चौथ्या क्रांतीचे शिल्पकार नररत्न मुरली मनोहर जोशी!

युगायुगाच्या अंधकारानंतर भारतवर्ष पुन्हा एकवार सूर्यासमान तळपणार! देशात दुधाची गंगा वाहणार! अन्नधान्य, फळफळावळांची रेलचेल असेल. समस्त जनता धष्टपुष्ट आणि सुखी समाधानी असणार. रोगराईची निशाणी उरणार नाही. डॉक्टर मंडळी इतर क्षेत्रांत कौशल्याचा ठसा उमटवतील. चौसष्ट कलांमधून आपलाच ध्वज दिसेल. ऑलिंपिकची सगळी सुवर्ण पदके आपल्यासाठीच असतील. बकाल सिलिकॉनच्या व्हॅलीत स्मशान शांतता आणि ऐश्वर्याने नटलेल्या गंगेच्या खोऱ्यात जाल तेथे सोन्याचा धूर दिसेल. कुबेराला लाजवणारी आपली समृद्धी पाहून जगातले शास्त्रज्ञ, विद्वान रोजगारासाठी आपल्याकडे याचना करतील. अमेरिका, जपानमधील भारतीय दूतावासाबाहेर रांगा लागतील. ते पाहून एकेकाळची धनाढ्य राष्ट्र मनात जळफळाट करून घेतील. पण महासत्तेपुढे त्यांचे तरी काय चालणार? दुबळ्या अमेरिकेची ऐपत संपल्याने ‘पाकडे’ शरण येतील. संपूर्ण पृथ्वीवर फक्त भारताची पताका असेल. आणि हे पाहून तिन्ही लोक आनंदाने भस्न रॅप गातील. स्वर्गातून ऑर्किडची वृष्टी होईल. असा भारत घडवण्याची नील प्रत आता तयार झाली आहे. त्यामुळे थोडी कळ काढा. अशा मंगल प्रसंगी तात्कालिक व क्षुद्र प्र नांबद्दल वाफ दवडणे हा शुद्ध कर्मदरिद्रीपणा! आता भारतापुढे कसल्याही समस्या म्हणून नावाला उरल्या नाहीत, अशी खूणगाठ बांधून मन्वंतर घडवण्याच्या नवोन्मेषी कारसेवेत सहभागी व्हा. नवभूमी दाखवण्यासाठी सज्ज आहेत आपले केंद्रीय मनुष्यबळ मंत्री व भौतिकशास्त्राचे माजी प्राध्यापक माननीय श्री. मुरली मनोहर जोशी!
मोहनदास करमचंद गांधी, जवाहर नेहरूच काय विनायक सावरकरांनासुद्धा आजपर्यंत भारताच्या मागासपणाचे रहस्य उलगडले नव्हते. तंत्रज्ञान जुने म्हणून उद्योग व शेतीचे उत्पादन अपुरे असल्याचे कुणी सांगायचे. काहींना वर्णव्यवस्थेमुळे शतखंड समाज हाच दोष वाटायचा. जो तो सात आंधळ्यांप्रमाणे भारतीय हत्तीचा अंदाज लावायचा. कुठलीही घटना वा कार्य असो त्याच्या यशापयशाचे विधिलिखित आधीच तयार असते. मुहूर्त हाच एक आणि एकमेव इलाज अयशस्वितेला दूर ठेवू शकतो. ह्या त्रिकालाबाधित सत्याच्या प्रकाशात इतिहासाकडे नजर टाका, मग समजेल. आक्रमकांना शस्त्रास्त्रांची, तोफगोळ्यांची फिकीर नव्हती. शकुन, कौल, मुहूर्ताच्या भारतीय (यापुढे हिंदू समजावे) परंपरांचा मात्र परकीयांना धाक होता. भारतावर राज्य करणाऱ्या यच्चयावत परकीयांनी काही देशी विद्वानांना आश्रय दिला होता तो समाज वा भूगोल समजून घेण्यासाठी नाही. शक-कुशाण-हूण-मोगलांनी व पुढे ब्रिटिशांनी काशीच्या ज्योतिर्भास्करांपुढे प्र नकुंडली मांडून, आपापल्या आगमनांची घटिका निचित केली होती. शुभकार्याच्या प्रसंगी पाऊलसुद्धा टाकताना मुहूर्त चुकवू नये या नियमाचे चोख पालन केल्याचे फळ त्यांना मिळाले. हिंदूंनी घेतलेला वसा टाकून दिला. या पापाचे फळ आपण पिढ्यानपिढ्या भोगत आहोत. हे ऐतिहासिक भान कुणालाही नव्हते. वैदिक काळातील ज्योतिष्यविद्येचा जीर्णोद्धार करण्याची गगनभेदी गर्जना जोशींनी केली आहे.
भारतातील उच्चशिक्षणाची दशा आणि दिशा ठरवणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाने आज्ञापत्रे धाडली आहेत. त्यातून वेदशास्त्रसंपन्न मुरली मनोहर जोशी यांच्या प्रज्ञेचे काही पैलू समोर येतात. “मानवी जीवन व विश्वातील घटनांचे आकलन करून देणारे वैदिक ज्योतिष्यशास्त्र हे आपल्या महान परंपरेची आणि अभिजात ज्ञानाची एक अनमोल ठेव आहे. काळाची पावले ओळखण्यास ही ज्ञानशाखा उपयोगी ठरते. काळाचे गुणधर्म, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम ध्यानात येतो. त्यामुळे काळाचा उत्तम उपयोग करून घेता येतो.’ केवळ हिंदू वा भारतीयांपुरते हे मर्यादित नाही. विश्वातील मानवकल्याणाची आकांक्षा घेण्याच्या ध्येयाने विद्यापीठ अनुदान आयोग प्रेरित झाला आहे. सांप्रत प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या विवंचनेने ग्रासला आहे. काळजी, भीती, धास्ती ही भविष्याची असते. त्या भविष्याच्या गर्भाचा वेध घेताना ज्योतिष्यशास्त्र मार्गदर्शक ठरू शकते. अदृष्टाचे दर्शन होते. काळाशी सामना करायला बळ येते. “पुढील क्रमिक वर्षापासून विद्यापीठांमधून ज्योतिष्यशास्त्राची पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचा श्रीगणेशा होईल. त्यातून ज्योतिष्यशास्त्राच्याच नव्हे तर हिंदु-गणित, वास्तुशास्त्र, शेतीविज्ञान, अंतराळ विज्ञान इत्यादीच्या संशोधनास वेगळी दिशा मिळेल, अशी खात्री विद्यापीठ अनुदान आयोगाला वाटत आहे.”
वैदिक ज्योतिष्यशास्त्राएवढे समर्थ विज्ञान अस्तित्वात नाही, ही बाब आता जगाला समजू लागेल. तोवर ज्योतिष्यविज्ञान आणि ज्योतिष्य तंत्रज्ञानातील मार्तंड व भूषण भारताला अग्रेसर करून ठेवतील. फार नाही तीन वर्षांत भारतीय विद्यापीठातील ज्योतिष्यशास्त्री जगात दुमदुमतील. माहिती तंत्रज्ञान(आय टी) व जैविक तंत्रज्ञानाचा (बी. टी) डंका न वाजता ज्योतिष्यविज्ञानाचे पडघम सर्वत्र वाजतील. ज्योतिष्यशास्त्राच्या सॉफ्ट वेअरला अतोनात मागणी आल्याने देशाच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन ए.टी. (अॅस्ट्रॉलॉजिकल टेक्नॉलॉजी) हेच असणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. क्षेत्र कोठलेही असो जिथे माणूस तिथे ज्योतिष्यशास्त्राचा आडाखा आलाच. यावरून रोजगाराच्या संधी किती उपलब्ध होतील याचा अंदाज लावता येतो. पाऊस कधी, किती, कुठे पडणार हे सांगायला वेधशाळा नकोच. एक ज्योतिर्भास्कर, दोन होराभूषण व चार शिकाऊ उमेदवार पुरेत. संरक्षण, अवकाश संशोधन, आरोग्य, शिक्षण, कायदा व सुव्यस्था अशा सर्वव्यापी क्षेत्रात ज्योतिष्याच्या भाष्यकारांची निकड भासेल.
एके काळी गावात गुबगुबी वाजवून नंदीबैलाकडून होरा ऐकवणाऱ्या तिरमलांना बक्षिसी खास द्यावी लागायची. कुडमुडे वाजवून जोशी दारात येत असे. मेंढीगे अर्थात ठोकेजोशी शेतात जाऊन ग्रहांची दशा, शुभाशुभ सांगत. चिमुकल्या पिंजऱ्यातील पोपटाकडून भविष्य सांगणारे दारोदार हिंडत. आता या समस्त सल्लागारांना स्थैर्य येईल. त्यांच्या विद्येची खरी कदर होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोककलेला नावाजले जातेच. या लोकवैज्ञानिकांनाही सन्मान लाभेल. अशा रीतीने गावापासून साता समुद्रापलिकडे भविष्यवेत्त्यांची कीर्ती पसरेल आणि ते भारताला बलसागर करतील. साठा उत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल. याबाबत जिवाला घोर असण्याचे कारण नाही. तरी ऐकायला येते की काही नतद्रष्ट उगीच शंका व्यक्त करून अपशकुन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी नाही हे सिद्ध झाल्यावर ज्योतिष्यशास्त्राचा पायाच ढासळतो असे कुणी स्टीफन हॉकिंग म्हणतात. ग्रहणाचे कारण समजल्यावर चंद्राला व सूर्याला गिळणाऱ्या ह्या राहू व केतू नामे काल्पनिक ग्रहांचे काय? जन्माची अचूक वेळ सांगता येते का? असे कुत्सित प्र न उपस्थित केले जातात. अमेरिकेतील वैज्ञानिक नियतकालिकाने तर जन्मपत्रिका घेऊन सर्वेक्षण केले आणि ज्योतिष्याचार्यांनी व्यक्त केलेले आडाखे साफ चुकल्याचे जाहीर केले. इतकेच काय, भविष्य जाणून घेणारे मनोदुर्बल असतात. ज्योतिष्याकडे जाण्याऐवजी त्यांनी मनोविकारतज्ज्ञांकडे जावे असा उपदेश स्वामी विवेकानंदांनी केल्याचा दाखला काही देतात. कुणी ह्याला भ्रामक विज्ञान असल्याची दूषणे देतात. त्या वितंडवादात जाण्यात अर्थ नाही. त्याने उदात्त कामात बाधा येते. चुका दाखवायच्या म्हटल्या तर जगच दोषांनी भरलेले भासते. ते काही काळ बाजूला ठेवा. नररत्न मुरली मनोहर जोशींनी फलज्योतिषशास्त्राच्या ब्रह्मास्त्राने विश्व पादाक्रांत करायची मोहीम हाती घेतली आहे. तिच्यात सामील होऊन ‘विश्वात शोभुनी राहू.’

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.