धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर

आजचा सुधारकच्या नोव्हेंबर २००० च्या अंकात दि. के. बेडेकर यांच्या श्रद्धाविषयक भूमिकेवर श्री. वसंत पळशीकर यांचा संक्षिप्त लेख व त्यावरील प्रा. दि. य. देशपांडे यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली होती. त्या चर्चेवस्न दि. के. बेडेकरांच्या भूमिकेबाबत गैरसमजच होण्याचा संभव आहे; ‘धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार’ या त्यांच्या पुस्तकाच्या आधारे श्री. पळशीकरांनी असे मत मांडले आहे की त्यांना धर्मश्रद्धेची आवश्यकता वाटू लागली होती. परंतु हा फार मोठा विपर्यास आहे. त्यांचे खरे म्हणणे काय होते हे येथे पाहायचे आहे. धर्माला पर्यायी श्रद्धा हवी. दि. ३ मे १९७३ रोजी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर बेडेकरांचे निधन झाले. त्यांच्या शेवटच्या काही दिवसातल्या पत्रांमधली काही अवतरणे पाहा. दि. २८ एप्रिल रोजी श्री. राजाभाऊ गवांदे यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,
“तेव्हा (ऑपरेशनचा) निर्णय बरोबर आहे. त्याप्रमाणे वागताना सर्जनचा व माझा आत्मविश्वास हे दोन जमेला आहेत. सदिच्छा, प्रार्थना, या हॉस्पिटलमधल्या उत्तम व्यवस्था, उपकरणे या साऱ्या जमेच्या, बेरजेच्या गोष्टी.
मग बेरजेच्या बाहेर आहे ते सारे मानवाच्या तुटपुंज्या सामर्थ्याच्या बाहेरचे. हे बाहेरचे आपल्या भाबड्या आशा व अपेक्षांना मारकही नाही व तारकही नाही. ते आंधळे, बहिरे व मुके आहे. त्याला डोके, कान व जीभ देणारी श्रद्धा माझ्यापाशी नाही व मला ती हवीशीही वाटत नाही . . . मला माणसांच्या, तुमच्या सर्वांच्या सदिच्छा पुरेपूर आहेत. माणूस तेवढ्या-वरच जगतो, निभावतो आणि माझ्यासारखा नास्तिक तेवढ्यावरच विसंबतो आणि विसावतो . . .”
(आठवणींचा मोहोर, राजाभाऊ गवांदे २०००)
यावस्न हे अगदी स्पष्ट आहे की अगदी शेवटपर्यंत बेडेकर नास्तिक होते. पण इतकेच नाही. नास्तिक, म्हणजे निरीश्वरवादी असूनही माणूस धार्मिक असू शकतो. जसे बौद्धधर्मीय. ईश्वर याच स्पात नव्हे, पण दुसऱ्या कोणत्यातरी स्पात मनुष्याच्या कक्षेबाहेरच्या जगात काहीएक जाणीवयुक्त चैतन्य आहे, परतत्त्व आहे, चिद्तत्त्व आहे; आणि त्याआधारे विश्वव्यापारामध्ये काही-एक प्रयोजन, मूल्यभाव, नीतिव्यवस्था आहे; तसेच ह्या चिद्तत्त्वाशी प्रेषिताच्या, साक्षात्कारांच्या वा अन्य माध्यमाद्वारे माणूस संपर्क/संवाद साधू शकतो ही सर्व धर्मांच्या गाभ्याशी असणारी श्रद्धा असते. बेडेकरांजवळ असलीसुद्धा श्रद्धा नव्हती. त्यांनी कधीही, कसलाही धार्मिक विधी, प्रार्थना वगैरे केली नाही हे सांगायला नको. वर ‘प्रार्थना’ हा शब्द आला आहे. गैरसमजांना वाव राहू नये म्हणून त्याबद्दलचे हे अवतरण ‘यातून सारे नीट, सुरळीत, निदान सुसह्य होणार आहे असे मला वाटते, तुम्हाला सर्वांना वाटते. प्रार्थना म्हणजे वाटणे —- फक्त वादळाच्या आवेगाने भावना जाणवणे याला आपण नुसते वाटणे न म्हणता प्रार्थना म्हणतो.’ (श्री. गवांदे यांना पत्र १२.४.१९७३)
धर्मश्रद्धा: एक पुनर्विचार हे त्यांनी मार्च १९७२ मध्ये दिलेल्या व्याख्यानांचे पुस्तक आहे. त्याचे संपादन करून मुद्रणप्रत करण्याचे काम आजारपणामुळे बेडेकरांना शक्य नव्हते. श्री. राजाभाऊ गवांदे व प्रा. गो. म. कुलकर्णी या त्यांच्या स्नेह्यांनी ते केले. श्री. गवांदे यांना लिहिलेल्या एका पत्रात बेडेकर म्हणतात,
“’धर्मप्राय’ हा शब्द तुम्ही वापरत आहात. पण तो समजणार नाही. व खरे म्हणजे समजला तरी तो बरोबरच नाही. धर्मपर्याय —- धर्माऐवजी नवी श्रद्धा —- हवा. आपण हे बोललो की नाही आठवत नाही.’ (पत्र, ३.७.१९७२, तिरपा ठसा माझा)
पण पुस्तकात धर्मप्राय हा शब्द तसाच ठेवला गेला आणि मग गैरसमजूनही घेतला गेला! खरे तर ते संपूर्ण पुस्तक आणि धर्मचिंतन हे त्यांचे दुसरे पुस्तक वाचल्यावर असे होण्याची गरज नव्हती.
तर मग बेडेकरांचे म्हणणे तरी काय होते? (कोणत्याही व कसल्याही स्वरूपाची) धर्मश्रद्धा नको, पण श्रद्धा हवी, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी असे स्पष्ट म्हटले आहे की यातु, धर्म व त्यांना अभिप्रेत असलेली श्रद्धा या तिन्ही निखालसपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकाच गोष्टीची, धर्मश्रद्धेची ती तीन वेगवेगळी रूपे आहेत असे नाही. तर एक वस्तू नाश पावून दुसरी जन्माला यावी तसे धर्मश्रद्धेपासून पूर्ण फारकत घेऊन नवी, पर्यायी श्रद्धा नांदू लागेल. हजारो वर्षांच्या परंपरेमुळे, श्रद्धा म्हणजे धर्मश्रद्धाच, धर्माशिवाय ‘श्रद्धा’ असे काही असूच शकत नाही, असे बहुतेकांचे मत असते. धर्म मानणाऱ्यांचे व बुद्धिप्रामाण्यवाद्यांचेदेखील. म्हणून त्यांची श्रद्धेची कल्पना नीट समजावून घेतली पाहिजे. धर्मश्रद्धा का नको.
धर्मश्रद्धा का नको हे कदाचित आजचा सुधारकच्या वाचकांना सांगण्याची गरज नाही. पण बेडेकरांचा याबाबतचा विशिष्ट दृष्टिकोन लक्षात घेतला पाहिजे. तो बुद्धिप्रामाण्यवादी नाही, तो मार्क्सप्रणीत जडवस्तुवादी (मटिरिअॅलिस्ट) आहे. हा दृष्टिकोन एकीकडे असे मानतो की माणूस हा इतर प्राण्यांसारखा जड सृष्टीचा भाग आहेच, पण त्याच्यामध्ये बाह्य परिस्थितीने ठरवून दिलेल्याच्या पलीकडे जाण्याची, स्वतंत्रपणे, सर्जनशील त-हेने, जाणीवपूर्वक संकल्प करून तो व्यवहाराद्वारा प्रत्यक्षात आणण्याची, नवनिर्मितीची, शक्ती आहे. दुसरीकडे, तो माणसाच्या जीवनक्रियेच्या सामाजिक अंगाला मूलभूत अर्थाने महत्व देणारा दृष्टिकोन आहे. जाणीवपूर्वक सर्जनशील व्यवहार करणे, म्हणजेच माणूस असणे, हे समाजाशिवाय माणसाला शक्यच नसते. श्रमाद्वारे जीव जगवणे तर झालेच, पण जाणीव, भाषा इत्यादी सुद्धा एकट्या सुट्या व्यक्तीला असणे अशक्य असते. म्हणूनच माणसाचा आजवरचा प्रत्यक्षातला आर्थिक-सामाजिक, वैचारिक-सांस्कृतिक असा एकंदर व्यवहार हे विचाराचे अधिष्ठान मानून धर्माची समीक्षा बेडेकर करतात. माणसाच्या या इतिहासात पहिली लाखदीड लाख वर्षे यातुश्रद्धेचा प्रभाव होता. नंतरची गेली अडीचतीन हजार वर्षे धर्माचा प्रभाव होता. धर्म अस्ताला जाण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे, गेल्या एकदीड शतकांमध्ये तिने वेग घेतला आहे. आणखी दोनपाचशे वर्षांत धर्म विलयाला जाऊन नवी, पर्यायी श्रद्धा माणसे स्वीकारतील, स्वीकारायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. आजवरच्या प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचे स्वरूपच असे होते की त्या समाजाची आवश्यक गरज म्हणून धर्मश्रद्धा ही ‘भ्रामक व खोटी’ जाणीव निर्माण होणे स्वाभाविक होते. या श्रद्धेत माणसाला बाह्य विश्व ‘आंधळे, बहिरे, मुके’ आहे, माणूस त्यात ‘अनाथ’ आहे, हे समजलेले नसते. खरे तर नवनिर्मितीद्वारा अधिकाधिक प्रगत जीवन घडवायचे सामर्थ्य ह्याच्याच अंगी असते. ज्ञानविज्ञान व नीतिमूल्ये यांना तोच जन्माला घालतो. पण आपली निर्मिती, आपली शक्ती ही मानवी आहे व मानवपरिमित आहे हे सत्य त्याला आकळलेले नसते. तो कला व साहित्य निर्माण करतो पण ते सरस्वतीचे देणे आहे असे मानतो. पण त्या काळात याच उफराट्या प्रकारे त्याची प्रगती होणे अपरिहार्य होते.
मार्क्सच्या शब्दांत, जणू काय आपण कोण आहोत, काय आहोत याचेच खरे भान माणूस विसरलेला असतो; स्वतःच्या मनुष्यत्वाला पारखा झालेला असतो. आणि विश्वाच्या खऱ्या स्वरूपाला, त्यामध्ये चाललेल्या स्वतःच्या जीवनव्यवहाराच्या खऱ्या स्वरूपाला पारखा झालेला असतो. अशा परात्मभूत जाणिवेचे (एलिएनेटेड कॉन्शसनेसचे) धर्मश्रद्धा हे एक रूप आहे. पण माणूस स्वतःच्या खऱ्याखुऱ्या माणूस-पणालाच नव्हे तर इतर माणसांच्या माणूसपणालाही पारखा होतो; माणसामाणसात दुरावा व शोषणदमनाचे संबंध असलेल्या गुलामगिरी, सरंजामशाही, भांडवलशाही इत्यादी समाजांच्या जीवनव्यवहारांमधून धर्म जन्मतो व त्यांच्याशी घट्टपणे संलग्न असतो, त्यांचे समर्थन करतो. धर्मश्रद्धा जगाकडे एका पारलौकिक विश्वचैतन्याचा अविष्कार म्हणून पाहात असल्याने, मानव व विश्व यांच्या सत्य स्वरूपाचे आकलन त्यात नसल्याने, ती खऱ्या वैज्ञानिक ज्ञानसाधनेला, खुल्या कलात्मक व्यवहाराला बाधक असते, खऱ्या मानवी नैतिकतेला बाधक असते. ती एकंदरीतच मानवोचित, माणसाला साजेलशी नसते. म्हणून धर्मश्रद्धा नको. पर्यायी श्रद्धा का हवी पण धर्मश्रद्धेप्रमाणेच बेडेकरांना अभिप्रेत असणारी नवी श्रद्धादेखील ज्ञानसाधनेला बाधक ठरणार नाही काय? बुद्धिप्रामाण्यवाद्यांचे म्हणणे असे असते की कोणतीही श्रद्धा अशीच असणार. बेडेकर मार्क्सवादी होते आणि मार्क्सवादी माणूस बुद्धिप्रामाण्यवादी नसतो. जगाचे खरे ज्ञान करून घेण्याचा मार्ग अनुभवाचे परीक्षण करून लाभणाऱ्या प्रत्यक्ष वस्तुतथ्यांचा (फॅक्ट्स) आधार घेऊन तर्कनिष्ठ बुद्धीने, सिद्धान्तने घडवणे हा आणि हाच एकमेव असू शकतो हे अर्थातच मार्क्स-वाद्यांना मान्य असते, नव्हे अत्यंत मोलाचे वाटते. पण जगाकडे पाहण्याचा एक सम्यक् तात्त्विक दृष्टिकोण म्हणून, जीवनाला आधार देणारी परिदृष्टी म्हणून, बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारणे त्यांना मान्य नसते. म्हणजे असे :
प्रत्यक्ष वैज्ञानिक व्यवहाराला आधारभूत अशी काही गृहीततत्त्वे असतात. भौतिक विश्व मानवी जाणीवेच्या बाहेर स्वतंत्रपणे नांदत असते, त्याला स्वतःची अशी स्वयंगती असते, ते नियमबद्ध असते, माणसाला त्याचे ज्ञान होऊ शकते, हे ज्ञान पडताळून पाहून त्याची सत्यासत्यता ठरवता येते, इत्यादी. या गृहीततत्त्वांच्या आधाराशिवाय विज्ञानव्यवहार शक्यच नसतो, मग अमुक एखादा शास्त्रज्ञ असा सगळा विचार करून ती मानत असो वा नसो. ही तत्त्वे खरी का मानायची असा प्र न विज्ञान विचारत नाही. ही तत्त्वे वैज्ञानिक पद्धतीने ‘सिद्ध’ झालेली नसतात व सिद्ध करताच येत नाहीत, कारण ती अशा सर्वसाधारण स्वरूपाची असतात की विज्ञानाचा विषय बनू शकत नाहीत.
ही तत्त्वे कोणती व ती खरी का मानायची, या प्र नाची विविध उत्तरे असू शकतात. कोणी म्हणेल विश्व स्वयंगतीने चालत नाही, ते नियमबद्धरीत्या चालते कारण ती ईश्वरी योजना आहे. आणि ही तत्वे साक्षात्काराद्वारा वा ईश्वरी अधिष्ठानावर चाललेल्या तत्त्वज्ञानाच्या प्रयत्नांद्वारा आपल्याला समजून येतात, म्हणून ती खरी मानावीत. दुसरा एखादा म्हणेल प्रत्यक्षातल्या मानवी व्यवहारात हजारो वर्षांच्या इतिहासातून ही तत्त्वे खरी असल्याचे निष्पन्न झाले आहे, म्हणून विश्वाचे ज्ञान करून घ्यायचे तर तीच खरी मानली पाहिजेत, विश्वसनीय मानली पाहिजेत. यापैकी काहीही मानले तरी आधुनिक निसर्गविज्ञानाच्या प्रत्यक्ष व्यवहारात फरक पडत नाही. कारण त्याची एक नि िचत, रेखीव पद्धती ठरली आहे, आणि असली तत्त्वे व त्यांच्याबाबतचे वाद कटाक्षाने विज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर ठेवले जाऊ शकतात. समाजविषयक व तात्त्विक ज्ञानव्यवहारात मात्र या मतांचा शिरकाव बराच होतो. त्यामुळे विविध सिद्धान्तने उभी राहतात आणि प्रदीर्घ सामाजिक व्यवहारातूनच त्यांच्या खरेखोटेपणाचा निवाडा होऊ शकतो.
सारांश, या गृहीततत्त्वांच्या पातळीवरचे वाद निर्णायकरीत्या सोडवायला विज्ञान वा बुद्धीचे प्रामाण्य अपुरे पडते. वैज्ञानिकांचा प्रत्यक्ष व्यवहार आणि विज्ञानाचा इतिहास यांचा पुष्कळ अभ्यास तत्त्वज्ञांनी केला आहे. सुफळ ज्ञानव्यवहाराचा पाया चिद्वाद तर असू शकत नाहीच, पण अनुभव/प्रत्यक्ष/बुद्धिप्रामाण्यवाद हा देखील नसतो, हे आता प्रस्थापित झाले आहे. ज्ञानप्राप्तीची समग्र प्रक्रिया कशी चालते व चालावी, तिचे तात्त्विक अधिष्ठान काय असावे, ज्ञानाच्या सत्यतेचे निकष कोणते? केवळ बुद्धी नव्हे तर माणसांचा समग्र (विज्ञानशाळेतला आणि एकंदर सर्व) सामाजिक व्यवहार ही या प्र नांचे उत्तर शोधण्याची जागा आहे असे मार्क्सवादी मानतात. केवळ बुद्धीला नव्हे तर प्रत्यक्षातल्या हाडामांसाच्या माणसांच्या समग्र जीवनाला अधिष्ठान व केंद्र मानून ज्ञानव्यवहाराचा विचार व्हायला हवा असे ते मानतात.
ज्ञानव्यवहार हा अनेक इतर व्यवहारांबरोबर समाजात चालणारा, त्यांच्याशी संबंधित, त्यांच्यात घोळसला जाणारा व्यवहार आहे. विशुद्ध बुद्धीच्या एखाद्या चिंतकाने खुर्चीत बसून केलेला व्यवहार नसून ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. आता जशी ज्ञानव्यवहाराला आधारभूत अशी काही तत्त्वे मानावी लागतात तशीच नैतिक वा कलात्मक वा इतर व्यवहाराला आधार असणारी तत्त्वेही मानावी लागतात. केवळ तत्त्वेच नाहीत तर हे व्यवहार शक्य होण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये, मनोवृत्ती, भाववृत्ती माणसांच्या मनात दृढ होत जातात. त्याचे संपूर्ण अंतर्विश्व संस्कारित होते. त्याला वळसे पडतात. मानवी व्यक्तीचे मूल्य मानणे, स्वातंत्र्याचा आदर करणे, संदेहवृत्ती जोपासणे, विश्वास ठेवणे, दया, क्षमा, शांती, करुणा बाळगणे वगैरे वगैरे तो मानू लागतो. या सगळ्याच्या मीलनातून ‘श्रद्धा’ बनते. त्यामुळे, कोणतीही श्रद्धा विज्ञानाच्या वा विवेकनिष्ठेच्या विरुद्ध असते हे खरे नाही. उलट नवी धर्मपर्यायी श्रद्धा ज्ञानविज्ञानव्यवहाराला पोषक व उपकारक होईल. सर्व प्रकारच्या (धार्मिक, राजकीय व आर्थिक) अपश्रद्धांच्या अतिक्रमणांपासून त्याचे रक्षण करेल. त्याचे आरोग्य ठीक ठेवेल.
एका वेगळ्या अंगानेही बुद्धिप्रामाण्यवादाच्या मर्यादा लक्षात घ्यायला पाहिजेत. ‘विवेकनिष्ठ’ कशाला म्हणायचे? मार्क्सने दाखवले की प्रत्यक्ष सामाजिक वास्तवावरून त्या त्या समाजातील जाणिवांचे आणि ज्ञानव्यवहाराचे देखील स्वरूप व मर्यादा ठरतात. विवेक म्हणजे काय व विवेकनिष्ठ कशाला म्हणायचे हे प्रत्येक युगात तत्कालीन समाजजीवनावस्न ठरते, जितके नैतिक काय व अनैतिक काय हे ठरते. यापासून बुद्धीला मुक्त करून तिला त्रिकालाबाधित अर्थाने ‘शुद्ध’ बनवणे अशक्य आहे. फ्रॉइडप्रभृती मानसशास्त्रज्ञांनी माणसाच्या मनातील व अंतर्मनातील गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा त्याच्या ज्ञानक्रियेवर परिणाम होतो हे सांगितले. सार्चसारख्यांनी अस्तित्वजन्य, अॅबसर्डिटीसारख्या समस्यांच्या संदर्भात बुद्धीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. विसाव्या शतकाने मानवी बुद्धीचे पराक्रम व वैभव जेवढे दाखवले तेवढीच तिची सान्तता व ऐतिहासिकता पुरेशी स्पष्ट केली. बुद्धी महत्त्वाची आहेच, पण एक संपूर्ण जीवननिष्ठा म्हणून जगण्याचा आधार म्हणून ती घेऊन चालणे शक्यही नाही आणि शहाणपणाचेही नाही. तेव्हा आपण हजारो वर्षांच्या मानवाच्या इतिहासाच्या परिशीलनाच्या आधारे ज्यांच्यावर निःशंकपणे विश्वास ठेवतो त्या सर्वसाधारण स्वस्याच्या तत्त्वांच्या, मूल्यांच्या, वृत्तींच्या गाठोड्याला–या एकंदर जीवनदृष्टीला श्रद्धा म्हणायचे. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला इत्यादीपेक्षा या जाणीवेच्या प्रकाराचे स्वरूप वेगळे असते, आकार वेगळा असतो. त्याला जीवनदृष्टी म्हणा हवे तर. बेडेकर त्याला श्रद्धा हा शब्द वापरतात. अगदी स्थूलमानाने बोलायचे तर विज्ञान तत्त्वज्ञान आपल्याला ज्ञान देते, श्रद्धा शहाणपणा देते. प्रत्येकच माणूस अशी काही श्रद्धा कळत नकळत, स्फुटअस्फुट ख्यात मनाशी बाळगूनच जगत असतो. त्यापेक्षा, जाणीवपूर्वक श्रद्धा ठेवावी. चिकित्सकपणे आपली श्रद्धा तपासून घ्यावी, निकोप (म्हणजे यातु व धर्म ह्यांच्या प्रभावापासून मुक्त) बनवावी, हे श्रद्धाच नको म्हणण्यापेक्षा बेडेकरांना जास्त श्रेयस्कर वाटते. (या विषयावरील माझा जास्त सविस्तर लेख समाज प्रबोधन पत्रिकेच्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर २००१ च्या अंकामध्ये पाहावा.)
[एकच शब्द दोन वृत्तीने वेगळ्या भूमिकांसाठी वापरण्याने होणारे गोंधळ टाळायला काय करावे, हे प्र. ब. कुळकर्णी सांगतात. जुलै २००१, आ. सु. १२.४]