स्त्री-सुधारणेच्या वारशाचे–विस्मरण झालेला महाराष्ट्र

देशातील सर्वांत प्रगत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतीत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात गेल्या सहस्रकाच्या अखेरच्या वर्षात राज्यातील स्त्रियांची अवस्था फार शोचनीय असल्याचे आढळते. मुंबई महानगराला मागे टाकून नागपूर व अमरावती जिल्हे स्त्रियांवरील अत्याचारांबाबतीत पुढे आहेत. पुणे, नांदेड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातही या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सी. आय. डी.) नुकतीच ही आकडे-वारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत महिलांसंबंधी गुन्ह्यांची संख्या सुमारे तीन हजारांनी घटली. परंतु मुळातच हे प्रमाण भयावह आहे. यावर्षी दाखल झालेल्या १३,५८२ प्रकरणात प्रमुख गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे —-
दर आठवड्याला सुमारे २५ बलात्कार म्हणजे वर्षात १३०८ बलात्कारांना स्त्रियांना सामोरे जावे लागले. त्यात केवळ तरुणी आहेत असे नाही तर ६-८ वर्षाच्या मुलींपासून साठ वर्षापर्यंतच्या वृद्धांचाही त्यात समावेश आहे. विनयभंग २७९६, महिलांचे अपहरण ८७२, छेडछाड १११८, एकूण हुंडाबळी तर ३६२, हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न ५४, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकार १२०७ सासरच्या मंडळींकडून छळ ५६३१. नांदेडमध्ये सर्वाधिक महिला हुंडाबळी (२४) ठरल्या. त्या पाठोपाठ यवतमाळ (२२), बुलढाणा (२१), कोल्हापूर (२१) लातूर (१८) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. विवाहित महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकारांची गतवर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये अधिक नोंद झाली. नगर (७७), औरंगाबाद (७०), यवतमाळ (६०), पुणे (५०) येथेही असे गुन्हे अधिक संख्येने दाखल झाले. नव्या मुंबईत असे केवळ ५, तर मुंबई महानगरात ३० प्रकार घडल्याची नोंद आहे. भंडारा, गोंदिया, नंदूरबार प्रत्येकी ४, रायगड येथे ७, तर गडचिरोलीत असे ८ गुन्हे घडले.
विविध कारणांसाठी महिलांचे सर्वाधिक खून गतवर्षी नांदेड व सोलापूर जिल्ह्यांत झाले. सोलापूर जिल्ह्यात हे सर्व प्रकार ग्रामीण भागात घडले. विशेष म्हणजे शहरात मात्र असा एकही प्रकार घडल्याची नोंद नाही. औरंगाबादमध्ये १०, लातूर येथे ८, तर मुंबई व नवी मुंबई येथे एकूण ८ असे खून झाले. स्त्रियांविषयीच्या छेडछाडीची एकही तक्रार सातारा व नगर जिल्ह्यात दाखल झाली नाही. अकोला, परभणी, लातूर, हिंगोली (५) येथे एक-दोन प्रकार झाले. सिंधुदुर्ग, जालना, बीड व उस्मानाबाद येथेही असे प्रकार घडले. याउलट नागपूर व नांदेड जिल्ह्यात असे प्रकार सर्रास घडत असल्याचे दिसून येते. नागपूर जिल्ह्यात २४७ तर नांदेड जिल्ह्यात २३३ प्रकार घडले. गडचिरोली (१), पुणे (८०) व यवतमाळ (७२) या जिल्ह्यातही छेडछाडीचे अधिक प्रकार घडले. स्त्रियांविषयक गुन्हे अधिक प्रमाणात नोंदविले गेलेले पहिले पाच जिल्हे व गुन्हे कमी असलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी पुढीलप्रमाणे —-
स्त्रियांविषयक गुन्हे अधिक प्रमाणात गुन्हे नोंदविलेले कमी प्रमाणात गुन्हे नोंदविलेले जिल्हा गुन्हे जिल्हा गुन्हे
१. नागपूर सिंधुदुर्ग
२. अमरावती रायगड
३. मुंबई रत्नागिरी
४. पुणे नवी मुंबई
५. नांदेड नंदुरबार

महिलांवरच्या अत्याचार, बलात्कार, छेडछाड, आत्महत्येस प्रवृत्त करण्या-इतपत छळ अशासारख्या प्रकारातून नोंदविलेल्या गुन्ह्यांचा तपशील देण्यातून वाचकांना आत्मचिंतन नव्हे तर शोध व बोध घेता घेईल म्हणून हे नोंदले आहे. शिवाय गुन्हे घडलेले असूनही न नोंदविलेल्यांची संख्या तितकीच असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या आकड्यांच्या आधारे स्थूलमानाने जाणवलेले मुद्दे असे —- १. बलात्काराचे प्रकार वाढत आहेत. जळगाव वासनाकांडापाठोपाठ सातारा वासनाकांडामुळे समाज हादरून गेला आहे. कोठेवाडी येथील स्त्रियांची दरोडेखोरी करणाऱ्यांनी केलेली अब्रू-लूट व स्त्री-शरीराचा भोग अमानुषच. म्हणजे पैसा, सत्ता. याचा मोह तरी पुरुषांना पूर्वीपासूनच कमीजास्त प्रमाणात आहेच, पण आता बाटली व त्याबरोबर वासनातृप्तीसाठी ओरबडून घेण्यासाठी ‘बाई’ हवीच! ह्या विकृतीची झळ मोठ्या प्रमाणात स्त्रियांना पोहचते आहे.
२. प्रकर्षाने झालेला एकविसाव्या शतकातील बदल म्हणजे स्त्रियांची असुरक्षितता व अत्याचाराची भीती. ही मुंबईसारख्या शहरांमध्ये अधिक असते. लोकसंख्या प्रचंड, बकाल वस्त्या, झोपडपट्ट्या व एकूणच त्या शहराचा चेहरामोहरा पा चात्त्य संस्कृतीशी जुळणारा. गुन्हेगारीसह अनेक सामाजिक अनैतिकता, राजकीय भ्रष्टाचार, शेअरबाजारात घोटाळे, अवैध मालमत्ता, भूखंड प्रकरणे यांसारख्या अमानुष वेदनांनी वेदलेले हे शहर आहे. परंतु महिलांवरील अन्याय व अत्याचाराबाबत आता मुंबईपेक्षा नागपूर व अमरावती जिल्हे पुढे गेले. याचाच अर्थ महिलांचे शोषण, तेही शारीरिक स्तरावरचे, करण्याची मानसिकता मोठ्या शहरांकडून इतर शहरांकडे वळत आहे. ही प्रादेशिक बदलाची नोंद घेणे जरुरीचे आहे.
३. महत्त्वाची बाब म्हणजे नांदेडमध्ये हुंडाबळींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक झाली. अर्थात् ती पुढे बदलेलही. पण नांदेड, यवतमाळ, बुलढाला लातूर वगैरे भाग हा तसा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. सून ही ‘अर्थ’ मिळविण्याचा मार्ग, ‘छळ’ हे माध्यम व ते झाकण्यासाठी ‘बळी’ घेणे हा उपाय अशीच प्रवृत्ती यातून लक्षात येते. शहरांमध्येही हे प्रकार घडतात पण बळी घेण्यापर्यंत मजल पोचण्यापूर्वी जागृत व साक्षर पालकांचा सामाजिक दबाव, स्त्री संघटना कार्यकर्त्यांची भीती वगैरे कारणांनी आणि प्रसार माध्यमांमुळे सासुरवाशीणा बोलू लागल्याचा परिणाम म्हणूनही खून करण्याअगोदर लग्नविच्छेदन होते.
४. विविध कारणांसाठी सर्वाधिक खून नांदेड व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी १४ झाले. मात्र सोलापूर जिल्ह्यात हे सर्व प्रकार ग्रामीण भागात घडले. शहरात मात्र असा एकही प्रकार घडला नाही. म्हणजे महिला अत्याचाराचे लोण आता शहरांकडून ग्रामीण भागात पोचलेले जाणवते. एकत्र कुटुंबपद्धतीचा -हास, नीतिमत्तेच्या बदलत्या कल्पना, राजकारण व पुढाऱ्यांची वाढती संख्या, पैसा व चंगळवाद, कर्जाच्या सोयी, व्यसनाधीनता व चित्रपट, टी. व्ही. कार्यक्रमांमधील ‘सेक्स’, जे अतिरेकी, अमानुष व रंगीबेरंगी आकर्षक दाखविले जात आहे त्याचा पगडा, अब्रू इज्जत-खानदान याची भीती न बाळगणे व प्रतिष्ठेच्या कल्पनांमध्ये बदल वगैरे कारणांनी हे अत्याचर, खून, वासनाकांड, शहरांकडून ग्रामीणांकडे ‘शिफ्ट’ होत आहे.
५. पूर्वी श्रीमंत, सावकार, पुढारी, जमीनदार, पाटील अशासारख्या मंडळींच्या तारुण्यसुलभ वृत्तींकडून महिलांवर बळजबरी, भोग घेणे व्हायचे. शक्यतो बाई शोषण व शरीरक्लेश सोसायची, ते कुटुंबावर पुढे होणाऱ्या अत्याचाराच्या कल्पनेने. अगदीच नाही सोसले तर विहिरी जवळ करायच्या. खून करेपर्यंत वाट पहायची वेळच येऊ द्यायची नाही. ‘बाईची अब्रू–काचेचे भांडे’ अशी मानसिकता. चंगळवादी चैनी भोगवादी युगात ही वृत्ती मध्यमवर्गीय नव्हे तर झोपडपट्ट्या अन्य इतरही स्तरांमध्ये बोकाळत आहे ही चिंतेची बाब आहे. हे ‘झिरपणे’ फार घातक. आणि वेळीच रोखले नाही तर लागण अधिक होईल.
६. मनी पॉवर, मसल्स् पॉवर व मीडिया पॉवरचा वाढता प्रभाव व वापराबद्दलचा बेदरकारपणा यातूनच महिलांवरील अन्याय व अत्याचार वाढत आहेत. जसा जसा तो मुळातील छोट्या प्रवाहाच्या उगमस्थानापासूनचा प्रवास पुढे पुढे विस्तारित होत आहे तसा तसा तो परीघ वाढवत आहे. त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांची दिशा व तीव्रताही बदलत आहे.
महाराष्ट्रातील स्त्रियांवरील अत्याचाराची स्थिती व तीव्रता वाढत आहे. याचा अर्थ शिक्षण, सुबत्ता, विकास, स्त्रीसुरक्षिततेचे कायदे व त्यात सुधारणा-दुरुस्त्या, पोलिससंख्या व ठाण्यांमध्ये वाढ, माहिती तंत्रज्ञान यांच्या विस्ताराबरोबरच स्त्री-पुरुष समानतेचे बीज व वाढ खुरटते नि खुंटली जाते आहे असेच चित्र दिसते. महिला अत्याचार हा कायद्यांच्या आधारे संपणार नाही. गुन्हेगारांना शिक्षा, हे कायद्याने अंशतः शक्य आहे. पण ही पुरुषी वृत्ती रोखण्यासाठी त्याविरोधी सामाजिक चळवळ उभी रहायला हवी. स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांची साखळी व तळमळ हवी. त्यास बहुसंख्य जणांचा नैतिक व कृतिशील पाठिंबा हवा. स्त्रीसंघटना, कार्यकर्त्या या तुमचे काम करणाऱ्या कामवाल्या नाही किंवा ‘येथे मदत मिळेल’ अशी जाहिरातही करत नाहीत. संघटनेचे बळ हे आपल्यातूनच वाढत असते. नुसती ‘वाईट झाले, ठेचून काढायला हवे अशा नराधमांना’ असे उद्गार. पण ठेचून (वृत्तीवर प्रहार) काढण्यासाठी प्रत्येकीचा नसला (असावाच खरे तर) तरी शिकलेल्यांसह अनेकजणींचा व जणांचा रेटा हवाच ना! विद्यार्थी, युवती, गृहिणी वगैरेंचा सहभाग वाढवायला हवा. सामाजिक प्रदूषण शोषण ह्यांची जाण असणारे व कृती करण्यात हातभार लावणारे या हव्यात. नुसती शाब्दिक हळहळ व पाठिंबा नको. बऱ्याचदा बलात्कार, अत्याचार, छळ, आत्महत्या करण्यास भाग पाडणारी दुष्ट वृत्तीची मंडळी फार दूरची, अनोळखी असतातच असे नाही. बऱ्याचदा लांबचा मामा, आतेभाऊ, काका, पुतण्या, दीर व नवऱ्याचे मित्र, जवळपासचे परिचित यांच्याकडून हे प्रकार घडतात. काही अपवाद वगळता, बलात्कार, खून, शारीरिक छळणूक, मानसिक छळ हे अत्याचार करणारे अनोळखी व नवीन नसतात. गॅरेजवाला, मेडिकलवाला, फोटो स्टूडिओचा मालक, कामगार, नोकर, रिक्षावाला, पानपट्टीवाला, नातेवाईक, मित्र, अशासारख्या कित्येकांचा सहवास स्त्रियांना घडतो. सगळेच वाईट नजर व हेतू ठेवून वागतात असे नाही. अजूनही हीच मंडळी सज्जन व सहाय्य करणारी संख्येने अधिक आहेत.
पण जे अत्याचाराला उद्युक्त होतात त्यांनी पूर्वतयारी केलेली असते. काही पुरुषांच्या वर्तणुकी नक्कीच संशयास्पद असतात. अत्याचाराचे संकेत नजरेतून, बोलण्यातून, वर्तनातून पुरुषांकडून निसटते का होईना, जाणवतात, तेही स्त्रियांनाच, खरे तर. या संकेतांची डोळसपणे व वेळीच (विलंब नकोच) दखल घेऊन, डोके सजग ठेवून अर्थ लावणे, सावरणे, प्रसंगी खुलेपणाने कुटुंबात बोलून मार्ग काढणे, पोलिसांची मदत घेणे जरुरीचे आहे.
खाजगी माहिती उदा. वास्तव्याचे ठिकाण, घरातली माणसे, पेशा, फोन नंबर अशासारखी माहिती विचारणाऱ्यांचा हेतू पाहावा. शक्यतो ती अगदी न देणेच इष्ट. लक्ष्मणरेषा पाळायलाच हव्यात–धूर्तपणाने. कारण संकटात टाकणारे ते खुलेपण पुरुष भिन्नलिंगी म्हणून टाळण्याचीही गरज नाही. स्वतःला कडी-कोयंड्यात बंद करून घेणे आता अपंगत्व वगळता कोणत्याही स्त्रीला शक्य नाही व आवश्यकही नाही. पण सुरुवातीला गंमत, मजा नाविन्य ओढ म्हणून तरुणीही प्रतिसाद देतात. काही विवाहितांचे कळत-नकळत तसे वर्तन घडते. नाती शाबूत राहण्यासाठी शब्दांपेक्षा त्यामागील हेतू व हितसंबंध ओळखण्याची आजच्या काळात अपरिहार्यता आहे.
शारीरिक-मानसिक नाजुकपणा, भित्रेपणा, भोळेपणा, परावलंबित्व या ‘पारंपारिक’ स्त्रीत्वाला डोळसपणे फेकून द्यायला हवे. शारीरिक ताकद, मनाचा घट्टपणा, रग, निर्णयशक्ती, नकाराचे सामर्थ्य, आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहणे, भावनशीलतेवर मात, अशांसारखे गुण जाणीवपूर्वक अंगात आणण्याचा प्रयत्न स्त्रियांनी करायला हवा. बळी पडण्याची प्रवृत्ती तर टाळायलाच हवी. शॉर्ट कट मेथडस् व बेनिफिटस् तर त्याज्यच मानायला हव्यात. (नोकरी, परीक्षेत गुण वाढविणे, यश, टी. व्ही. व सिनेमात काम अशासारख्या आमिषांना बळी पडताच कामा नये.)
श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी, जि. कोल्हापूर — ४१६ २०९

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.