पूर्ण मनःस्वास्थ असेल तर आळशी बनतो—-त्याचप्रमाणे अतिशय जास्त विवंचना असेल तरी आळशी बनतो. हा आमचा स्वभाव अल्पकालीन रोजगार म्हणून खादीचा स्वीकार आम्हाला करू देत नाही. खादीची परवड आमच्या देशातील परिस्थितीचा परिपाक आहे. खादी विचाराने काही वेगळे करून दाखविण्याची गरज होती अपेक्षा होती पण ती अपेक्षा फोल ठरली आहे. हे सारे लिहिताना मला अतिशय दुःख होत आहे. ही कारणमीमांसा चुकीची ठरावी अशीच माझी इच्छा आहे. खादीच्या वापराने गावातल्या गावात पैसा राहतो हा जो समज आहे तो पुढच्या लेखांकात तपासू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.