कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग २)

‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी.
कुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडणारे कुटुंब असले पाहिजे. पति-पत्नींचे दांपत्यजीवन त्यांच्या परस्परपोषणासाठी स्वतंत्रपणेही महत्त्वाचे असतेच. पण त्यांच्या पोषणासाठी त्यांना कुटुंबाबाहेर पोचणारे अन्य मैत्रीसंबंध व त्यावर उभारलेले सहजीवन यांचीही तेवढीच आवश्यकता असते. त्यांचा दांपत्यजीवनाचा भाग कुटुंबातील मुलांखेरीज असलेल्या व्यक्तींच्या संदर्भातील योग्य जबाबदारी पार पडणे हा पण असतो. पण मध्यवर्ती लक्ष्य मुलांचे संगोपन हे असते व असायला हवे. गृहस्थाश्रमातली ही एक प्रधान जबाबदारी असते. मुले मोठी होऊन वयात आली, कुटुंब स्थापन करण्यास पात्र बनली की, दंपतीचा ‘आश्रम’ बदलतो : त्यांच्या दांपत्यजीवनाचा आशय व आकार यांमध्ये स्थित्यंतर घडून येते. किंबहुना, योग्य स्थित्यंतर घडून येणे इष्ट व आवश्यक मानायला हवे. पारंपारिक चौकटीत या स्थित्यंतराचे वर्णन वानप्रस्थाश्रम असे अर्थपूर्णपणे केले आहे.
मातृत्व व पितृत्व या दोन परस्परपूरक आणि गृहस्थाश्रमाला परिपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या दोन भूमिका (रोल) म्हटल्या तर, ‘मातृत्वा’च्या भूमिकेला तिचे योग्य ते स्थान ज्यामध्ये दिले जात आहे ते ‘स्त्रीकेंद्री कुटुंब’ अशी स्पष्टता करणे योग्य होईल. असेही म्हणता येईल की, मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडण्यास, मुलांचे संगोपन व वयस्क, वृद्ध लोकांचा सांभाळ वा यासंबंधातले गृहस्थीचे कर्तव्य पार पाडण्यास पती व पत्नी दोघांनाही आवश्यक ती सवड व प्रोत्साहन ज्यात आहे असे कुटुंब स्त्रीपुरुषांना विवाहाद्वारे प्रस्थापित करता यायला हवे. यासाठी उपकारक व सहाय्यभूत अशी अर्थ व राज्यव्यवस्था हवी आणि संस्कृती पण हवी. तरीही, मुलाला जन्म देणे व वाढविणे या कामाची काही विशेष जबाबदारी फक्त स्त्रीलाच उचलता येते, आणि तिने हे कार्य पूर्ण स्वस्थचित्ताने, आरोग्यसंपन्न अवस्थेत व सन्मानपूर्वक पार पाडावे यासाठी कुटुंबातले कर्तेपण, केंद्रस्थान तिचे असल्याचे मान्य झाले पाहिजे. तिचा विशेषाधिकार स्वीकृत करण्याच्या उद्देशाने ‘स्त्रीकेंद्री’ हा शब्द वापरणे औचित्याला धरून होईल.
मूल जन्मल्या क्षणापासून पितृत्वाचीही भूमिका सुरू होतेच आणि मुलाला वाढविण्यात पित्याने करावीत अशी मुलांच्या संगोपनाशी निगडित अशी पुष्कळ कामे घरात असतातच. पण आज हा प्र नही उपस्थित करावयास हवा की, पितृत्व व मातृत्व अशा दोन भूमिका असतात, पितृत्व पुरुषाने पार पाडावयाचे व मातृत्व स्त्रीने, हे मानलेच पाहिजे का? प्रसंगी पुरुष पित्याच्या भरीला आई पण बनतो आणि स्त्री आईच्या भरीला बापही बनते, हे आपण पाहतो. तेव्हा पितृत्व पुरुषालाच पार पाडता येते वा आईपण फक्त स्त्रीलाच पार पाडता येते असे नाही, पण मुलाच्या निकोप व समग्र वाढीच्या दृष्टीने या दोन भूमिका दोन वेगळ्या व्यक्तींनी, एक स्त्रीने व दुसरी पुरुषाने पार पाडणे ही अधिक श्रेयस्कर व निकोप व्यवस्था आहे आणि निसर्गाच्या व्यवस्थेत हे अपेक्षितही आहे, असे म्हणता येईल. स्त्रीला वा पुरुषाला डबलरोल करता येतो, पण तसे आपद्धर्म म्हणून करावे; सामान्यतः पुरुषाने पितृत्व व स्त्रीने मातृत्व या भूमिका पार पाडाव्यात, असे म्हणणे पुरुषसत्ताकतेचे द्योतक मानण्याचे कारण नाही. पितृत्व व मातृत्व या भूमिकांमध्ये अंतरही आहे आणि हे अंतर असल्याने दोन भिन्न पण परस्परांशी वैवाहिक नात्याने जोडलेल्या व्यक्तींनी त्या पार पाडाव्यात हे त्या मुलाच्या दृष्टीने स्वाभाविक व श्रेयस्कर आहे. या दोन भूमिकांमध्ये आईची भूमिका काही बाबतीत स्त्रीच करू शकते हे लक्षात घेता, कुटुंबात मातृत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रीला प्राथम्य, वजन, अधिकार व सन्मान प्राप्त व्हावा; या अर्थाने ‘स्त्रीकेंद्री कुटुंबा’ची गोष्ट केली जाऊ शकते.
पंडितांच्या भूमिकेला किमान दोन भूमिकांमधून विरोध होईल. मूल जन्माला घालणे एवढ्यापुरता जैविक लिंग व कार्य भेद सोडता बाकी स्त्री व पुरुष यांच्यामध्ये काही भेद नाही; स्वभावप्रकृती वा कार्य भेद आहे वा असावा असे जे कोणी म्हणत असतील ते स्त्रीचे गौणत्व व दास्य टिकवून धरण्याचीच गोष्ट कळत-नकळत करीत आहेत, अशी भूमिका घेणारी मंडळी. यांच्यात पुरुषही आढळतील. ही एक विरोधी भूमिका. गृहिणीच्या भूमिकेचे पंडित एक प्रकारे उदात्तीकरण करीत आहेत; आणि तसे करून ती भूमिका वठविणाऱ्या स्त्रियांना पारंपारिक मानसिकतेच्या चाकोरीत संतुष्ट राहण्यास उत्तेजनच देत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होईल. बालसंगोपनासंबंधी पंडितांनी लिहिलेला जो लेख वाचण्यात आला त्यात मूल ५ वर्षांचे होईतोपर्यंत मातेने त्याचे संगोपन हे पूर्णवेळचे काम मानावे असेही सुचवले आहे. याचाही अर्थ असा केला जाईल की, ‘चूल व मूल’ याच पारंपरिक खोड्यात स्त्रीला अडकवणारी ही भूमिका आहे. करिअरला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या, त्याद्वारा मिळणाऱ्या उच्च उत्पन्नाला महत्त्व देणाऱ्या तरुण स्त्रिया, विशेषतः उच्च कोटीच्या पांढरपेशा व्यावसायिक स्त्रिया याही पंडितांच्या विरोधात दंड थोपटतील. घरकामासाठी, मुलाचे संगोपन करण्यासाठी आम्ही चार जास्त पैसे देऊन कामवाला वा कामवाली ठेवू —- नव्याण्णव प्रकरणी कामवालीच —- अशी आग्रही व कर्कश भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.
घराबाहेरच्या जगातील काही कार्ये ही पुरुषांच्या हाती सोपविली गेली ती त्यांनीच करावयाची कार्ये म्हणून स्वीकृत झाली. याला स्त्रियांचीही त्या प्राचीन काळी सक्रिय व मनःपूर्वक मान्यता राहिली असली पाहिजे. उदा. दूरवर जाऊन करावयाची मोठी शिकार वा युद्ध वा शोधमोहीम; अन्य समाजांशी आर्थिक व राजनैतिक संबंध, समाजपातळीवरील कारभार, नियमन, दूरवर जाऊन करावयाचा व्यापार, वाहतूक व दळणवळण. तिचे मातृत्वाचे निसर्गदत्त कार्य पार पाडण्यास स्त्री ही अधिक नि िचतपणे मोकळी झाली असेल, जमातीची सुबत्ता वाढल्याने त्यासाठी तिला अधिक संसाधने उपलब्ध झाली असतील, राजकीय प्रभुत्व व स्थैर्य यामुळे शांततेचा काळ वाढला असेल, तर स्त्रियांचाही या कार्यभेदाला पाठिंबाच राहिला असेल. विशेषतः कोणत्याही मोठ्या समाजातील अभिजनवर्गातील वडीलधाऱ्या स्त्रियांचा तर खासच. शरद पाटील ज्या स्त्री-राज्यांची गोष्ट करतात त्या राज्यांमधील श्रेष्ठी स्त्रियांचेही धोरण पुरुषांवर ही कामे सोपवण्याचे राहिले असेल. उपवर मुलींची देवाणघेवाण हा आर्थिक राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा मार्ग प्राचीन काळीच बनला आणि विवाह ही संस्था त्या कामी वापरली जाऊ लागली. वंश पुरुषावरून ठरविला जाऊ लागला आणि ज्या स्त्री क्षेत्रांमध्ये पुरुषाचे ‘बीज’ पडावयाचे ते क्षेत्र वंशशुद्धतेच्या दृष्टीने मालकीचे व पूर्ण नियंत्रणाखाली ठेवण्याचा विचार मान्यता पावला तिथे स्त्रीचा दर्जा गौण ठरला, तिच्या ठायी दास्यही आले. हा तर्क जर योग्य असेल तर, गृहिणी व माता या कार्यांमध्येच स्त्रीच्या गौणत्वाचे वा दास्याचे मूळ पाहण्याचे कारण नाही. दूरदूरवरच्या क्षेत्रापर्यंत पोचणारे राजकारण व अर्थकारण या क्षेत्रांतून स्त्रिया सामान्यतः वर्ज केल्या गेल्या आणि विवाह हे सत्ताकारणाचे, प्रतिष्ठा–दर्जा–संपादण्याचे साधन बनवले गेले, एकंदर मानव संस्कृतीने पितृवंशीय वळण घेतले यामध्ये स्त्रीच्या वाट्याला आलेल्या विषम भोगाचे खरे मूळ आहे. याच्या जोडीला आणखी एका गुंतागुंतीचाही विचार करायला हवा. काही अपवाद सोडता-तेही खरोखर अपवाद आहेत का, हा प्र न आहेच. जगभर लहानमोठे मानवसमाज हे पुरुषसत्ताक बनले. ही घडामोड बऱ्यापैकी प्राचीन काळीच घडली. पण या एवढ्या प्रदीर्घ पुरुषसत्ताकतेच्या काळातही स्त्री म्हणजे जिचा धाक बाळगावा, जिच्यापासून सावध व दक्ष राहावे अशी जबरदस्त शक्ति-देवता वा शक्ति-स्थल हे भानही टिकून राहिलेले दिसते. स्वतःच्या सत्तेचे व पौरपाचे प्रदर्शन करीत असतानाही, स्त्रीवर हुकुमत गाजवीत असतानाही, दुसरीकडे अनेकानेक बंधनांनी स्त्रीला जखडून बंदिस्त व दुर्बल करून ठेवणे पुरुषांना कायम गरजेचे वाटलेले आहे! मोक्षसाधनेच्या, आध्यात्मिक विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा स्त्री हा मानला गेला आहे. ‘स्त्रीकेंद्री कुटुंब’ ही कल्पना साकार करावयाची असल्यास स्त्रीला बंधमुक्त आणि पुरुषाला भयमुक्त करण्याची गरज आहे अशीही मांडणी करता येण्यासारखी आहे.
संततिप्रतिबंधक साधनांचा वापर स्त्रीला एकाहून अधिक अर्थाने सवड निर्माण करतो, मोकळीक देतो. स्त्री आज मातृत्व ही भूमिका पूर्ण नाकास्नही लैंगिक मीलनाची तृप्ती अनुभवू शकते. स्वेच्छापूर्वक हवे तितक्या मुलांना, हवे तेव्हा जन्म देण्याचे ठरवू शकते. यामुळे पूर्वीचे अनेक कार्यभेद आता रद्दबातल ठरले आहेत. लष्कर, पोलीस, शास्त्रीय संशोधन, साहसी शोधमोहीम, व्यापारउदीम, दळण-वळण, अंतराळप्रवास अशी क्षेत्रेही तिच्या कार्यकक्षेत आली आहेत. पुरुषाने घरी गृहिणीच्या कामात वाटेकरी व्हावे हे आज अधिक मान्य झाले आहे. पितृत्वाचीही व प्रसंगी अंशतः मातेचीही जबाबदारी त्याने सांभाळावी यासाठी काळ व वातावरण अनुकूल आहे. गृहिणी व माता या भूमिका आणि स्त्रीचे गौणत्व, दास्य यांचा संबंध मनातून व व्यवहारातून निपटून काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुटुंबात स्त्रीने योग्य प्रमाणात व योग्यरीत्या या भूमिका वठविल्यास स्त्री स्वतःचा आत्माविष्कार अधिक परिपूर्णरीत्या करून अधिक स्वस्थ, समाधानी व कृतकृत्य होऊ शकते. या भूमिकांना समाजाने पुरेसे महत्त्व, वजन व श्रेय द्यायला हवे. आईवडिलांच्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी आणि मुलांच्या योग्य जडणघडणीसाठी या दोन भूमिका कुटुंबात पार पाडणे हे नैतिक कर्तव्यही आहे आणि त्यात मोठा आनंदही साठवलेला आहे इतके ते सर्जनशील निर्मितीचेही कार्य आहे, ही दृष्टी रुजायला हवी. स्त्रिया व पुरुष दोघांनाही स्वतःचे व्यवसाय पेशे असले पाहिजेत आणि ‘घराबाहेरच्या जगा’तही दोघांना वाव असला पाहिजे हे जितके इष्ट व आवश्यक आहे तितकेच दोघांनीही घरातील आपल्या भूमिका वठविणे इष्ट व आवश्यक आहे.
स्त्री व पुरुष यांच्यातील वैवाहिक-कौटुंबिक संबंध हे परस्परांना बांधणारे राहणारच. मुलांचे संगोपन, त्यांच्यावरील संस्कार आणि त्यांचे ‘सामाजिकीकरण’ योग्यरीत्या होण्यासाठी पति-पत्नी यांची परस्परांवर निष्ठा असणे हीदेखील आवश्यकता राहणारच. विवाहसंबंध हा हंगामी, जुजबी, सोयीपुरता, स्वार्थकेंद्री असून चालणार नाही. लग्न मोडणे हा अपवादच राहायला हवा. पण, त्याच वेळी, घराबाहेरच्या जगात स्त्रीचा समानत्वाने सक्रिय सहभाग लक्षात घेऊन विवाह व कुटुंब या दोन्ही संस्थांमध्ये काही खोलवर व दूरवर पोचणारे बदलही भावी काळात घडून येण्याची गरज आहे. भावी काळातही दांपत्यजीवनाचे स्वतःचे स्थान व महत्त्व राहीलच. पण पारंपरिक व्यवस्थेत स्त्री लग्न करून नवऱ्याच्या घरी येत असे. आधीचे आपले मैत्रीसंबंध, भावजीवन त्यागण्याची मनाची तयारी करूनच ती येई. नवरा व सासरची मंडळी यांच्या मर्जीवर गोष्टी अवलंबून राहणे योग्य मानले जाई. ‘स्त्रीकेंद्रित कुटुंब’ करण्याचा एक भाग असा असेल की, स्त्रीचे स्थलांतर, कुटुंबांतर करणे ही स्वीकृत, जवळपास एकमेव रीत नसेल. ‘पुरुषकेंद्री वंशसातत्य’ ही बाबही निकालात काढलेली असेल; म्हणजे कुल वा घराणे हे नवऱ्यावस्न ठरण्याचे थांबेल. ते बायकोवस्नही ठरणार नाही. रक्ताची नाती असतील, नातेसंबंधही असतील, एकत्र तीन पिढ्या राहत आहेत अशी कुटुंबेही असतील. गोतावळेही असतील. पण एकाच वेळी समाजात अनेक आकृतिबंधांचे वैविध्य आढळण्यास अवसर असेल.
या पलीकडचा मुद्दा आहे तो उभयता पति-पत्नींच्या मैत्रीसंबंधांचा. विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक संबंध ही कमीअधिक प्रमाणात प्राचीन काळापासून आढळून येणारी गोष्ट आहे. आदिवासी जमातींमध्येही असे संबंध आढळतात. समाज त्यांची पण काही व्यवस्था लावतो. म्हणजे, नियमन करणारे नीतिनियम असतात, आणि काही प्रमाणात त्यांचे उल्लंघनही व्यक्तींकडून होणार हे पण गृहीत धस्न दंड, शिक्षा यांचे पण नियम असतात. स्त्री-पुरुष समानता, स्त्री-मुक्ती हवीच ना, मग नीतिविवेक, नीतिनियम, समाजाचे नियमन काढून टाका, असे आपण येथे म्हणत नाही. आपण असे म्हणत आहोत की, विवाहपूर्व अवस्थेपासून स्त्री-पुरुष हरत-हेच्या कार्यक्षेत्रात एकमेकांच्या नित्य सहवासात मोकळेपणी येणार असतील तर आजच्यापेक्षा काही पटींनी त्यांच्या मैत्रीसंबंधांचे जाळे घनदाट असणार आहे. अंशतः असे संबंध हे पतिपत्नींच्या दांपत्यजीवनाचा विस्तार बनतात हा आपला अनुभव आहे. पण अंशतः पतीचे व पत्नीचे संबंधांचे जाळे स्वतंत्रही राहील. स्त्रीची लैंगिकक्षमता (वा लैंगिकता) ही विवाहपूर्वी पालकांच्या संरक्षण नियंत्रणाखाली बंदिस्त व लग्नानंतर नवऱ्याच्या मालकीची या भूमिकेतून, तिच्या दडपणामधून स्त्रीची मुक्तता होणे हा एक मोठा बदल व्हायला हवा आहे. यामधून ‘काहीही चालते’ असे मानणारी ‘पर्मिसिव्ह सोसायटी’ पण उत्कर्ष पावायला नको आहे. एकमेकांच्या मैत्रीसंबंधांना स्वागतशील वृत्तीने मोकळीक देण्याची क्षमता असलेली परस्परांवरची निष्ठा हा ‘स्त्रीकेंद्रित कुटुंबांचा’ विशेष असेल.
पतिपत्नीमधील संबंध हे विषय, एकतर्फी असतात तेव्हा ते एका पाया-भूत अर्थाने सत्तासंबंध असतात आणि मग व्यक्ती, जी औपचारिक व्यवस्थेत दबलेली, हीन असते तीही ‘मागच्या दाराने’ कुरघोडी करण्याच्या चाली खेळत राहते. पंडित ज्या कुटुंबाची व दांपत्यजीवनाची गोष्ट करीत आहेत त्या व्यवस्थेची एक मुख्य शर्त अशी आहे की पतिपत्नीसंबंध हा सत्तासंबंध नसावा, परस्परांविषयी उघड वा सुप्त भीतीने तो ग्रस्त नसावा. तो परस्परांना आधार देणारा, सांभाळून घेणारा, वाढण्या-विकास पावण्यास साहाय्य व प्रोत्साहन देणारा, योग्य मोकळीक देणारा, उदार व क्षमाशील असा निष्ठावान असावा. हे घडून येण्यासाठी स्त्रीपुरुष दोघांचीही ‘आध्यात्मिक’ पात्रता वाढायला हवी, आणि एकंदर समाजात स्त्रीपुरुष सहजीवनाच्या व मैत्री-संबंधाच्या क्षेत्रात प्रौढ व समंजस नीतिविवेक रुजायला हवा.
[शेवटचा ‘आध्यात्मिक’ हा शब्द मला अर्थातच बिनबुडाचा वाटतो. त्याची काही पार्श्वभूमी पाळशीकरांनी दिलेली नाही. इतर मुद्दे मात्र रास्त. – संपादक]
१५०, गंगापुरी, वाई — ४१२ ८०३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.