काही समीक्षण, काही चिन्तन

‘प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान’ हा मराठी भाषेतील एक अपूर्व असा ग्रन्थ आहे. एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या हयातीतच त्याच्या तत्त्वचिंतनाविषयी मोकळेपणाने समकक्ष लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी व तत्त्ववेत्त्याने त्यांचा त्याच ग्रन्थात परामर्श घ्यावा अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. अन्य भारतीय भाषांतही अशा स्वरूपाचा ग्रन्थ प्रसिद्ध झाल्याचे मला माहीत नाही. इंग्रजीमध्ये मात्र Living Philosopher’s Library या ग्रन्थमालेत अनेक दशके अशा स्वरूपाचे ग्रन्थ प्रसिद्ध होत आलेले आहेत.
या ग्रन्थाच्या अपूर्वतेचे दुसरे अंग असे की रेगे यांच्या भूमिकेविषयी महाराष्ट्रात गेल्या दशकात जे काही संदेह निर्माण झाले त्याविषयीचा धागा या ग्रन्थातील सर्व लेखांना जोडताना आढळतो. ग्रन्थाच्या पूर्वार्धात विविध लेखकांनी आपली जी मते मांडली आहेत त्यांना रेगे यांनी दिलेल्या उत्तराविषयी प्रस्तावना-लेखक प्रा. दि. य. देशपांडे लिहितात : ‘या उत्तरांविषयी एका शब्दात बोलावयाचे तर ती तात्त्वज्ञानिक लिखाणाचे आदर्श आहेत असे म्हणावे लागेल.’ रेग्यांनी आपल्यावरील प्रत्येक टीकेचा योग्य तो परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे, असाही आपला अभिप्राय दियदेनी नोंदविला आहे. दियदेंचा निर्देश महत्त्वाचा आहे कारण ‘विवेकवादाच्या अलीकडे आणि पलीकडे’ या स्वरूपाच्या विषयावर महाराष्ट्रात जो वाद आहे त्यात दियदे व मेरे हे प्रमुख वादी आणि प्रतिवादी आहेत हे सर्वमान्य आहे. (वादी कोण व प्रतिवादी कोण हा यातील एक अनिर्णीत वाद आहे असेही वाटल्यास म्हणावे. सचिवैचित्र्याप्रमाणे त्याचा वेगवेगळा निर्णय होऊ शकतो.) या दोघांनाही परस्परांविषयी केवळ आदरच आहे असे नाही तर गाढ स्नेहभावनाही आहे. या ग्रंथाची अर्पणपत्रिकाच ‘प्रखर विवेकवादी तत्त्वज्ञ प्रा. दि. य. देशपांडे यांना सादर’ अशी लिहिली आहे. परस्परांविषयींच्या त्या उभयतांच्या स्नेहादरभावनेचा प्रत्यय या ग्रन्थात अन्यत्रही येतो.
या ग्रन्थाचे तिसरे महत्त्वाचे अंग असे की यात रेगे यांच्या प्रकाशित वाङ्मयाची संपूर्ण सूची साक्षेपी वृत्तीने तयार करून देण्यात आलेली आहे. क्वचित् एखादादुसराच महत्त्वाचा लेख यातून निसटला असेल. संपादकानी व्यक्त केलेली अपेक्षा : ‘येणाऱ्या पिढीतील कोणाला जर रेगे सरांच्या तत्त्वज्ञानविषयक लिखाणा- वर संशोधन करावेसे वाटले तर हा ग्रंथ उपयुक्त ठरावा’ ही अपेक्षाही उचितच म्हणावी लागेल.
रेगे यांचा ‘माझी तत्त्वज्ञानातील वाटचाल’ हा सोळा पृष्ठांचा प्रदीर्घ लेख या ग्रंथाच्या प्रारंभीच आहे. त्यानंतर झालेल्या वाद-विवेचनाचे आकलन होण्याच्या दृष्टीने हे उपयुक्तही आहे. या लेखात तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची कोणती वृत्ती आपल्याला पटली याविषयी लिहिताना रेगे लिहितात:
“ऑक्सफर्ड-केंब्रिज, हारवर्ड–प्रिन्स्टन ही तत्त्वज्ञानाची मध्यवर्ती केंद्रे आहेत. तेथे जे घडते ते आत्मसात करणे हे आपले काम आहे, या तत्त्वज्ञानाच्या सीमेवर काही साफसफाई करणे, ती थोडीशी विस्तारावी म्हणून होणाऱ्या प्रयत्नांत काही भाग घेणे हे आपण तत्त्वज्ञानात सुशिक्षित असल्याचे लक्षण मानता कामा नये. आपण आपले तत्त्वज्ञान घडवले पाहिजे; आपण उपक्रमशील असले पाहिजे. हे कठीण असले तरी ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे नाहीतर आपण कायमचे अधू आणि मिंधे राहू. ह्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट अशी की सामाजिक आणि नैतिक तत्त्वज्ञान, तसेच धर्माचे तत्त्वज्ञान हे आपले तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती विषय असले पाहिजेत. कारण आपल्याला एका वेगळ्या स्वरूपाच्या भारतीय समाजाची घडण करावयाची आहे आणि धार्मिक परंपरेने बांधलेला असा हा समाज आहे. तेव्हा अशा समाजाला अधिष्ठान देणारे असे सामाजिक तत्त्वज्ञान आपण घडविले पाहिजे आणि त्याला पूरक असे धार्मिक तत्त्वज्ञानही रचले पाहिजे. आणि ज्या भारतीय विचारवंतांनी ह्या स्वरूपाचे तत्त्वज्ञान घडविले असेल, उदा. रानडे, टिळक, गांधी इ. त्यांच्या विचारांचे आपण गंभीरपणे परीक्षण केले पाहिजे. ते आपले खरे पूर्वसूरी आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपण आपल्या अभिजात परंपरेकडे वळले पाहिजे. हा दृष्टिकोन मला पूर्णपणे पटला.” यानंतरच्या निवेदनात आपल्या अध्ययन पद्धतीविषयी रेगे सांगतात : “ऑक्स्फर्डला जे मी साधले ते भारतात राहून या तत्त्ववेत्त्यांची पुस्तके वाचून, त्यांच्यावर विचार कस्न, मला साधता आले असते असे मला वाटते. . . . निदान माझी तरी घडण अशी आहे की मी दुसऱ्यापासून ऐकून फारसे शिकू शकत नाही. पण दुसऱ्यांच्या लिखाणातील वाक्यांशी झगडून, ठेचा खात, धडपडत, तोल सावरीत एखादा विषय सावकाश शिकू शकतो.”
रेगे यांना कोणी ‘तुम्ही कोणाचे अनुयायी आहात’ असा प्र न विचारला असता तर त्यांनी काय उत्तर दिले असते, या प्र नाचे सरळ नाही, परंतु आडून दिलेले उत्तर त्यांच्या या लेखात आहे. त्यांनी लिहिले आहे:
“रसेल यांना जर कुणी विचारले असते —- रसेल यांचे नाव केवळ उदाहरणादाखल आहे —- की तत्त्वज्ञानात तुम्ही कुणाचे अनुयायी आहात तर हा प्र न त्यांनी रागाने झिडकारला असता. जरा शांत झाल्यावर त्यांनी बहुधा असे उत्तर दिले असते की मी कुणाचा अनुयायी नाही, पण अनेक तत्त्ववेत्त्यांची मते विचारात घेऊन आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करून मी माझे तत्त्वज्ञान घडविले आहे. ते एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या मतांच्या जवळ येते का हे इतरांनी ठरवायचे आहे. कोणत्याही लहानमोठ्या तत्त्ववेत्त्यानेही असे उत्तर दिले पाहिजे. तत्त्वज्ञान हा ज्ञानप्रांतच असा आहे की प्रत्येक तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे त्याचे तत्त्वज्ञान असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी, वैयक्तिक दृष्टिकोनाशी ते अविच्छेद्यपणे संलग्न राहते.” नंतर रेगे लिहितात : “यामुळे एका बाजूला काव्य आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान-तर्कशास्त्र इ. यांच्या दरम्यान तत्त्वज्ञानाच्या परंपरेचे स्थान असते. एखाद्या महान तत्त्ववेत्त्याचे तत्त्वज्ञान हे बौद्धिक महाकाव्य असते असे म्हणता येईल. ते प्रामाण्याचा सत्यतेचा दावा करते म्हणून ते बौद्धिक असते. पण विश्वव्यापी, मानवव्यापी अशी दृष्टी आणि या दृष्टीवर आधारलेली एक आदर्श जीवनसरणी त्यात प्रकट झालेली असते व म्हणून ते महाभारतासारखे महाकाव्य असते. त्याचे बौद्धिक खंडन केले, तरीही विश्वदर्शन म्हणून (त्याचे महत्त्व उरतेच).” पुढे काही परिच्छेदानंतर रेगे लिहितात. “वैज्ञानिक ज्ञानाचा विषय होणारे जे अस्तित्व आहे त्याच्या पलीकडे असलेले अस्तित्व आहे पण मानवी ज्ञानशक्तीला त्याचे ज्ञान होऊ शकत नाही. एक नैतिक प्राणी म्हणून आचरण करताना या परतत्त्वाचे आकलन होते, पण हे आकलन म्हणजे श्रद्धा असते, ज्ञान नसते असे कांटचे मत आहे व मला ते तत्त्वतः मान्य आहे.”
प्रखर विवेकवादी दियदे व ‘परतत्त्वां’चे सश्रद्ध साधक रेगे यांच्यामधील वादाचा हा प्रमुख मुद्दा आहे. या संदर्भस्वरूपाच्या मांडणीविषयीची दियदेंची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत खालीलप्रमाणे सांगता येईल :
“खरे सांगायचे म्हणजे ही कांटने सांगितलेली उपपत्ती मला केवळ एक परीकथा वाटते. ज्याला कांट transcendental psychology म्हणतो ते वस्तुतः मानवी बुद्धीच्या एका पूर्णतः काल्पनिक भागाची चर्चा करणारे शास्त्र आहे. कांट म्हणतो तशा क्षमता अंगी असलेल्या शक्ती आपल्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा तो म्हणतो तो व्यापार चालतो हे संशयास्पद आहे. हे सगळे अतिशय गूढ, रहस्यमय वाटते.’ याविषयी रेगे लिहितात : “हा धूसर प्रांत आहे आणि त्याविषयी धूसरपणे लिहिणे क्रमप्राप्त आहे. माणूस अपूर्ण आहे, पण आपण अपूर्ण आहोत हे भान त्याला आहे, म्हणून पूर्णाची संकल्पना त्याला आहे व या पूर्णाची ओढही त्याला आहे. या पूर्णा-विषयीची परि-कल्पना (कांटने वापरलेला शब्द Idea) करण्याची स्वाभाविक प्रवृत्ती मानवी प्रकृतीत आहे. . . . हा आध्यात्मिक आचरणाचा, साधनेचा प्रांत होय. भक्ती, पूज्यभाव, प्रेम, वैराग्य इ. भावनांनी ही साधना प्रेरित झालेली असते आणि या साधनेने या भावनांना बळकटी येते.” रेगे पुढे लिहितात : “या सर्व भिन्न साधनांची परिणती एकाच ‘अनुभवात’ होते असे एक भारतीय मत आहे. . . . असे असेलही, पण कदाचित् असे असणारही नाही”
येथून पुढे रेगे अधिकच धूसर प्रांतात शिरतात. ते सांगतात : “जर असा अनुभव कोणाला असेल तर तो आपल्याला आलेला आहे हे तो सांगू शकणार नाही. पण त्याच्या जगण्याच्या रीतीतून तो प्रकट होईल. अध्यात्माचा प्रांत हा बहुविधतेचा प्रांत आहे. कदाचित हे परिकल्पित गूढतत्त्व कायमचे गूढच राहील. आणि तरीही त्याचा स्पर्श ज्याला झाला आहे त्याला त्याच्या छायेतच जगावे लागेल. गूढाची ही जाणीव ही एका परीने माणसाचे एक ओझे आहे, पण त्याच्या मुक्तीचे बीजही तिच्यात आहे.”
हे लिहिल्यानंतरचे त्यांचे वाक्य केवळ एक विनयाचे, स्वतःला लपविण्याचा प्रयत्न करणारे विधान म्हणून स्वीकारावे लागेल. ते स्वतःविषयी येथे सांगतात : “मी स्वतः आध्यात्मिक साधक नाही. पण आध्यात्मिक साधनांच्या सर्व स्पांचा मी आदर करतो.’ (पृ. १६) या विधानाला, ‘रेगे, तुम्ही आध्यात्मिक साधकच आहात. साधनेच्या अनेक स्पातील एक’. असा प्रतिसाद द्यावा असे वाटते. [रसेलच्या त्याने स्वतःविषयी लिहिताना केलेल्या एका विधानाला (—-But all this is autobiography not philosophy’—-) रेगेंचा प्रतिसाद This is very much philosophy अशा स्वरूपाचा होता हे येथे सहज आठवते.]
परंतु ‘साधक’ याचा अर्थ ‘सज्जन परंतु एकूण भ्रान्तच’ असा जर कोणी प्रखर विवेकवादी करणार असतील तर त्या टीकेचा रेगे यांनी स्फिंक्सच्या मुद्रेने किंवा फार तर मोनालिसाच्या आशयगूढ स्मितानेच स्वीकारात्मक प्रतिवाद केला असता. हा ‘भ्रान्तचित्त’ अर्थ या ग्रन्थातील कोणी लेखक करणार नाहीत याचा मला मनोमन विश्वास आहे कारण त्यांची रेग्यांच्या विषयीची स्नेहा उत्कट आदराची भावना मी जाणतो. परंतु तरीही आपल्या पहिल्या मानसिक प्रतिमेतले रेगे परत आपल्याकडे वळतील अशी सुप्त आशा त्यांच्या मनात घर करून राहिली असावी असे मला वाटते. या आशेचे एक ओझरते दर्शन मला सुनीती देव यांच्या ‘प्रा. रेगे आणि ईश्वर’ या लेखातील शेवटच्या परिच्छेदात आढळते. त्या परिच्छेदाच्या पहिल्या सहा ओळी प्रा. रेगेंचे अवतरण आहे. शेवटच्या वाक्याच्या उत्तरार्धातील एक शब्द देवांच्या वेदनेचा सूचक आहे असे मला आपले वाटते. तो परिच्छेद असा:
“‘जे घडते ते कार्यकारणनियमांना अनुसरून घडते. त्याचे नियम विज्ञानात शोधून काढता येतात आणि अशा ज्ञात नियमांचा वापर करून आपल्याला इष्ट ते घडविता येते, त्याचा दुसरा मार्ग नाही, ही दृष्टी समाजात रुजविली पाहिजे. यासाठी आपल्याला जे किमान करता येईल ते म्हणजे कधीही अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथेप्रमाणे आचरण करावयाचे नाही. यासाठी जवळच्या माणसांची कितीही अप्रीती सहन करावी लागली तरी समाजहितासाठी ही किंमत दिली पाहिजे’ (‘परंपरागत श्रद्धा, कालनिर्णय १९९६).’ हा निर्धार जास्तीत जास्त लोकांनी करावा आणि सरांनी कधीकाळी असलेला ‘कच्चेपणा’ सोडायला हवा असे वाटते.” दियदे यांनी अशीच वेदना वेगळ्या शब्दांत मांडली आहे. प्रथम त्यांनी आपल्या लेखाच्या शेवटी लिहिले आहे : “अवश्यता, अपरिहार्यता ही कल्पना तार्किकीय आहे. तिचा निसर्गात कोठेही अनुभव येत नाही. ती सुचण्यास बरीच प्रौढ बुद्धी लागते. एखादी गोष्ट अशी असेल तर त्याच वेळी ती तशी नाही हे संभवत नाही, व्याघात अशक्य आहे हे जाणवते तसेच एखादी परिस्थिती अमुक असेल, तर अन्य एखादी परिस्थितीही अस्तित्वात असते, अवश्यपणे असते, हेही लक्षात येते.” हे सर्व नेमकेपणाने लिहिल्यानंतर दियदे लगेच लिहितात : ‘हे सर्व फारच बाळबोध आहे हे खरे आहे. कदाचित ते पोरकटही असू शकेल. याचा निर्णय रेग्यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे.’
दियदे यांनी हे जवळजवळ आता ‘यांना किती समजावून सांगणार?’ अशा उदास स्वरांत सांगितले आहे असा मला भास होतो.
रेगे यांनी तसे न म्हणता आपला निर्णय या ग्रन्थातील लेखनात दिला आहे असे मला वाटते. तो तरीही निर्णायक नाही असेही मला वाटते. परंतु ‘Now the ball is in your court’ अशी त्यांची आक्रमक नसली तरी खिलाडूवृत्तीची धारणा असावी.
आज चेंडू परत आला तरी पुढे खेळावयास रेगे आपल्यात नाहीत. परंतु या सर्व विवेचनात, वादविवादात मला बौद्धिक कुवत नसली तरी भावनात्मक आत्मीयता आहे. १९४४-४५ मध्ये सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात मी प्राध्यापक म्हणून माझा प्रारंभ केला त्या वर्षी दियदे माझे सहकारी होते. ‘एक ना धड’ —- अशी माझी या क्षेत्रात वृत्ती असल्यामुळे तत्त्वज्ञानातही मला काही कुतूहल होते (व आजही त्याच स्तरावरचे आहे.) दियदेना आठवत नसेल परंतु रसेलच्या Problems of Philosophy पासून सुरवात करावयास त्यांनी मला सांगितले. त्याचा मला फायदा इतकाच झाला की ‘वेदनदत्त’ या शब्दाची वेदना मी प्रथमदर्शनीच सहन करू शकलो. रसेल यांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात माझ्यापुढे शरणागती पत्करली परंतु जीवनाच्या अनेक क्षेत्रांत माझी साथ केली. Problems of Philosophy वरील या दोन दिग्गजांच्या लेखनातून त्यामुळे मला आपण या क्षेत्रात कुठे आहोत (किंबहुना त्यांच्या आसपासही कसे नाही) याची विदारक जाणीव झाली. परंतु अशा वेदनेचा आनंद उपभोगावयास मी शिकलो आहे.
या ग्रन्थातील एकाच (परंतु मला विशेष महत्त्वाच्या वाटणाऱ्या) भागा-विषयीचे हे लेखन झाले. इतर भागाविषयी लिहावयाचे तर तो एक स्वतंत्रच लेख होईल.
(प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे यांचे तत्त्वज्ञान, संपादक: डॉ. सुनीती देव)
४३, गुस्कृपा हौ. सोसा., गोडोली, सातारा शहर — ४१५ ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.