दूरदर्शन आणि स्त्रीची दुर्गती

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवरील एका अतिशय लोकप्रिय मालिकेच्या संदर्भात एक विस्मयकारक घटना घडली. “क्योंकि सास भी कभी बहू थी’ ह्या मालिकेतले पात्र मिहिर ह्याचा अपघाती मृत्यू घडल्याचे एका भागात दाखवताच संपूर्ण देशभर हाहाःकार उडाला. आपल्या घरचेच कोणी गेल्यासारखे दुःख अनेकांना झाले. लोकांनी फोन, पत्र, ई मेल ह्यांद्वारेच नव्हे तर अगदी मोर्चा काढून मिहिरला पुन्हा जीवदान देण्याची मागणी मालिकेच्या निर्मात्यांकडे केली. एखाद्या मालिकेच्या कथानकाशी आणि पात्रांशी अशा मोठ्या प्रमाणात भावनिक तादात्म्य होण्याची ही घटना अभूतपर्व अशीच म्हटली पाहिजे. छोट्या पडद्यावर प्रथमच दीर्घ मालिका (soap operas) सुरू झाल्या तेव्हाही ‘हम लोग’, ‘बुनियाद’, ‘खानदान’ यांना अशीच अफाट लोकप्रियता लाभल्याचे आता आठवते. त्या मालिकाही मुख्यतः पारिवारिक होत्या. त्यातली सर्व पात्रे घरातल्या लोकांसारखी वाटायची. त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात अजून घर कस्न आहेत.

मात्र त्या मालिका, त्यातले स्त्रीचे चित्रण आणि आज अनेकविध वाहिन्यांवरून प्रसारित होण्याऱ्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांमध्ये काही ठळक फरक असल्याचे जागरुक प्रेक्षकाला चटकन जाणवते. ६ मे २००१ रोजी टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवार पुरवणीत त्या विषयावर विस्तृत विवेचन आले होते. अतिशय रोचक असे हे लेख आहेत.

आजच्या लोकप्रिय मालिका — ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कोरा कागज’ — बहुतांशी मोठ्या, संपन्न, एकत्र परिवारांचे चित्रण करणाऱ्या आहेत. इथली सून सकाळी उठून तुळशीला पाणी घालते. घर एकत्र बांधलेले राहावे म्हणून कोणताही त्याग करायला ती तयार असते. पुरुष मंडळी बाहेरच्या उलाढाली करतात आणि भरपूर पैसे कमवतात. स्त्रिया सुंदर साड्या नेसून ठळक मंगळसूत्र व इतर दागिने घालून, भांगात सिंदूर माखून सदैव सुसज्ज असतात. अंतर्गृहातले कलह व राजकारणे हा त्यांचा मुख्य उद्योग. परंपरा सांभाळणाऱ्या आणि घरात फाटाफूट कस्न ती भंग करणाऱ्या अशा दोन प्रकारच्या स्त्रियांचा संघर्ष हा प्रामुख्याने ह्या कथानकांचा विषय असतो.
ह्या पार्श्वभूमीवर ‘बुनियाद’ मधली लाजोजी आठवते. कुटुंबातले सर्व निर्णय तिला विचारून घेतले जातात तरी कुटुंब एवढेच तिचे विश्व नसते. बाहेर घडणाऱ्या घडामोडीत तिला केवळ रसच नसतो तर त्यात तिचा सक्रिय सहभाग असतो. जीवनातल्या सर्व भल्याबुऱ्या प्रसंगाना तोंड देताना ती फक्त एक पारंपारिक कळसूत्री बाहुली राहत नाही. ‘हमलोग’ मधील स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्या विविध होत्या तशाच अगदी खऱ्याखुऱ्या होत्या. तारा, केतकी ह्या हाडामासाच्या वाटायच्या. निखत काजमी म्हणतात त्याप्रमाणे तुळसी, प्रिया, पार्वती आणि बडकी, मझली, चुटकी ह्यांच्या मधला फरक हे प्रगती आणि प्रतिगामित्व ह्यातले अंतर होय.

एकेकाळी अतिशय लोकप्रिय झालेली तडफदार आणि आक्रमक रजनी आठवा. दैनंदिन जीवनात स्त्रीला त्रस्त करणारे सर्व प्र न नेटाने आणि स्वतःच्या हिंमतीवर सोडवणारी रजनी आज छोट्या पडद्यावर कालबाह्य ठरली आहे. प्रिया तेंडुलकर ह्यांच्या मते हा बदल होण्याचे मुख्य कारण खुली अर्थव्यवस्था (बाजारपेठ) हे होय. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि जाहिरातदार ह्यांच्या ताब्यात आज बहुतेक वाहिन्या आहेत. आपल्या मालाचा खप करण्यासाठी हवी असलेली स्त्रीची प्रतिमा ह्या मंडळींना जनमानसात निर्माण करायची असते. त्यामुळे तशा प्रकारचे कार्यक्रम जास्त लोकप्रिय करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो. वास्तववाद, खऱ्या ज्वलंत समस्या ह्यावर आधारलेला कार्यक्रम हे लोक स्वीकारायला तयार नसतात. प्रमोद महाजन हे ज्या ‘टॉकशो’चे प्रमुख पाहुणे असतील तो कार्यक्रम सौंदर्य प्रसाधने अथवा साबणांच्या जाहिरातीसाठी तितकासा उपयोगाचा नाही. मग अशा कार्यक्रमाला प्रायोजक कसा मिळणार? खरे तर दूरदर्शनचे माध्यम अतिशय प्रभावी आहे तसेच ते लवचीक आहे. त-हेत हेचे प्रयोग येथे करता येण्यासारखे आहेत. ते घरातच शिरलेले असल्याने प्रेक्षकांच्या जास्त जवळ असते. पण तनुजा चंद्रा म्हणतात तसे ते अधिकच संकुचित झाल्याचे आढळते. बहुतेक मालिकांमध्ये स्त्रीचे चित्र पत्नी, माता, कन्या, भगिनी ह्या नात्यांमधूनच अविष्कृत होताना दिसते. विवाह हे स्त्रीचे एकमेव व अंतिम लक्ष्य असते. मुली ह्या शेवटी केवळ ‘अमानत’ असतात. पतीच्या मनात व त्याच्या मोठ्या एकत्रित परिवारातले स्थान टिकवणे हा सर्वात महत्त्वाचा प्र न असतो. ह्या स्त्रिया शिकलेल्या असल्या तरी आपल्या शिक्षणाचा उपयोग त्या स्वतःचे प्र न सोडवण्यासाठी करताना दिसत नाही. मग धर्माने त्या हिंदू (कोरा कागज मधील पूजा) असोत की मुस्लिम (हीनाची नायिका).

सविता हिरेमठ त्यांच्या मते ह्याचे मुख्य कारण म्हणजे बहुतेक निर्माते व लेखक हे पुरुष असतात. परंतु एकता कपूर हिच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्याला असेच चित्रण आढळते. एकता कपूरच्या मते तिच्या नायिका ‘पुरोगामी’ आहेत. कुसुम तर मिळवती असल्याने मुलीच्या स्यात मुलगाच आहे. म्हणजे कमावती असल्यामुळे ती मुलीपेक्षा वरच्या पातळीवरची ‘मुलासारखी’ आहे. बाकी ज्या गृहिणी आहेत त्या घरकुल घडवणाऱ्या (homemaker) असल्याने स्त्रीवादीच (feminist) आहेत. “आधुनिकता म्हणजे विवाहबाह्य संबंध असणे असे नव्हे तर भारतीय नैतिकतेच्या सीमारेषा न ओलांडता, परंपरा सांभाळून, मूल्यांना धस्न आणि आपल्या संस्कृतीचा जाणिवपूर्वक सन्मान करून ती आत्मसात करणे हे होय.” नोकरीधंदा न करता गृहिणी म्हणून राहणाऱ्या स्त्रीला कमी लेखणे किंवा मागासलेली ठरवणे हे चूक आहे हे एकता कपूरचे म्हणजे कोणीही कबूल करेल. पण मग तिच्या मालिकांमध्ये होणारे चित्रण वास्तव आहे का? आज स्त्रीच्या पुढे येणाऱ्या प्र नांची हाताळणी तिच्या मालिकांमधून होते का? ह्यातल्या स्त्रिया भारी सुंदर साड्या नेसतात किंवा सलवार कमीज घालतात. वास्तविक आज घरात साड्या नेसण्याऱ्या तरुणींची संख्या झपाट्याने रोडावत चालली आहे. जीन्स, टॉप हे पोशाख सर्रास वापरले जातात. ह्या मालिकांमधील स्त्री मुख्यतः गृहिणी असते. तिचा बाहेरच्या जगाशी संबंध फारसा येत नाही. प्रत्यक्षात आज जास्त स्त्रियांना बाहेर पडणे अपरिहार्य झालेले आहे. आणि छोटे कुटुंब वेगाने एकत्र कुटुंबाची जागा घेत आहे.

आज छोट्या पडद्यावर चित्रित होणाऱ्या ह्या स्त्रिया अतिशय शालीन आणि लक्ष्मणरेषेच्या आत राहणाऱ्या अशा आहेत. त्या तशा नसतील तर लगेच त्यांना खलनायिकेचा दर्जा प्राप्त होतो. वास्तविक आयुष्यात आज स्त्री बरीच मोकळी झालेली आहे. ‘साँस’मध्ये घटस्फोटित, एकट्या राहणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या घटना व त्यामुळे निर्माण होणारे प्र न अशी आशादायक सुरवात होती. पण पुढे ‘दुसऱ्या’ स्त्रीला — मनीषाला — खलप्रवृत्तीची दुष्ट स्त्री बनवून मूळ हेतूची धूळदाण केलेली दिसते. ही डोळेझाक, हे स्वप्नरंजन, प्रेक्षकवर्गाला सत्यापेक्षा जास्त प्रिय वाटते हे मात्र अगदी खरे आहे. ‘कोरा कागद’ मधील पूजाला — रेणुका शहाणे हिला — बायका रस्त्यात थांबवून रवीशी लग्न न करण्याचा सल्ला देतात. ‘क्योंकी . . .’ मधल्या बांधणीच्या साड्यांना बाजारात एकदम मागणी येते ही वस्तुस्थिती आहे. प्रादेशिक वाहिन्यांवरील चित्र काही प्रमाणात जास्त वास्तव व आशादायी वाटते. मराठी ‘दामिनी’ मधील झुंजार दामिनी खूपच लोकप्रिय झाली. कर्नाटकातही बऱ्याचशा वास्तववादी मालिका लोकप्रिय आहेत. पण अशी उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आढळतात. एकूण चित्र हे स्त्रीच्या चित्रणात प्रगती न दर्शवता अधोगती दाखवणारेच आहे. त्याला जबाबदार जाहिरात कंपन्या आहेत की पुरुष निर्माते आणि लेखक आहेत की प्रेक्षकच खरे अपराधी आहेत? ह्या मालिकांच्या प्रेक्षकवर्गात स्त्रियांची टक्केवारी पुष्कळच जास्त प्रमाणात असते. स्त्रियांमुळेच त्यांची लोकप्रियता आहे. स्त्रियांना आपले हेच चित्रण जास्त भावते का? आज सर्व संधी उपलब्ध असताना आणि समानतेच्या वाटा खुणावत असताना त्या मार्गात येणारे प्र न, त्यातल्या उपलब्धी ह्यांचे चित्रण करणाऱ्या मालिका जास्त आवडू शकणार नाहीत का? डॉक्टर, वकील, पोलीस कॉन्स्टेबल, पत्रकार, कार्यालयातील कारकून अशी कामे करणाऱ्या स्त्रीला घर, तिचे काम हे सर्व करताना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यातले प्र न, आनंद, आशा, निराशा ह्याविषयी मालिका का निघू नयेत किंवा निघाल्या तर त्यांना अशी लोकप्रियता लाभेल का? असे प्र न पडतात. मागे ‘उडान’ ही कविता चौधरीची मालिका अशी होती. ती अतिशय लोकप्रिय झाली होती. पण त्यावेळी त्या मालिकेला स्पर्धा नव्हती. आता ‘कहानी घर घर की’ च्या स्पर्धेत अशी मालिका टिकेल का? असे अनेक प्रश्न ह्या लेखांमुळे डोळ्यासमोर येतात. साऱ्या स्त्रीविषयक समस्यांचे मूळ इतर कशापेक्षाही तिच्या मानसिकतेतच असावे अशी शंका मनात डोकावते. नेरळच्या केशवराव जोशींनी माझे लक्ष ६ मे २००१ च्या टाईम्सकडे वेधले —– संपादक

‘वैशाली’ टिळक नगर.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.