उपजत प्रवृत्ती

आजचा सुधारक मधील लेखनात ‘उपजत प्रवृत्ती’ (Instinct) या मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकाकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे असे वाटते. मानवी वर्तनावर परिणाम करणाऱ्या बुद्धी व भावना या दोन घटकांकडे आजचा सुधारक मध्ये पुरेसे लक्ष दिले जाते.
प्राण्यांचे वर्तन प्रामुख्याने उपजत बुद्धीने ठरत असते. आई-मुलांनी परस्परांना ओळखण्याच्या क्रियेपासून पिलांना पाजणेभरवणे, घरटे बांधणे, काय खावे काय खाऊ नये, अन्न कसे मिळवावे, लैंगिक जोडीदाराची निवड, आपल्या स्वामित्व-क्षेत्राचे मर्यादीकरण व रक्षण, शत्रूला ओळखणे व त्याच्यापासून संरक्षण वगैरे सर्वच क्रियांमध्ये सर्व क्षेत्रात उपजत बुद्धीच महत्त्वाची असते व शिक्षणाचे, अनुभवा-पासून शिकण्याचे महत्त्व गौण असते. बुद्धीने, विवेकाने निर्णय घेण्याचे महत्त्व तर नगण्यच असावे. माणसाच्या बाबतीत मात्र शिक्षण व विवेक यांनी एवढी प्रगती केली आहे की उपजतप्रवृत्तींची आपल्याला आता आठवणदेखील होत नाही. आपल्या नैसर्गिक, उपजतप्रवृत्तींचा अभ्यास तरी कसा करणार? ‘नैसर्गिक अवस्थेतील मानवी समाज’ ही देखील एक आत्मविसंगत कल्पना आहे. त्यातल्यात्यात जास्त नैसर्गिक म्हणता येतील असे, आधुनिक समाजापासून दूर राहिलेले — Isolated — आदिवासी समाजही आता दुर्मिळ झाले आहेत. तरीही कांही मूलभूत गोष्टींमध्ये नैसर्गिक प्रवृत्ती या अजूनही कार्यप्रवण असाव्या असे मला वाटते.

उदाहरणार्थ लहानपणापासून एकत्र वाढलेल्या दोन भिन्नलिंगी व्यक्तींचे प्रेम जमत नाही —- त्यांना एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही —- असे अनुभवास येते. ही एक नैसर्गिक प्रवृत्ती असावी व त्यामुळे अंतर्पुनरुत्पादनाचा (inbreeding) धोका कमी होत असावा. (‘बालम’ हा काव्यातही नेहमी ‘परदेशी’ असतो.) तसेच विवाहसंबंधांतील एकनिष्ठता, जोडीदाराविषयीची मालकी हक्काची भावना —- (Possesiveness), विवाहबाह्य-संबंध ठेवण्याची वृत्ती व तिला जोडीदाराकडून मिळणारा प्रतिसाद यांमध्येही उपजतप्रवृत्ती कार्यरत असाव्या असे वाटते. त्यामुळेच ‘रसेल’ चे ‘मॅरेज अँड मॉरल्स’ हे पुस्तक किंवा आजचा सुधारक मधील दिवाकर मोहनींचे लेख वाचताना, युक्तिवाद बिनतोड वाटले व पटले, तरी वर्तनात येणे अशक्यप्राय दिसते.
नैसर्गिक प्रवृत्तींचे गुलाम आपण होऊ नये. शिक्षणाने, विवेकाने नैसर्गिक उपजत प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे आवश्यकच आहे. पण उपजत प्रवृत्तींची दखलच न घेणे हेही विवेकवादात बसणारे नाही. म्हणून मानवी उपजत प्रवृत्तींच्या अभ्यासाबद्दल आजचा सुधारकच्या वाचकांनी काही वाचले असल्यास, काही निरीक्षण | संशोधन केले असल्यास, त्याबद्दल त्यांनी आजचा सुधारक मध्ये लिहावे अशी माझी सूचना विनंती आहे.

२५, नागाळा पार्क, कोल्हापूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.