मेंदू, भावना, सहजप्रवृत्ती, नैवेद्य वगैरे

मेंदूची रचना आणि कार्य यांचा अभ्यास दाखवतो की मेंदू आणि संगणक या एकाच नमुन्याच्या रचना आहेत. बाहेरून मिळणाऱ्या संवेदना आणि स्वतःत साठलेले सूचनांचे संच यांच्यावर तार्किक प्रक्रिया करून काही क्रिया घडवणे, हे संगणकाचे काम, आणि मेंदूचेही. बाहेरच्या संवेदना आणि सूचनांचे साठे वापस्न तर्क लढवणाऱ्या यंत्राची कल्पना अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितीला १९३५ साली सुचली. १९४३ मध्ये मॅककुलक आणि पिट्स या अमेरिकन जैवभौतिकीतज्ञांनी मज्जाव्यवस्था आणि मेंदू यांचे काम टुरिंगच्या कल्पनेतल्या यंत्रासारखेच चालते, हे दाखवून दिले. तेव्हापासून आजवर मेंदूचे काम आणि संगणकाचे काम ह्यांच्या समरूपतेला पुष्टीच मिळत गेली आहे.
आजच्या संगणकांच्या तुलनेत मेंदू फार मोठा, फार किचकट आहे, पण हा फरक गुणात्मक नाही तर आकाराचाच आहे. आजचे संगणकशास्त्रीसुद्धा मेंदूच्या व्यवहारातल्या आणि रचनेतल्या गुंतागुंतींनी स्तंभित होतात. सामान्य माणसांना तर मेंदू पूर्णपणे अनाकलनीय वाटतो. पुस्तक, आगगाडी, अशी यंत्रे पाहून आदिमानव जसा अवाक् झाला असता, तशाच भावाने आजची माणसे मेंदूने अवाक् होतात. आज पुस्तके-आगगाड्या आपल्या सवयीच्या आहेत. उद्या मेंदूही तसाच सवयीचा होईल, असे दिसत आहे.
हे मेंदू नावाचे यंत्र आपल्याला जगण्यात मदत करते, परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करते. असे ‘अवयव’ उत्क्रांतीतून सजीवांना मिळालेले असतात. मेंदू हेही असे उत्क्रांत यंत्र आहे. वस्तूंपासून, जड पदार्थांपासून बनलेल्या संगणकाच्या भागाला ‘हार्डवेअर’ म्हणतात. धातू, प्लास्टिक्स, सिलिकन, अशांपासून हे हार्डवेअर बनते. मेंदू जैवरसायने आणि पेशींपासून बनतात. आजकाल काही जागी अशा ‘जैविक’ यंत्रणांना ‘वेटवेअर’ (wetware) म्हटले जाते. मुळात मात्र मेंदू हे वेटवेअर संगणकांच्या हार्डवेअरशी समस्प असते.
संगणकांमध्ये काही प्रोग्रॅम्स किंवा सूचनांचे संच अगदी खोलवर रुजलेले असतात. सर्व संगणकांमधली डिस्क ऑपरेटिंग सिस्टिम उर्फ ‘डॉस’ ही अशी पायाभूत नियमावली असते. याला समांतर अशा काही नियमावली माणसांच्या मेंदूंमध्येही खोल रुजलेल्या, अविभाज्य भागासारख्या असतात. ह्या नियमावलीही उत्क्रांतीतूनच घडलेल्या असतात. शरीर ‘चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व नियमावली अशा खोलीवरच्या असतात. हृदयाच्या, पचनसंस्थेच्या, श्वसनसंस्थेच्या (इत्यादी) व्यवहारांचे नियंत्रण अशा प्रकारच्या नियमावलींनी होते.
मेंदूचे काही भाग आणि त्यांच्यात रुजलेल्या नियमावली मिळून काही विशिष्ट कामे केली जातात. माणसांच्या सर्वच गटांमध्ये भाषा शिकण्याची, वापरण्याची क्षमता असते. लहान मुलेसुद्धा व्याकरणाचे नियम न शिकता, केवळ आसपासच्या लोकांचे बोलणे ऐकून व्याकरणशुद्ध बोलू लागतात. १९५० मध्ये संगणकांना अशी ‘बोलणी’ ऐकवून भाषा शिकवायचे प्रयत्न झाले. अयशस्वी ठरले ते. याचा नोआम चोम्स्कीने अर्थ लावला, की ‘भाषा आत्मसात करण्याची क्षमता’ ही ‘कोऱ्या’ मेंदूंमध्ये नसते. मेंदूचे काही भाग व त्यांच्या नियमावल्या असे संचच ही क्षमता
वाळगतात. म्हणजे मेंदूंमध्ये असे क्षमतांचे ‘स्वयंघटक’ किंवा मोड्यूल्स असतात. तांत्रिक संगणकी भाषेत अशी मोड्यूल्स ही ‘डेडिकेटेड मशीन्स’ असतात, एकाच कामासाठी घडलेल्या संगणकांसारखी.
भाषेबाबतच्या कौशल्यासारखी दृष्टीसंबंधीची, शत्रू ओळखण्याची, अन्न आणि विष यांच्यातला भेद ओळखण्याची, अशी अनेक मोड्यूल्स सापडली आहेत. यांना बिगर-संगणकी भाषेत सहज-प्रेरणा किंवा प्रवृत्ती म्हणतात. या अंकात सुभाष आठल्यांच्या लेखात जिला ‘उपजत वृत्ती’ (instinct) म्हटले आहे, तीच ही ‘चीज’. आतापर्यंत आपण मेंदू (वेटवेअर) त्यात अत्यंत खोल रुजलेल्या नियमावली (‘डॉस’ सारख्या) आणि मेंदूचे भाग आणि त्यांच्या खास नियमावलींपासून घडलेली मोड्यूल्स, अशा तीन पातळ्या पाहिल्या.
मोड्यूल्समध्ये एक मोड्यूल आहे फसवाफसवी तपासणारे. ते थेट निगामी (डिडक्टिव्ह) तर्कशास्त्रातल्या सिलजिझम्स किंवा संवाक्यांसारख्या क्रिया करते. या क्षेत्रातल्या मेंदूच्या विशिष्ट मोड्यूल्सच्या क्रिया आपल्याला सहजपणे समजतात. हे जराशा तपासाने समजू शकणारे नियमांचे संच म्हणजेच ‘विचार करण्याची क्षमता’, खोल न रुजलेली. पण इथेही एक गंमत आढळते. जर ‘अॅब्स्ट्रॅक्ट’ अशा अ, ब, क च्या स्पात तार्किक प्र न विचारले तर खूपशी माणसे चुकतात. तेच प्र न जर ‘अमुक माणूस तुम्हाला फसवायचा प्रयत्न करतो आहे, आणि हा प्रयत्न तुम्ही हाणून पाडायचा आहे’, अशा ख्यात विचारले तर चुका कमी होतात. म्हणजे आपल्या जगण्या-तगण्याशी संबंध आहे असे भासवले तर विचार जास्त काटेकोरपणे, जास्त तर्कशुद्धपणे केला जातो.
वेटवेअर यंत्रे, खोल नियमावली, मोड्यूल्स, तर्कशुद्ध विचार —- हा एक क्रियांचा रंगपट आहे. ‘विचार’ सहज समजतो तर मोड्यूल्स वगैरे सहज समजत नाही. पण ही सगळी भानगड तगून राहण्याच्या, टिकून राहण्याच्या बाबतीत मदत करतेच, मग तुम्हाला त्यातले सगळे टप्पे समजोत की न समजोत. असाच न समजणारा एक टप्पा ‘भावना’ या नावाने ओळखला जातो —- बहुधा विचारापेक्षा खोल, प्रवृत्ती—-इन्स्टिंक्टपेक्षा उथळ असा हा टप्पा.
‘मेंदू हे यंत्र आहे’, ‘ते उत्क्रांतीतून घडले’, असली वाक्ये–विधाने बहुतेकांना अस्वस्थ करतात. वैज्ञानिकांमध्ये मात्र ह्या संकल्पना वापरून अनेकानेक नैसर्गिक घटनांचा सुसंगत अर्थ लावता येतो, हे बहुमान्य आहे. यामुळे आज ही विधाने खरी मानून चालले जाते. ती ‘शंभर टक्के सिद्ध’ झालेली नाहीत, तशी कोणतीच निसर्गानियमांची विधाने ‘शत-प्रतिशत’ सिद्ध होत नाहीत. पण मान्य न करणे आडमुठेपणाचे ठरावे इतपत ती ‘सिद्ध’ झाली आहेत. ही ठाम जडवादी-इहवादी मांडणी आहे, विज्ञानाच्या क्षेत्राने मान्य केलेली. ज्ञानाच्या क्षेत्रात, सत्याच्या क्षेत्रात विवेकवाद विज्ञानाची मते ग्राह्य धरतो . . . पण जडवादाने अस्वस्थ होणेही अनेकांना ‘विवेकी’ वाटते.
प्रवृत्ती—-भावना—-विचार ही कमीजास्त प्रमाणात समजू शकणारी एकाच प्रकारच्या क्रियेची स्पे आहेत. आणि ह्या सर्व क्रियांचा गठ्ठा म्हणजे ‘मन’. जेव्हा उषा गडकरी ‘विवेकवादी मनाला मोडीत काढतील’ असे विधान करतात, तेव्हा त्याने फक्त त्यांचे पूर्वग्रह व्यक्त होतात, कारण त्या विधानाला कसलाही आधार नाही, आणि तसा आधार त्या देतही नाहीत. नंतर गडकरी ‘आपुलकीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने’ होणाऱ्या व्यवहाराबद्दल बोलतात. असे व्यवहार बेगडी असले तरी पुरतात, असेही त्या नोंदतात. त्यांना धक्का बसेल, पण परस्परोपकार, एखाद्या ‘निष्ठावान’ गटात शिरणे किंवा तसा गट स्वतःभोवती रचणे याचीही मोड्यूल्स असावी असे मानण्यास भरपूर जागा आहे. ‘नैतिक प्राणी’ या नावाने प्रकाशित झालेले तीन लेख (११.७ ते ११.९) अशा व्यवहारांची उत्क्रांतीतून घडण कशी झाली असेल ते सांगतात.
माणूस हा प्राणी स्वतःला विश्वात काहीतरी खास स्थान आहे असे मानण्यासाठी ‘बदनाम’ आहे. आधी माणूस ज्या ग्रहावर राहतो तो ग्रह हे विश्वाचे केंद्रस्थान असणार, असा भ्रम होता. कोपर्निकस—-गॅलिलिओ—-न्यूटन वगैरेंनी तो ‘भोपळा’ फोडला. मग डार्विनने माणूस इतर जनावरांसारखा, झाडांसारखा, जीवाणू-रोगाणूंसारखाच उत्क्रांत झाला असे म्हटले. हे ‘म्हणणे’ आजवर अनेक माणसांना ‘चिडवते’ —- पण पोपच्या सल्लागार–समितीनेही आज ते मान्य केलेले आहे. एका अर्थी हा उत्क्रांती-भोवतीचा वादही माणसाच्या ‘खास’ भ्रमाला टोचणाराच आहे. फ्रॉइडने
माणसाच्या ‘जाणते’पणाच्या मर्यादा दाखवल्या तेव्हाही अनेकांना ते आवडले नव्हतेच. हा प्रकार बहुतांशी युरोपात घडला, कारण पौर्वायांना ‘सब-कॉन्शस’ मन ही कल्पना आधीच पटलेली होती.
आता हे उत्क्रांतीवर बेतलेल्या मानसशास्त्राचे ‘प्रकरण’. विचार करणे हे फसवणूक टाळण्याचे हत्यार —- किंवा अवयव. हात हा जसा वस्तू पकडणारा अवयव, तसे मनाचा भाग असलेले भाषा शिकण्याचे अवयव, दुसऱ्यावर मोजून-मापून बेगडी—-खरा जिव्हाळा दाखवणारे अवयव . . . नाही, अस्वस्थ तर व्हायलाच हवे आहे.
धार्मिक, सश्रद्ध वागणुकीत सचोटी, प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, आदर वगैरे असते असे गडकरी म्हणतात. जर हा सचोटी वगैरे प्रकार ‘देवा मला पाव’ ह्या दूरदृष्टीच्या स्वार्थाने वागणाऱ्या मोड्यूलचा भाग असला तर? मग नैवेद्य ही लाच ठरेल का? मला कल्पना आहे, की वरील वाक्य उपेक्षावादी, सिनिकल असे वाटेल. पण सचोटी वगैरेंसाठी धर्म आणि श्रद्धा आवश्यक आहेत असे सुचवणे, धर्म-श्रद्धा बदमाशीला जन्म देतच नाहीत किंवा दिलाच तर ती स्वार्थी वागणूक सौम्य, नगण्य असते असे सुचवणे — हेही तसेच आडवळणी, तिरके आणि सिनिकल नव्हे का?
पळशीकर, दि. य. देशपांडे, दि. के. बेडेकर ह्या सर्वांचीच सचोटी आणि चांगुलपणा वादातीत आहे, पण एक जण सावध सश्रद्ध आहे, एक श्रद्धाविरोधक, एक पर्यायी श्रद्धेचा पुरस्कर्ता! गेल्या काही महिन्यातल्या लेख, वाद, चर्चेतून ही श्रद्धा-सचोटीतील फारकतच अधोरेखित झाली आहे.
मग नैवेद्याची कल्पना हातून निसटली तर जीवन ‘रक्ष, शुष्क, भाव-विरहित, कोरडे’ होईल, ह्याला आधार काय? जीवनाच्या संपन्न, समृद्ध, श्रीमंत होण्याचे ‘खरे’ अर्थ श्रद्धेतूनच समजतात, उत्क्रांती-मानसशास्त्रातून नाही, याला आधार काय? श्रद्धावाद्यांचा हा अनाठायी, निराधार आग्रह की श्रद्धेतूनच सौंदर्य, शिवता उपजते, हे ‘कोरडे’ नाही का? वेटवेअर, प्रवृत्ती, भावना, विचार, हा ‘छटां’चा संच समजूनही घ्यायला विरोध का होतो? ‘अज्ञाता’चा इतका धसका घेणे विवेकी नक्कीच नाही —- मग विवेकाचा अर्थ दियदेप्रणीत असो की संतपरंपरेतला.
[संदर्भ :१. इंट्रोड्यूसिंग इव्होल्यूशनरी सायकॉलजी, एव्हन्स व झराटे, टोटम बुक्स, न्यूयॉर्क १९९९ किंवा आयकन बुक्स, केंब्रिज, इंग्लंड १९९९.
२. आठले १२.६, गडकरी १२.६, केळकर १२.४ — सगळे संदर्भ आ.सु.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.