अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद

आधी अमेरिकेत येणे झाले तेव्हा आजचा सुधारकचे चार वर्गणीदार होते. त्यातली एक माझी मुलगी आणि इतर तीन पद्मजा फाटकांनी मिळवून दिलेले. त्यांपैकी दिलीप फडणीस म्हणाले, चार आहेत त्यांचे चाळीस करू. त्यांना एकत्र आणू. एकत्र यावे हा विचार मनात होताच. Summit ला राजेन्द्र मराठे असतो. त्याच्याजवळ बोललो. (इथे एकेरी संबोधायला वेळ जावा लागत नाही. फारशी जवळीक लागत नाही, आपलीच जीभ रेटत नाही. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत.) आजचा सुधारक च्या वाचक-हितचिंतकांची पहिली सामूहिक गाठभेट झाली ती Summit लाच राजनकडे, सप्टेंबर १२, १९९८ ला. त्यावेळी आणि नंतरच्या पाठपुराव्यामधून वर्गणीदारांची संख्या ऐंशीवर गेली. त्यांत जसे अमेरिकेतले होते तसेच त्यांनी भारतातले स्पॉन्सर (प्रायोजित) केलेलेही होते आणि त्यांतले ९५ टक्के आजीव वर्गणीदार होते. या खेपेला मुलीने न्यूजर्सी सोडून टेक्सासमध्ये स्थलांतर केलेले. कोणाशी ओळखी पाळखी न झालेल्या. पुन्हा यायची वेळ आली तेव्हा मनात ती आतुरता नव्हती. तेच न्यूजर्सीत जायचे असते तर ती आनंदयात्रा वाटली असती. मागच्या वेळी जडलेल्या मैत्रामुळे स्नेह्यांचा आग्रह झाला, जरूर या, पुन्हा गाठीभेटी घडवून आणू. त्यात अग्रगण्य डॉ. गोपालदास श्रॉफ, अशोक विद्वांस, श्री. श्रीराम गोवंडे, (Princeton) उदयन विनोद (Moristown) यांनीही अगत्याने आमंत्रण केले. एप्रिल २६ ते मे ६ असा दौरा ठरला, आणि तो ‘रात्रिरेव व्यरंसीत्’ या धर्तीवर चुटकीसरसा संपला. त्यातल्या ५ मे च्या अमेरिकेतल्या आ.सु.च्या दुसऱ्या मेळ्याचा हा वृत्तान्त.
मे ची ५ तारीख शनिवारी होती. सभेची वेळ आपल्या कानांना अवेळ वाटेल; मे महिन्यात भर दुपारी दोन ते जमलो. त्यात काही थोडे नियमित वाचक-वर्गणीदार नसलेले, पण आ.सु.चे नमुना अंक वाचलेले, स्वस्प माहीत असणारे होते. कार्यक्रमाचे स्वरूप साधारणतः असे. पूर्वार्धात वाचक-हितचिंतकांचे मनोगत त्यांनी सांगायचे. गेल्या दोन अडीच वर्षांच्या आ.सु.च्या परिचयानंतर त्यांना काय वाटते ते त्यांनी मोकळेपणाने सांगायचे. आक्षेप, अपेक्षाभंग, सूचना, आलोचना, आडपडदा न ठेवता सांगायच्या. अधून-मधून मी उत्तरे द्यायची. प्र न-टीका विसरू नयेत, चर्चेत एकतर्फीपणा येऊ नये हाही हेतू होताच. (येथे एकूणच निर्भीडपणा आपल्या मानाने जास्त आहे.) मध्यन्तरानंतर बीजभाषण म्हणून नासिकला म. फाउंडेशनच्या पुरस्कार-वितरणाचे वेळी प्रा. एन्. डी. पाटील यांचे भाषणातील अंश ‘मंथन’ या स्मरणिकेतून श्री अशोक विद्वांस वाचणार होते. मुख्य पाहुणे श्री. सुनील देशमुख. प्रोफेसर आबासाहेब गवांदे यांचे अध्यक्षीय भाषण. पण त्यापूर्वी पूर्वार्धातील आलोचने-बद्दल मी सांगायचे, आठवडाभर अनुत्तरित राहिलेल्या काही आक्षेपांना सारांशाने उत्तर द्यायचे, अशी एकूण योजना होती. उपस्थिती अशी होती : अशोक व शैला विद्वांस (यजमान), प्रो. आबा गवांदे, सुनील देशमुख, मधुकर आणि अनघा देशपांडे, कौस्तुभ आणि चित्रा लेले, मुकुंद व डॉ. जयश्री सातवळेकर, डॉ. गोपालदास व डॉ. कमल श्रॉफ, रमेश प्रधान, डॉ. विनू बोडस, रवी करमरकर, प्रोफेसर हृषीकेश विनोद, राजन गडकरी, राजवू मराठे, सुबोध शाह, डॉ. लक्ष्मण उर्फ बण्डू फडके, अशोक व मीना देवधर, श्रीमती लीला व नलिनी लिमये, श्रीराम व पुष्पा गोवंडे आणि अर्थात् मी.
पहिल्या क्रमांकाचा आक्षेप भाषेचा. आ.सु.तील लिखाण क्लिष्ट, बोजड आणि किचकट असते असा मुख्य सूर. सन्मान्य अपवाद श्रीराम गोवंडे, कौस्तुभ व डॉ. श्रॉफ यांचे. श्रीरामचे म्हणणे आ.सु. वाचू लागल्यापासून माझे मराठी सुधारले आहे. कौस्तुभलाही भाषा आणि विषय मांडण्याची पद्धत आवडते. या उलट मी पुण्याचा असूनही हे मराठी मला जड जाते, अशी रमेश प्रधानांची गमतीची प्रतिक्रिया या टीकेतून मुद्दा आला की, आ.सु. आहे कोणासाठी? विचारवंत, उच्चविद्याविभूषितांसाठी म्हणाल तर त्यांना त्याची गरज नाही. आणि सामान्यांना तो समजत नाही. तुम्ही विचारवंतांसाठी लिहीत असाल तर त्यांना इथला समाज तरी महत्त्व देत नाही. भारतातही काही निराळे दिसत नाही. येथे चित्रपट नटनट्या आणि खेळाडूंचे अनुकरण लोक करतात. यावर हलकासा प्रतिवाद म्हणून मी म्हटले की मराठी चित्रनाट्य कलावंतांपैकी अमकेअमके मान्यवर आपले वर्गणीदार आहेत. त्यावर उत्तर आले की माधुरी दीक्षित म्हणतील तर लोक सुधारक घेतील एकवेळ, पण वाचतील असे मानू नका.
श्रद्धेचा मुद्दा तितकाच नाजुक, मर्मस्थळावर बोट ठेवणारा ठरतो. सुधारक नास्तिकच असला पाहिजे अशा आग्रह का, हा प्र न पुनःपुन्हा पुढे येतो. सुधारक कोण, याची व्याख्या करा. परलोक व मोक्ष मानणारा सुधारक राहू शकतो. तो समाजाच्या ऐहिक सुखासाठी, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, न्याय या तत्त्वांवर जागण्याच्या व पुनर्रचना करण्याच्या पक्षाचा राहू शकतो. तो धर्म देव मानू शकतो. याला तुमची काय हरकत आहे? असे मुद्दे प्र न चर्चेच्या अनुषंगाने पुढे आले. याचा संक्षिप्त आढावा पण शक्यतो आता नावनिशीवार आपण घेऊ.
१. आक्षेपांना वाचा फोडताना मीना देवधर : समाजाचे एक विचारवंत व दुसरे त्यांचे पाहून वागणारे असे दोन गट करणे मला मान्य नाही. अनुकरणात मला कमीपणा वाटत नसला तरी प्रत्येकाने विचार करावा असे मला वाटते. त्यासाठी प्रत्येकाला समजेल अशी भाषा आ.सु. ने वापरली पाहिजे. आपली वागणूक आपल्यालाच उलगडेल असे लिखाण आ.सु.त यावे.
२. राजेन्द्र मराठे : आपल्या संस्कृतीला नावे ठेवली की लोकांना राग येतो. त्यांच्या तिखट प्रतिक्रिया येतात. त्याला इलाज नाही. ज्ञान आणि रंजन दोन्ही दृष्टींनी मला आ.सु. आवडतो. मुखपृष्ठ आकर्षक आणि त्यावर आतील विषयांचा सूचक निर्देश करता आला तर बरे.
३. कौस्तुभ लेले : मी आ.सु. संपूर्ण वाचतो. मला त्याची भाषा व मांडण्याची पद्धती आवडते. पण विचारसरणी orthogonal वाटते. लेनिनने मार्क्स-वाद रशियावर बळजबरीने लादला. पण तो अपयशी झाला. कारण श्रद्धा मनुष्य-स्वभावाचा स्थायीभाव आहे. आ.सु. ला एकाच निष्कर्षाप्रत पोचण्याची घाई दिसते. म्हणून लिखाण एकतर्फी असते. हा एकतर्फीपणा बुद्धिवादाला विरोधी आहे. श्रद्धा, आप्तवचन, सत्य यांच्या नीट व्याख्या
करणे आवश्यक आहे.
उत्तर : श्रद्धाविरोध यावर मी म्हणालो : सर्वंकष श्रद्धेचा पक्ष घेणारांनी श्रद्धा व निष्ठा असा भेद करणे आवश्यक आहे. नीतिनियमांची मूलतत्त्वेही प्रमाणांनी सिद्ध न करता येण्यासारखी असतात. तरी ती आपण स्वीकास्न त्यांच्यावर पुढले नीतिशास्त्र उभारतो. उदा. मनुष्याला हवे तसे करण्याचे कृतिस्वातंत्र्य आहे हे आपण गृहीत धरले आहे. मानवामानवांमधील समानता, न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य ह्या गोष्टी एका अर्थाने आपल्या श्रद्धा आहेत. म्हणजे त्यांच्यावर आपला ठाम विश्वास आहे. ते आपले निर्धार आहेत, नि चय आहेत, ठराव आहेत. आधारमूल्ये म्हणून स्वीकारलेल्या त्या निष्ठा आहेत. ती वर्णनपर वाक्ये नाहीत. विधाने (Statements) नाहीत म्हणून खरीखोटी असण्याचा प्र नच नसतो. तरी आपण ती आहार्य (स्वीकार्य) मूल्ये म्हणून स्वीकारली आहेत. हे मुळारंभीचे पुढच्या वाटचालीचे निर्देश (Prescriptive Judgements) आहेत. नीतीसाठी आवश्यक आहेत त्यांना निष्ठा असे नाव आपण देऊ. हा नीतीचा प्रांत आहे. परंतु तथ्याचा प्रान्त दुसरा आहे. तेथे विधान (Statement) खरे व्हावयाचे असेल तर ते वस्तुतथ्य पाहिजे. म्हणजे यथार्थ पाहिजे. सत्यता म्हणजे यथार्थता. वस्तुस्थिती तशी असेल तरच ते विधान सत्य ठरते. येथे ठाम विश्वासाचा संबंध नाही. विश्वासाच्या दृढतेमुळे किंवा नि चयांमुळे या प्रांतातले विधान सत्य ठरत नाही. असे असता, ‘श्रद्धे’चे नाव घेऊन एखाद्या सत्याचा दावा करणे समर्थनीय ठरत नाही. श्रद्धाबळाने विधानाची सत्यता ठरत नाही. असा श्रद्धेचा उपयोग ज्ञानाच्या क्षेत्रात समर्थनीय नाही. आता नीतीसाठी आरंभबिंदू म्हणून स्वीकारलेली तत्त्वे आपण ठाम विश्वासाने स्वीकारली तर तो ठामपणा ग्राह्य आणि ज्ञानाच्या — वस्तुज्ञानाच्या क्षेत्रातला श्रद्धेचा ठामपणा अग्राह्य हा भेद दाखवण्यासाठी एकास आपण निष्ठा आणि दुसऱ्याला श्रद्धा असा शब्द वापरू. ग्राह्यश्रद्धा (नीतीच्या प्रांतातल्या) ‘निष्ठा’ आणि अग्राह्य श्रद्धा (ज्ञानाचा प्रांतातल्या) ‘श्रद्धा’ म्हणू. आपला विरोध या दुसऱ्या प्रांतातल्या श्रद्धेशी आहे.
४. डॉ. बंडोपंत फडके : लहान मुलांसारखे निर्भीडपणे प्र न विचारणाऱ्यांना देखील कशी उत्तरे द्यायची याचे प्रात्यक्षिक आ.सु. मधून मिळते. तसेच विरोध कसा करावा व कसा करू नये याची उत्तम उदाहरणे सुधारकात पाहायला मिळाली. काही व्यक्तिगत नालस्तीचे कंटाळवाणे लिखाण आले. ते न येते तर बरे असे वाटते. आ.सु.ने रंगीत मुखपृष्ठ आणि अंतरंग थोडे अधिक आकर्षक करावे, तो तसा पॉप्युलर होऊ शकेल.
५. प्रोफेसर गवांदे : भारतात विभिन्न राज्यांत विभिन्न समस्या आहेत. सामाजिक क्षेत्रात प्रादेशिकता आहे. हे मी आ.सु. वाचताना विसरलो. नैतिक प्र नांची आ.सु.ची हाताळणी अपूर्व आहे. उत्तरभारतात हिंदुपरंपराभिमानी राजवट आली. ज्योतिष विद्या B.Sc. पदवीपरीक्षायोग्य ठरविली गेली. कुंभमेळ्यासारख्या पौराणिक कथेच्या आधाराने चालू झालेल्या भ्रामक प्रथांना सरकारने एक प्रकारे प्रोत्साहन देणे या गोष्टीचे वि लेषण कस्न हिंदी आवृत्तीत त्याचा समाचार घेतला जावा. या व अशा मान्यतांची चिकित्सा व्हावी.
६. डॉ. विनू बोडस : आ.सु. ने पुढारी कोण आणि सामान्य कोण हे जे गृहीत धरले आहे ते परत पारखून घ्यावे. उच्च डिग्र्यांनी माणूस सुशिक्षित होत नाही. शिवाय पुढाऱ्यांचा आजकाल कोणी आदर्श ठेवत नाही. तुमचे कष्ट व्यर्थ जात आहेत.
७. डॉ. गोपालदास श्रॉफ : आजचा सुधारकचा मूळ उद्देश लक्षात घेता आजच्या समाजाच्या प्रॉब्लेम्सच्या दृष्टीने काय करता येईल यावर मार्गदर्शन हवे. आ.सु.मधील महत्त्वाचे लेख लोकांच्या मनाला जाऊन भिडले आहेत का असा मला प्र न पडतो कारण त्या संबंधी चर्चा झालेली दिसत नाही. आजच्या आमच्या प्र नांना प्राधान्य देणारे लिखाण हवे.
उत्तर : समाजधुरीण वागतात तसे वागावे अशी प्रवृत्ती, आदर्शवाद, भारतातही पूर्वीसारखा राहिला नाही हे खरे आहे. पुढाऱ्यांसंबंधी आगरकरांनी म्हटले आहे ‘समाज म्हणजे त्यातील बहुतेक किंवा निदान प्रमुख लोक’. सर्वच लोक विचार करू शकत नाहीत. त्यामुळे सुधारकाचे आवाहन थोड्याच लोकांना असणार. म्हणून निराश व्हायचे कारण नाही. कोणी समानधर्मे निघतातच.
आ.सु.मध्ये समाजातील ज्वलंत समस्यांबद्दल लेखन यावे यात दुमत नाही. आम्हाला अधिक लेखनसाहाय्य हवे आहे. आमचे प्रयत्न कमी पडतात याची आम्हाला जाणीव आहे.
८. करमरकर : मी आ.सु.चे नमुना अंक वाचले. माझा प्र न आहे, सुधारक नास्तिकच असला पाहिजे का? मी आस्तिक आहे. मला सुधारक होता येणार नाही का? सुधारकाची व्याख्या काय आहे? धर्म ही अफूची गोळी आहे हे म्हणणे मला पटत नाही. मला तर आगरकर आस्तिक वाटतात.
उत्तर : आगरकर आस्तिक नव्हते. जो आस्तिक नाही तो नास्तिकच असे नाही. ईश्वर, आत्मा, मरणोत्तर अस्तित्व, पुनर्जन्म या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नाही, त्या अज्ञात आहेत असे म्हणणारे अज्ञेयवादी (agnostic) असू शकतात. आगरकरांना अज्ञेयवादी म्हणता येईल.
आस्तिक समाजसुधारक झाले आहेत. गेल्या शतकात न्या. मू. रानडे, कर्मवारी विठ्ठल रामजी शिंदे असे बरेच होते. या शतकात रेगे आस्तिक होते आणि सुधारकही होते असे म्हणता येईल. व्यक्तिस्वातंत्र्य, मानवी समानता, न्याय या तत्त्वांवर त्यांची निष्ठा होती. ऐहिक सुख व्यक्तीचे असो की समाजाचे, त्या सुखाकडे दुर्लक्ष करावे असे त्यांना वाटत नव्हते या अर्थाने रेगे सुधारकांपेक्षा कमी नव्हते. मात्र मनुष्याला व्यापक मानवतेकडे नेणाऱ्या अनेक वाटा असू शकतात अशी त्यांची भूमिका होती. आम्हा विवेकवाद्यांची अनुभववादी ज्ञानमीमांसा त्यांना अमान्य होती.
[अधिक खुलासा : नागपूरचे विद्वद्रत्न डॉ. भाऊजी दप्तरी धार्मिक असून नास्तिक होते. परलोक, पुनर्जन्म, आत्म्याचे मरणोत्तर अस्तित्व, वेदांचे अपौरुषेयत्व ह्या गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या. भक्तिमार्ग आणि अवतार ह्या गोष्टी वेदात (उपनिषदांतही) नाहीत असा त्यांचा दावा होता. समाजस्वास्थ्यासाठी केलेले नियम, मर्यादा म्हणजे धर्म तो अत्यंत आवश्यक आहे व तो परिवर्तनशील आहे. असा त्यांचा पक्ष होता.]
९. सुनील देशमुख : समानतेवर व मानवतेवर ज्याची निष्ठा आहे तो आस्तिक या अर्थाने मी प्रचंड आस्तिक आहे. तसेच चार्वाक आस्तिकांचे शिरो-मणी ठरतात. देव म्हणजे तुम्ही काय समजता यावरही पुष्कळ अवलंबून आहे. दिवसातून चार तास घंटा बडवणारे आणि पाच वेळ बांग मारणारे समाजाबद्दल आस्था बाळगत नसतील तर ते नास्तिकच म्हटले पाहिजेत.
१०. रमेश प्रधान : आगरकरांच्या सुधारकाचे नाव तुम्ही घेतले आहे तेव्हा आ.सु.ने राजकीय, सामाजिक ज्वलंत प्र नांना वाचा फोडली तर ते योग्य होईल.
उदा. लोकशाही पद्धतीने एकदा निवडून आलेले लोक पुढे काम नीट करीत नाहीत अशा अनेक प्र नांची चर्चा करण्याऐवजी, द्वैत-अद्वैत किंवा आस्तिक-नास्तिक यांचा आणि मिल-कांट या तत्त्वज्ञानाचा खल करण्यात काय अर्थ?
कोणत्या विषयांना अग्रक्रम द्यावा याबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया मागवाव्या त्या जाणून घेऊन लिखाण येत असावे.
उत्तर : (आगरकरांच्या ‘सुधारक काढण्याचा हेतू’ या पहिल्याच लेखातील उतारा वाचून दाखवून) व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीपुरुष-समानता इत्यादी सुधारणावादाची मूलतत्त्वे, समाजातील उपेक्षित, वंचित, अन्यायपीडित वर्गाची दु:खे; त्याचबरोबर नीतीची मूलतत्त्वे विचारी जनांपुढे मांडून त्यांना विचार प्रवृत्त करणे हे आमचे काम आम्ही समजतो.
११. शैला विद्वांस : भारतातील इष्टमित्रांकडे आ.सु.चा अंक आम्ही पाठवतो. त्यांच्यापैकी शिक्षणक्षेत्रात, स्त्रीशिक्षणाशी संबंधित व्यक्तींची देखील प्रति-किया अशी आली की, हे लिखाण फार heavy आहे. हे आपले काम नाही. आ.सु.स्त्रियांचा कैवारी असेल तर त्यांना अपील होईल अशी विषयांची मांडणी असावी. भाषा सोपी असावी.
फडके : भाषेच्या बाबतीत टारगेट IX Grade Readers माना, असे शैक्षणिक लेखन करणाऱ्यांना सांगतात.
१२. अशोक विद्वांस : ‘अमेरिकेत राहणाऱ्या किंवा अनिवासी भारतीयांचे प्र न’ या आणि अशा विषयासंबंधी आपले लेखनसाहाय्य आपण दिले पाहिजे.
सुनील देशमुख: मुखपृष्ठावर आगरकरांचे चित्र देत जावे अशी सूचना आहे.
१३. हृषिकेश विनोद : भ्रष्टाचाराने भारतीय जीवनात थैमान घातले आहे. त्यावर लिखाण यावे. मानवी बुद्धीला मर्यादा आहेत. म्हणून बुद्धिग्राह्यतेचा बडिवार माजवू नये.
१४. राजन गडकरी : आपण विचारस्वातंत्र्य मानणारे लोक आहोत. आजवर जगाच्या इतिहासात आस्तिकांनी नास्तिकांची सतत मुस्कटदाबी केलेली आहे. त्यामुळे हे लिहू नका, ते लिहू नका असे म्हणणे बरोबर वाटत नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा प्र न नाही. प्रत्येकाचा उच्चारस्वातंत्र्याचा हक्क मानला गेला पाहिजे.
१५. मुकुंद सातवळेकर : आ.सु.चा उपक्रम सुत्य आहे, पण तुम्ही तुमच्या समोर ठेवलेला वाचकवर्ग संकुचित आहे. समाज हा व्यापक आहे. सामान्य व्यक्तीला उपयोगी होईल असे लेखन असले तर जास्त लोकांचे लक्ष जाईल. तुमचे काम वाढेल.
श्रीराम गोवंडे : [आपल्या लिखित मुद्देसूद भाषणात म्हणाले : यांनी सभेचे संचालन आणि वेळेचे नियोजन काटेकोरपणे केलेले.
आ.सु. भूमिका मला समजली ती अशी : १. आप्तवचनास जागा नाही. २. स्त्रिया व दलित समाजावर होत असलेला अन्याय दूर करणे व या कामाला प्रोत्साहन देणे. ३. समाजगटात परस्परसामंजस्य वाढावे यासाठी प्रयत्न करणे.
४. परलोकाच्या विचारात वेळ दवडणे व्यर्थ आहे. आणि ५. धर्म-देव ह्या कल्पना झूट नव्हे तर हानिकारक आहेत या मताचा प्रसार. यातील पहिल्या चारांशी मी सहमत. परंतु भारतात हिंदुधर्मीयांना तरी निदान (i) परधर्मीयांबद्दल तसेच आस्तिकांबद्दलही सहिष्णुता, (ii)समाज सुधारणा व (iii) शास्त्र-विज्ञानात प्रगती करणे ह्या गोष्टी जमल्या आहेत. धर्म-देव न नाकारता येथे पाणिनी, कौटिल्य, वात्स्यायन, शिवाजी, टागोर, गांधी, रामन-नारळीकर असे कर्ते महापुरुष झाले आहेत. त्यामुळे धर्मदेव काल्पना हानिकारक आहेत व त्यांचा शास्त्रीय प्रगतीत किंवा विज्ञानात अडथळा झाला, असे दिसत नाही. आ.सु.चा विवेकवाद जहाल म्हटला तर त्यातील वरील ५ वा मुद्दा सोडून बाकीचा मला स्वीकार्य आहे, त्याला मी माझा मवाळ विवेकवाद म्हणतो.
माझा अनुभव असा की, लोकांकडून चांगले काम करून घ्यायचे असेल बदल घडवायचा असेल तर Shock Therapy चालत नाही. तरी आहे अशा स्वरूपात आ.सु. हे कार्य चालू ठेवावे कारण त्यामुळे विचार मंथनाला वाव मिळतो, कृतिशीलता वाढू शकते असा माझा विश्वास आहे.
मध्यन्तरानंतर ‘मंथन’ या स्मरणिकेतील प्रा. एन. डी. पाटील यांच्या मुद्रित भाषणातील अंश श्री. अशोक विद्वांसांनी वाचले. त्यांचा सारांश असा की, आपला समाज एका आव्हानातून जात आहे. समाजातल्या सर्व थरांत गरिबीमुळे शिक्षणाचा प्रसार पुरेसा होऊ शकत नाही. वडिलोपार्जित धंद्याची मगरमिठी सैल होत नाही तोवर व्यवसायाची समान संधी आहे असे म्हणता येत नाही. पिंजाऱ्याचा मुलगा पिंजारी, भंग्याचा मुलगा भंगीच होतो. ऊस तोडणारे लक्षावधी कामगार वर्षातून ६ महिने फिरतीवर राहतात त्यांच्या मुलाबाळांना शाळा शिकता येत नाही. कमतरता बुद्धीची नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी अशा शोषित, वंचित समाजातल्या दुर्बल मुलांना हात देऊन त्यांच्यातून बॅरिस्टर, प्राचार्य, कुलगुरू घडविले. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षे उलटूनही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक लाभांची समान संधी नाकारलेला एवढा मोठा वर्ग तुमची राजकीय लोकशाही सुखाने नांदू देणार नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी मळलेली वाट सोडून नवी वाट धरली आहे त्यांचा आपण गौरव करू या. कितीही दीर्घ वाट असो, पहिले पाऊल टाकावेच लागते. समाजसुधारणेच्या प्रयत्नांचे स्वागत असो.
विचाराचे हे सूत्र घेऊन सुनील देशमुख म्हणाले : ज्या कारणांसाठी आगरकरांनी ‘सुधारक’ साप्ताहिक काढले होते ती कारणे अजूनही उपस्थित आहेत. धर्मसंरक्षणाच्या नावाखाली रुढींचे थैमान सुरू आहे. गुरुबाजी सुरू आहे. प्रस्थापितांना लोकांनी विचार कस्न नको आहे. स्त्रियांची दुःस्थिती कायम आहे. हुंडाबळींची संख्या वाढली आहे. अत्याचार वाढले आहेत. फुले, आगरकर, कर्वे यांची विचारप्रणाली आजही प्रस्तुत आहे. तेथे भारतात आणि येथेही धर्माच्या नावाखाली दांभिकपणा वाढला आहे. धर्मात पैसे देऊन आत्म्याची सोय करता येते. धर्मगुरू मोक्षाची हमी
देतात. आपण विचार करायला पाहिजे आणि संख्येने जरी कमी असलो तरी विचाराने प्रबळ आहोत याची खात्री ठेवली पाहिजे; आणि नुसते बुद्धिजीवीच नसून बुद्धि-प्रामाण्यवादी आहोत हे आपल्या वर्तनाने दाखविले पाहिजे. (अपूर्ण, पुढील भाग व चर्चा पुढील अंकी)
4400 Ave N Apt 156, Galveston TX 77550, U.S.A.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.