कुटुंब-व्यवस्था – मुलांना वाढविणे (भाग २)

१०. परीकथा, कहाण्या, गोष्टी
मुलांचे जग स्वप्नांचे, अद्भुतरम्यतेचे असते. आजूबाजूच्या जगाविषयी कुतूहल अचंबा वाटत असतो. शिवाय स्वतःचे काल्पनिक जगही ती उभी करू शकतात. कल्पनेनेच चहा करून देतात, बाजारात जाऊन भाजी आणतात, घर घर खेळतात, फोन करतात. शहरातल्या मुलांचा परिसर म्हणजे रहदारी, गोंगाट, भडक जाहिराती असा धामधुमीचा असतो. आजकाल घरचे वातावरण पण धावपळीचे आणि यंत्राच्या तालावर नाचायला लावणारे असते (दूरदर्शन, पंखे, गीझर, मिक्सर, फ्रीज, वॉशिंग मशीन, नळ, वीज . . . .) आयुष्याची गतीच ‘चाकांवर’ आधारित. अशा मुलांना स्वप्ने तरी शांत, कल्पनारम्य, अद्भुत कोठून पडणार? जी मुले शांत वातावरणात, निसर्गरम्य परिसरात, शेतात, नदीवर, समुद्रा-वर जातात, चांदण्यात फिरतात ती शांत, प्रेमळ, लाघवी होतात. कोरडी, संवेदना-शून्य राहात नाहीत. अद्भुत कल्पनारम्यता घालवून बसत नाहीत. इथे अद्भुत कल्पनारम्यता (fantasy) आणि विलक्षण, विचित्र, चमत्कारिक, अजब (fantastic) या दोहोत फरक करायला हवा.
मुले स्वतःशी बोलतात तेव्हा ऐकायला हवे. आपल्या खेळातून मुले बाहेरच्या जगाशी संबंध जोडत असतात आणि गोष्टी ऐकताना सगळे आपल्या आत साठवत असतात.
अगदी लहान मुलांना त्यांच्या रोजच्याच व्यवहारातील गोष्टी जुळवून सांगाव्यात. मोठ्या परीकथा नकोत. काऊचिउ, बाबा, आजी, भाजीभात, कढी . . . त्यांचा खेळ खेळ जिवंत आणि अर्थपूर्ण करणाऱ्या पुरेत. पाच सहा वर्षानंतर मुलाला चांगले वाईट कळायला लागते. मग ससा, कोल्हा, लांडगा . . . ठीक आहे. या वयात मुले सारखी गोष्टींची मागणी करीत असतात. त्यांना आत्मभान येत असते, जाणिवा जाग्या होत असतात. गोष्टींच्या कॅसेटस ही जरा शंकास्पदच बाब आहे. गोष्ट सांगणाराचा चेहरा दिसत नाही, हावभाव दिसत नाहीत. सांगणाराच्या डोळ्यांत पाहता येत नाही. ऐकणारे बाळ त्यामुळे तृप्त होत नाही. आतून भस्न पावत नाही. आई बाबा, आजी आजोबा, बाई यांच्या ओठांच्या हालचाली, हावभाव, आवाजातील चढउतार यांचे ठसे कायम लक्षात राहतात. कहाण्या स्मृतीत राहतात. कॅसेटमध्ये यातले बरेच हरवते. कार्टून मालिका, (animation films) यावरही खूप विचार व्हायला हवा. बऱ्याच वेळा वास्तवापेक्षा फार मोठी (bigger than and out of all proportion to reality) पोरकट, सनसनाटी अशी मांडणी असते. आणि इथे पशुपक्षी माणसेच होतात —- नैसर्गिक पशुपक्षी राहत नाहीत. यामुळे त्यांचे हावभाव, बोलणे चालणे हुबेहूब माणसांसारखे असते. तेही अमेरिकन माणसांसारखे. शिवाय सर्व मांडणी भडक, त्यामुळे संवेदनाक्षमता बोथट होतात.
जी मुले हळवी असतात त्यांना हे सगळे खरेच वाटायला लागते. सदभिरुची बाळगणाच्या पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जाहिरातीच्या अंगानी काढली जाणारी ही भडक बटबटीत कार्टून्स मुलांचे मनःस्वास्थ्य बिघडवतात. दूरदर्शन वरच्या आणि इतर जाहिरातींविषयी तर बोलायलाच नको. उलट शेकडो वर्षे लोककथा, परीकथा, बोधकथा चालत आल्या आहेत आणि त्यांनी मुलांचे उद्बोधनच केले आहे, छान मनोरंजन केले आहे. आजी आजोबां-कडे गोष्टी सांगायचे काम असे. निरनिराळ्या लोकसमूहांच्या दंतकथाही वेगवेगळ्या असतात —- परिसराशी नाते सांगण्याऱ्या, सांस्कृतिक नाते सांगणाऱ्या. आदिम मानवाचे भावविश्व, अनुभवविश्व या मिथक-कथात दडलेले असते. धैर्य, शौर्य, चिकाटी, सत्याचा विजय, दुष्टांचा धिंगाणा यांतून नकळत मुलांचे चारित्र्य घडते. निसर्ग, नद्या, पर्वत, झाडे, मासे . . . यांच्याशी त्यांचे नाते जडते.
सात वर्षापासून मूल आई-वडिलांपासून सुटे व्हायला लागते. स्वतःची अभिव्यक्ती पुढे यायला लागते. आज पालक मुलांना उघड्या हवेवर खेळकूद, पदभ्रमण इत्यादींनी शारीरिकदृष्ट्या कणखर करायला पाहतो. त्याच्या मानसिक आरोग्याचाही असाच विचार झाला तर किती चांगले होईल? समोरची माणसे, त्यांचे वागणे, बसणे, बोलणे इ. ही सर्वांचे अनुकरण केले जाते. हळू हळू त्याला “आपल्याला वाटणे आणि प्रत्यक्षात असणे’ यातले भेद कळायला लागतात. आणि बाहेरचे वास्तव जग (भावविश्वापेक्षा) वेगळे) त्याला हळू हळू कळूही द्यावे. समजावून सांगून, रागावून, उपदेश कस्न ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टींतून-कहाण्यांतून सहज घडतात.
नवव्या दहाव्या वर्षांपासून मुलांचा अद्भुतरम्यतेतील, परीकथेतील रस कमी होतो. ती आता या जगात रुळायला लागतात. त्यागाच्या, ऐतिहासिक, धैर्याच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या गोष्टी त्यांना आवडू लागतात. श्याम, श्यामची आई, गुज-गोष्टीनी . . . किती जणांवर कायम संस्कार केले आहेत. फास्टर फेणे, गोट्या, चंदू, चिंगी ही त्यांची मित्रमंडळी होतात. मुलांना उगीचच फार लवकर प्रौढ करू नये (ताई, दादा).
११. निसर्गाशी मैत्री जोडा
जसजसे शहरीकरण वाढेल तसतशी मुले निसर्गापासून दूरदूर जातील. व्यापारी इमारती, रोंरों करीत सुसाट धावणाऱ्या मोटारी, मोठमोठे जाहिरातींचे फलक, दुकानांची आरास, धूर ओकणारे कारखाने . . . हेच पाहत ही मुले वाढणार आहेत. अशावेळी शहरातच निसर्ग आणण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न झाले पाहिजेत. उद्याने, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, तलाव, रस्त्यांच्या दुतर्फा झाडी असे व्हायला हवे. पण ते होईल तेव्हा होईल. पालकांनी, शाळांनी मुलांना हे भरपूर दिले पाहिजे. छोट्या छोट्या सहली —- समुद्रावर जाणे, डोंगरावर जाणे, ओढ्या नाल्यावर हुंदडणे, पावसात भिजणे, चांदण्यात फिरणे, भाताची लावणी पाहायला नेणे, कुणाच्यातरी शेतावर जाणे, गाईम्हशींच्या धारा दाखविणे, कोंबड्याबदकांच्या मागे धावणे, बागकाम करणे (निदान चार कुंड्या बाळगणे) हे सर्व आवर्जून केले पाहिजे. या सर्वांना प्रवासापलिकडे खर्च येत नाही. खायचे बरोबर घेता येते. मुलांबरोबर मोठ्यांनाही मजा येते. कुटुंबभावना घट्ट होते. दोनतीन कुटुंबे एकत्र गेली तर फारच उत्तम. आजही तिशीतल्या आमच्या मुलांना माथेरानचे गडद धुके, खंडाळ्याच्या घाटातले धबधबे, नारळीपौर्णिमेचे उधाण, अंबोली घाट, सेमाडोह, तुळशीलेक, भंडारदरा, शरदपौर्णिमेचे चांदण्यात फिरणे . . . सर्व सर्व आठवते. त्यांत ती रमून जातात.
प्रत्येक माणसाला आतूनच निसर्गाची ओढ असते. वयाप्रमाणे प्रतिसाद, अनुभूती बदलतील. पण निसर्ग आपल्या आत शिस्न आपले आंतरिक जीवन समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. काहीजण गोष्टीतून निसर्ग मांडायचा प्रयत्न करतात. पण प्रत्यक्षात बऱ्याच वेळा ती असतात नैसर्गिक पोशाखातली शहरी माणसेच. जणु काही निसर्गात जाण्याऐवजी त्याला आणि त्याच्या पशुपक्ष्यांनाही आपण शहरी करतो. वॉल्ट डिस्नेची बदके/उंदीर पाहा. मुले मोठी झाली की नऊ दहा वर्षांपासून पदभ्रमण, गिरिभ्रमण, वृक्षारोपण, वल्हवणे, कोळ्यांबरोबर मासे पकडायला जाणे, अभयारण्यात प्राणी पक्षी पाहणे सुरू करता येईल. यात कुठेही ‘अभ्यास’ नको, ‘निबंध लिहिणे’ नको. हवे फक्त मनसोक्त, मनमुराद निसर्ग अनुभवणे.
१२. यंत्रांची अजव दुनिया आणि शिक्षण एकाद्या गावाकडच्या शाळेतून ज्यावेळी मुलगा एकदम शहरी वातावरणात येतो तेव्हा निसर्गाशी जुळवून घेतलेला आयुष्यक्रम एकदम बदलतो. यंत्रांच्या आधुनिक जीवनपद्धतीशी जुळवून घेताना त्याची काय तारांबळ उडते. इथे सूर्यापेक्षा विजेचा बडेजाव जास्त. पायाच्या गतीपेक्षा चाकाची गती श्रेष्ठ. भूक लागली म्हणून जेवायचे नाही तर lunchtime झाला म्हणून जेवायचे. लोकांची ऊठबस सहज मनात आले म्हणून होत नाही, घड्याळ परवानगी देईल तरच होते. मोठ्यांना हे सगळे समजते, समजून घ्यावे लागते. मुलांचे काय? उत्तम शाळांच्या नादात दूर दूर प्रवास करावा लागतो. मित्रमैत्रिणी पांगतात, आईबाबाही बरेच वेळा दिवसभर कामावर जातात. दुर्दैवाने शिक्षणाचा अर्थ नुसते ‘डोक्यात भरणे’ असा होऊन बसला आहे. माणसाला मन असते, भावजीवन असते. सिनेमा, आकाशवाणी, दूरदर्शन ही सुद्धा यंत्रेच आहेत. या सर्व यंत्रांनी नियंत्रित केलेल्या जीवनक्रमाचा परिणाम मुलांवर नकारात्मक होत असतो. आभासी जग (Virtual reality) प्रत्यक्ष जिवंत जागत्या जगाची जागा घेऊ पाहत आहे. बिरबलाची डुकराच्या आवाजाच्या नकलेची गोष्ट जरा आठवा. अस्सलपेक्षा नक्कल खरी! संस्कार, शिक्षण, संगोपन आणि रोजचे जीवन या सर्वांचा मेळ घालता आला पाहिजे.
वयात येताना कदाचित चांगली चरित्रे, आत्मचरित्रे, वाचून फायदा होईल. तंत्रज्ञानाच्या विकासाची पण एक अद्भुत कथाच आहे. हजारो लोकांचा परस्पर सहकार, जिद्द, चिकाटी, कल्पकता यांतून शेकडो वर्षांच्या परिश्रमातून हे उभे राहिले आहे. आणि शेवटी माणसाचे जीवन अनेक बाबतीत सुसह्यही केले आहे, हे पण त्यांना कळू दे. मात्र पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की निसर्ग तो निसर्ग. त्याची जागा आभासी जगाने घेऊ नये. मुलात दुधाचे दात असेतो मुलांना शाळेत घालू नये असे सर्व शिक्षणतज्ञ मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपण मात्र बालमंदिरातच मुलांना थोडे आकडे आणि बाराखड्या शिकविण्याचा हट्ट धरतो. (prevention of cruelty to children अशी एखादी संस्था आहे का?) मुलांना शिकू देणे, वाढू देणे म्हणजे त्यांना हाताळणे (manipulate) नव्हे. यंत्रमानवाकडून संगणकाद्वारा मुलांना शिकवता येईल? शिक्षण म्हणजे काय कारखान्यातून पूर्वनियोजित बाहेर पाडायचे उत्पादन आहे ?
१३. दूरदर्शन चित्रपट ज्यावेळी या विषयावर चर्चा होते तेव्हा ती ‘चांगले आणि वाईट कार्यक्रम’ अशा अंगानी जास्त होते, तर या माध्यमांचे अंगभूत गुणदोष, या अंगाने कमी होते. माणूस आणि यंत्र, फावला वेळ आणि करमणूक, कृतिशील सहभाग आणि त्रयस्थ ‘बघ्या’ सहभाग यावर जास्त विचार करायला हवा. बऱ्याच जणांना वाटते की मुलांनी National Geographic, Animal World, विम्बल्डन सामने, ‘आमची माती आमची माणसे’ असे कार्यक्रम पाहावेत. पण कित्येक मुलांना साधा समुद्रही माहीत नसतो की जवळच्या ओढ्याकाठी ती दोन चार किलोमीटर चाललेली नसतात. साधा व्हालीबॉल खेळलेली नसतात की त्यांनी भातखाजणात चिखल तुडवलेला नसतो. त्यामुळे हे कार्यक्रम timepass होतात. त्यातून सुदृढ मने तयार होत नाहीत. पाहणाऱ्या मुलांसाठी (आणि बऱ्याच मोठ्यांसाठी) ते काल्पनिक जगच राहते. अशा कार्यक्रमात ‘माणूस’ नसल्यामुळे पुढेपुढे ते कंटाळवाणे पण होतात. निव्वळ आवाज आणि चित्रांची ही दुनिया आहे. जिवंत हाडामांसाची नव्हे. पण हेही कार्यक्रम मनावर ठसा उमटवतातच. खून मारामाऱ्यांचे चित्रपटही उमटवतात आणि भावना उद्दीपित करणारे चित्रपटही. भावनांना आवाहन करणाऱ्या जाहिरातीही फार परिणामकारक असतात.
एक मजेदार प्रसंग (परदेशी शिक्षकाने सांगितलेला) सागण्यासारखा आहे. “आम्ही ग्रामीण भागातील लहान मुलांना घेऊन सहलीला गेलो होतो. छान रानावनात रमली होती मुले. अचानक एक स्वनातीत जेट विमान अगदी खालून डोक्यावस्न रोंरावत गेलं. मुलं जी घाबरली, किंचाळायला लागली, शिक्षकांना बिलगायला लागली, थरथरायला लागली, आईची आठवण काढून रडायला लागली! आधुनिक यांत्रिक संस्कृती पचवायला काय काय दिव्यातून मुलांना जावं लागतं!” (मलाही पार्ल्यात असा अनुभव अनेक वेळा आला आहे.) अशा या अनुभवांतून यंत्रे आपले श्रेष्ठत्व पदोपदी मुलांच्या (आमच्या उद्याच्या नागरिकांच्या मनावर ठसवत राहतात, हतबलतेची जाणीव त्यांच्यात रुजवतात.
आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इथे (दूरदर्शन, सिनेमा) बघणाराला काही विचार करायचा नसतो. सगळे तयार readymade तुमच्यापुढे मांडले जाते —- समस्याही आणि उत्तरेही. पण माणूस खरा घडत जातो तो अनुभवांतून, प्रत्यक्ष स्वतः करून पाहून, सर्वांतून स्वतः जाऊन.
१४. फावला वेळ —- कोणाची जबाबदारी? हल्ली अशी एक समजून झाली आहे की मुलांना मोकळे बसूच द्यायचे नाही. एकतर आपण त्यांची करमणूक केली पाहिजे (दूरदर्शन दाखवून, सिनेमे दाखवून, नाहीतर कार्यक्रम आखून) नाहीतर त्यांना कशाना कशात तरी गुंतवून/अडकवून टाकायला पाहिजे.
व्यायामाचे एक तत्त्व आहे आलटून पालटून ताण देणे आणि सैल सोडणे असे. निसर्गातही दिवसानंतर रात्र येते. पण शाळेमध्ये सहाआठ तास ताणलेल्या मुलांना मोकळे सोडायला, हुंदडायला नको? मनाला पण झीज भरून काढायला अवधी लागतो. पण हा अति महत्त्वाचा ‘अवधीच’ शिक्षणातून हद्दपार झाला आहे. एका पाठोपाठ एक निरनिराळ्या विषयांचे तास, इतिहासात मन रमते तोच एकदम गणित, मग एकदम जीवशास्त्र. ज्ञान मनात मुरायला अवधीच द्यायचा नाही, ते कोंबायचे. दोन दोन पाळ्यात शाळांचे कारखाने चालू असतात. वर गृहपाठही आहेच. उसंत म्हणून नाही. शांत, स्वस्थ बसून राहणे, निवांतपणे समुद्राची गाज ऐकणे, आकाशातील ढगांची पकडापकडी पाहात बसणे, यात मनाची झीज भरून येत असते, विकास होत असतो. पण आम्हाला हा आळशीपणा वाटतो, उनाडक्या वाटतात, वेळ वाया घालवणे वाटते. दोनचार वर्षे अशी गेली की मुलांनाही रोजचा धबडगा अंगवळणी पडतो. मग त्यांना रविवारी/सुटीच्या दिवशी कंटाळा येतो. सारखे मनाला गुदगुल्या करायला काहीतरी हवे असे वाटायला लागते. १५. घरबशी चिडचिडी मुले शाळेत सतत डांबलेली, काहीना काही करण्यात गुंतवलेली मुले मग कातावतात. घरी आल्यावर आईला कामात हातभार लावणार नाहीत. उलटून बोलून राग बाहेर काढतील. नाहीतरी कचेरीतून घरी आलेले बाबा (आणि आता आईही) काय करतात? सगळ्यांनाच कुठे जाऊ या नको, काऽही करायला नको असे वाटते. पण गृहपाठ चुकत नाही, स्वयंपाकपाणी चुकत नाही . . मग उणीदुणी, जगाला नावे ठेवणे, सरकारला शिव्या, गुरुजनांची निंदानालस्ती असे सगळे नकारात्मक वागणे सुरू होते. खरे म्हणजे मुलांसमोर चांगले, उत्साहवर्धक बोलण्यासारखेही जगात, अवतीभवती खूप घडत असते. आयुष्य उत्साहासाठी, आनंदासाठी आहे हे मुलांना कळू द्या. यातूनच कुटुंब एकजीव होते. नाहीतर जो तो करवादलेला आणि स्वतःपुरता विचार करतो आहे. एकत्र गप्पागोष्टी करत सर्वांनी एकाच वेळी जेवणे हा तर आनंदोत्सव व्हायला हवा.
१६. मुले, सणवार, उत्सव, जत्रा, रीतीभाती सणवार, उत्सव, जत्रा या सगळ्यांना धार्मिक बाबीपेक्षा सामाजिक आणि निसर्गचक्राचा आशय जास्त आहे. बेंदूर (पोळा) याचा शेतीशी, दिवाळीचा सुगीशी, संक्रांतीचा सूर्याशी, आईनवमी, जिवत्या, सर्वपित्री अमावास्या यांचा कुलाचाराशी, घरगुती नात्यांशी, वंशपरंपरांशी जास्त संबंध आहे. त्यांचे उगम आदिम कालाशी निगडित आहेत. आणि धर्मांनासुद्धा त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागले! २५ डिसेंबर हा काही येशू ख्रिस्ताचा खरा जन्मदिवस नाही. मानववंश विज्ञानातून, मानसशास्त्राच्या अभ्यासातून या सर्वांचे संदर्भ आता बदलत आहेत. एकसंध समाजबांधणीचा, निसर्गाशी नाते जोडण्याचा, सामाजिक उच्चनीचतेचे बंध सैल कस्न एकत्र मौजमजा करण्याचा असे अनेक पैलू त्यात आहेत.
कालानुरूप त्यात बदल करावेत जरूर पण त्यांच्यावर सरसहा रानटीपणाचा, मागासलेपणाचा, धार्मिक कट्टरतेचा आरोप करू नये. त्यांची हेटाळणी करू नये. मुलांना या सर्वांचा मनसोक्त आनंद लुटू द्या. दहीहंडी, रंगपंचमी, आवळी भोजन, कृष्णाबाई उत्सव, डोंगरावरच्या जत्रा, . . . किती नावे घ्यावीत. बऱ्याच वेळा या सर्वांत अडथळा येतो तो शाळांचा. आपले शैक्षणिक वर्ष आपल्या निसर्गचक्राशी जोडलेले नाही. ५० अक्षांशावर राहणाऱ्या इंग्रज राज्यकर्त्यांनी २० अक्षांशावर राहणाऱ्या आपल्यासाठी ते ठरवले. शेतावर कामे चाललेली असतात तेव्हा आमच्या शेतकी कॉलेजचे विद्यार्थी वाचनालयात बसून परीक्षेची तयारी करीत असतात. बांधकामाच्या भरल्या मोसमात अभियांत्रिकीच्या परीक्षा आणि पावसाळ्यात जेव्हा बांधकाम ठप्प होते तेव्हा विद्यार्थी मोकळे. निसर्ग सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी मुलांवर, ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांवरही हे शहरी शैक्षणिक वर्ष लादले गेले आहे.
१७. मुलांच्या नैसर्गिक वाढीचे टप्पे
‘चिंगी चार महिन्यांची झाली नाही तोच’ ही गोष्ट सर्वांना परिचित आहे. त्या त्या गोष्टींचे वय असते. साधारणतः तीन वर्षांपर्यंत बाळ, दुधाचे दात पडेतोपर्यंत लेकरू, वयात येईतो मूल, पुढे किशोर-तरुण असे शारीरिक आणि मानसिक बौद्धिक टप्पे असतात.
तीन वर्षापर्यंत मुलाच्या मेंदूची वाढ होत राहते. मेंदू आणि ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये यांचा मेळ घातला जातो. रंग, प, स्पर्श, रस, गंध, शारीरिक तोल, स्नायूंची ताकद, बोटांचा उपयोग . . . बाळ सारखे कष्टपूर्वक शिकत असते. त्याला आईचा सहारा लागतोच.
पुढे त्याला आत्मज्ञान येते, जाणिवा जागृत होतात, साधारणपणे सातव्या वर्षापर्यंत मुलाचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व पक्के झालेले असते. त्याप्रमाणे ते स्वतःशी आणि इतरांशी जुळवून घ्यायला लागते. तरीही घरच्या प्रेमाच्या आपल्या लोकांवर ते अवलंबून असतेच.
वयात येताना त्याच्यात शारीरिक बदल घडायला लागतात. ते बावरते. फार मोठ्या मानसिक चलबिचलीतून ते जात असते. आपल्याला कोणी समजूनच घेत नाही असे त्याला वाटते. यावेळी आई-वडिलांची जबाबदारी मोठी असते.
१८. सारांश
‘लालयेत पंचवर्षाणि, दशवर्षाणि ताडयेत्. प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्र-वदाचरेत्’ ही म्हण बरेच काही सांगून जाते. मुख्य सूत्र असे की प्रत्येक मुलाला त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या गतीने तालाने विकसित व्हायला मदत करा. तुमची घायकूत, तुमच्या काळज्या-चिंता, आशा-महत्त्वाकांक्षा त्याच्यावर लादू नका. रवींद्रनाथ ठाकुरांची एक फार सुंदर कविता आहे. तिचा आशय असा:
त्या कळीवर फुलण्याची बळजबरी करू नका तिच्या पाकळ्या ओढू ताणू नका जोरजोरात कुंकर मास्न फुलवण्याचा प्रयत्न करू नका एक दिवस कुठूनतरी मंद वाऱ्याची झुळूक येईल आणि कळी खुदकन हसून तिचे फूल होईल. लक्षात घ्या तुम्ही मुलांचे पालक आहात, मालक नाही.
ज्या गरीब अशिक्षित बापड्यांच्या मुलांना सरकारी आणि घरातली, कुठलीच शाळा मिळत नाही त्यांच्या विषयी फार वाईट वाटते. पण ज्या भाग्यवान मुलांना हे मिळू शकेल त्यांचेही आई–वडील–शाळा आज त्यांना आपण बेतलेल्या चांगल्या दणकट चिलखतात अडकवून टाकतात तेव्हा काय म्हणावे? एकदा चांगल्या शिक्षणसंस्थेच्या बालमंदिरात प्रवेश मिळाला की ‘आता दहावीपर्यंत बघायला नको’ असे म्हणणारे सुशिक्षित पालक कमी नाहीत. अंगाबाहेर झटकून टाकण्याइतकी बालसंगोपन ही सहज घडणारी (Casual) गोष्ट आहे? तुम्हाला ‘मूल जन्माला घाला’ असे सरकारी फर्मान नव्हते निघाले. मुलांवर प्रेम करा, मशागत करा पण हुकूमत गाजवू नका.
६, सुरुची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई — ४०० ०५७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.