मला आस्तिक व्हायचे आहे

परमेश्वर आहे की नाही हा वाद बहुधा हजारो वर्षांपासून सुरू असावा आणि पुढे किती वर्षे चालू राहील हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! किंवा, तो नसला तर, कुणास ठाऊक हे कुणास ठाऊक! त्यामुळे ज्या वादांतून काहीही निष्पत्ती होणे शक्य नाही, अशा वादांत हा वाद अग्रणी धरला जावा. ईश्वर नसल्याबाबतचे लाखो पुरावे, कारणे आणि शास्त्रीय मीमांसा नास्तिकांतर्फे दिल्या जातात. परंतु तितकेच अनुत्तरित प्रश्नही आस्तिकांकडूनही उपस्थित केले जातात. प्रथमतः दोनही पक्ष आपापली बाजू हिरिरीने मांडायला सुरुवात करतात, पुढे या वादाचे स्पांतर ‘श्रद्धा विरुद्ध चिकित्सा’ अशा वादात होते . . . आणि सरते शेवटी मात्र वाद एकाच प्रश्नावर येऊन ठेपतो, तो म्हणजे, विश्वाच्या रगाड्यामागे एखादी ‘अज्ञेय शक्ती’ आहे की नाही? याचे उत्तर नास्तिक अर्थातच ‘नाही’ असे देतात . . . तर आस्तिक ‘आहे’ असे! आणि मग, “या बाबतीत आपले एकमत होणे शक्य नाही” या मुद्द्यांवर दोनही पक्षांचे एकमत होते . . . मात्र, ‘देव आहे की नाही’ हे काही केल्या ‘फायनल’ होतच नाही. ते कसेही असले तरी, नास्तिकांची मात्र या वादात एखाद्या मॅटॅडॉरप्रमाणे फसवणूक होत असते. ‘अज्ञेय शक्ती’ असली काय आणि नसली काय . . . जग- रहाटीत काय फरक पडतो? माणसाच्या वर्तणुकीने मात्र नि िचतपणे जगात फरक पडतो. वाद संपला की आस्तिक कशीही वर्तणूक करण्यास पूर्ण मोकळे राहतात आणि वाद घालताना मात्र फक्त अज्ञेय शक्तीच्या अस्तित्वाबाबतच घालतात. वादाच्या वेळी जगात आजवर सर्वाधिक हिंसाचार व भ्रष्टाचार देवाच्या आणि धर्माच्याच नावावर झालेला आहे या प्रखर वास्तवाकडे ते पूर्ण दुर्लक्ष करतात. बहुतांश आस्तिक तर असे वाद घालताना स्टी–विधी–धर्मग्रंथ–ईश्वराचे मूर्त स्वरूप इत्यादी अनेक बाबींवर टीकादेखील करतात. जणु आपण ह्या गावचेच नाही असेही भासवतात. परिणामतः वादाच्या वेळी आस्तिकांची दैनंदिन वर्तणूक– दैनंदिन व्यवहार हा विषय बाजूला पडतो आणि नास्तिकांचे लक्ष ‘अज्ञेय शक्ती’च्या असण्या-नसण्यावर केंद्रित होऊन दिशाभूल होते असे नास्तिकांना वाटते. या उलट आस्तिकांना नास्तिकांपेक्षा अधिक मनःशांती व स्थैर्य तसेच जीवनासाठी अधिक प्रेरणा व कार्यबल मिळते असे आस्तिकांचे प्रतिपादन आहे. शिवाय, ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यास सर्व लोक अनियंत्रित-अनिर्बंध होऊन परिणामतः जगात हाहाकार माजेल अशी भीतीही ते व्यक्त करतात. त्यासाठी ते लेनिन-स्तालिन-हिटलर यांसारख्या नास्तिकांनी केलेल्या हिंसाचाराची उदाहरणेही पुढे करतात. अशा प्रकारचे असंख्य वाद आणि त्यांची निष्फळता अनुभवल्यावर माझ्यासारख्याची फारच पंचाईत व्हायला लागली. तथापि, आस्तिकांना अधिक मनःशांती व कार्यासाठी बळ मिळते हे कळल्यावर मला आस्तिक होण्यातच ‘प्रॉफिट’ आहे हे लक्षात आले आणि आस्तिकांची संख्या ९५ टक्क्यांच्या वर असल्याचे कारणही उमगले. अहो, ‘प्रॉफिट’ असल्याखेरीज उगाचच कोणी कशाला कोणाची बाजू घेईल? . . . मग भले ती देवाची बाजू का असेना? त्यातही मी लोकशाहीवादी असल्यामुळे, ९५ टक्के लोक सांगतात त्या अर्थी देव असणारच हे मला पटले . . . आणि, मी आस्तिक व्हायचे ठरवले.
मला वाटले होते, मी आस्तिक झाल्यावर माझे अनेक अनुत्तरित प्रश्न चुटकीसरशी सुटतील–मनःशांती मिळेल–जीवनाला प्रेरणा मिळेल—-किमान गोंधळ तरी दूर होईल. मात्र घडले उलटेच! ईश्वर नाहीच असे मानणारा मी कधीच नव्हतो! असल्यास, असू दे आणि नसल्यास नसू दे बापडा! असे माझे धोरण होते. पण ईश्वर आहे असे मानायला लागल्याबरोबर मनात प्रश्नांची मालिकाच सुरू झाली! ईश्वर किती आहेत? त्यांची नावे काय? ते कसे दिसतात? कुठे असतात? काय करतात? का करतात? कसे वागतात? का वागतात? एक ना दोन, हजार प्रश्न उपस्थित झाले! आणि मी भेटेल त्या आस्तिकाला या प्रश्नांची उत्तरे विचारू लागलो, जेणेकस्न कोणत्या-किती आणि कशा ईश्वरांना कसे मानावे हा प्रश्न सुटेल. पण मिळालेली उत्तरे इतकी अफलातून होती की त्या प्रत्येक उत्तरातून आणखी अनेक उपप्रश्न उपस्थित झाले! उदा. देव किती आहेत या साध्या-सोप्या प्रश्नाला ‘एक’ पासून ३३ कोटींपर्यंत वाट्टेल ती उत्तरे मिळाली. म्हणजे, काहींच्या मते प्रत्येक माणसाच्या वाट्याला एक अब्जांश देव येत होता, तर काहींच्या मते माणशी एक देव पडेल एवढा देवांचा साठा उपलब्ध होता! जी गोष्ट देवांच्या संख्येबाबत होती. तीच देवांच्या नावाबाबतही! (जे साहजिकच आहे म्हणा!) जितकी देवांची संख्या तितकीच त्यांची नावेही! त्यातही काही देवांच्या बाबतीत तीन वेगवेगळ्या नावांचे देव एकत्र येऊन चौथ्याच नावाचा एक स्वतंत्र देव झालेलाही आढळला. पुन्हा, काहींच्या मते अनेक नावे असली तरी देव एकच आहे, तर काहींच्या मते नाव एकच असले तरी देव वेगवेगळेच आहेत! या कोट्यवधी ‘ऑप्शन्स्’ मुळे माझा गोंधळ अधिकच वाढला.
देवांच्या दिसण्याबाबतही आस्तिकांमध्ये एकमत नाहीच. काही आस्तिकांचे देव वर्णाने काळे, काहींचे गोरे . . काहींचे देव तर हिरवे-निळे सुद्धा आहेत. काही देवांचा काही भाग जनावरांसारखा दिसतो तर काही जण जनावरांनाच देव मानतात. देवांच्या मूर्त स्वरूपाबद्दल आस्तिकांमध्ये प्रचंड मतभेद तर आहेतच, पण जे आस्तिक देव निर्गुण-निराकार असल्याचे मानतात त्यांच्यातही तितकेच मतभेद आहेत. ईश्वर कोठे असतो याबाबतही काही कमी गोंधळ नाहीत! मोठेमोठे पर्वत व नद्यांपासून करोडो मंदिरे, प्रार्थना स्थळे–थडग्यांपर्यंत अब्जावधी ठिकाणी ईश्वर असल्याचे ठामपणे सांगितले जाते. देवांच्या वास्तव्याच्या वादात नद्या-पर्वत तर सोडा पण गाईचे पोटदेखील सुटलेले नाही. (एवढे देव पोटात ठेवूनही गाईचे पोट वेगळ्या अर्थाने ‘सुटलेले’ नाही हे पुन्हा एक आ चर्यच!) काहींच्या मते देव पूर्वेकडे राहतो तर काहींच्या मते प िचमेकडे. वास्तविक, यांपैकी कोणत्याही दिशेने जरी देव निघाला तरी पृथ्वी गोल असल्यामुळे तो पुन्हा जेथून प्रवास सूरू केला तेथेच उलट्या दिशेने परत येईल. त्यामुळे ईश्वराने वास्तव्यासाठी कोणतीही दिशा धरली तरी काय फरक पडतो? . . . याचे उत्तर मात्र कोणताही आस्तिक देत नाही. गंमत म्हणजे, काही जण ईश्वर पृथ्वीवर राहातच नाही, तो आकाशात राहतो आणि पृथ्वीवर एखाद्या कुरीयरप्रमाणे प्रेषित पाठवून त्याच्यामार्फत फक्त संदेश पाठवतो असे सांगतात. त्या आकाश नावाच्या ठिकाणातही स्वर्ग, जन्नत, हेवन वगैरे मतभेदाचे प्रकार आहेत ही गोष्ट ‘अल्ला’ हिदाच! ईश्वर अधूनमधून एखाद्या माणसात प्रवेश करतो किंवा माणसाचे स्पच धारण करतो असेही काहीजण सांगतात. पण या कोणत्याही बाबतीत ईश्वर तसेच का करतो याचे उत्तर मात्र कोणीही आस्तिक देत नाही. म्हणजे, प्रश्न न विचारता ते सांगतात तसे निमूट मानावे. पण तरीही त्यातले नेमके कोणाचे खरे मानावे हा प्रश्न राहतोच!
ईश्वराच्या नावात, स्वरूपात व स्थानात आस्तिकांचे एकमत तर नाहीच, परंतु ईश्वराच्या कार्यपद्धती व कार्यकक्षेबाबतही एकवाक्यता नाही. काही जणांच्या मते ईश्वर हा प्रत्येक माणसाच्या पापपुण्याचा एखाद्या अकाऊंटंटप्रमाणे हिशेब ठेवतो. काही म्हणतात की संपूर्ण विश्वाचा कर्ताकरविता ईश्वरच आहे, तर काहींच्या मते ‘माणसाने कार्य करत राहावे, ईश्वर फक्त मदत करतो.’
एकंदरीत, ईश्वराचे नाव, ठाव-ठिकाण, कार्य, वागणूक या कोणत्याही बाबतीत आस्तिकांमध्ये एकमत दिसत नाही. आस्तिकांचे प्रतिपादन व वर्तनातील विसंगती ही केवळ धर्म-प्रांत-जात-भाषा या बाबींवरच आधारित आहे असे नव्हे. तर ही विसंगती ही प्रत्येक आस्तिकाच्या वर्तनात स्वतःच्याच प्रतिपादनाशीही आहे. चराचरात ईश्वर आहे किंवा आकाशात (स्वर्गात) ईश्वर आहे असे म्हणणारी व्यक्ती एखाद्या विवक्षित ठिकाणी देवदर्शनासाठी अथवा प्रार्थनेसाठी जाते. नावे वेगवेगळी असली तरी ईश्वर एकच आहे असे मानणारी व्यक्ती शंभरएक देवांची पूजा करते . . . आणि तरीही सहसा परधर्माच्या ईश्वराची परधर्माच्याच विधींनुसार पूजा किंवा प्रार्थना करत नाही. उलट बहुतांश आस्तिकांस परधर्मीय ईश्वराचा व उपासनापद्धतीचा तिटकारा असतो. एका धर्माच्या ईश्वरावर श्रद्धा ठेवणाऱ्या आस्तिकांना परधर्माच्या ईश्वराबाबत अपशब्द वापरताना त्यांच्या धार्मिक स्थळांचा विध्वंस करताना ईश्वराची भीती वाटत नाही. एखादे देवस्थान ‘जागृत’ आहे सांगणारा आस्तिक त्याच देवाची इतर स्थाने ‘सुप्त’ आहेत असे मानण्यास नकार देतो. ‘ईश्वर साऱ्या जगाचा सांभाळ करतो’ असे सांगणारा आस्तिक ‘बालमृत्यू, भूकंप-वादळा’मुळे होणाऱ्या जीवितहानी याबाबत गप्प बसतो. साऱ्या विश्वाचा ‘तो’ ‘कर्ता-करविता’ आहे असे सांगणारा आस्तिक ‘पाप करणाऱ्यास ईश्वर शिक्षा देईल’ असेही सांगतो. समजा, अशा आस्तिकाची एखादी आवडती व्यक्ती नास्तिक असेल तर तो आस्तिक परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, ‘परमेश्वर ह्या नास्तिकास माफ करो आणि त्यास सद्बुद्धी देवो’ — जेणेकरून तो नास्तिक परमेश्वराला मानायला लागेल. या साऱ्या प्रकारात आपण विसंगत वागत आहोत असे कोणाही आस्तिकाला कधीही वाटत नाही. विश्वाचा ‘सांभाळ’ करणारा ईश्वर बालमृत्यू-भूकंप का घडवतो? बालके-अर्भके यांसारख्या निष्पाप– निरपराध्यांना तो का मास्न टाकतो किंवा अपंग बनवतो? ईश्वर जर ‘विश्वाचा कर्ता-करविता’ आहे, तर नास्तिकाला नास्तिक बनवणारा आणि पाप्याला पाप करायला लावणाराही ‘तो’च असला पाहिजे. मग, त्या नास्तिकाला आस्तिक बनवण्याची प्रार्थना त्याच ईश्वराकडे करून काय फायदा? ‘त्यानेच’ निर्माण केलेल्या पाप्याला त्याने शिक्षा का द्यावी? असे प्रश्न आस्तिकांना पडतच नाहीत. अशा प्रश्नांना ते उत्तरे देतच नाहीत. किंवा दिलीच, तर त्या कोणत्याही दोन आस्तिकांच्या उत्तरांत साम्य नसते.
तथापि, देवाचे नाव-स्वस्प-स्थान-कार्यकक्षा-कार्यपद्धती-पोषाख या प्रत्येक बाबतीत मतभेद असणाऱ्या आस्तिकांचे ‘ईश्वराची उपासना सर्वांनी केलीच पाहिजे–त्याची प्रार्थना केलीच पाहिजे–त्याच्या पाया पडलेच पाहिजे’ याबाबतच्या आग्रहात मात्र विलक्षण साम्य आढळते. ईश्वराचे अस्तित्व नाकारणाऱ्यास अथवा त्याच्या अस्तित्वास आव्हान देणारी कोणतीही कृती करणाऱ्यास ईश्वर शासन घडवेल—-त्याचा सर्वनाश करेल याबाबतही तमाम आस्तिकांचे एकमत असते. धर्मग्रंथ-पूजा-अर्चा-प्रार्थना या सर्व गोष्टींमध्ये जागोजाग, वारंवार नास्तिकांना धमक्या दिलेल्या आढळतात, आणि या धमक्या ईश्वराने लवकरात लवकर अंमलात आणाव्यात असे आस्तिकांना मनोमन वाटत असते. कधी ना कधी ईश्वर या नास्तिकांना ‘धडा’ शिकवील आणि मगच ते आस्तिक बनतील याबाबत कोणाही आस्तिकांमध्ये दुमत नसते. कित्येकदा तर आस्तिक त्यासाठी ईश्वराची वाट न पाहता परस्पर नास्तिकांना ‘धडा’ शिकवून मोकळेही होतात. आणि नेमक्या याच प्रकारांमुळे माझ्या आस्तिक बनण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आणि ती आजही कायम आहे.
ईश्वर अस्तित्वात असला, तर असू दे! मी त्याचे अस्तित्व मानायला तयार आहे . . . किंबहुना, तो जर अस्तित्वात असला तर ते नाकारणारा मी कोण? . . . पण मी त्याच्या पाया पडावे . . . मी त्याची प्रार्थना-याचना करावी . . . पूजा करावी अशी त्याची किंवा त्याच्या भक्तांची अपेक्षा का? जगात अनेक क्षेत्रांमध्ये अनेक सामर्थ्यवान मंडळी अस्तित्वात आहेत. सचिन तेंडुलकर, विश्वनाथ आनंद, भीमसेन जोशींपासून पेले, टायसन, बुश पर्यंत कित्येक मातबर–सामर्थ्यवान मंडळी जगात अस्तित्वात आहेत. आणि त्यांचे सामर्थ्य मला मान्य आहे. हा जो कोणी ‘ईश्वर’ आहे. तो या सर्वांपेक्षा जास्त सामर्थ्यवानही असेल. पण असे बाकीच्या मातबर मंडळींनी किंवा त्यांच्या चमच्यांनी ऊठसूट मला त्यांच्या पाया पडायला सांगितले किंवा ते माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर परिणामांची तमा न बाळगता मी उत्तर देईन, ‘मोठा असलास तर तुझ्या घरी. . . ! गेलास उडत!’ ईश्वर जर खरोखर अस्तित्वात असला तर त्याने भक्तांना सुद्धा स्वतःच्या पाया पडू देण्यास मनाई केली पाहिजे किंबहुना ‘भक्त’ बाळगणे सुद्धा थांबवले पाहिजे. कारण, खरा ‘मोठा माणूस’ आपण त्यालाच मानतो जो लोकांना आपल्या पाया पडू देत नाही. पदरी चमचे बाळगत नाही. लोकांनी आपल्या पाया पडावे, प्रत्येक चांगल्या घटनेचे श्रेय आपल्याला द्यावे, लोकांचे ईप्सित पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून ‘लाच’ घ्यावी, लोकांचे वाईट न करण्यासाठी त्यांच्याकडून ‘खंडणी’ घ्यावी, खंडणी न देणाऱ्यास धमक्या दिल्या जाव्यात, एकंदरीत, कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ केली जावी, असले सारे प्रकार एखाद्या माणसाने केल्यास आपण त्याला ‘गुंड’ किंवा ‘दादा’ म्हणतो. अशा माणसाची तरफदारी करणाऱ्यास आपण त्याचा ‘चमचा’ म्हणतो. तसेच ‘गुंडगिरी–दादागिरी’ करणाऱ्यासमोर झुकणे हे त्या अनैतिकतेस प्रोत्साहन देणे आहे असे आपण मानतो. या ‘दादागिरी’ सारख्या अनैतिकतेमध्ये मी ‘देवाचा’ ‘अपवाद’ करायला तयार नाही किंवा त्याला खास सवलत द्यायलाही तयार नाही.
ईश्वर आहे की नाही, तो विश्वाचा कर्ता-करविता आहे की नाही यावर मी वाद घालू इच्छित नाही, कारण तो वाद पुन्हा निष्फळ आणि अनिर्णितच होणार! त्याऐवजी मी त्याचे आस्तित्व आणि सामर्थ्य मान्य करतो. . . . आणि त्याची संख्या-स्पे-पोषाख-कार्यपद्धत वगैरेही मान्य करतो. . . . पण त्याच्या ‘दादागिरीस आणि व्यक्तिगत आयुष्यातील ढवळाढवळीस प्रोत्साहन मिळेल असे कोणतेही कृत्य मी करणार नाही. मग, भले त्या लाचारीला —- पाया पडण्याला लोक ‘पूजा’ किंवा ‘प्रार्थना’ म्हणोत, त्या लाचेला — खंडणीला लोक ‘नैवैद्य-दक्षिणा’ किंवा ‘चादर’ वगैरे म्हणोत, त्याच्या ‘चमच्यां’ना ‘धर्मगुरू’ किंवा ‘भक्त’ म्हणोत किंवा त्या कार्यपद्धतीला ‘धर्म’ असे नाव देवोत. आणि ‘टोळी-युद्धाला’ ‘धर्मयुद्ध’ असे नाव देवोत! ही चमचेगिरी-टोळीयुद्धे खपवून घेणारा कोणीही असो, मग तो साक्षात् ईश्वर का असेना आणि तो अस्तित्वात का असेना. त्याला व त्याच्या चमच्यांना माझा जबाब आहे, ‘गेलास उडत! . . . काय करायचंय ते माझं वाईट करून घे . . . पण मी तुझ्यासमोर झुकणार मात्र नाही!’
ईश्वराबाबतची ही भूमिका तथाकथित ‘आस्तिकांना’ योग्य वाटेल काय? याचे उत्तर ‘होय’ असल्यासच ‘मी आस्तिक व्हायला तयार आहे!’
कुठेतरी,
दातेनगर, मते नर्सरी रोड, गंगापूर रोड जवळ, नाशिक — ४२२ ००५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.