‘ल्यूटाइन बेल’

लॉइज ऑफ लंडन. काही शतके जगाच्या विमाव्यवसायाचे केंद्र समजली जाणारी संस्था. एका मोठ्या दालनात अनेक विमाव्याव-सायिक बसतात आणि कोणत्याही वस्तूचा, क्रियेचा किंवा घटनेचा विमा उतरवून देतात. लॉइड्जची सुरुवात झाली जहाजे आणि त्यांच्यात वाहिला जाणारा माल यांच्या विम्यापासून. ‘मरीन इन्शुअरन्स’ ही संज्ञा आज कोणत्याही वाहनातून केल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या विम्यासाठी वापरतात. पूर्वी मात्र जहाजी वाहतूकच महत्त्वाची होती आणि लॉइड्जच्या दालनातील बहुतेकांचा प्रत्येक जहाजाच्या प्रत्येक सफरीच्या विम्यात सहभाग असे. एखादे जहाज बुडाल्याची वार्ता आली की दालनाच्या एका कोपऱ्यातील ‘ल्यूटाइन बेल’ (Lutine Bell) वाजवली जाई. आपापले संभाव्य खर्च तपासा, अशी ती सूचना असे.
१२ सप्टेंबर २००१ रोजी लॉइड्जमधली ल्यूटाईन घंटा वाजवण्यात आली. आदल्या दिवशीच्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यांमुळे विमा कंपन्या अब्जावधी डॉलर्स खर्चात पडू शकतात, हे तो घंटानाद सांगत होता. पण हा ‘खर्च’ फक्त विमा कंपन्यांपुरता मर्यादित नाही. जगातील प्रत्येक माणसाला ही घटना व ती घडण्यामागची कारणे खर्चात पाडणार आहेत. खर्च स्पये–डॉलरांमध्येच असणे सुखाचे असेल. तोच जर मृत्यू, इजा, अशा स्पात आला . . . आणि तसा तो येतच राहणार. इजा नीतिमूल्यांनाही होईल. मूल्ये मरतीलही. हिंसेला प्रवृत्त होणे ही अशा इजेची, आजाराची, संभाव्य मृत्यूची खूण असते. आता कोणकोण कितीकिती मूल्यांबाबत ‘तंदुरुस्त’ आहे ते पाहायचे. मुळात दहशतवाद्यांची मूल्ये कशामुळे आणि किती जायबंदी झाली, हेही तपासायला हवे. तीही तुमच्यामाझ्यासारखी माणसेच आहेत. आज जे त्यांचे झाले, जे त्यांनी केले, ते आपल्यालाही होऊ शकते, आपणही ते करू शकतो.
ल्यूटाइन बेल सर्वांनीच काळजीपूर्वक ऐकलेली बरी. —- संपादक