अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका

१. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे भाव काय आहेत हे दर आठवड्याला, महिन्याला, तिमाहीला, टिपून ठेवले गेले, आणि त्याचप्रमाणे त्या वस्तूची किंवा सेवेची किती विक्री (खरेदी) झाली याचे मोजमाप टिपलेले असले तर एक तालिका आपल्याला उपलब्ध होते. अशी तालिका (Time Series) सातत्याने ठेवली असली तर अभ्यासाला अत्यंत उपयुक्त ठरते. कोळसा, सोनेचांदी आणि अन्य धातु, आगगाडीची प्रवासी वाहतूक व मालाची वाहतूक, टिकाऊ उपभोग्य वस्तू (जशा की धुलाई यंत्रे, शीतकपाटे, शिवणयंत्रे इ.), दुचाकी-तीनचाकी-चारचाकी वाहने, शाळांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी, कापूस व कापडचोपड, तयार कपडे, पोलाद, पेट्रोल, अशा अनेक तालिका उपलब्ध असल्या तर (आणि तरच) देशांतील एकंदर उलाढालीचा अंदाज करता येतो. प्रत्येक तालिकेचा, कालानुसार आलेख मांडला तर त्यामधील चढ-उतार दिसतील. अशा अनेक तालिकांमधून समांतर चढ वा उतार होत आहेत असे आढळले तर एकंदर तेजी किंवा एकंदर मंदी बाजारात दिसली असा अंदाज करता येतो. एकंदर तेजी व एकंदर मंदी एकापाठोपाठ येत असल्या तर त्याला चक्राकार गति आहे असेही अनुमान करता येईल. त्याशिवाय, एकंदर तेजी व एकंदर मंदी यांची तुलना करून कुठल्याचा प्रभाव आहे हे पाहिले तर एकेका कालखंडातील कल (trend) कळून येईल.
इंग्लंडात व युरोपांतील इतर काही देशांमध्ये इ. स. १७९० ते १९२० काळात, तीन प्रकारची व्यापारी चक्रे (trade cycles) अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यांच्या अभ्यासकांना दिसली. त्यांच्या प्रथम संशोधकाच्या नावाने ती ओळखली जातात आणि तेजी व मंदी अशा एका पूर्ण चक्राची मुदत ठोकळ मानाने ठरवली जाते. ही व्यापारी चक्रे खालील प्रमाणे —-
(१) किचीन (Kitchin) चक्र —- सुमारे ३० महिने
(२) जुगलर (Jugler) चक्र —- सुमारे ८५ ते ९० महिने आणि
(३) कोन्द्रातीफ (Kondratief) चक्र —- सुमारे २०० महिने
या व्यापारी चक्रांची कारणे कोणती, आणि ती पाठोपाठ येत राहणे बाजारी व्यवस्थेमध्ये अटळ आहे काय, या विषयावर तीव्र मतभेद, वादंग आहेत. अर्थशास्त्रातील कार्य-कारण-भाव उलगडणारी उपपत्ति, ही वैज्ञानिक सिद्धान्ताप्रमाणे मान्य झालेली नसते. अमुक काही गोष्टी गृहीत धरल्यास अमुक अनुमान निघते, असे उपपत्तीला स्वस्य येते. गृहीतकाला मान्यता देणे हे वाचकाच्या, विद्यार्थ्याच्या, नागरिकाच्या, व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. तरी पण १९०० ते १९५० या पन्नास वर्षांत काही उपपत्तीचा प्रचार अधिक झालेला दिसतो.
२. व्यापारी चक्रांच्या उपपत्तीपेक्षा दीर्घकालिक कल (secular trend) कसे निर्माण होतात यात साहजिकच जास्त लक्ष घातले गेले. यांत्रिकी / तांत्रिकी (technology) लोकसंख्या (एकूण संख्या व तिचे वयोगटांतील वर्गीकरण) आणि सामाजिक संरचना (institutions) अशा तीन त-हेच्या घटकांनी अर्थकारणात बदल होत असतात. संरचनेमध्ये कायदे फार महत्त्वाचे असतात : जसे की मालकी हक्क, कंपनी व तिची विशिष्ट व्यक्ती म्हणून मान्यता, मजूर संघटनाविषयक कायदे इत्यादि. त्याचप्रमाणे उद्योजकाला मिळणारा दर्जा (status), वर्गमूलक उच्च-नीच भावना, लष्करी सत्ता व नागरी सत्ता, असे संरचनेत मोडणारे विषय आर्थिक कल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
दीर्घकालीन आर्थिक फेरबदल मोजताना राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न किंवा राष्ट्रीय दरडोई उत्पन्न, यावर भर असतो. शक्य तो जलद विकास व्हावा, उत्पन्न वाढावे, यावर जगभर एकमत आहे. अर्थनीति ठरवताना हे लक्ष्य डोळ्यासमोर असते. (अर्थनीति ही सरकारी वार्षिक अंदाजपत्रकापुरती मर्यादित नसते; वर्षभर तिच्या संदर्भात धोरण ठरवावे लागते). कशामुळे विकास सुरू होतो, चालू राहतो, वाढत जातो, याच्या उपपत्तीकडे थोडक्यात नजर टाकू. १९२८ साली Alleyn Young यांनी अर्थशास्त्रज्ञांच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षपदावरून सांगितले की प्रगतीमुळे प्रगती होते. एकदा चेंडू सरकू लागला की त्याची गती थांबत नाही. भौतिकशास्त्रात ज्याप्रमाणे inertia ची संकल्पना आहे त्यासदृश ही मांडणी आहे. वाढता परतावा (increasing returns) जिथे मिळतो, अंतर्गत व बाह्य अशा खर्च कमी करणाऱ्या सोयी जेव्हा सापडत जातात, तेव्हा आपोआप उत्पादकता वाढण्याचा प्रसार होत जातो. ‘युगांतर’ पुस्तकांत विभाग एक, पान ८ वर, श्री. साने यांनी क्र. ४ व ५ मध्ये उल्लेख केलेले घटक दर एककाचा खर्च कमी करतात, उत्पादन वाढवतात. कालांतराने या उपपत्तीत श्री. रॉस्टोव्ह यांनी अशी भर टाकली की भांडवलाच्या एकूण संचयात होणारा वाढीचा दर विशिष्ट मर्यादा ओलांडून गेला (critical level) की यंग म्हणतात तसा आत्मनिर्भर विकास होऊ लागतो.
या उलट आर्थिक सर्वंकष नियोजनावर जी उपपत्ती आधारलेली आहे तिचा ‘आपोआप’ विकासावर विश्वास नाही. सर्व उत्पादनप्रक्रिया व गुंतवणूक यांचा मध्यवर्ती सत्तेने मेळ घातला पाहिजे, आणि विशिष्ट ध्येये आखली पाहिजेत. एखादा कुत्रा दूरच्या सशाचा पाठलाग करील त्यापेक्षा एखादा निष्णात पारधी अधिक सफाईदार शिकार साधेल. Leontief इत्यादि शास्त्रज्ञांनी आकडेवारी कशी मांडावी हे स्पष्ट केले, तर Hayek, Polanyi इत्यादि शास्त्रज्ञांनी मध्यवर्ती सत्तेला पुरेशी माहिती व खोलवरचे ज्ञान मिळणे अशक्य आहे अशी टीका केली. कागदावर ठेवलेली ध्येये (target) कधीच प्रत्यक्षात उतरत नाहीत, आणि विकासाचे खोटे आकडे दाखवले जातात असे त्यांनी दाखवले.
गालब्रेथ, हेगन, टाउनी इत्यादि विचारवंतांचा भर आर्थिक धोरणापेक्षा अन्य सामाजिक सुधारणांवर आहे. पेटंट कायद्यांतील बदल, रस्ते किंवा धरणे/बंधारे बांधण्यातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग, पिढ्यांमधील दृष्टिकोणाचा फरक (generation gap), जुनाट धर्माऐवजी (उदा. कॅथॉलिक चर्च) विद्रोही धर्म (उदा. प्युरिटन पंथ) इत्यादि संस्थात्मक घटक विकास घडवतात किंवा अधोगतीला नेतात. या विचारात ताजी भर अमर्त्य सेन यांनी टाकली आहे. श्री. अण्णा हजारे यांचा या संदर्भात उल्लेख योग्य होईल.
हर्शमान या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने समतोल विकास या कल्पनेवर जोरदार टीका केली व एखादा विभाग विषम गतीने वाढला, किंवा वाढवला, तर इतर विभागांना वाढण्याची चालना मिळते असे प्रतिप्रादन केले. उदाहरणार्थ शेती, उद्योगधंदे, कारखाने, खाणी, सेवाउदीम, नागरी किंवा लष्करी खर्च असे अनेक विभाग असताना सर्वांवर मर्यादित साधनसंपत्ति वाटण्यापेक्षा एकच क्षेत्र घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणे इष्ट होय. विसाव्या शतकात निर्यातीवर भर देऊन विकास साधणारे अनेक आशियाई देश हे या विचारसरणीची उदाहरणे होत.
प्रस्तुत लेखकाला प्रा. शुंपीटर यांची विचारसरणी सयुक्तिक व वास्तववादी वाटते. त्यांचे मत संस्कृतमध्ये थोडक्यात देता येईल, जसे की योजकस्तत्र दुर्लभः किंवा उद्योगिनं पुरुषसिंह मुपैति लक्ष्मीः (किंवा साहसे श्रीः प्रतिवसति).
खुल्या बाजारपेठांतून व्यवहार सुरळीतपणे चालत असतात. या संथ व्यवहारात उद्योजक नावीन्य आणतो. उत्पादनाची नवीन रीत, नवनवीन वस्तू, कच्चा माल पुरवणारे नवीन साठे, विक्रीसाठी नवीन बाजारपेठ किंवा अभिनव पद्धती, यामुळे एखादा उद्योग प्रमुख बनतो, आणि इच्छा असो वा नसो, इतर लोक त्याच्यामागे फरपटत जातात. नवीन उद्योजकांचे जुने उद्योजक अनुकरण करतात, आणि कालांतराने नावीन्य नाहीसे होऊन संथपणा येतो. दोनशे वर्षांचा आढावा घेऊन शुम्पीटरने अशा नावीन्यपूर्ण उद्योगांची नोंद केली. त्यांच्यासोबत ऊर्जेचे नवीन स्रोत व जनसंपर्काची नवीन साधने खालील तक्त्यांत दाखवली आहेत. १९६० नंतर सुद्धा ही वैचारिका लागू पडू शकते तेही सुचवले आहे :—-
कालखंड ऊर्जास्रोत
मुख्य उद्योग (mass media)
जनसंपर्क साधन १.१७५०–१८५० वाफ, कोळसा
कापड उद्योग, जहाज, छापखाने, पत्रके,रेल्वे
२. १८५०–१९२० वीज,रेल्वे,खाणी दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रे
३. १९२०–१९६० पेट्रोल, मोटारी, केमिकल्स सिनेमा, रेडिओ १९६०–२०००
सौर, अणू कम्प्यूटर (संगणक), दूरदर्शन व्यवस्थापन २०००– अवकाश यान, इंटरनेट, जैवतांत्रिकी वर उल्लेख केलेल्या वैचारिका (ideologies) सर्वत्र लागू पडतात असे समजू नये. प्रत्येक देशांत स्थळ काल सापेक्ष निवड करणे योग्य ठरेल. Adolf Loewe चे Path of Economic Progress हे पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.