नैतिक उपपत्तींचे दोन प्रकार

नीतिशास्त्राच्या इतिहासाकडे थोड्या बारकाईने पाहिल्यास त्यातील नीतिशास्त्रीय व्यवस्थांचे किंवा उपपत्तींचे स्थूलमानाने दोन प्रकार आढळून येतात. त्यांना अनुक्रमे empirical आणि transcendental अशी नावे देता येतील. empirical म्हणजे अनुभववादी आणि transcendental म्हणजे अतिक्रामी. अनुभववादी उपपत्ती अर्थातच पंचज्ञानेंद्रिये आणि मन यांच्यावर आधारलेली; आणि अतिक्रामी म्हणजे सामान्य अनुभवांखेरीज अन्य ज्ञानस्रोतांवर विश्वास ठेवणारी. या दुसऱ्या वर्गातील उपपत्तीत intuition (साक्षात्कार)१ या ज्ञानसाधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो, उदा. goodness किंवा साधुत्व हा काही इंद्रियगोचर गुण नव्हे. तो जाणण्याकरिता अनेंद्रिय साक्षात्काराची आवश्यकता असते. तसेच कर्तव्याची कल्पनाही अनेंद्रिय साक्षात्काराशिवाय आकलन करणे अशक्य आहे. उलट अनुभववादी उपपत्तींचा भर ऐंद्रिय अनुभवावर असतो. अनुभववादी उपपत्तीचे उदाहरण द्यायचे तर उपयोगितावादाचे देता येईल. या उपपत्तीत सर्व कल्पना शेवटी अनुभवाच्या क्षेत्रातील असतील. अतिक्रामी उपपत्तीचे उदाहरण म्हणून कांटच्या उपपत्तीकडे बोट दाखविता येईल. कांट साक्षात्कार आणि व्यावहारिक प्रज्ञा (practical reason) दोन्ही मानतो. अतिक्रांत जगाचे विस्तृत वर्णन तो देतो. दुसरे उदाहरण जी. ई. मूरचे देता येईल. मूर अतिक्रांत जगाविषयी काही बोलत नाही. पण तो साक्षात्कार मानतो. उदा. साधुत्व (goodness) हा गुण नैसर्गिक, इंद्रियगोचर गुणांहून त्याच्या मते अतिशय भिन्न आहे. त्याचे ज्ञान आपल्याला साक्षात्काराने होते असे मूर म्हणतो. रॉस नावाचा दुसरा एक लेखक कर्तव्याची (ought) कल्पना साक्षात्कारावाचून कळणे अशक्य आहे असे म्हणतो. ही कल्पना म्हणजे सर्वथा बंधनकारक कर्तव्याची कल्पना. अमुक एक कर्म किंवा कर्मप्रकार आपल्यावर निरपवाद बंधनकारक आहे हे आनुभविक साधनांनी कळू शकत नाही. तिचे ज्ञान होण्याकरिता साक्षात्काराची गरज आहे. कांटची व्यावहारिक प्रज्ञा हे लक्षात येण्याकरिता अपरिहार्य आहे. पण जर निरपवाद कर्तव्याची कल्पना अतिक्रांत असेल, तर मग उपयोगितावादी निरपवाद कर्तव्याची कल्पना अशक्य आहे असे म्हणता येईल. म्हणजे निरपवाद कर्तव्याची कल्पना उपयोगितावाद्याला स्वीकारता येणार नाही. पण हे आपल्या सामान्य मताच्या विरुद्ध मत होणार आहे, ते उपयोगितावाद्याला मान्य आहे काय? ते मान्य करणे आपल्या सामान्य नैतिक अनुभवाच्या विरुद्ध होणार नाही काय?
उपयोगितावाद्याला निरपवाद कर्तव्याची कल्पना मान्य नाही. तो म्हणतो की असे एकही कर्म नाही की जे आपण अपरिहार्यपणे केलेच पाहिजे. अशी कर्तव्ये आहेत ही आपली चुकीची समजूत आहे. असत्य भाषण पुष्कळदा करावे लागते. फार काय हत्येसारखी निषिद्ध कर्मेही आपल्याला करावी लागतात, नव्हे ती क्षम्य असतात, आणि कदाचित् ती कर्मे विशिष्ट परिस्थितीत करणे आपले कर्तव्य असते. त्यामुळे निरपेक्ष बंधनकारक कर्मे नाहीत असा निष्कर्ष काढावा लागतो. तसेच साधुत्वाची कल्पनापण आनुभविक नाही असे म्हणावे लागते. मग आनुभविक दृष्टिकोनातून साधुत्व म्हणजे काय असेल? अनुभववाद्याची साधुत्वाची कल्पना म्हणजे इच्छाविषयाची कल्पना. एखादी गोष्ट साधु आहे याचा अर्थ तिची आपण इच्छा करतो. थोड्या वेगळ्या भाषेत असे म्हणता येईल की इच्च्छातृप्तिविषय म्हणजे चांगुलपणा. या अर्थी चांगलेपणा ही गोष्ट व्यक्तिनिरपेक्ष नाही, ती व्यक्तिसापेक्ष आहे. ज्या वस्तूची आपण इच्छा करतो ती वस्तु इतर कुणाच्याही इच्छेचा विषय नाही असे असू शकेल. माझी इच्छातृप्ती म्हणजे मला साधु वाटणारी गोष्ट. आता साधारणपणे आपण असे म्हणतो की मनुष्य निसर्गतः स्वार्थी आहे. ही गोष्ट स्थूलमानाने खरी आहे. आपल्या अनेक इच्छा आपल्या अपत्यांच्या इच्छा-पूर्तीच्या असतात. मित्रांची इच्छापूर्तीही आपण इच्छितो. ज्याला अपत्यप्रेम आणि मित्रप्रेम नाही असा मनुष्य सापडणार नाही. तसेच गरिबांच्या इच्छा मोठ्या प्रमाणात अपूर्ण राहतात ही गोष्ट आपल्याला आवडत नाही, आणि आपण हस्ते परहस्ते त्यांच्या इच्छापूर्तीला हातभार लावतो. एवढेच नव्हे आपल्या ओळखीच्या माणसांपुरती ही सहानुभूती मर्यादित राहात नाही. आपण देशबांधवांवर प्रेम करतो. देशावर संकट आले तर आपण त्याच्या निवारणार्थ थोडाबहुत प्रयत्नही करतो. याच गोष्टीचे रूपांतर उपयोगितावादाच्या जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे आपले प्राप्तव्य आहे या मतात व्यक्त झाले आहे. आपण केलेली इतरांची इच्छापूर्ती ही तुलनेने विरळ असल्यामुळे तिचे आपल्याला अप्रूप वाटते, आणि ती गोष्ट आपण अधिक महत्त्वाची मानतो.
आता जर कोणतीही वस्तू स्वख्यतः साधु नसेल, आणि अनिवार्यपणे बंधनकारक वागण्याचा नियम नसेल, तर नीतिशास्त्र अशक्य आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे अनुभववादी दृष्टिकोणातून नीतिशास्त्र अशक्य होणार नाही काय? या प्र नाला उत्तर आहे, “तसा निष्कर्ष काढण्याची गरज नाही”, आजपर्यंत आपण अतिक्रांत नीतिशास्त्राविषयी ऐकत होतो. अनुभववादी नीतिशास्त्र एकतर कोणी मानतच नव्हते, किंवा त्याची टर उडविली जात होती. पण काळजीपूर्वक विचार केल्यास वर्तमानकाळी नीतिशास्त्राची अवस्था काय आहे? स्वस्पतः साधु गोष्टी आणि अनिवार्य वागण्याचे नियम नीतिशास्त्राच्या पुस्तकात राहतात, प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना कोणी भीक घालताना दिसत नाही. सर्वथा बंधनकारक नियम कोणीही मानताना दिसत नाही. नैतिक नियमांचा घोर भंग सामान्यपणे कोणी करीत नाही, आणि ज्यांना साधु म्हटले जाते त्या वस्तूंची विटंबना फारशी कोणी करीत नाही. त्यामुळे अनुभववादी नीतिशास्त्र प्रचलित झाले तर एकदम आकाश कोसळेल अशी स्थिती नाही.
समाजामध्ये राहण्याकरिता काही नियमांचे पालन करावे लागते याची जाणीव समाजात हळूहळू रुजली आहे. कायद्याचा बडगा उगारावा लागला तरी ते सामान्यपणे पुरते. कायद्याचा भंग करणारे अनेक लोक आहेत. पण म्हणून कायद्याचे राज्य अशक्य होत नाही. त्याच धर्तीवर नीतीच्या क्षेत्रातही नीतीचे राज्य अशक्य होईल अशी भीती बाळगणे योग्य होणार नाही.
कर्मयोग अपार्टमेन्टस्, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.