मनाचिये गुंती

आधुनिक युगात स्थलकालाबाधित अशी जर कोणती गोष्ट असेल, जी प्रत्येक मनुष्यप्राण्याला कमीजास्त प्रमाणांत छळत असते, ती म्हणजे काळजी किंवा चिंता. Anxiety (चिंता) हा जर एखाद्या व्यक्तीचा स्थायीभाव झाला तर, तिचे दूरगामी शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, अनेक व्याधींचा उद्भव करून त्या व्यक्तीचे जीवन यातनामय कस्न टाकू शकतात. ‘जी चित्ताला जाळते ती चिंता’ हे सर्वश्रुत आहेच. सामान्य माणसाचे सामान्य जीवन जगणेही मुष्कील करून टाकणारी ही चिंता (anxiety) दूर करण्यासाठी व किंचित काल तरी तीपासून सुटका करणारी अशी उपाययोजना मग माणसे शोधू लागतात. मुक्तीचे हे मार्ग मात्र दुखण्यापेक्षा जालीम ठस्न जास्तच गंभीर अशी दुखणी होऊन बसतात. गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारू ‘अस्वस्थ चित्त’ काही अंशी व काही काल स्थिर करतात. पण मग जेव्हा त्यांची सवय लागून तीच तुम्हाला गिळंकृत करते तेव्हा प्र न अधिकच गंभीर होतो. drugs, नशा आणणारी औषधे ही पूर्णपणे पोखरून मनुष्यजीवन उद्ध्वस्त करणारी द्रव्ये आहेत. ही द्रव्ये एका वेगळ्याच सामाजिक समस्येची कारणे ठरतात.

ही सर्वव्यापी चिंता (anxiety) म्हणजे शेवटी असते तरी कशी? ती नेहमीच जर मनुष्यप्राण्याला छळत राहणार तर मग यातून मार्ग तरी काय?

चिंता ही एक भावावस्था आहे. ती विनाशकारी ठरू शकते किंवा व्यक्तीला कृतिशील व उद्योगीही बनवू शकते. रॉबर्ट गर्झन (Robert Gerzon) या मानसोपचार तज्ज्ञ-तत्त्वज्ञ लेखकाच्या मते प्र न ‘आपण चिंता करतो’ हा नाही तर आपण पुरेसे चिंतित तर नाहीच पण योग्य व रास्त गोष्टींविषयी चिंतित नाही हा आहे. उदा. ‘मी काय पोशाख घालावा’, ‘रिक्शेवाल्याने जास्त पैसे घेतले’, ‘कामवाली आली नाही तर?’ ह्या चिंता तुमचे जीवन इतके व्यापून टाकतात की त्यामुळे माझा विकास (self growth) एक व्यक्ती म्हणून होत आहे की नाही, माझ्या विचारांची आचारांची दिशा व जीवनशैली ही योग्य मार्गाने जात आहे की नाही अशा चिंता करायला तुमच्या चित्ताला फुरसदच मिळत नाही.

चिंता हे एक दुधारी शस्त्र आहे. ते हानिकारक की उपकारक हे ठरवणे व तसे करणे हे शक्य आहे. हीच चिंता आपल्याला आंतरिक शांती (serenity) मिळवून देऊ शकते. ह्या चिंतायुगांत शांति मिळवण्यास चिंताच मदत करते हे वरवर self contradictory (आत्म-व्याघातयुक्त) विधान वाटते. पण चिंता म्हणजे कशी व किती प्रकारची असते हे पाहिले की ते तसे नाही असे लक्षात येते. चिंता (anxiety) हा एक तिपेडी गोफ आहे. चिंतेचे तीन पदर असतात. ते वेगवेगळे असले तरी एकत्रित गुंफलेले व परस्परांत मिसळलेले असतात. त्यापैकी पहिला पदर —- १. स्वाभाविक चिंता (Natural Anxiety) संरक्षक व विकासाकडे नेणारी ऊर्जा आत्मसंरक्षणाची स्वाभाविक जाणीव (instinct) ही प्रत्येक जीवित प्राण्यांत असते. शारीर पातळीवर बाह्य जगातील संभाव्य धोका ओळखून स्वतःला त्यापासून वाचवण्याची अंतःप्रेरणा देणारी ही सकारात्मक शक्ती स्वाभाविक चिंतेपोटीच उगम पावते. त्या त्या वेळेला उद्भवून संरक्षणाचे कार्य पार पाडले की ही चिंता लुप्त होते. ही स्वाभाविक चिंता आपल्या Central Nervous System (केन्द्रीय चेता संस्था) मध्ये अंतर्भूत असते व fight or flight (लढणे वा पळून जाणे) या प्रतिक्रियां-मधून वारंवार व्यक्त होत रहाते. भविष्यातील संभाव्य धोके याबद्दल चिंता करून त्यांना पायबंद घालण्यासाठी प्रतिरोधक उपाय आधीच योजणे ही याप्रकारच्या चिंतेची एक सकारात्मक अभिव्यक्ति. भूकंप, हिमवादळे, दुष्काळ इत्यादि नैसर्गिक आपत्ति केव्हा, कुठे व किती प्रमाणात येणार हे ओळखण्यासाठी विज्ञानाने शोधून काढलेली यंत्रणा व साधने हे याचाच परिपाक होय. तसेच वैयक्तिक पातळीवर, पाऊस येण्याचा संभव आहे हे इंद्रियांद्वारे ओळखून बाहेर पडताना छत्री जवळ ठेवण्याची खबरदारी घेणे हे एक त्याचेच उदाहरण.

ही चिंता दुःखदायक नसून उलट एक प्रकारची उत्कंठावर्धक हुरहूर (excitement) लावणारी व भविष्याकडे आशावादी बनून बघणारीही असते —-धावण्याच्या शर्यतीच्या सुरवातीला, स्टेजवर जाऊन प्रेक्षकांसमोर कलेचे प्रदर्शन करण्याआधी किंवा महत्त्वाच्या परीक्षेच्या आधी. ही आनंददायक असते. परंतु हीच चिंता जर प्रमाणाबाहेर जास्त वाढली तर ती सर्व कृति, मति व प्रवृत्ति गोठवून टाकणारी अशी Toxic Anxiety (विषारी चिंता) ही बनू शकते. २. Toxic Anxiety (विषारी चिंता) एक अत्यंत प्रलयंकारी व स्वसंहारक असे toxic anxiety चे वर्णन करता येईल. ही राक्षसी चिंता माणसाला सतत पोखरत राहते. तिच्यापासून सुटका अत्यंत कठीण किंबहुना अशक्यप्राय असते, कारण हा राक्षस आपल्या अंतर्मनातच ठाण मांडून बसलेला असतो. किंबहुना हा राक्षस जो निर्दयपणे आपले जीवन उद्ध्वस्त करीत असतो. तो म्हणजे आपले स्वतःचेच मन.

Toxic anxiety ला ‘भयाचेच भय’ किंवा ‘चिंतित होण्याबद्दलच चिंतित असणे’ असे म्हटले जाते. ह्या चिंतेने ग्रासलेल्या मनुष्याला सर्वसाधारण जीवन व दैनंदिन व्यवहारही पार पाडणे मुष्कील होते. ह्या प्रकारच्या ‘चिंतित अवस्थे’ चे मूळ, आपले भूतकाळातील अनुभव, पालन पोषणाच्या सदोष पद्धती (faulty parenting), बालपणातील संस्कार व मानसिक धक्के ज्यातून बाहेर पडण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नसतात, यात सापडू शकते. ह्या प्रकारची ‘चिंतावस्था’ ही एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे अशी पिढानपिढ्याही चालू ठेवलेली आढळून येते. अशा चिंतावस्थेला Dr. Freud ने ‘neurotic anxiety’ असे म्हटले होते. आधुनिक मानसशास्त्रात, mood / affective disorder, anxiety disorder, substance abuse या नावांनी ही ओळखली जाते. ह्या विषारी चिंतेची बाह्य लक्षणे म्हणजे सततचा तणाव (chronic tension), शारीरिक पीडा (pain) आणि आजारपणे. एका मानसशास्त्रीय प्रयोगात एका समूहाला प्रचंड मानसिक तणावाखाली एका विशिष्ट कालावधीत दिलेले काम पूर्ण करण्याचा आदेश दिला गेला. ह्या प्रयोगा-तील व्यक्तींची anxiety level इतकी जास्त वाढली की काही काळानंतर त्यांना संभाव्य हृदयविकाराचे रोगी या सदरांत टाकले गेले. याशिवाय ही विषारी चिंता त्या माणसाच्या पुढील बाह्य वर्तनावस्नही ओळखता येते. ह्या व्यक्ती परावलंबी, उद्धट व उद्दाम भाषा वापरणाऱ्या व दुसऱ्यांप्रति आक्रमक वागणाऱ्या असतात.

विषारी चिंता ही माणसाच्या विकास व वाढीच्या आड येणारी अशी एक गंभीर अडचण आहे. निरोगी, निरामय, सुदृढ मानसिक आरोग्य ह्यांना लाभत नाही. अशा व्यक्तीची विवेकी विचारशक्तीच संपून जाते. मनुष्याची स्वाभाविक प्रतिक्रिया अशी आहे की कुठलेही संकट असो त्यातून मार्ग शोधणे. ह्या प्रकारची चिंतित व्यक्ती आपल्या परीने उपाय शोधतेच पण या मानसिक अवस्थेमुळे ते उपाय dysfunctional कृतिहीन व दुष्परिणामकारकच असतात. कारण ते एका विकृत व रोगी मनाने शोधलेले पर्याय असतात. ते पर्याय असे —- (अ) Denial किंवा वास्तव नाकारणे —- ‘हे असे झालेलेच नाही’ किंवा ‘आम्ही असे म्हटलेच नव्हते’ हे वारंवार स्वतःला व दुसऱ्यांना पटवत राहणे. असे म्हणून हे विचार मनाच्या गुंफेच्या खोल तळाशी दाबून चिणून टाकण्याची प्रवृत्ती. दुर्दैवाने ही गाडली गेलेली चिंता आणखी खोल स्तत जाऊन आपला विषारीपणा जास्तच कडवट करून, त्या व्यक्तीचे व तिच्या सहवासात येणाऱ्या सर्वांचे जीवन कडू करून टाकते. (ब) Blame–दोषारोप किंवा दुसऱ्यांना बोल लावणे — ज्या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांवर टीका करतात, दोष देतात, सर्वांना आपल्या हुकमतीखाली ठेवतात आणि दुसऱ्यांचा उपयोग करून स्वतःची पोळी भाजून घेतात त्यांना ह्या विषारी चिंतेने ग्रासले आहे असे समजावे. वरवर ही पळवाट वाटते पण यामुळे आंतरिक चिंता आणखीच वाढते. कारण स्वतःच्या दुःखदायक भावना, स्व विषयीची हीनतेची जाणीव, दुसऱ्यांबद्दलची ईर्षा या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक अशांती वाढतच जाते. आणि स्वतःपासूनच दूर पळण्यासाठी मग ती व्यक्ती दारू, पैशाची उधळपट्टी, जुगार गरजेपेक्षा जास्त वस्तूंची साठवण, गैरवाजवी लैंगिकता अशा गोष्टींच्या आहारी जाऊ लागते. Workoholism (पराकोटीची कार्यमग्नता) हेही याच सदरात येते. क्षणिक सुखाची अनुभूती देणाऱ्या या सर्व गोष्टी व्यसन या सदरात मोडतातच पण जिच्यापासून पळवाट शोधली ती चिंता तर जास्त खोलवर जाऊन तुमचा पाठलाग अति वेगाने चालू ठेवते. व शेवटी psychiatric treatment, psychotherapy याशिवाय मार्गच राहत नाही. ही मदत कशी केली जाते तर दाबून टाकलेले विचार (stuffing) व भावना किंवा दुसऱ्यांवर केलेले दोषारोप (blame) यांना conscious वैचारिक पातळीवर आणून, त्यांना सामोरे जाऊन, स्वतःच्या त्रुटी, दोष मान्य करून ही खोल स्तलेली विषारी चिंता स्वाभाविक चिंतेच्या (Natural Anxiety) पातळीवर आणून ठेवणे. 3. Sacred feball Spiritual Anxiety Natural किंवा स्वाभाविक चिंता ही जरी बहुतांशाने वर्तमानकाळाशी निगडित असते; तरीही आपण कितीही यशस्वी, सुखी असलो तरी शेवटी आपले शरीर हे मर्त्य आहे व त्याचा शेवट होणारच हेही सत्य आपल्या जाणीव नेणिवेच्या सीमारेषेवर सतत खेळत असते. व ही जाणीव म्हणजे मृत्यूबद्दलची भावना, कल्पना केवळ मनुष्यप्राण्यांमध्येच असते. निसर्गाच्या हातातील आपण केवळ एक कळसूत्री बाहुले आहोत, कळ संपली की आयुष्य संपणार ही एक humbling (नम्रता आणणारी) जाणीवही बौद्धिक पातळीवर सतत असते. ह्याच जाणीवेत आपल्या चिंतामुक्तीचे द्वार व सार आहे. वर्तमानातील स्वाभाविक चिंता (दैनंदिन) ह्या मृत्यूच्या जाणीवेपुढे किती क्षुल्लक ठरतात हे एकदा उमजले की sacred किंवा spiritual चिंतेचा उगम होतो. श्री समर्थ रामदासांची ‘चिंता करितो विश्वाची’ ही या प्रकारची, संपूर्ण मानवजातीची चिंता होती. व त्यामुळेच त्यांना मनःशांतीचे, मुक्तीचे, मोक्षाचे द्वार उघडले गेले होते.

Toxic Anxiety ही भूतकाळातील राक्षसांशी लढत असते, Natural Anxiety ही वर्तमानातील प्र न व आव्हाने यांच्याशी लढा देत असते. तर Sacred Anxiety ही भविष्यकाळातील अगम्य गोष्टी, सृष्टीचे रहस्य, जीवनाचा खरा अर्थ, मृत्यूची ultimate reality अशा विषयांत चिंतनमग्न असते. ती आपल्याला ethics (नीतिशास्त्र) तत्त्वज्ञान, धर्म यांच्या प्रदेशांत घेऊन जाते. मनुष्याला विचार करण्याची, बुद्धीची, सर्जनशीलतेची आणि आश्चर्य (wonder) करण्याची जी आयुधे मिळाली आहेत त्यांचा उपयोग जास्त विस्तृत (global) प्रमाणावर, व्यक्तिनिरपेक्ष, स्वनिरपेक्ष आणि चिरंतन अशा सृष्टितत्त्वांचा, नीतितत्त्वांचा भेद घेण्यासाठी करण्याने, सर्व प्रकारच्या चिंतेचे निराकरण होऊन मनःशांति (serenity) मिळायला मदत होते. आत्मपरीक्षणाने, स्वतःच्या अंर्तमनांत वसत असलेल्या ह्या तिपेडी चिंतांचे मनन करून, त्यांना समजावून घेऊनच चिंतेवर मात करता येऊ शकते. आणि मग ‘मन’ हे ‘चिंतेचे वारू’ न होता ‘आत्मरंगी रंगले’ ‘भवतरंगी रंगले’ ‘विश्वरंगी रंगले’ असे ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ होऊन जाते.

निर्मल अपार्टमेंटस्, चितळे मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.