भयमुक्त शिक्षणासाठी

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रांमधून दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. ही मुले विद्यार्थी होती आणि शिक्षणाशी संबंधित व्यवहारातून ती आत्महत्येला प्रवृत्त झाली. एका विद्यार्थ्याला कॉपी केल्या-बद्दल शिक्षकांनी बेदम मारहाण केली म्हणून त्याने आत्महत्या केली आणि दुसऱ्याने परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य येऊन आत्महत्या केली. परीक्षा आणि त्यातील यशापयश ह्याचा आणि पर्यायाने शिक्षणाचाही विचार फार व्यापक पातळीवर करण्याची गरज जास्त जास्त निकडीची होत चालली आहे. ह्या करता कुठलेही पाऊल उचलण्या पूर्वीच पाय मागे ओढण्यासाठी अनेक कारणे तत्परतेने पुढे केली जातील, तरीही व्यावहारिक पातळीवर काय करता येईल ज्यामुळे अशा टोकाच्या, निर्वाणीच्या कृती करायला विद्यार्थी प्रवृत्त होणार नाहीत ह्याचा विचार पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण-तज्ज्ञांनी आणि शाळा-चालकांनी करायला हवा.
मुलांच्या शाळेतील अपयशामागे भीती हे एकच महत्त्वाचे कारण आहे. अनेक लहान-मोठ्या भयांनी मुलांचे आयुष्य झाकळून गेलेले असते. ह्या सगळ्यामध्ये प्रमुख भीती परीक्षेची असते, परीक्षेत नापास होण्याची भीती. परीक्षेत नापास झालो तर आई-वडील काय म्हणतील, शिक्षक हेटाळणी करतील, इतर मुले चिडवतील अशा अनेक प्रकारच्या विचारांनी मुलांचे लहानपण भयग्रस्त झालेले असते. केवळ लहान-पणच नाही तर माणसाच्या सर्व आयुष्यावरच ह्या भीतीची छाया पडलेली असते. त्याच्या उपबोधाचा (subconscious) ती एक भागच बनलेली असते, म्हणूनच अनेकांना प्रौढ वयातही परीक्षेत नापास झाल्याची भयस्वप्ने पडतात.
शिक्षण आणि त्या शिक्षणाचे मूल्यमापन करणाऱ्या परीक्षा ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जीवघेण्या स्पर्धेचा शिरकाव झाला आहे. परीक्षेतील यशापयशाला त्यामुळेच बेसुमार महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेत प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी ह्या शर्यतीत अटळपणे सहभागी होतो. जॉन होल्ट नावाच्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञाच्या मते, “शिक्षण ही स्पर्धा झाल्यामुळे त्यात भाग घेणाऱ्या स्पर्धकांचे दोनच वर्ग संभवतात —- विजयी आणि पराभूत. आणि इतर स्पर्धांप्रमाणेच पराभूत स्पर्धकांचे प्रमाण ह्याही स्पर्धेमध्ये नेहेमीच जास्त असते.” शिक्षणाच्या ह्या स्पर्धेमध्ये आपण अयशस्वी ठरू ह्या भीतीपोटी कॉपीचा अनुचित मार्ग अनुसरला जातो. परीक्षेत अपयश आल्यावर सन्मानाने जगण्याचे सगळे मार्गच खुंटल्यासारखे वाटून आत्महत्येचा पर्याय स्वीकारला जातो — इतकी ही भीती सर्वव्यापी बनते. ज्या वयात कुतूहलाने, उत्साहाने जीवनाला सामोरे जायचे त्या वयात ते संपवून टाकण्याची इच्छा प्रबळ होते. ही वेळ जेव्हा एखाद्या मुलावर किंवा मुलीवर येते तेव्हा त्यांच्यापेक्षा त्यांचे पालक, शिक्षक आणि समाज खऱ्या अर्थाने पराभूत ठरलेले असतात.
मुलांचे सगळे भविष्य ‘परीक्षा’ ह्या एका घटनेवर तोलले जावे हे बरोबर आहे का? परीक्षा कशासाठी? त्यांचा हेतू काय आणि तो साध्य होतो आहे का? ह्या प्र नांचा विचार विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकरता करण्याची तातडीची गरज आहे. परीक्षेतून काय तपासले जाते आणि ते कसे मोजले जाते ह्याचा विचार केला तर लक्षात येईल की परीक्षेतून परीक्षा पास होण्याची कुवत फक्त मोजली जाते. ठराविक पद्धतीने विचारलेले ठराविक प्र नच विद्यार्थी सोडवू शकतात आणि त्याची ठराविक पद्धतीने दिलेली उत्तरेच शिक्षक तपासू शकतात. विद्यार्थ्यांची ग्रहण-शक्ति, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, कठीण आणि अनोळखी प्र न सोडवत असताना करावा लागणारा बुद्धीचा वापर ह्या कशाचीच परीक्षा होत नाही. ह्या साचेबद्ध प्रकाराला शिक्षण म्हणायचे का? आल्डस हक्सले ह्या विचारवंताला तर अशा प्रकारचे शिक्षणच विसाव्या शतकातील लोकशाहीच्या हासाला कारणीभूत झाले असे वाटे. त्याच्या मते “कडक शिस्त, निमूट आज्ञापालन आणि अस्वाभाविक नम्रता ह्या गोष्टींचेच शिक्षण शाळेत मिळाल्याने एक प्रकारचा न्यूनगंड समाजात तयार झाला. त्यातूनच आपल्यापेक्षा वरचढ असलेल्यांचे निमूट आज्ञापालन आणि आपल्यापेक्षा खाली असलेल्यांची निर्णय उपेक्षा अशी चमत्कारिक मनोवृत्ती निर्माण झाली.”
कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता पण शालेय शिक्षणाच्या प्रणालीत ते कितीही उदार आणि प्रागतिक असले तरीही —- स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती खुरटवली जाते. तिच्या अभावामुळेही भीतीचा पगडा मनावर चटकन् बसतो. अशा भीतीमुळे विवेकी विचार करण्याची क्षमता उरत नाही आणि म्हणून काही मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. पण आत्महत्या ही टोकाची प्रतिक्रिया झाली. तो पर्याय स्वीकारणारी मुले अगदी थोडी असतात. मात्र शालेय जीवनातील भीतीमुळे ज्यांची निर्मितिक्षमता, बुद्धी, जिज्ञासा कमी जास्त प्रमाणात खच्ची झाली आहेत अशी जवळ जवळ सगळी असतात. ही गोष्ट अतिशय काळजी करण्यासारखी आहे. शाळे-मध्ये भीतीचा वापर हत्यारासारखा केला जातो — मुलांवर वचक ठेवायला, त्यांनी शिक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे वागावे म्हणून जाणीवपूर्वक त्यांना धाकात ठेवायला. घरा-मध्ये आईवडीलही ह्याच कारणासाठी भीतीचे शस्त्र वापरतात — पण त्याचबरोबर प्रेमाचे सुरक्षाकवचही असते. ह्या सगळ्यामुळे मुलांचे भावविश्व प्रभावित होत असते. मुलांच्या भावनिक संतुलनाचा अभ्यास करताना मानसशास्त्रज्ञ त्यांच्या आईवडिलांशी असलेल्या संबंधाचा, आई-वडिलांच्या आपापसातील संबंधाचा विचार करतात, पण तितक्याच महत्त्वाच्या असलेल्या शिक्षक–विद्यार्थी नातेसंबंधाचा अभ्यास कितपत झाला आहे ?
शिक्षक विद्यार्थी संबंध गेल्या काही वर्षात झपाट्याने बदलत गेलेले दिसतात. ह्या नात्यामध्ये एक अलिप्तपणा, कोरडेपणा आला आहे. विद्यार्थ्यांच्या बोलण्यात शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल आदर, जिव्हाळा व्यक्त होताना दिसत नाही. शिक्षण ही जोपर्यंत विशेषाधिकार असलेल्या वर्गाची मिरासदारी होती तोपर्यंत हे संबंध वैयक्तिक पातळीवरचे होते आणि शिक्षणामध्येही माहिती (information) पेक्षा कितीतरी जास्त गोष्टींचा अंतर्भाव होता. शिक्षकांच्या मार्ग-दर्शनाने केलेल्या अभ्यासविषयाच्या वाचनातून, चर्चेतून, प्रत्येकाची जीवनदृष्टी आणि व्यक्तिमत्त्व स्वतंत्र-पणे विकसित व्हावे, शिक्षणाने हा पाया घडवावा अशी अपेक्षा असे. सध्याच्या घाऊक शिक्षणाच्या काळामध्ये शिक्षणाचे हे ‘उपयोजन’ मागे पडले आहे. एकाच मापाने बेतलेले शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येवर ते चढवण्यात गुंतलेले मूठभर शिक्षक अशी परिस्थिती असल्याने ओढाताण, हिसकाहिसक आणि काही ठिकाणी घुसमट होणे अनिवार्य आहे, पण तरीही शिक्षणातील प्रचलित स्टी आपण सगळे फार निमूटपणे स्वीकारतो आहोत का? विद्यार्थ्यांचे गुणपत्रक आणि त्यांचे ज्ञान ह्यांचा कुठलाच ताळमेळ नसलेल्या परीक्षा आपण का स्वीकारतो आहोत? विद्यापीठीय किंवा शालान्त परीक्षांच्या निकालावर विश्वास नसल्यामुळेच वेगवेगळ्या संस्था पुन्हा स्वतःच्या वेगळ्या प्रवेशपरीक्षा घेतात. त्याच्या तयारीकरता विद्यार्थी क्लासेसना जातात. काही उच्चभ्रू क्लासेसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीसुद्धा तयारी करून घेणारे क्लासेस असतात. ह्या क्लासेसच्या परीक्षा असतात, त्यांचे ‘होमवर्क’ असते. ह्या सगळ्या फरफटीमध्ये क्षणभर थांबून ‘आपल्याला कुठे जायचे आहे आणि आपण तिकडेच चाललो आहोत ना?’ हा प्र न विचारायला शिक्षक तर विसरतातच पण स्वतःच्या मुलांच्या भविष्याची काळजी करणाऱ्या पालकांनाही हा प्र न विचारणे परवडत नाही. ह्या सगळ्या कसरतीत शिक्षण हातातून निसटून जाते. त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंध आहे हेच विसरले जाते.
शिक्षकालाही विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे अशक्य असते. सध्या वर्गामध्ये साधारण ६० ते ७० विद्यार्थी असतात. शिक्षकाचा बराच वेळ प्रशासकीय कामामध्ये जातो, शिवाय वर्षातून ६ वेळा परीक्षा घेणे आणि उत्तरपत्रिका तपासणे हे एक संख्येमुळे जिकिरीचे झालेले काम करण्यात जातो. शिक्षणाच्या संदर्भात कुठलेही स्वातंत्र्य शिक्षकाला असत नाही. अभ्यासक्रम ठरवणे, क्रमिक पुस्तके ठरवणे हे सगळे निर्णय घाऊक पद्धतीने घेतलेले असतात. प्रशासन, व्यवस्थापन, कायदे, नियम ह्यांना अमर्याद महत्त्व प्राप्त झाल्यामुळे साधन काय आणि साध्य कोणते ह्याचा इथेही विसर पडतो. म्हणून गोंदियात शिकणारा सातवीतील विद्यार्थी आणि कोल्हापुरात शिकणारा सातवीतील विद्यार्थी एकच क्रमिक पुस्तक अभ्यासतात. ह्या सगळ्याची चीड हतबल शिक्षक समोर बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर काढतो. शिक्षकाने केलेला अपमान, दाखवलेली तुच्छता विद्यार्थ्यांना जास्त दुखते. त्याचा अटळ परिणाम त्यांच्या लक्ष केंद्रित करण्यावर, ग्रहणशक्तीवर होतो, म्हणूनही शिक्षण हातातून निसटून जाते.
जॉन होल्ट ह्या शिक्षकाने आपल्या वर्गातील मुलांचे निरीक्षण करून दोन फार सुंदर आणि महत्त्वाची पुस्तके लिहिली —- How Children Learn आणि How Children Fail. एका शिक्षकामागे जेमतेम पंधरा विद्यार्थी अशी चैन परवडणाऱ्या अमेरिकेसारख्या देशातही मुलांना शिकताना काय काय अडचणी येतात ह्याचे वर्णन फक्त उदाहरणांमधून होल्ट करतो. एखादी कल्पना कुणालाही समजली आहे का हे कसे ओळखायचे? होल्ट म्हणतो —
एखादी गोष्ट मला समजली असेल तर पुढीलपैकी काही गोष्टी तरी मला करता आल्या पाहिजेत —- १. माझ्या शब्दांत ती मला मांडता आली पाहिजे; २. त्याची उदाहरणे देता आली पाहिजेत; ३. वेगवेगळ्या परिस्थितीत आणि रूपात ती ओळखता आली पाहिजे. ४. इतर गोष्टींशी आणि कल्पनांशी तिचे असलेले संबंध दिसले पाहिजेत. ५. वेगवेगळ्या प्रकारे तिचा वापर करता आला पाहिजे. ६. तिचे पुढे होणारे काही परिणाम तरी ताडता आले पाहिजेत. ७. तिच्या विरुद्ध किंवा उलट गोष्टी सांगता आल्या पाहिजेत.
ह्या दोन्ही पुस्तकात होल्ट मुले कशी शिकतात ह्याचे निरीक्षण करतो अनौपचारिकरीत्या खूप शिकणारी मुले, शाळेसारख्या औपचारिक शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये कशामुळे बुजतात? होल्टचे असे निरीक्षण आहे की शिक्षकांनी शिकवलेले न समजणे, त्यांनी विचारलेल्या प्र नाचे उत्तर न येणे ह्याचे प्रचंड दडपण मुलांच्या मनावर असते. परीक्षेत वरच्या श्रेणीत पास होणाऱ्या मुलांनाही तो विषय समजलेला नसतो. होल्टचे प्रत्येक विधान हे वर्गात त्याला आलेल्या अनुभवांवर आधारलेले आहे. मुलांना शब्द माहीत असतात पण त्यांचा अर्थ —- त्या कल्पनेचा इतरांशी असलेला संबंध, तिचे स्थान, तिचे संदर्भ काही माहीत नसते. होल्ट म्हणतो –
ज्ञान, शिक्षण, समज ह्या गोष्टी एकरेषीय (linear) नसतात. तथ्यांचे (facts) छोटे छोटे तुकडे एकापुढे एक ठेवून किंवा एकावर एक रचूनही त्या बनत नाहीत, ज्ञानाचे एखादे क्षेत्र, मग ते गणित असो किंवा इंग्रजी, इतिहास, विज्ञान वा संगीत असो —- हा एक प्रदेश असतो. ह्या प्रदेशाचे ज्ञान असणे म्हणजे त्यांतील सगळ्या घटकांची माहिती असणे असे नाही तर त्या सगळ्या घटकांचे एकमेकांशी नाते काय, त्यांचा तुलनात्मक संबंध काय, त्यांची जुळणी कशी आहे ह्याची जाणीव असणे. एखाद्या शहरातील सर्व रस्त्यांची नावे माहीत असणे आणि त्या शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हव्या त्या मार्गाने जाता येणे ह्यात जो फरक आहे तोच माहितीत आणि ज्ञानात आहे. मुलांच्या संबंधात येणाऱ्या सगळ्यांनी वाचावीतच अशी ही पुस्तके आहेत. शिकणे आणि शिकवणे ह्याबाबतीत आपल्या मनाचे जे अवलंबीकरण (conditioning) झाले आहे ते काही प्रमाणात ह्या पुस्तकांच्या वाचनाने कमी होईल.
शाळेच्या पुस्तकांमधून जे आपण शिकतो त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी, भोवतालच्या जगाशी संबंध आहे हे नीट अधोरेखित होत नाही ही सध्याच्या शिक्षणातील सर्वांत मोठी उणीव आहे. तो सबंध लक्षात आला की मुलांचे कुतूहल, जिज्ञासा जिवंत राहील. शिक्षण रोचक होईल. अपयश हा शिकण्यातला एक टप्पा आहे ह्या वृत्तीने त्याकडे पाहिले —- तसे वातावरणच निर्माण झाले —- तर शाळा, परीक्षा त्याबद्दलची भीती आपोआप कमी होईल. मुक्त वातावरणातच ज्ञानाची देवाण-घेवाण होऊ शकते. १९३, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.