गृहिणी —- प्रवास चालू (दांपत्यजीवन)

“कुटुंबकेंद्रित समाज आणि स्त्रीकेंद्रितकुटुंब’ या विषयाचा मी मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी काही तात्त्विक चर्चा करायला बसलेलो नाही तर या विषयात निरनिराळ्या ठिकाणाहून आत शिरण्याचा प्रयत्न करतो आहे. एक गृहिणी म्हणून तिच्या विविध प्रकारच्या कामांचा अगदी थोडक्यात मी आढावा मांडला होता. तेथे गृहिणी ही ‘कर्ती’ होती. विचार आला की या कर्तीचे पुढे होते काय?
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझे दोन मित्र गप्पा मारत होते. एक म्हणाला —-अरे, वैजू म्हणते आहे, आठपंधरा दिवस माहेरी जाते. तिच्या आईला जरा बरं नाहीयं वाटतं. आमच्याकडेही तशी थोडीशी अडचण आहेच. दुसऱ्याची त्यावरची तडकाफडकी प्रतिक्रिया —- मग काय, वैजूने तुझ्यापुढे सुटीचा अर्ज भरून द्यायची वाट पहातोयस? अरे वैजूपण नोकरी करते आहे, शिकलेली आहे. तिला कुठे तिची जास्त गरज आहे एवढंही कळत नाही काय? इतकी ती बेजबाबदार नाही. यावर पहिला खजील झाला. आपल्या सहज बोलण्याचा इतका सगळा अर्थ होऊ शकतो हे त्याच्या लक्षातच आले नव्हते. हीच पुरुषप्रधान संस्कृती ही नकळत जन्मापासून आपल्या अंगात —- मुलांच्या आणि मुलींच्याही —- मुरत जाते. आता आणखी काही संवाद ऐकू या. “कशी आहेस? काय म्हणतय मद्रास? गोट्या कसा आहे?”
“अरे, मला आता झेपत नाही. फार मस्तीखोर दांडोबा आहे. माझी तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी १५ दिवसांसाठी आले आहे. नेहमीच्या डॉक्टरकडून औषध घेऊन परत जाणार आहे. अस्ला ८-१० दिवस जपानला जायचंय ऑफीसतर्फे आणि घरी कोणीच नाही.”
“बघ ग. नीट काळजी घे. तुझी तब्येत काही तितकीशी बरी दिसत नाहीये मला गेले वर्षभर.” “खरे सांगू का मला हल्ली फार एकटे, एकाकी वाटते.”
“तुला खरे सांगू का. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. पण दिवसभर त्यानी आणि मी समोरासमोर बसून रहायचे. एक शब्द बोलायचा नाही. मीच म्हटले जात जा कामाला. तू तरी कामात रमला आहेस. मी पण आता हळू हळू माझे सोशल वर्क सुरू करीन.”
दोन आठवड्यांत आयुष्यात एकदम फार मोठा बदलं झालेल्या माझ्या मैत्रिणीशी मी बोलत होतो, दोनतीन वर्षे घरी अंथरुणात खिळूत पडलेल्या वडीलधाऱ्या माणसाचा नुकताच मृत्यू झाला होता. मुलीचे सहज झटकन लग्न ठरले आणि होऊन ती अमेरिकेला गेलीही. मुलगा आधीच परदेशी होता. आता अचानक दोघेच उरले. मी रमेशला म्हटले होते, ८-१० दिवस कामावर जाऊ नकोस. एकदम भरलेले घर खाली झाल्यामुळे नलिनीला फार एकटं एकटं होईल. तर हा तिसऱ्याच दिवशी कामावर गेला पण.
“हिला काही हल्ली स्वयंपाकच करता येत नाही. अगदी बेचव सगळं. माझे ७२ वर्षांचे मित्र ६८ वर्षांच्या पत्नीविषयी तक्रार करत होते. नेहमी सगळ्यांसमोर पत्नीचा पाणउतारा करतात. वास्तविक यांना प्रचंड प्रमाणावर मधुमेह. जराही जिभेवर —- बोलण्यावर आणि खाण्यावरही —- ताबा नाही. पत्नी काय करणार?’
वरील तिन्ही प्रसंग खरे आहेत. अनेक जणांना त्याचा अनुभव आहे. स्त्रियांची वये ६२, ५५, ६८ अशी आहेत. पहिल्या प्रसंगानंतर दोनच दिवसांत परगावाहून आलेला माझा दोस्त भेटला. म्हटले “अरे जरा आशाकडे बघ. हल्ली तिची तब्येत तोळामासा असते. परवा फार एकटेपण वाटते म्हणत होती. तू तिकडे नोकरी करणार. ही इकडे एकटी. तिथे परक्या प्रांती, परक्या भाषीय गावात कंटाळून जाते. तूं दिवसभर उशिरापर्यंत कामावर. घरीपण फोनवर तेच. इथे नातेवाईक, मित्रमैत्रिणी म्हणून इथेच मन रमवण्याचा प्रयत्न करतेय.”
“काय करणार? सध्या कंपनीची परिस्थिती फार वाईट आहे. माझ्यासारख्या व्हाईस प्रेसिडेंट, फायनान्सला फार जबाबदाऱ्या असतात.”
“नोकरी केलीच पाहिजे?” “काय करू घरी बसून?” “तुला एक विचारू? Do’nt you miss her there? तुला तिची आठवण येत नाही? चुकल्या चुकल्यासारखे नाही वाटत?” “खरे सांगू? नाही! इतकं काम असतं की हा विचारच केला नाही” मला धक्काच बसला. यात विचार कसला डोंबलाचा करायचाय? एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीची चुटपुट काय विचारपूर्वक लागायची असते?
वरीलपैकी दोन विवाह हे प्रेमविवाह आहेत. घरच्यांच्या प्रचंड विरोधाला न जुमानता झालेले. यातले नवरे सुसंस्कृत, बायकोचा एरवी मान ठेवणारे, तिला मारझोड न करणारे, सज्जन लोक आहेत. ३० वर्षांच्यावर सहजीवन जगलेली ही दांपत्ये या मुक्कामावर कशी येऊन पोहोचली?
आमची गृहिणी आपल्या पसाऱ्यात पार बुडून गेलेली. मुले, त्यांच्या शाळा, कॉलेजे, सहली, पै-पाहुणे. आलागेला यांतून तिचे डोकेच वर निघालेले नसते. अशी १५-२० वर्षे सहज म्हणताम्हणता निघून जातात. तोपर्यंत नवरा आपल्या कामात वर वर चढत अधिकाराच्या पदावर पोहोचलेला असतो. आता तो महत्त्वाकांक्षी होतो. अंगात थोडा बॉसपणा आलेला असतो. प्रियकर केव्हाच हरवलेला असतो. सहजीवन म्हणजे एका छपराखाली राहणे आणि घरात पैसे देणे. बायकोने फारच तणतण केली तर “उगीच काहीतरी बोलू नकोस. परवाच तर हिऱ्याच्या कुड्या केल्या” किंवा “मागच्याच वर्षी काश्मीरला नव्हती का नेली तुला?’ असे बोलणार. जणु काही वर्षातले १५ दिवस काश्मीर नाही तर केरळ दाखवले की यांचे कर्तव्य संपले. वर्षाचे ३६५ दिवस असतात आणि प्रत्येक दिवसाला २४ तास असतात. एकत्र बोलणे-बसणे; नाटक, सिनेमा, प्रदर्शन पहाणे; छोट्या छोट्या सहली काढणे, इतकंच काय पण “आज काय झक्क चांदणं पडलंय. गच्चीत जाऊन जेवण करू या?” अशी हौशीची फर्माईश करता येऊ शकते.
अशा छोट्या छोट्या गोष्टींतूनच तर आयुष्य (सहजीवन) घडत असते. समरसून फुलत असते. पण “मास्तर तेवढे सांगू नका. वाटलच तर रु. १०,०००/- च्या क्लासला घालतो पोराला, पण दिवसाकाठी अर्धा तास त्याच्याबरोबर घालवणे काही जमणार नाही’ असे सांगणारे महाभाग मला माहीत आहेत.
मुले कॉलेजला जायला लागून सुटी होईतो घरात एखाद दुसरा वृद्ध, त्याचे आजारपण सुरू होते. वय ४५-५० कडे झुकायला लागले की स्त्रियांच्यात दुसऱ्यांदा शारीरिक स्थित्यंतर सुरू होते —- मेनोपॉझ. मासिक पाळी अनियमित होते. हार्मोनल संतुलन बिघडते.
स्त्री एका फार मानसिक तणावाखालून जात असते. पुन्हा तिला प्रियकर, समजून घेणारा पती, जोडीदार हवा असतो. या वेळपर्यंत बऱ्याच जणांना आपली पत्नी मागास, अनाकर्षक वाटायला लागते. “तुला मुळी चटपटीत रहाताच येत नाही. जग कुठच्या कुठं गेलंय पहा.” अगदी साधी, चारचौघींसारखी नोकरी करणाऱ्या बाईला पण हे ऐकावे लागते. वर मुलांवर सुसंस्कार करण्याचा, घराचे घरपण टिकवून ठेवण्याचा सर्व मक्ता या हिंदुगृहिणीचा. याबाबतीत गांधीजीपण अपवाद नाहीत. कुठच्या एकनिष्ठ पत्नीला साठी उलटलेल्या आपल्या पतीचे असले “ब्रह्मचर्याचे प्रयोग’ आवडतील? मानसिक छळवादच की! त्यापेक्षा दोन दणके परवडले असे म्हणतील काही जणी. मुळात पत्नी ही काही खाजगी मालमत्ता नाही.
दुसरे एक असे होते की बहुतेक पुरुष आपल्या कामाविषयी घरात फारसे बोलतच नाहीत. कामावरचे बोलणे म्हणजे तिथल्या तक्रारी मांडणे असे नव्हे. घराबाहेर अनेक त-हेचे अनुभव मिळत असतात, अनेक माणसे भेटतात, अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. तीही गंमत असते. “घराबाहेरच्या या वाढीला” स्त्री मुकत असते. या शिवाय बहुतेक पुरुष बायकांचे काही ऐकूनच घेत नाहीत. They are bad listeners. त्यांना तिचे बोलणे ही कटकट वाटते. (आम्ही एवढे दमून कामावरून येतो आणि वर हिची कटकट). अगदी समवयस्क, नेहमीची पुरुष मंडळी गप्पा मारत बसली तरी स्त्रिया दिवाणखान्यात येऊन त्या गप्पांत सहभागी होत नाहीत किंवा आवर्जून त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यामुळे हळूहळू दांपत्यजीवन या स्त्रीसाठी साचेबंद, रटाळ होते.
अपवाद महादेव गोविंद रानड्यांचा. आईच्या शब्दाखातर वयाने लहान असणाऱ्या मुलीशी विवाह करण्याची चूक केली खरी. पण त्यानंतर सर्वांचा विरोध सहन कस्न अतिशय हळुवारपणे त्यांनी रमाबाई रानडे नावाचे शिल्प विकसित केले. स्वतः रमाबाईंनीच आठवणी लिहून ठेवल्या आहेत. समोरच्या माणसाचा, मग ते मूल असो, पत्नी असो, की हाताखालचा माणूस असो, माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून सन्मान राखायचा असतो. माझ्या माहितीतील एका बाईंनी लग्नानंतर आपल्या वडिलांना पत्रातून विचारले होते “बाबा, निसर्गात सुरवंटाचे फुलपाखरू होते. पण लग्न झाल्यावर फुलपाखराचा सुरवंट होतो का हो?”
एका पांढरपेशी सुशिक्षित समाजातील सुशिक्षित गृहिणीची ही साठी-पासष्टीपर्यंतची वाटचाल आहे. मी त्याच जगातला असल्यामुळे माझ्या काक्या, आत्या, मावश्या, मैत्रिणी, मुली, पुतण्या, बहिणी, वहिन्या यांचे जे जीवन पाहिले ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनाची मला जाणवलेली ओढाताण, घुसमट मांडायचा हा प्रयत्न आहे. स्त्रीकेंद्रित कुटुंब, कुटुंबकेंद्रित समाज असा असावा?
माझ्या दृष्टीने हा चर्चेचा विषय नाही. प्रत्येकजणच या दोन लेखांच्या पार्श्वभूमीवर स्वतःला तपासून पाहू शकतो ना?
पिग्मॅलियनमध्ये शेवटी प्राध्यापक म्हणतो “अग, तू मला इतकी अंगवळणी पडलीयस. I am so much used to you, I will miss you. मला पदोपदी तुझी आठवण येईल. चुकल्यासारखे वाटेल. शेवटी माझ्या शर्टाची बटणे कोण शिवणार तू गेलीस की?” दुर्दैवाची गोष्ट आहे माझे सुस्वभावी, उच्चविद्याविभूषित मित्र पासष्ठाव्या वर्षीही “Miss their jobs, not their lifelong loving partners.” गृहिणीची हीच शोकांतिका आहे. तिला सगळेपण गृहीत धरून चालतात. तिच्या मनाचा कोणी विचारच करत नाही. नेहमीच्या सवयीने हे विचार दोघा चौघांना वाचायला दिले. एक प्रतिक्रिया गंमतीदार वाटली. महादेव गोविंद रानडे यांनी रमाबाईंना घडवले असा उल्लेख आहे. यात पतिपत्नीतील समानता नष्ट नाही का होत? मुद्दा बरोबर आहे. पण शंभर वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर रानड्यांची सहृदयता, संवेदनशीलता संशयातीत आहे. माझा मुद्दाच मुळी असा आहे की मानवी नातेसंबंध अशा संवेदनशीलतेवरच उभे राहतात. हक्क, अधिकार यांनी व्यवहार साधतो, काही अन्याय थोपवून धरायला मदत होते इतकेच. लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची’ पण आठवण झाल्याशिवाय राहत नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेही उदाहरण आहेच.
पिग्मॅलियन —- शॉ हा मुद्दा निराळा आहे. पुरुषी अहंकाराचा इथे संबंध नसून बौद्धिक अरेरावीचा, आढ्यतेचा संबंध आहे. म्हणजे परत आपण तिथेच येतो. सर्व प्र न बोद्धिक पातळीवर सुटत नाहीत. मने जुळावी लागतात. आणि हे wishful thinking ने होत नाही. नाती धस्न चालता येत नाहीत, सांभाळावी लागतात.
स्त्री बिन जीवन सूना सूना . . .
अलीकडेच कोलंबियाची राजधानी बोगोटाचे महापौर अनातास मोकस यांना शहरातील महिलांची कीव आली व त्यांनी आठवड्यातील एक विशिष्ट दिन ‘महिला दिन’ म्हणून घोषित केला. आपल्याकडे कोठलाही दिन असला की लगेच दिखाऊ चर्चा व परिसंवाद भरवून नेहमीचीच चार डोकी मिरवून घेतात. पण ही स्वयं–ओवाळणीची साथ कोलंबियापर्यंत पसरलेली नसल्याने बोगोटाच्या महापौरांनी अशी भाषणबाजी न करता त्या दिवशी संध्याकाळी केवळ महिलांनी घराबाहेर पडून जिवाची मुंबई (माफ करा, जिवाचा बोगोटा) करायची व पुरुषांनी घरी बसून मुलांकडे पाहणे, स्वयंपाकपाणी करणे अशी कामे करायची, असा फतवा या महापौर महाशयांनी काढला. महिला हरखून गेल्या. महापौरांची आज्ञा शिरसावंद्य मानून हजारो महिलांनी जणू आनंदोत्सवच साजरा केला. क्लब्ज, मदिरागृहे इथे त्यांची गर्दी उसळली. अगदी भल्या पहाटेपर्यंत त्या स्वैरपणे मनमुराद मनसोक्त भटकल्या, हुंदडल्या, हसल्या, खेळल्या नाचल्या. मग महापौरांनी याच धर्तीवर ‘पुरुषदिन’ जाहीर केला. त्या दिवशी पुरुषांनी बायकोला वा मैत्रिणीला न घेताच सायंकाळ घालवावी, असे सांगण्यात आले. पण हा दिवस मात्र साफ फसला. स्त्रियांविना भटकण्यात काही गंमतच आली नाही. मदिरागृहामध्येही तुरळक गर्दी होती. कॅबेरे शोजलाही उपस्थिती नव्हती. सगळीकडे पुरुषच पुरुष पाहून पुरुष कंटाळले आणि ‘स्त्री बिन जीवन सूना सूना’ अशी त्यांची अवस्था झाली. पुरुष पार वैतागले, कंटाळले. दक्षिण ध्रुवावर तीन महिने एकट्याने काढणाऱ्या अमेरिकन जेम्स बायर्डने आपल्या ‘अलोन’ या पुस्तकात म्हटले आहे की, स्त्रियांमुळे जीवनात शान येते, जगण्याला एक प्रतिष्ठा प्राप्त होते. नाहीतर नुसते पुरुष हे खट्याळ, रांगडे व दुष्ट राहतील. —- कलंदर महाराष्ट्र टाईम्स, रविवार १५/४/२००१
६ सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई — ४०० ०५७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.