“शास्त्र” म्हणे!

[“वैज्ञानिकांनी संस्कृत शिकायलाच हवे : जोशी’ ह्या मथळ्याने दिलीप पाडगावकरांनी घेतलेली मुरली मनोहर जोशींची मुलाखत टाईम्स ऑफ इंडियाच्या १५ एप्रिल २००१ च्या पहिल्या पानावर प्रकाशित झाली. तिचे हे भाषांतर.]
इतर कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा मुरली मनोहर जोशींवर सेक्युलर विचारवंत खार खाऊन असतात. धोतर, उपरणे, गंध, शेंडी, सगळेच त्यांना चिरडीस आणते. जोशींचा देशाच्या शिक्षणव्यवस्थेवर आणि संशोधनसंस्थांवर भगवा कार्यक्रम लादण्यातला निर्धार तर त्यांना सर्वांत जास्त खुपतो. मुमजो प्रचारक किंवा पोथीचे भाष्यकार म्हणून बोलत नाहीत, तर विचारवंत आणि त्यातही वैज्ञानिक या नात्याने बोलतात. डावे आणि उदारमतवादी विचारवंत जे संकल्पनांचे क्षेत्र आपली मिरास असल्याचे मानतात, त्यातच मुमजोंना स्वतःचे कुरुक्षेत्र दिसते. नव्या पाठ्यपुस्तकांमुळे लोकांनी घाबरू नये, असे प्रतिपादणाऱ्या त्यांच्या मुलाखतीतले हे उतारे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने फलज्योतिषशास्त्र विद्यापीठीय अभ्यासक्रमात घेण्याबद्दल : नवे अभ्यासक्रम सुचवणे हे आयोगाचे काम आहे. मी त्यांना ह्या निर्णयाबद्दल विचारले. ते म्हणतात की ह्या विषयाला खूप मागणी आहे, आणि २४-२५ विद्यापीठे हा अभ्यासक्रम मागत आहेत. प्रत्येक वृत्तपत्र ह्या विषयावरचा एक ‘स्तंभ’ चालवते. लोक तो वाचतात. म्हणून सुशिक्षित लोकांना तो विषय समजून घ्यायला हवा.
संस्कृतच्या अभ्यासावरील वाढत्या भराबद्दल : संस्कृत अत्यंत नेमकेपणाने व्यक्त करता येते. त्या भाषेचे साहित्य अनेक क्षेत्रे व्यापते, सामाजिक जाणिवेच्या (consciousness) महत्त्वाबद्दल (वगैरे). संस्कृतच्या विद्वानांनी आधुनिक विज्ञान जास्त प्रमाणात समजून घ्यायला हवे. आणि वैज्ञानिकांनी संस्कृत साहित्य जास्त प्रमाणात अभ्यासायला हवे. संशोधनाचे आघाडीचे क्षेत्र जाणिवेचे आहे. म्हणून मी वेगवेगळ्या संशोधन-प्रवाहांमधून वेगवेगळ्या क्षेत्रांचा एकत्रित अभ्यास (inter-disciplinary research) करण्यावर भर देतो.
शाळांच्या अभ्यासक्रमांमधून कोणत्या प्रकारचा सेक्युलॅरिझम प्रसृत होईल याबद्दलचे त्यांचे मत : नवी पाठ्यपुस्तके पाहिल्यावर (ह्या बाबतीतल्या) लोकांच्या काळज्या मिटतील. आपल्या विद्यार्थ्यांनी सर्व धर्मांना समजून घेऊन त्यांचा आदर करायला हवा. भारतात अनेक धर्म अनेक शतके अस्तित्वात आहेत. ते (धर्म) समजून घेतले जावेत.
भारतीय संस्कृतीत इस्लामच्या स्थानाबद्दल : संस्कृती ‘चल’ असते. शरीर जसे वाढते तसे संस्कृती काही अंगे टिकवून धरते. ती ताकद, शहाणपण आणि अनुभव कमावते. तुम्हाला संगीताच्या क्षेत्रात हे दिसते. अनेक राग बाहेरून आलेल्या लोकांनकडून अनेक संगीतातले प्रवाह प्राचीन भारतीय संगीतात गुंफले जाऊन घडले आहेत. गझल ही सुद्धा भारतीय आणि इस्लामिक देवापर्यंत पोचण्याच्या प्रयत्नांच्या विचित्र मिश्रणासारखी आहे.
मुमजो यज्ञ आणि हवने करतात, ‘दैवी’ स्त्री पुरुषांचे पाय धुतात. त्यांना स्वत:बद्दल लोकांना काय वाटून हवे आहे, याबद्दल : भारतीय अध्यात्माबद्दल आदर असलेला, आधुनिक विज्ञानाचे कौतुक करणारा, ह्या दोन क्षेत्रांनी एकत्र व्हावे म्हणून झटणारा एक भारतीय नागरिक, अशी माझी प्रतिमा असावी. ह्या दोन्ही ‘वाटा’ एकाच सत्याचा पाठपुरावा करतात, त्यामुळे शेवटी त्या एक होतीलच. दोन्ही क्षेत्रे एकच मूळ प्र न विचारतात, की माझे या विश्वात असण्याचे उद्दिष्ट (aim) काय? मी कसा उद्भवलो? का? आज विज्ञानही हे प्र न विचारत आहे.
[१. वृत्तपत्रांमध्ये भविष्यकथनाचे ‘स्तंभ’ असतात. यावस्न २४-२५ विद्यापीठांना फलज्योतिषशास्त्राचे महत्त्व पटले. तो अभ्यासविषय होण्याची निकड अनुदान आयोगाला पटली. आणि हे सारे घडल्यावर मुमजोंनी आयोगाला ‘विचारले’! नाही, काळजी करण्यासारखी परिस्थिती आहेच. मुमजो जो “तटस्थपणे पाहून नंतर मी विचारले’ असा आव आणतात, तो खोटारडेपणाच आहे.
२. “संस्कृत अत्यंत नेमकेपणाने व्यक्त करता येते” हे बिनचूक भाषांतर एका निरर्थक वाक्याला जन्म देत GTÈ (Sanskrit can be expressed in a very precise manner). पण मुमजोंना विचारी-वैज्ञानिक असल्याचा आवच फक्त आणायचा आहे. ते inter-disciplinary वगैरे शब्दांचा धुरळा त्यासाठीच तर उडवीत आहेत.
३. पाठ्यपुस्तकांमध्ये काळजीचे कारण नाही, अशा मंत्र्याच्या सूचनेने कोणता भारतीय ‘आश्वस्त’ होईल? उत्तर प्रदेशाने कबीर बाद केले, पूना करारातून आंबेडकरांना वगळले. राजा, वैयची रात्र आहे, जागा राहा!
४. इस्लामने भारताला गझल आणि मूठभर रागच दिले? मुमजो इस्लामिक आणि भारतीय यांना पूर्ण वेगवेगळे मानतात, आणि वर मुसलमानांना राष्ट्रप्रेम कसे नाही यावर ऊर बडवतात!
५. विज्ञान मूळ (basic) प्र नांनाही थेटपणे भिडत नाही, आणि अंतिम सत्यालाही. त्याच्या शिस्तीत खात्रीलायक, पुनरावृत्त करता येणारे प्रायोगिक ज्ञान आणि त्यावर बेतलेली भाकिते आणि तंत्रे, एवढेच काय ते येते. मूळ (आणि अंतिमही!) प्र नांबद्दल काही संकेत विज्ञानातून मिळतात, हे मुळातच विवाद्य आहे. पण मुमजोंना भौतिकीत पीएचडी आहे! अशा ‘ढाई आखर ग्यानका’ वर भारतीय फार विश्वास ठेवत नाहीत.
६. आणि पाडगावकरही कल्पनांच्या क्षेत्रात मुमजोंना ‘घाबरणाऱ्यांच्या’ यादीत डाव्या आणि उदारमतवादी विचारवंतांचे नाव घेतात —- स्वतःचे नाही. एखादे वेळी स्वतःचे नाव घेतले तर टाईम्समधल्या भविष्यकथनाच्या ‘स्तंभां’ची सत्यासत्यता तपासायची जबाबदारी आपल्यावर येईल, अशी धास्त मनात असावी! पण! न धास्तावलेले वैज्ञानिक आणि विचारवंत आहेत! २२ एप्रिल २००१ च्या महाराष्ट्र टाईम्समधील बातमीचा हा भाग पहा —-]
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून फलज्योतिषशास्त्र या विषयाचा भारतातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समावेश केला जावा, अशा स्वरूपाचे परिपत्रक विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देशभरातील विद्यापीठांना पाठविण्यात आले असले तरी मुंबई विद्यापीठाने हा अभ्यासक्रम अशास्त्रीय असल्याचे सांगून त्यास विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.
भारतात वैदिक फलज्योतिषातील विज्ञानाचे पुनरुज्जीवन होण्याची तातडीची आवश्यकता असल्याने देशातील सर्व विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. अशा स्वरूपाच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयाला विविध मान्यवरांनी विरोध दर्शविला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ज्योतिषशास्त्राला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे सांगून मुंबई विद्यापीठात या अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार नाही. असे स्पष्ट केले. एकविसाव्या शतकात प्रवेश करताना ज्योतिषशास्त्रासारखा अशास्त्रीय विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून एकूणच वैज्ञानिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनाला खीळ घालण्याचाच हा प्रकार आहे, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी, मध्ययुगात घेऊन जाणारा निर्णय अशी आयोगाच्या निर्णयाची संभावना केली आहे. अनेक निरीक्षणांमधून आणि प्रयोगांतून फलज्योतिषशास्त्र हे विज्ञान नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ते म्हणाले. या अभ्यासक्रमाचा समावेश करावा की नाही याचा प्रत्येकाने सुज्ञपणे विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहेच; पण आपली नाराजी कळविणारे पत्र त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगालाही पाठविले आहे.
तर ‘ज्योतिषशास्त्र शिकविणे हे विद्यापीठांचे काम नाही. शास्त्रीय कसोट्यांवर ज्योतिषशास्त्र टिकत नाही’, असे मत प्रसिद्ध खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले आहे. आज या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश झाला तर उद्या मंत्रशास्त्र, धर्मशास्त्र या विषयांचा समावेश करण्याची मागणीही केली जाईल असे सांगून आयोगाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी श्री. सोमण यांनी केली.
दरम्यान, देशभरातील अग्रणी विज्ञान संस्थांतील शंभरपेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. हरी गौतम यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पत्रक काढले असून मुंबईतील आय. आय. टी. या संस्थेतील शास्त्रज्ञांचाही यात समावेश आहे. ‘नोबेल पारितोषिक विजेते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांनी ज्योतिषशास्त्राला ‘विज्ञान’ म्हणून मान्यता दिली होती, असे विधान प्रा. गौतम यांनी केले होते तसेच ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या आयोगाचे समर्थनही केले आहे.
पुस्तक परिचय : “सीता जोस्यम्” (लेखक : नाला वेंकटेश्वरराव, अनुवाद : नलिनी साधले)
चास्ता नानिवडेकर

रामायण आणि महाभारत ह्या ग्रंथांचे भारतीय मानसातले स्थान असामान्य असे आहे. ह्या ग्रंथांचे नायक राम व कृष्ण हे प्रत्यक्ष भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. रामायण, महाभारत हे केवळ धार्मिक ग्रंथ आहेत किंवा त्यांना काही ऐतिहासिक आधार आहे ह्याबद्दल सामान्य भाविकाच्या मनात काही संभ्रम नसला तरी त्यांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांमध्ये मात्र एकमत नाही.
श्री नाला वेंकटेश्वरराव हे तेलुगुभाषी विद्वान अभ्यासक. रामायण हा त्यांच्या खास जिव्हाळ्याचा विषय असून त्याचा विशेष अभ्यास त्यांनी केलेला आहे. अत्यंत परखड मतप्रदर्शन, कठोर बुद्धिवादी विचारसरणी आणि परिश्रमपूर्वक केलेला अभ्यास ह्यांतून त्यांनी रामायणाबाबत काही ठाम मते बनविली आहेत. ‘जाबाली’ आणि ‘सीता– जोस्यम्’ अशी दोन नाटके लिहून त्यांत त्यांनी आपल्या मतांचा विस्तार केला. त्या दोन्ही नाटकांत नाट्यसंहितेपेक्षा प्रस्तावनाच जास्त दीर्घ आहेत. आपल्या मतांचा केवळ नाट्यवस्तूंतून आविष्कार करून त्यांचे समाधान झाले नाही. विस्तृत प्रस्तावनांमधून स्वतःच्या मतांचा पुरस्कार आणि विरोधकांचे खंडन त्यांनी आवेशाने केलेले आहे.
सीताजोस्यम् म्हणजे सीतेने वर्तविलेले भाकीत हे नाटक केवळ बावन्न पानांचे आहे तर त्याची प्रस्तावना एकशे एकोणतीस पानांची! प्रस्तावनेत भारताच्या प्राचीन इतिहासाचा वेध नार्ला रामायणाच्या संदर्भात घेतात. त्याच्या मते राम हे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असले तरी रामायणाला पूर्णतः इतिहासाचा आधार नाही. वाल्मीकिरामायणात मागाहून प्रक्षिप्त केलेला (घुसडलेला) भाग बऱ्याच प्रमाणात आहे. रामायणातील राम-रावण संघर्ष म्हणजे अन्नसंकलक संस्कृतीचा अन्नोत्पादक संस्कृतीशी झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे. त्यामधील तपस्वी आणि ऋषिमुनी ह्यांचे यज्ञयाग म्हणजे दंडकारण्यामध्ये कृषि–संस्कृतीचा प्रसार करणे व त्यासाठी ती अरण्ये जाळणे हे आहे. ह्या अरण्यातील फळे मुळे व प्राणी ह्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासींचा त्याला विरोध झाला तेव्हा त्यांना ‘राक्षस’ ही संज्ञा मिळाली. ते दुष्ट प्रवृत्तीचे ठरले. यज्ञयागासारख्या पवित्र आध्यात्मिक कार्यात व्यत्यय आणणारे म्हणून ते नाशास पात्र ठरले. ह्या आदिवासींचा संहार करून ऋषींच्या कार्यात मदत करणे हे ईक्ष्वाकुकुलोत्पन्न रामाचे कर्तव्यच ठरते. वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहता आदिवासींचा वंशच्छेद ह्याला सत्कर्म म्हणता येणार नाही. अमेरिकेवर कब्जा करताना त्या भूमीवर बाहेरून आलेल्या युरोपीय लोकांनी तेथील आदिवासी रेड इंडियन्सचे शिरकाण केले. त्या आक्रमकांजवळ बंदुकी होत्या म्हणून ते संपूर्णतः यशस्वी झाले. या जेते-गणांच्या कथा शौर्यगाथा म्हणून प्रसिद्ध झाल्या. राम आदि आर्यांजवळ धनुष्यबाण होते. त्या बळावर त्यांनी अनार्य आदिवासींना दंडकारण्यातून हटवून तेथे कृषिसंस्कृती आणि नागरता स्थापन केली, अशा प्रकारचे रामायणाचे विवेचन नार्ला करतात. ह्या लहानशा नाटकाची पार्श्वभूमी अशी आहे.
नाटकात राम सीता व लक्ष्मण ह्यांच्या दंडकारण्यातील प्रवेशारंभीचा काळ आहे. सीता अगदी कोवळ्या वयाची —– सोळा सतराची —- आहे. परंतु सीता केवळ सहृदयच नव्हे तर बुद्धिमान, प्रखर विचारशक्ती असलेली आणि स्पष्टवक्ती आहे. तिचे रामावर प्रेम आहे. पण रामाचे दोष, त्याच्या त्रुटी आणि त्याच्या कार्यातील अनैतिकता तिला पूर्णपणे जाणवतो. निःसंदिग्ध शब्दांमध्ये ती तसे त्याला सांगते. दंडकारण्यातल्या ऋषींनी शब्दांचे मोहजाल रचून रामाला त्यात गोवले आहे हे ती ओळखते. रामालाही वचनपालनाची धुंदी चढते. ऋषींच्या सांगण्यावरून तो दंड कारण्यातील आदिवासींचा नाश करण्यास प्रवृत्त होतो. तेथील ऋषी रामाला आपला नैतिक राजा मानतात. ही प्रतिष्ठा जपणे रामाला आपले आद्य कर्तव्य वाटू लागते. सीतेचे काहीही ऐकून घ्यायला राम तयार होत नाही. उलट कर्तव्यपूर्तीची भावना ही त्याच्या पत्नीप्रेमापेक्षा जास्त प्रबल असल्याचे तो स्पष्ट शब्दांत सांगतो. इथे सीतेला रामाच्या मनाचा तळ आरपार दिसतो. आणि आपले भवितव्य लख्खपणे तिच्या नजरेसमोर उभे राहते. स्वतःच्या कीर्तिरक्षणासाठी राम एक दिवस आपल्याला दयनीय, असहाय अवस्थेत सोडून देणार असे भाकीत ती करते.
एवढीच नाटकाची कथावस्तू आहे. पण शोषक आणि शोषित त्यांचा इतिहासच जणू त्यात बंदिस्त झालेला आहे. दुबळ्यांचे शोषण करताना स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला गप्प बसवण्यासाठी त्या कार्याला धार्मिक आणि नैतिक चौकट द्यायची आणि शोषितांसाठी नवे आदर्श निर्माण करून त्यांच्या शोषणाला उदात्त स्प द्यायचे, ही वैश्विक क्लृप्ती यशस्वीपणे वापरून भारतीय आदर्शाची परिमाणे तयार झाली. सीतेचे पतिव्रत्य व भारतीय संस्कृतीचा मानबिंदू ठरला; आणि समस्त स्त्रीजातीच्या खांद्यावर त्या आदर्शाचे जोखड देऊन त्यांचे अधिकृतरित्या शोषण करायला पुरुष मोकळा झाला.
भारतीय स्त्रीत्वाच्या पुढे शतकानुशतके येणाऱ्या भवितव्याचे हे भाकीत सीता करते. वंशाभिमानी रामाची मानसिकता, लक्ष्मणाची अंधभक्ती, आदरणीय, पूजनीय’ अशा कावेबाज ऋषींचे वर्तन त्या सर्वांचे कोवळ्या सीतेला जे दर्शन घडते त्यातून तिला द्रष्टेपण प्राप्त होते. राम एक दिवस तिचा त्याग करणार, तिच्या प्रेमाची कदर होणार नाही हे तिला कळून चुकते आणि कळवळून ती हे, भाकीत उच्चारते त्यावेळी तिला गरज असते सहृदय आश्वासनाची. हे रामाच्या गावीही नसते. स्वतःची कीर्ती आणि कुलाचे श्रेष्ठत्व ह्यांचाच विचार करणारा राम सीतेपुढे थिटा पडतो. सीतेच्या भाकितावर आपल्या वर्तनाने तो शिक्कामोर्तब करतो.
नालांचे हे नाटक दोन लहान अंकांत बांधलेले आहे. केवळ पाच पात्रे ह्यात आहेत. व घटना थोड्याच आहेत. संवाद नाटकाचा प्राण आहेत. ते अत्यंत प्रत्ययकारी आहेत. नाटकाची कथावस्तू अल्प असली तरी अतिशय विस्फोटक व विचार करायला लावणारी आहे. भारतीय मानसिकतेत पूर्णतः भिनले गेलेले मानदंड, श्रद्धा, त्यांना हादरा देणारी अशी ही संहिता आहे. भारतीय आचारांची आणि विचारांची पायाभूत असणारी आदर्शाची कल्पना, आणि धार्मिकता ह्या चौकटी पार उद्ध्वस्त कस्न विचारवंतांच्या मनाला प्रक्षुब्ध करणारी आहे. आपली सनातन पारंपारिक मूल्ये पुन्हा एकदा निःपक्षपातीपणाने तपासण्याची गरज निर्माण करणे हा नाल्चा उद्देश ह्या नाटकातून प्रकट होतो.
वैचारिक अंधत्व आणि मूर्ख श्रद्धाळूपणा ह्यावर आपल्या प्रास्तविकातही नार्ला कडाडून आसूड ओढतात. भारतीय मनांचा श्रद्धाळू कोपरा रामायण, आणि त्यांची आदर्शस्थाने—-राम, सीता, मुनिगण ह्या साऱ्यांची फेरतपासणी नार्ला करतात आणि योग्य ते माप बिनदिक्तपणे ते ज्याच्या त्याच्या पदरात घालतात. राम हा त्यांच्या दृष्टीने आदर्श अवतारी पुरुष तर नाहीच नाही. सीता मात्र त्यांना निर्विवादपणे श्रेष्ठ वाटते. सहृदयता, विचारांची स्पष्टता, बुद्धिमत्ता आणि द्रष्टेपणा ह्या सर्व गुणांमुळे ती आत्मकेंद्रित रामाच्या तुलनेत एकदम उंचीवर जाते.
आपल्या ह्या चरित्रचित्रणासाठी नार्ला वाल्मीकि–रामायणाचा आधार घेतात. त्यातली सीता थट्टेखोर, परिहास करणारी अशी आहे. तशीच सीता नार्ला उभी करतात. नाटकातले सीतेचे संवाद उपरोधिक विनोदाचे नमुने आहेत. अश्राप वनवासींची हत्या करणे हे पाप आहे असे वाल्मीकीची सीताही प्रतिपादन करते, हे ते सोदाहरण पटवून देतात. तेव्हा त्यांचे हे नाटक पूर्णतः काल्पनिक नाही. ते मूळ संहितेशी प्रामाणिक आहे. फक्त त्याच घटनांकडे पाहण्याचा नालाचा दृष्टिकोण वेगळा आहे. एकच घटना जित आणि जेते ह्यांच्यासाठी वेगळे रूप धारण करते. त्यांचे विवेचन वेगळे असू शकते. हा प्रकाश पडल्यावर त्याच घटना वेगळ्या अंगाने उजळून निघतात. इतिहासाचे खरे परिशीलन जितांच्या आणि जेत्यांच्या दृष्टिकोणांच्या एकत्रित अभ्यासाशिवाय होणे शक्य नाही.
ह्या नाटकाची प्रायोगिकता कितपत आहे हे मात्र सांगणे कठीणच. नाटक फारच लहानसे आहे. घटनाही फारच अल्प आहेत. केवळ विचारप्रवृत्त करणारे संवाद आणि सीतेचे विनोदी संभाषण ह्यामुळे नाटकाचा प्रयोग यशस्वीपणे करता येईल की नाही हे सांगता येणार नाही. शिवाय प्रस्तावना कळल्याशिवाय नाटकाचे पूर्ण आकलन होत नाही. नाटकाइतकीच प्रस्तावनाही महत्त्वाची आहे. नाटक पाहण्यापेक्षा वाचण्यातच त्याचे यश आहे. नार्थ्यांचे सर्व मुद्दे पटण्यासारखे नसले तरी ते विचारांना नवी दिशा देणारे, ठोस असे आहेत ह्याबद्दल दुमत होणार नाही. विचारप्रवृत्त करणारे हे नाटक मनाला उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देते ह्यात शंका नाही.
वैशाली अपार्टमेंटस्, टिळक नगर, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.