विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला, तेव्हा प्रेतातील वेताळ बोलू लागला:
आटपाट नगर होते, तेथे एक राजा राज्य करत होता. राजा प्रगतिशील होता आणि प्रजेला सुशिक्षित, संपन्न करण्यासाठी झटत होता. परंतु इतक्यात त्याची झोप एका विचित्र प्र नामुळे उडाली होती. त्याची प्रजा जरी सुशिक्षित व संपन्न होत चालली होती तरीही प्रजेतील मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात न राहता घसरत चालली होती. राजाने निरीक्षण केल्यावर एक भयानक गोष्ट त्याच्या लक्षात आली. मुलींचे आईबापच त्यांच्या जिवावर उठले होते. ते एकतर मुलींना जन्मालाच येऊ देत नव्हते किंवा नवजात मुलींचा जीव घेत होते. त्याचे कारण काय असावे? प्रत्यक्ष जन्मदातेच इतके निष्ठुर कसे वागू शकत होते? समस्येवर गांभीर्याने विचार केल्यावर काही गोष्टी राजाच्या लक्षात आल्या. त्याच्या राज्यात स्त्रियांची स्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना दुय्यम दर्जाच्या नागरिकाची वागणूक मिळत होती. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असल्या तरी त्या प्रमाणात त्यांना हक्क नव्हते. कुटुंबाच्या मिळकतीत आणि मालमत्तेवर त्यांचा हक्क नव्हता. त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत होते. मुलीच्या लग्नासाठी वधूपित्याला वरपक्षाला हुंडा द्यावा लागत होता. हुंड्याच्या वसुलीसाठीदेखील मुलींचाच छळ केला जात होता. अनेकदा तर हुंड्यासाठी नवविवाहितेचा बळी देखील घेतला जात होता. आपल्या सुसंस्कृत म्हणवणाऱ्या प्रजेतील स्त्रियांची परिस्थिती पाहून राजा विषण्ण झाला. त्याने स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवले. स्त्रियांची परिस्थिती सुधारली की नि िचतच त्यांचे प्रमाणही सुधारेल अशी राजाला आशा वाटली. त्याप्रमाणे त्याने विविध योजना आखल्या. हुंडा देण्याघेण्यावर त्याने कायद्याने बंदी आणली. स्त्रियांवर शारीरिक अत्याचार करणाऱ्यांना घोर शिक्षा देण्याची तजवीज केली. त्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था केली. तसेच विविध क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवल्या आणि वडिलांच्या संपत्तीत त्यांना मुलांच्या बरोबरीने हक्क दिले. स्त्रियांना आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम केल्यावर त्या निदान आपल्या मुलामुलींमध्ये भेदभाव करणार नाहीत. आपल्याच मुलीचा जीव घेण्याच्या पुरुषी षड्यंत्राला बळी पडणार नाहीत असे त्याला वाटले आणि आपल्या ह्या उपाय योजनांच्या परिणामस्वरूप त्यांचे प्रजेतील प्रमाणही वाढणार असा त्याला विश्वास वाटू लागला. पण घडले उलटेच. हे सर्व उपाय योजूनही मुलींचे प्रमाण वाढेना, उलट ते अधिकअधिकच कमी होऊ लागले. राजाच्या उपाययोजना पूर्णपणे अयशस्वी झाल्या होत्या.
एवढी गोष्ट सांगून वेताळाने विक्रमाला विचारले – “राजा, ह्या इतक्या उपाययोजना अयशस्वी होण्याचे कारण काय? खरे तर राजाने जे केले ते योग्यच केले होते. इतके करूनही तो मुलींचे प्रमाण का वाढवू शकला नाही? त्याच्या राज्यातल्या शिकल्यासवरलेल्या, पैसे कमावणाऱ्या आणि वडिलांच्या मालमत्तेत समान हक्कदार असलेल्या मुलींनाही स्वतःला मुलगी व्हायला का नको होती? आपल्या अपत्यांच्याप्रति असलेली आपली जबाबदारी मुलीच्या बाबतीत मात्र पतिपत्नी दोघेही का नाकारत होते? माझ्या ह्या शंकांचे समाधान केले नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील हे तू जाणतोसच!’
राजा विक्रमादित्य वेताळाच्या शंकांचे निरसन करीत म्हणाला —- राजाने जे उपाय केले ते योग्यच होते आणि प्रजेमध्ये स्त्रीपुरुषसमता आणण्यासाठी आवश्यकदेखील होते; परंतु स्त्री-पुरुष-समानता आल्यावर किंबहुना स्त्रियांना पुरुषांपेक्षा काकणभर अधिकच अधिकार दिल्यामुळे प्रजेतील मुलामुलींचे प्रमाणही समान होईल असा जो राजाने विचार केला होता तो मात्र चुकला. शिकल्यासवरलेल्या, पैसे कमावणाऱ्या स्त्रियांनाही स्वतःला मात्र मुलगी व्हायला नको होती. इतकी की तिची भ्रूणहत्या करायलाही त्या तयार होत्या, ह्याची कारणे पालकांच्या दृष्टीतून बघितल्या-खेरीज आपल्याला कळणार नाहीत. ही कारणे काही अंशी सामाजिक तर बऱ्याच अंशी आर्थिक असावीत असे मला वाटते. मुलगी झालेल्या पालकांच्या दृष्टिकोणातून पाहिल्यास काय दिसते? मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत तिचे संगोपन करावे लागणार, तिला योग्य ते शिक्षण द्यावे लागणार, तिचे लग्न लावून द्यावे लागणार, त्यात हुंड्याचा नाही, तरी लग्नाचा खर्च तरी करावाच लागणार. तिला मुलांइतकाच मालमत्तेत हक्क द्यावा लागणार. इतके कस्नही ती परक्याचे धन, त्यामुळे पतीच्या घरी जाणार, त्यामुळे वृद्धापकाळी तिचा आधार मिळण्याचीही शक्यता नाही. उलट ती तिच्या घरी सुखी आहे की नाही ह्याचीच चिंता सतत भेडसावणार. अशा परिस्थितीत कोणते पालक आपल्याला मुलगी झाली म्हणून आनंदित होतील? उलट ती त्यांना नकोशीच होणार.
मुलींचे प्रमाण वाढवायचे असेल तर मुलीच्या पालकांचे अधिकार वाढवायला हवेत. राजा हुंड्यावर कायद्याने बंदी आणून थांबला. त्याने तिथेच न थांबता अशी काही व्यवस्था करायला हवी होती ज्या योगे मुलीच्या पालकांच्या चिंता मिटतील मुलीकडे एक Liability म्हणून न बघता एक Asset म्हणून ते बघू लागतील.
मी जर राजाच्या जागी असतो तर वडिलांच्या म्हणजेच पालकांच्या संपत्तीत तिला वाटा देण्याच्या ऐवजी तिला पतीच्या उत्पन्नातील वाटा मिळण्याची व्यवस्था केली असती. तसेच ती मुलगी पतीच्या घरी आल्यामुळे तिच्या पालकांच्या वृद्धापकाळाचा आधार हरवला त्याबद्दल, तसेच आतापर्यंत त्यांनी तिचा सांभाळ केला त्याबद्दल, त्यांना योग्य तो मोबदला देण्याचीही व्यवस्था केली असती. आणि हे सर्व कसे करावयाचे, मोबदला कसा ठरवायचा, तो देणे कसे भाग पाडायचे ह्याचे चित्र जरी माझ्या मनात स्पष्ट असले तरी आधी प्रजेला आवाहन करून मी त्यांचे मत आणि त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या असत्या आणि मगच त्याप्रमाणे कायदे बनवले असते.
अशा रीतीने राजाचा मौनभंग झाल्यावर वेताळ प्रेतासह अदृश्य झाला आणि पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.