खादीचे नवसर्जन

[‘साम्ययोग साधना’ (१६ मे २००१) या नियतकालिकातील हा लेख आ. सु. त सुरू असलेल्या विचारमंथनाचा भाग वाटला, म्हणून तो त्यांच्या सौजन्याने येथे घेत आहे. हा लेख मोहनींच्या लेखाला उत्तरादाखल लिहिलेला नाही. (तिरपा टाइप आ. सु. च्या संपादकाचा)]
१९०८ मध्ये गांधींच्या मनात चरख्याची कल्पना पहिल्यांदा आली. गिरण्या उभ्या राहिल्या तर विणकरांचे काय होईल, हा प्रश्न मनात उभा झाला आणि गांधी हातकताईच्या शोधात लागले. एका महिला कार्यकर्तीने गुजराथमध्ये विजापूरला कताई जाणणाऱ्या मुसलमान भगिनींचा शोध लावला आणि कताईचा जन्म झाला. १९१५ मध्ये गांधी प्रथम विणकर झाले. १९१८-१९ मध्ये चरख्याचा पुनर्जन्म/जीर्णोद्धार झाला. खादी-विचाराचा आरंभ सुरवातीला गरिबीने पीडित लोकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने झाला. परदेशी कपड्याचा बहिष्कार या स्पात राजकीय क्षेत्रात खादी शोषणव्यवस्थेविरुद्ध संघर्षाचे प्रतीक बनली. सामाजिक क्षेत्रात, श्रमप्रतिष्ठेवर आधारित सहयोगी समाजाची संकल्पना प्रस्तुत झाली.
खादीचे आर्थिक मूल्य
गरिबी राष्ट्राचे शरीर आणि आत्मा यांचे हनन करते. उद्योगवाद हा गरिबी नष्ट करण्याचा उपाय नव्हे. यंत्रांनी उत्पादित वस्तू बाजारात श्रममूल्य इतके खाली आणतात की श्रमजीवी कुटुंबाला दोन घास मिळणे अशक्य होऊन बसते. उद्योगवादाचा सगळा आधारच शोषणावर आहे. अतिरिक्त मूल्यातून केंद्रित झालेली संपत्ती धन-सत्तेच्या शोषणाला प्रोत्साहन देते. हजारो मजुरांना ती बेकार बनवते. उद्योगवाद एका बाजारू संस्कृतीला जन्म देतो. उद्योगवादाला कच्च्या मालाची आणि बाजाराची गरज असते. बाजारात माल विकण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दिली जातात. अनावश्यक वस्तू बाजारात आणल्या जातात. स्पर्धा ही बाजाराचे अंतरंगच असते. परिणामी भोगवादी संस्कृती जन्म घेते. हिंसा या संस्कृतीचा स्वभाव असतो. अशा विनाशकारी उद्योगवादी सभ्यतेला पर्याय म्हणून खादी पुढे आली. जो देश स्वतःला अमर्याद आंतरराष्ट्रीय स्पर्धेची शिकार होऊ देतो, तो गुलाम बनतो, कारण तो अन्नान्नदशेला लागतो. पिठाच्या गिरण्या घरांतील जात्यांना, तेलाच्या गिरण्या ग्रामीण बैलघाण्यांना, तांदळाच्या गिरण्या ग्रामीण ढेकींना, साखरेच्या गिरण्या ग्रामीण गूळ उद्योगाला गिळंकृत करतात. भारतातील प्रत्येक गावात काम आणि मजुरी देण्याचा अधिक चांगला उपाय सापडत नाही तोवर लाखो ग्रामीणांच्या दृष्टीने खादीच एकमेव, खरी आर्थिक योजना आहे, असे मांडून गांधींनी खादीला अन्नपूर्णा म्हटले, भाकरीवर लोणी देणारी म्हटले. खादी एकमेव सार्वत्रिक उद्योग असल्याचे प्रतिपादन कस्न गांधींनी समजावले की कताई-विणाई सहजपणे शिकता येते. भांडवल नगण्य लागते. कमीत कमी व्यवस्थाखर्चात जास्तीत जास्त (८५%) भुके-कंगालांचे पोट भरणारे, मानवीय तंत्रज्ञानाचे हे अद्वितीय उदाहरण आहे.
खादी गरिबी कमी करते. सामान्य लोकांसाठी श्रम हेच धन आहे. पैशाच्या उणिवेपेक्षा कामाची उणीव हा त्यांचा रोग आहे. शेतकऱ्याला वर्षात चार महिने जवळपास काम नसते. चरखा तेव्हा कामी येऊ शकतो. अन्नदानावर आश्रित भगिनींना प्रतिष्ठेसह रोजगार देऊन स्वावलंबी बनवणे अधिक औचित्यपूर्ण होईल. खादी ग्रामोद्धाराचे आणि अंत्योदयाचे प्रतीक बनली पाहिजे. सामान्य अर्थशास्त्र उघडपणे स्वार्थी असते. त्यात मानवीय तत्त्वांचा विचार अजिबात केला जात नाही. खादी मानसिकतेचा अर्थ आहे, जीवनाला आवश्यक वस्तूंचे उत्पादन आणि वितरण यांचे विकेंद्रीकरण. खादी एक विचार आहे. त्यात स्पर्धा नसते. किंमतींचा चढउतार नसतो. हॉटेल आणि घरच्या स्वयंपाकघरांत कधी स्पर्धा नसते. खादी जेथे निर्माण होते तेथेच उपयोगात आणता येते. खादी मानवधर्माला अनुकूल मानवीय अर्थशास्त्र आहे.
खादीचे सामाजिक मूल्य
खादी शेजाऱ्यांच्या उपयोगासाठी केला जाणारा कुटीर उद्योग आहे. शेजाऱ्यांच्या आवश्यकतेनुसार उत्पादन होईल. निर्वाहापुरते सर्वांना मिळावे या सद्-भावनेतून परस्परावलंबी जीवनाचा पाया मजबूत होईल. स्वदेशी भावनेचे प्रतीक असलेली खादी सहयोगी समाज घडवू शकते. खादी श्रमप्रतिष्ठा साकार करण्याचे माध्यम आहे. हाताने मेहनत करण्याची टाळाटाळ करणाऱ्या, त्याला हीन समजणाऱ्या लोकांना खादी शरीरश्रमाची प्रतिष्ठा शिकवील. इंग्रजी शिक्षणपद्धतीने बौद्धिक श्रमाला जास्त महत्त्व देऊन उच्च-नीचतेची जी भावना निर्माण केली आहे, समाजात जी खाई उत्पन्न केली आहे, ती नष्ट कस्न श्रमजीवी व बुद्धिजीवींमध्ये एकतेचा संबंध प्रस्थापित करणे हे खादीचे सामाजिक मूल्य आहे.
खादीचे राजकीय मूल्य
चरखा व्यापारी शांतीची निशाणी आहे. त्याचा संदेश सद्भाव आणि स्वावलंबनाचा आहे. विनाशकारी उद्योगवादाविरुद्ध आपल्या अंगणातून लढल्या जाऊ शकणाऱ्या लढाईतील ते शस्त्र आहे. आपापल्या घरी सूत कातण्याचा लाखो लोकांचा निश्चय यासाठी आवश्यक आहे. असे होईल तेव्हा खादी सत्याग्रहाचे प्रतीक बनेल. गांधी अहिंसात्मक संघर्षाची पायाभरणी करीत होते. ते अहिंसेचे इंजेक्शन म्हणून खादीचा उपयोग करू इच्छित होते. जवाहरलाल नेहरूंच्या काव्यमय शब्दांत, “खादी भारताच्या स्वातंत्र्याचा गणवेश आहे.” (Livery of freedom.)
व्यवहाराच्या धरतीवर
मजुरीसाठी खादी स्वीकारली गेली. अ. भा. चरखासंघ काम करू लागला. व्यापारी प्रकाराने खादीचा विकास झाला. परंतु, मजुरीसाठी सुरू झालेली खादी बाजारात आल्यावर योग्य निर्वाहमूल्य देऊ शकली नाही. विनोबाजींनी दिवसभर कताई कस्न तिच्या मजुरीवर उदरनिर्वाह करण्याचे प्रयोग केले. योग्य निर्वाहमूल्य न मिळाल्यामुळे अक्षरशः चणे-फुटाणे खाऊन आणि संध्याकाळी उपवास करून विनोबाजींनी निःसंदिग्धपणे दाखवून दिले की कत्तिनाला दिले जाणारे पारिश्रमिक भिक्षेहून जास्त नाही. श्रममूल्य वाढवले तर चरखासंघाचे बाजाराचे समीकरण जुळत नव्हते, आणि गांधींचा न्याय्य-आग्रहही तो टाळू शकत नव्हता. शेवटी चरखासंघ श्रम-मूल्य अंशतःच वाढवू शकला. व्यवहारात खादी कत्तिनांना भाकरीच्या तुकड्यांची भिक्षाच काय ती देऊ शकली. ती दिवसभरचा उद्योग बनू शकली नाही. वाया जाणाऱ्या वेळेचा उपयोग करून संपत्ती निर्माण करणे एवढेच तिचे स्वरूप राहिले. खादी एकट्याने गावांचे उत्थान घडवून आणू शकणार नाही, गावातल्या सगळ्या उद्योगांच्या पुनरुद्धाराशिवाय संपूर्ण ग्रामजीवन उद्यमशील बनवता येणार नाही, ही व्यापारी खादीने लादलेली मर्यादा स्पष्ट झाली. खादी ग्रामोद्योगांच्या सूर्यमालेचा सूर्य भलेही असो, विभिन्न उद्योगांच्या ग्रहांचा आधार तिला लागणारच. खादी वापरणाऱ्यांना कताई करण्याची इच्छा नव्हती. आर्थिक दृष्टीने सक्षम असणाऱ्या या वर्गाला, भांडारातून व्यापारी खादी खरेदी करून कत्तिनांवर उपकार केल्याच्या भावनेतून कर्तव्यपूर्तीचे बेगडी समाधान लाभत होते. कातणाऱ्यांना खादी वापरण्याची इच्छा नव्हती, कारण बाजारची खादी महाग होती आणि हा वर्ग गरीब होता. दारिद्र्यामुळे स्वावलंबनाचे मूल्य रुजू शकले नव्हते. वापरणाऱ्यांनी व्रतपूर्वक खादीचा स्वीकार केला नव्हता. म्हणून १९३४ पासूनच गांधीजी म्हणू लागले—- ‘काते वे पहनें, पहने वे कातें.’
१९४२-४३ च्या तुरुंगवासात गांधीजींना सूक्ष्म चिंतन करण्याची संधी मिळाली. अ. भा. चरखा संघाचे मंत्री श्रीकृष्णदासजी जाजू यांच्यासोबत सात दिवस रोज एक तास झालेल्या मनोमंथनात गांधीजींनी आपला उत्क्रांत खादी विचार प्रकट केला —-
१. ‘खादीला मी पैसा दिला खरा, परंतु खरी वस्तू—-स्वावलंबन—-लोकांना देऊ शकलो नाही. आम्ही त्यांना रोजगार देतो असे तरी कसे म्हणायचे —- एक प्रकारची भिक्षाच आम्ही त्यांना देतो, जशी दुष्काळाच्या प्रसंगी दगड फोडून घेऊन किंवा रस्ता तयार करवून त्यांना दिली जाते. आज चरखा अशा प्रकारच्या मदतीचे साधनच आहे.’
२. ‘खादीला जर गरिबांना भाकरी देण्यापुरते सीमित ठेवले तर खादी अहिंसेद्वारा स्वराज्य मिळवून देण्यात मदतगार ठरणार नाही. अहिंसेचे शस्त्र लोकांच्या हाती अगतिकतेतून ठेवले जाऊ नये.’
३. ‘आंशिक बेकार गावकऱ्यांना मदत देण्यासाठी व्यापारी खादी जोपर्यंत चालेल, तोपर्यंत ती सर्वव्यापी बनणार नाही. हस्तकला म्हणून काही लोकांचा तो उद्योग राहील. चरख्याचा संदेश घरोघर पोचलेला नाही. ग्रामीण लोकांसाठी खादी आम्ही सहज-प्राप्य बनवू शकलो नाही, ही आमची हार आहे.’
४. ‘आम्ही चरखा चालवला, परंतु विचारपूर्वक नव्हे, तर यांत्रिकपणे. समजून-उमजून कताई करा. समजून उमजून कातायचे म्हणजे कताई अहिंसेचे प्रतीक समजून कातायचे.’ विनोबांच्या शब्दांत —- ‘खादी जर मदतीसाठी असेल, तर तिच्यातील करुणा दासी आहे, आणि अहिंसक खादीत (स्वावलंबनासाठी असलेल्या खादीत) ती राणी आहे. दासी बनून हिंसेची सेवा करणाऱ्या करणेत लढाई बंद करण्याची शक्ती नसते. खादी दासीच्या रूपात राहिली तर असून नसून सारखीच.’
गांधी-विनोबांच्या अनुसार खादी विक्रीची वस्तू असू नये. ती विकण्याची वस्तू नाही, वापरण्याची आहे. स्वावलंबनातून होणाऱ्या शक्ति-साधनेला गांधीजी मुख्य स्थान देत असत. वस्त्रस्वावलंबनाचा व्रतपूर्वक स्वीकार हीच स्वराज्याची शक्तिसाधना असेल, या मुक्कामावर गांधीजी पोचले होते. यापेक्षा खाली येणे म्हणजे खादी केवळ मदतीचे साधन असणे. खादी केवळ अर्थशास्त्र नाही, तर अनिवार्यपणे नीतिशास्त्रही आहे. विनोबा म्हणाले होते —- इंग्रजांपूर्वी मोगल, तुर्क, पठाण इत्यादींचे राज्य होते. तेव्हा देश परतंत्र होता आणि गावे स्वतंत्र होती. इंग्रजांच्या काळात देश परतंत्र होता आणि गावेही परतंत्र होती. आज स्वतंत्र देशातही गावे परतंत्रच आहेत. देश आणि गावे, दोन्ही स्वतंत्र होणे हे आपले पुढचे पाऊल असेल. खादी त्या उत्क्रांत सामाजिक व्यवस्थेचे प्रतीक असेल. उत्क्रांत खादी-विचारासाठी गांधींनी तंत्रही सुचवले – “मी कत्तिनाला म्हणेन, तू स्वतःसाठी कात. मी तुझे सूत विणवून देईन. शहरे काय किंवा खेडी काय, खादी सार्वजनिक व्हायची असेल तर ती सुताच्या बदल्यातच मिळाली पाहिजे.” “खादीची विक्री बंद व्हावी. सुताच्या बदल्यात कापड देण्याच्या धोरणामुळे सगळी खादी भांडारे बंद पडली आणि खादी वापरणाऱ्यांनी खादी सोडून दिली तर मी हा सत्याचा विजयच मानेन.’ हे परिवर्तन व्हावे म्हणून चरखासंघाने स्वतःला विसर्जित केले तर खादीवाल्यांची शक्ती वाढेल, चरखासंघाचे विसर्जन ही स्वराज्याची विकेंद्रित शक्ति-साधना सिद्ध होईल, ही घोषणा अत्यंत क्रांतिकारी होती. केवळ खादी उद्योग ग्रामोत्थान करू शकणार नाही, ग्रामविकासाकडे समग्रतापूर्वक पाहावे लागेल, या निर्णयावर येऊन गांधीजींनी सर्व संघांच्या एकी-करणाचा प्रस्ताव पुढे ठेवला. याच्या पाठीमागे समग्र सेवेची दृष्टी होती. नोकरी सोडून, खेड्यांत बसून तिथेच हाडे ठेवण्याच्या भावनेने भारलेल्या कार्यकर्त्यांसाठी आवाहन केले गेले. या तंत्र-परिवर्तनामुळे सहकारी सोडून जातील, ही शक्यता जमेस धरून गांधीजींनी घोषणा केली —- ‘कोणीच कातले नाही, तर मी एकटा कातेन. महाभारतकाराने म्हटले आहे —- सत्याचा उच्चार करीत रहा, तुमचे म्हणणे कोणी ऐकतो की नाही याचा विचार करू नका. मला यामुळे दिलासा मिळतो.’
‘श्रद्धेविना ज्ञान अर्थहीन आहे, तसेच ज्ञानाविना श्रद्धा आंधळी आहे. चरखेचे पुजारी बुद्धिहीन राहिले तर ती लज्जास्पद गोष्ट होईल. अशाने आम्ही अहिंसेलाही लज्जित करू’ ‘प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. प्रकाश पसरवणे हाच जगात न्याय राहिला आहे. मग, स्वतःला खतम करण्याशिवाय अंधाराला दुसरा मार्गच राहत नाही. अहिंसेची रीत हीच आहे. माझ्या हृदयात ही गोष्ट आहे, म्हणून मी कशाला घाबरत नाही.’ कर्माचे प्रकार
कताई अनेक प्रकारचे लोक करतात —-
(१) मजुरीसाठी कातणारे, आणि (२) संकटकाळी कातणारे – हे दोघेही निस्पायाने काततात. याला आपण तामस कर्म म्हणू. (३) शिक्षणासाठी कातणारे—-चरख्याचा शास्त्रीय अभ्यास आपल्याला समाजशास्त्राकडे घेऊन जाईल. (४) वस्त्र-स्वावलंबनासाठी कातणारे गांधीजींच्या शब्दांत — “चरखा एखादी गरीब विधवा चालवेल तर तिला एक पैसा मिळेल. परंतु जवाहरलालसारख्यांच्या हातात तो भारताच्या मुक्तीचे साधन बनतो.” —- कताईच्या या बुद्धिपूर्वक केलेल्या उपयोगांना राजस कर्म म्हणता येईल.
(५) यज्ञस्य कताई करणारे —- याला सात्त्विक कर्म म्हटले जाईल.
मी जे खातो, ते मी उत्पादित केलेले नाही. मी आपल्या देशवासियांकडून हिसकावून घेतलेल्या कमाईवर जगतो. कृतज्ञतापूर्वक यज्ञार्थ कताई करणे हा त्यावरचा उदात्त उपाय आहे.
यज्ञार्थ कताई करणाऱ्यांसाठी खादी साध्या, शोषणमुक्त जीवनाचे प्रतीक आहे; एक वृत्ती आहे. कताई त्या व्यक्तीसाठी प्रार्थना आहे, आत्मदर्शनाचे साधन आहे. नवसर्जनाचे मापदंड गांधीजींचा उत्क्रांत खादी-विचार खादीच्या नवसर्जनासाठी आवश्यक मापदंड आपल्यापुढे प्रस्तुत करतो –
(१) आर्थिक मूल्याच्या मापदंडाच्या कसोटीला उतरूनच खादी व्यापक होऊ शकेल. परिवर्तनाकडे निस्पायाने वळणारे लोक आर्थिक मूल्याच्या कसोटीवरच तिचा स्वीकार करतील. गांधीजींच्या वेळी, त्यांच्याच शब्दांत, “वस्त्रस्वावलंबनात आर्थिक लाभ नगण्य आहे; तो इतका थोडा आहे की त्याचे आकर्षण वाटत नाही,’ अशी स्थिती होती. परिस्थिती बदलली आहे. स्पयाचे अवमूल्यन झाले आहे. वस्त्रस्वावलंबना-साठी सूत काढून बदल्यात मिळालेला कपडा बाजारभावाच्या अर्ध्या किंमतीत पडतो. कापसाच्या बदल्यात पळू, सुताच्या बदल्यात कपडा —- असे झाले तर उत्पादित खादीची किंमत बाजारभावाच्या एकचतुर्थांश राहील. बियाणे, खते, औषधी यांच्याबाबतचे परावलंबन आणि निसर्गाची अनिय-मितता व मार यांच्यामुळे शेतकऱ्याच्या हाती पैसा नाही. अशा स्थितीत वस्तु-विनिमयाची व्यवस्था अत्यंत न्यायपूर्ण व्यवस्था राहील. बाजारमुक्ती या व्यवस्थेचे हृदय आहे. कच्च्या मालापासून पक्का माल बनण्याची प्रक्रिया कुटीर उद्योगात झाल्या-मुळे तो व्यवसाय करणाऱ्यांना मजुरी तर मिळतेच, शिवाय शेतकऱ्याला कापसाला चौपट भाव मिळतो.
(२) गांधीजींनी सांगून ठेवले आहे की वस्त्रस्वावलंबनाच्या खालची पायरी शेवटी मदतकार्याकडे घेऊन जाईल. बाजाराच्या लुटीमुळे कंगाल झालेला शेतकरी आज निस्पायाने का होईना, स्वावलंबनाकडे वळत आहे. परिस्थितीतील या परिवर्तना-मुळे गांधींची खादी व्यापक होण्याची लक्षणे दिसत आहेत. बाजाराने पिडल्या नंतर बाजारमुक्तीकडे जाणे स्वाभाविकच आहे. खादी एक वृत्ती आहे. वृत्ति-परिवर्तन सत्संगानेच होते. यज्ञस्य कताई करणाऱ्या अशा सज्जन-समर्थांची आज आवश्यकता आहे, जे आपल्या जीवन-सुगंधाने क्रांतीचा मार्ग सुरभित करतील. अनुयायी जेव्हा श्रद्धापूर्वक गुरूचे अनुकरण करू लागतात तेव्हा समाज-परिवर्तन आध्यात्मिक दिशेने होऊ लागते, याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. बदललेल्या परिस्थितीत विनोबांचे शब्द सार्थ ठरत आहेत — ‘चरखा आहे उत्पादक श्रमाचे प्रतीक, अविरोधी श्रमाचे प्रतीक, अहिंसेचे प्रतीक. अहिंसेत विचारशासन असते. स्वातंत्र्यानंतर अहिंसक प्रतिकाराऐवजी अहिंसक सहयोगाचा जमाना आला आहे.’ व्यक्तिगत साधनेपासून आरंभ करून, बदलत्या काळाच्या मदतीने सामूहिक साधनेच्या परिमाणांना स्पर्श करणे, हे आमचे उत्तरदायित्व आहे. (अनुवादित)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.