खादी (भाग ३)

गरज आणि उत्पादन

खादीग्रामोद्योगप्रधान समाजरचनेमुळे खेड्यापाड्यांमधला पैसा खेड्यांतच राहतो, तो शहरांत जात नाही आणि पैसा खेड्यांतच खेळल्यामुळे शहरे त्यांचे शोषण करू शकत नाहीत अशा जो एक समज आहे —- आणि हा समज विकेन्द्रित अर्थव्यवस्थेचे म्हणजे खादीग्रामोद्योगांचे समर्थन करण्यासाठी वापरला जातो —- तो आता तपासून पाहू. तसे करताना पैसा म्हणजे काय आणि शोषण कशामुळे होते हे आपणापुढे स्पष्ट होईल अशी आशा आहे.
ग्रामीण प्रदेशात मुळात पैशांचा उपयोग फार थोडा असतो. पैशांशिवायच बराचसा व्यवहार पार पडतो. धान्याची किंवा इतर वस्तूंची देवाणघेवाण करून आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचा प्रघात फार प्राचीन आहे. ज्यांचे उत्पादन खेड्यांत होत आले आहे अशा वस्तूंचा आणि सेवांचाही विनिमय बलुतेदारीमधून होतो हे आपणास ठाऊक आहे. शेतकऱ्याच्या जवळजवळ सर्व गरजा पैशांशिवाय पुरविण्याची व्यवस्था बलुतेदारीत होती. सुतार, लोहार, महार, चांभार, कुंभार, सोनार, तेली, तांबोळी, साळी, माळी, कोळी, बेलदार (गवंडी), गुरव, जोशी, परीट, न्हावी आणि आणखी काही व्यावसायिक ह्या साऱ्यांना गावकऱ्यांच्या गरजा भागविल्याबद्दल मेहनताना म्हणून पिकाचा वाटा शेतकऱ्यांकडून वंशपरंपरा मिळत असे. शेतकऱ्याने आपल्या घरी पीक नेण्याच्या अगोदरच खळ्यावरून कणसांसकट पेंढ्या (पाचुंदे) मिळत किंवा मळलेले धान्य मिळे. वर्षभर दिलेल्या सेवांबद्दल (उदा. केस कापून देणे, कपडे धुऊन देणे) मोबदला वर्षातून एकदाच वस्तुख्याने मिळत आहे. ही सारी व्यवस्था चालू असताना पैशाचा वापरच होत नव्हता असे नाही. विनिमयाचे आणि केलेल्या श्रमांचा संचय करण्याचे साधन म्हणून पैसा वापरला जातच होता. तरीही पैशावाचून दैनंदिन आर्थिक व्यवहार अडत नसत. खेड्यांत तयार न होणारा माल जसजसा तेथे मिळू लागला तसतसे आर्थिक व्यवहारातले पैशांचे महत्त्व वाढू लागले. बाहेस्न आलेल्या वस्तू शेतकऱ्याला महाग पडतात, त्यांसाठी खिशातला पैसा काढून द्यावा लागतो असे शेतकऱ्याला वाटत आले आहे. त्याच समजुतीवर खादीग्रामोद्योगाचे अर्थशास्त्र आधारलेले आहे. पैसे देऊन बाहेरुन गावात आणलेल्या सगळ्याच वस्तू महाग पडतात की स्वस्त पडतात ते आता पाहू. ज्या वस्तू गावांतल्या गावांत निर्माण होऊ शकतात, त्यांतही ज्या आपण स्वतः करू शकतो त्या गावांतच आणि शक्यतोवर स्वतः करण्याने आम्ही श्रीमंत होतो की गरीब होतो हा प्र न आता सोडवू. त्यासाठी कपडा देशाच्या पातळीवर मोजणे—-आपली स्थिती समूहशः किती बदलली ते पाहणे इष्ट होईल. कपडे विणणाऱ्याला मराठीत साळी म्हणतात. त्याच्याकडून कपडा न घेता, म्हणजे त्याचा रोजगार हिरावून घेऊन गावे श्रीमंत कशी होतील ह्याचे उत्तर आपणास शोधावयाचे आहे. त्यासाठी माणसे किंवा गावे, देश श्रीमंत कसे होतात, त्यांच्या ठिकाणी सुबत्ता येते ती पैशांमुळे येते की गावकऱ्यांचे–देशवासीयांचे श्रम कमी झाल्यामुळे हे आधी समजून घेऊ.
फार पूर्वी एक गोष्ट वाचली होती. तिचे नाव होते ‘लंकेत सोन्याच्या विटा’. एक न्हावी होता. तो आपल्या गावातल्या लोकांची डोईदाढी करून कसेबसे पोट भरत असे. त्याने कधीतरी ऐकले की लंकापुरी अत्यंत श्रीमंत असून तेथे सोन्याच्या विटांनी व्यवहार चालतो. त्या सोन्याचा मोह पडून तो तिकडे जावयाला निघाला. पुष्कळ अडचणी सोसून कसाबसा लंकेपर्यंत पोचला. तेथे खरोखरच दुकानांमध्ये सोन्याच्या विटांच्या थप्प्या—-चळती—-त्याला दिसल्या. ते दृश्य पाहून त्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आपल्या कष्टांचे सार्थक झाल्यासारखे त्याला वाटले. रस्त्याच्या कडेला बसून त्याने आपली धोकटी उघडली आणि कामाला सुरवात केली. एक दाढी केल्याबद्दल त्याला दोन सोन्याच्या विटा मिळाल्यामुळे तो हरखून गेला. पण थोड्याच वेळानंतर त्याला शेरभर फुटाणे घेण्यासाठी जेव्हा त्या दोन विटा द्याव्या लागल्या तेव्हा त्याचा भ्रम–निरास झाला. त्याला आपल्या स्वतःच्या गावात शेरभर फुटाणे घेण्यासाठी तितकेच किंवा त्याहून कमी काम करावे लागत असे. आपले घरदार सोडून इतक्या दूर येण्याचा फायदा काय असा विचार त्याच्या मनात येऊन आणि लंकेत सोने जितक्या सहजपणे येते तितक्याच सहजपणे जाते हे पाहून तो आपल्या गावी परत गेला, अशी काहीशी ती गोष्ट होती.
माणसाची सुबत्ता पैशाच्या मापदंडाने मोजू नये—-ती श्रम आणि उपभोग यांच्या गुणोत्तराने ठरवावी असा बोध तिच्यापासून घ्यावयाचा आहे. सुबत्तेचे, भरभराटीचे पैशातले मोजमाप फसवे असते कारण एकच व्यवहार कधी सोन्याच्या देवाणघेवाणीने होतो तर कधी कवड्यांनी होतो. एका ठिकाणी सोन्याची विपुलता आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही. तेथे कवड्यांची आहे. एक धोतरजोडी गावातल्या साळ्याकडून मिळविण्यासाठी सामान्य ग्राहकाला किती पैसे द्यावे लागतात त्यापेक्षा तिच्यासाठी किती श्रमतास खर्चावे लागतात हे पाहणे आवश्यक आहे. गिरणीत तयार झालेली तशीच धोतरजोडी जर एक दशांश श्रमतासांच्या मोबदल्यात मिळत असेल तर गिरणीतल्या मालाला मागणी जास्त राहणारच. गावातले साळी पैसा न घेता बलुत्यावर धोतरजोडी देत असले तरी त्यांच्या उत्पादनाला मर्यादा असणार! गावातल्या एका माणसामागे
सरासरी एका धोतरजोडीपेक्षा जास्त कपडा वापरताच येणार नाही. गावातल्या साळ्याच्या घरी आजारपण आले तर सगळ्या गावकऱ्यांना आपले कपडे ठिगळे लावून वापरावे लागणार! गावातला एकही पैसा बाहेर न गेला तरी. आणखी एक गोष्ट ह्या संदर्भात लागू पडते काय ते बघू या.
फार फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. दोन मित्रांनी सरकतीत (म्हणजे भागीदारीत) धंदा करावयाचे ठरविले. जवळचा पैसा बरोबरीने घालून त्यांनी एक हंडाभर दारू ठोक भावाने विकत घेतली आणि ती चिल्लर भावाने आठवडी बाजारात विकण्यासाठी घेऊन जाऊ लागले. बाजार दूर होता. आळीपाळीने हंडा डोक्यावर घेऊन ते चालले होते. जाता जाता एकाला तलफ आली. त्याच्याजवळ एक पावली शिल्लक राहिली होती. ती त्याने आपल्या भागीदार मित्राला दिली आणि त्याच्याकडून त्याच्या मालकीच्या हिश्शातली पावलीची दारू विकत मागितली. भागीदाराने हंडा डोक्यावस्न खाली उतरवला आणि चिल्लर भावाने, योग्य तो नफा आकास्न त्या पावलीच्या किमतीची दारू मोजून दिली. ती दारू पिऊन झाल्यानंतर हंडा पुन्हा डोक्यावर चढवून दोघांची वाटचाल सुरू झाली. आता ज्याच्या खिशात पावली आली होती त्याला तलफ आली. त्याने पहिल्याच्या हिश्शाची दारू विकत घेतली. बाजाराचे गाव येईपर्यंत असे पुष्कळदा झाले. प्रत्येक वेळी दारूची विक्री होई आणि ती पावली एकाकडून दुसऱ्याकडे जाई. बाजार डोळ्यांना दिसायला लागला पण तेथे विकावयाला दारू शिल्लक होतीच कितीशी? मित्र तसेच परत फिरले. शिल्लक दारू परतीच्या वाटेवर आपसांतच खपली आणि पैशांची देवाणघेवाणही प्रत्येक वेळी बिनचूक झाली. दिवसभर धंदा केला. थेंबभर दारू कोणाला फुकट दिली नाही. कमी किमतीलाही विकली नाही. स्वतःसुद्धा बिनपैशाने कोणी प्याले नाहीत. पैसा कोठेही बाहेर गेला नाही. तो केवळ गावातच नाही—-फक्त दोघांमध्येच फिरत राहिला तरी नफा मात्र काहीच झाला नाही. सांगायचा मुद्दा असा की पैसा गावातल्या गावात राहिल्यामुळे कोणाला श्रीमंती येत नाही. मग श्रीमंती कशामुळे येते? ती आपल्याऐवजी दुसऱ्याला श्रम करावयाला लावून येते. सार्वजनिक वस्तूंच्या जास्तीत जास्त वापरामुळे येते किंवा गिरण्यांमध्ये तयार झालेल्या मालाचे नीट वितरण झाल्यामुळेही येते.
वरील विधानांचा थोडा विस्तार करू किंवा हा मुद्दा थोडा वेगळ्या पद्धतीने मांडून पाहू. प्र न असा आहे की गिरणीच्या कापडाच्या वापरामुळे नव्हे तर खादीच्या वापरामुळे उत्पादकाचे शोषण होते की काय?
कोणत्याही उत्पादनासाठी केवळ निर्वाहवेतनावर श्रमिक राबत असेल तर त्याचे शोषण होते असे मानले पाहिजे. अशा श्रमांमध्ये आणि गुलामांच्या श्रमां-मध्ये काहीच फरक नाही. गुलामालाही जिवंत राहण्याइतके ‘वेतन’ मिळतच असते. श्रमिकाला कसेतरी जिवंत ठेवावेच लागते. कालची चैन ही आजची गरज असल्यामुळे निर्वाहवेतनापेक्षा अधिक उत्पन्न मिळवणे किंवा देणे ह्याचा अर्थच गरजा वाढवीत नेणे; चंगळवादाला उत्तेजन देणे. गरजा वाढवीत नेणे, वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादनाच्या नवनवीन पद्धती शोधून काढणे, त्यासाठी मानवी कल्पकतेला प्रोत्साहित करणे हे अर्थकारणाचे मूलतत्त्व आहे. परंतु हा मुद्दा आपण नंतर घेऊ.
कोठल्याही बाह्य ऊर्जेचा उपयोग न करता, मानवी स्नायूंच्या किंवा फार तर बैलांच्या स्नायूंच्या ऊर्जेमधून केलेले ते उत्पादन असल्यामुळे ती एक वेगळी जीवनशैली बनते. कुटुंबात कराव्या लागणाऱ्या सगळ्याच कामांसाठी बाहेरची मदत किंवा ऊर्जा न वापरण्याचा तो संकल्प आहे. त्यामुळे घराला लागणारे पाणी भरणे, सर्पण गोळा करणे, दळणे, कांडणे, रांधणे, भांडी घासणे, कपडे धुणे, झाडझूड आणि सडासारवण करणे, घरांची डागडुजी करणे, मुलांचे संगोपन करणे, ही सगळी कामे करून बाजारहाट करणे, लाकडे फोडणे कापसाची रेचाई-पिंजाई कस्न ईचे पेळू तयार करणे, सूत कातणे, त्या सुताचा ताणा करणे, त्याला कुची करणे, फणी भरणे, विणाई करणे ही सगळी कामे करून एका कुटुंबाची विणाई फार थोडी होते. ती जेमतेम स्वतःच्या कुटुंबीयांपुरती होते. पूर्वी कपडा वापरण्याचे मानच फार कमी असे. त्यामुळे विणकर स्वतः अर्धनग्न राहून गावकऱ्यांची वस्त्राची गरज भागवीत असे. आपले राहणीमान वाढविण्यासाठी विणकराच्या कुटुंबीयांना वावच नव्हता. हीच परिस्थिती लोहार, सुतार, चांभार इत्यादि बलुतेदारांची. आणि थोडेफार जास्त कापड ते तयार करतात. अंगावर घालून जे उरते ते विकून कापूस आणि अन्नधान्य, तेल, मीठ, मिरचीमसाला, भाजी ते मिळवतात. अशा काळी त्यांच्या देशाला एखाद्या स्वारीवर जाण्याची गरज पडते. शेतकऱ्यापेक्षा लढवट्याला पुष्कळच जास्त कपडा लागतो. तो डोक्याला बांधण्यासाठी फेटा, अंगरखा, बंडी. इतकेच नव्हेतर तंबू कमरकस अशा वस्त्रांनी तो मढलेलाच असतो. पाले करण्यासाठीसुद्धा जास्तीच्या कपड्याची सेनेला खूप गरज असते. हे सगळे जास्तीचे कापड गावातल्या विणकरांना म्हणजे साळ्यांना कोठलाही जास्तीचा मोबदला घेतल्याशिवाय विणून द्यावे लागे. जास्त श्रम करून थोडे उत्पादन जोपर्यंत होत राहते तोपर्यंत आर्थिक सुबत्ता येऊ शकत नाही.
‘शहरांतून माल खेड्यांत येतो. तो पैसा बाहेर घेऊन जातो आणि त्यामुळे गावकरी उत्तरोत्तर दरिद्री होत जातो. माणसाने गरजा मोजक्या ठेवल्या पाहिजेत. गरज नसताना माल विकत घेतला गेल्यास माल विकणारा आपले शोषण करतो. किंवा असे म्हणू या की जी कामे आपणास स्वतःला करता येतात ती दुसऱ्याकडून करून घेतल्यामुळे आपले शोषण होते. आपण गरीब होतो.’ असे आम्हाला खादीच्या संदर्भात सांगण्यात येते.
ज्यावेळी खेड्यात तयार झालेल्या मालाच्या स्पर्धेत संघटित उद्योगात तयार झालेला माल उतरतो तेव्हा त्या लढाईचे स्वरूप देशी फौज विरुद्ध कवायती फौज असे असते. देशी सेना ही एकाने एकाशी लढण्यासाठी समर्थ व्हावे अशी घडविलेली असते तर कवायती फौज एका समूहाने दुसऱ्या समूहाशी लढण्यासाठी घडविली असते. देशी फौज ही विकेन्द्रित व्यवस्था आहे. पण ती फक्त विकेन्द्रित न राहता असंघटित, विस्कळीत आणि अव्यवस्थित असते. उलट संघटित उद्योग हा शिस्तबद्ध आणि व्यवस्थित असतो. पण त्याचा तो गुण आपण सध्या बाजूला ठेवू.
संघटित उद्योगामध्ये आधी माल तयार केला जातो आणि नंतर त्याला ग्राहक शोधला जातो. माल तयार होण्यापूर्वीच वितरकांचे जाळे विणून तयार असते. इकडे नीलगिरीच्या डोंगरउतारावर जशी चहाची लागवड सुरू होते तशी त्या चहाची बाजारपेठ दुसरीकडे तयार होते. ग्राहकाने आपली मागणी नोंदविण्यापूर्वीच गिरणीत माल तयार होऊ लागतो आणि तयार होईल तितका माल त्यांना खपवावाच लागतो. एका अर्थाने हा माल ग्राहकावर लादला जातो. ग्राहकाच्या मनात त्या मालाविषयी अभिलाषा निर्माण करून त्यासाठी कृत्रिम मागणी निर्माण करून गिरण्या तो ग्राहकांच्या गळ्यांत बांधतात. हे अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे. पण गिरण्यांच्या ह्या साऱ्या धडपडीमुळे तो माल ग्राहकाला फुकट मिळतो हे मात्र त्यांना ठाऊक नाही.
खादीग्रामोद्योगाधिष्ठित विकेन्द्रित अर्थकारण आणि संघटित उद्योग ह्यांच्या स्पर्धेत खादी ग्रामोद्योगाची पिछेहाट अपरिहार्यपणे होते कारण खादीच्या कापडाला किंमत द्यावी लागते तर गिरणीचे कापड ग्राहकाला पुढेपुढे फुकट मिळू लागते हे आहे. खादीग्रामोद्योगांच्या पुरस्कर्त्यांना वाटते की विकेन्द्रित अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी खादी वापरणाऱ्याला तिच्या उत्पादनात त्याचे स्वतःचेच श्रम लागत असल्यामुळे फुकट मिळते. उलट गिरणीमधला कपडा बाहेस्न आलेला असल्यामुळे आणि तो घेण्यासाठी पैसा उचलून द्यावा लागत असल्यामुळे अतिशय महाग पडतो. पण प्रस्तुत लेखकाच्या मते वास्तव अगदी विपरीत आहे. कोणत्याही मालाचे मूल्य पैशांत मोजले असता फसगत होते. ते मूल्य नेहमीच तो माल निर्माण करण्यासाठी आणि नंतर प्राप्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमांमध्ये मोजले गेले पाहिजे. जेव्हा कोणत्याही जास्तीच्या श्रमाशिवाय उपभोग्य वस्तूंचे अधिक परिमाण प्रत्येकाला उपलब्ध होते तेव्हा ते जास्तीचे परिमाण प्रत्येकाला फुकट मिळते. खादी हातसुताची आणि हातविणाईची असल्यामुळे तो कधीच अधिक परिमाणात उपलब्ध होऊ शकत नाही. गिरण्यांचा माल जर फुकट मिळतो तर त्यामुळे आणखी काही प्र न उद्भवतात. जसे शोषणाचे वास्तविक स्वरूप, पैसा म्हणजे काय, भांडवल म्हणजे काय आणि नव्या तंत्रांच्या उपलब्धतेमुळे रोजगारांवर होणारा परिणाम इ. ह्यांविषयी पुढच्या लेखांकांत.
मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.