आजचा सुधारक व आगरकरांचे विचार

भारतात नुकत्याच झालेल्या फूलनदेवीच्या हत्येचे कारण व कारस्थान अजून पूर्ण उघडकीस आले नसले तरी शेरसिंग राणा याने राजपुतांच्या खुनाचा बदला घेऊन ठाकूर/राजपूत जातींचे नाव उज्ज्वल करण्यासाठी हा खून केला हे वाचून भारतात आजही जातिनिष्ठा व जात्यभिमान किती तीव्र आहे याची खात्री झाली. दोन वर्षे अगोदर फूलनदेवी जेव्हा न्यूयॉर्कला यु. एन्. ओ. मध्ये आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. जास्त शिक्षित नसूनदेखील भारतातल्या मागासलेल्या (दलित) समाजाच्या व विशेषतः त्यांच्या स्त्रियांच्या उन्नतीकरता त्यांची कळकळ पाहून व विचार ऐकून भविष्यात गोर-गरिबांकरता त्या जोरदार आवाज उठवतील असे वाटले होते. पण तो आवाजच आता बंद झाला ही खेदाची गोष्ट आहे.
समाजाच्या खालच्या स्तरांवरील दलितांवर वर्चस्व ठेवण्याकरता उच्चवर्णीयांनी जातिनिष्ठा व जात्यभिमानाचे येन-केन-प्रकारेण पोषण केले. बेटी-व्यवहार स्वतःच्या जातीतच मर्यादित ठेवून व जातीजातींत बेटी-व्यवहारांचे बंधन घालून त्यांनी स्वतःचा वेगळा ‘क्लब’ बनविला व त्यामुळे त्यांच्याच जातीचे संस्कार व आचाराविचार त्यांच्या रोमरोमांत भिनले. दलित वर्गास गुलाम म्हणून ठेवण्याकरता त्यांनी शूद्रादिकांना शिक्षणापासून वंचित केले व खाजगी मालमत्ता देखील ठेवण्याची बऱ्याच जातींना त्यांनी (मनूने) धर्मा आधारे बंदी केली. जगात कुठेच नसेल अशा नावीन्यपूर्ण जातिव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या आयतेच गुलाम जन्मास येऊ लागले व वरिष्ठवर्गांना नोकर-चाकर, गुलाम काहीच कष्ट न करता तयार मिळू लागले. ह्या गुलामगिरी-पासून शूद्रादिकांची सुटका करण्यास त्यांच्यात विद्येचा प्रसार करण्याची शिकस्त बऱ्याच सुधारकांनी केली. विद्येमुळेच शूद्रादी वर्ग बंडास उठतील — आगरकर स्वातंत्र्यापूर्वी भारतातील ब्रिटिश राज्यामुळे महाराष्ट्रांत सामाजिक सुधारणेचे वारे वाहू लागले. न्यायमूर्ती रानडे तर भारतातील ब्रिटिश राज्याला परमेश्वरी इच्छा (divine dispensation) मानीत होते. आगरकर देखील, “सामाजिक सुधारणा करण्यास आजमितीस आम्हास जेवढी अनुकूल वेळ आली आहे तितकी पूर्वी कधीहि नव्हती’ असे म्हणत. यावरून काय दिसते की सामाजिक सुधारणा करण्यास पारतंत्र्यात जितकी अनूकुल परिस्थिती आहे ती स्वातंत्र्यात नाही असे म्हणाले होते. अस्पृश्यांच्या शिक्षणाची सुरुवात महात्मा फुले यांनी महारांकरता व स्त्रियांकरता पुण्याला पहिली शाळा काढून केली. गोपाळ गणेश आगरकरांनी ‘सुधारक’ नावाचे मासिक काढून हिंदूधर्मातील अनेक अनिष्ट प्रथांवर टीकेची झोड सुरू केली. शूद्रातिशूद्रांच्या उन्नती-करता शिक्षणाची किती जरूर आहे हे म. फुलेंप्रमाणे आगरकरांनीही आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या वेळेस कोर्टाने दिलेल्या एका निकालाने जेव्हा भटाविना लावलेली लग्ने बेकायदेशीर ठरली व अशा दांपत्याची अपत्ये ‘अनौरस संतती’ समजली जाणार अशी भुमका उठवली गेल्यामुळे लोक जेव्हा पेटून उठले तेव्हा आगरकर काय म्हणाले होते हे ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’ महाराष्ट्र शिक्षण विभाग (पान. ३९३), मधून मी येथे देत आहे. आगरकर म्हणतात:
“आजपर्यंत लोकांना अज्ञानावस्थेत ठेवण्याची खबरदारी घेतली गेली असल्यामुळे त्यास आपल्या अवनतीचे मुळीच ज्ञान नव्हते. त्याबद्दल विषाद मानण्याचेहि त्यांस कारण नव्हते. परंतु इंग्रजी अंमलाने त्यास ज्ञानाची द्वारे खुली होऊन त्यांचे डोळे उघडले असल्यामुळे ब्राह्मणास भूदेव मानून त्यांची सेवा करणे हा तुमचा धर्म आहे हा उद्देश यापुढे अर्थातच त्यास मानवणार नाही व ते ब्राह्मणांच्या भूदेवत्वाविरुद्ध बंड केल्यावाचून कधीहि राहणार नाहीत. या बंडास यापूर्वीच सुरुवात झालेली आहे. परंतु या वर्गात अद्याप विद्येचा विशेष प्रसार झाला नसल्यामुळे त्याचे पूर्ण स्वरूप भासू लागलेले नाही. विद्येचा जसजसा अधिक प्रसार होत जाईल तसतसे शूद्रादी वर्गास हल्लीचे वैषम्य अधिकाधिक पोहचू लागून ते नाहीसे करण्यास ते जारीने प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत.” आगरकर–फुले वारसा आंबेडकर–चळवळीने चालविला:
अस्पृश्य समाजाच्या उन्नतीकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना, “शिका, संघटित व्हा व अन्यायाविरुद्ध बंड करा —- (Educate, Agitate and Organise)” ही शिकवण दिली. ही शिकवण फुले–आगरकर यांच्याच मंत्रासारखी होती. आगरकर, फुले, रानडे, आंबेडकर, कोल्हापुरचे शाहू छत्रपती, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, महर्षी शिंदे, यांच्या साहाय्याने अस्पृश्यसमाजात जो मध्यमवर्ग जन्मास आला, त्यानेच पुढील काळात अस्पृश्यांच्या चळवळीची सूत्रे हाती घेतली व ती आजपर्यंत त्यांच्याचकडे आहेत. नलिनी पंडित आपल्या जातिवाद आणि वर्गवाद, साधना प्रकाशन, पुणे, (१९६५), या पुस्तकात म्हणतात:
“एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सुधारणावादी विचारांचे लोण समाजाच्या अगदी खालच्या थरापर्यंत पोहचविण्याचे कार्य अस्पृश्यचळवळीने पार पाडले. आधुनिक काळात लोकहितवादींनी आपल्या शतपत्रांतून चातुर्वर्ण्यजन्य विषमतेवर टीकेची पहिली फैर झाडली. त्यांच्या बद्दलची कृतज्ञता आंबेडकरांनी प्रगट केली आहे. त्यानंतर न्या. रानडे व त्यांचे उदारमतवादी सहकारी यांनी परंपरागत अन्याय्य व अमानुष स्ठी नाहीशा करण्यासाठी समाजाची विवेकबुद्धी जागृत करण्याची शिकस्त केली. फुले यांनी तर जातिभेदाविरुद्ध उघड उघड बंडाचा झेंडा उभारला. आगरकरांनी पूर्णपणे बुद्धिवादी कसोट्यांचा आग्रह धस्न स्टींवर प्रहार केले; आणि व्यक्तिस्वातंत्र्याची तरफदारी केली. मात्र आगरकर व फुले या दोघांचेही अनुयायी प्रतिष्ठित जातींमधील असल्याने समाजजीवनात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची त्यांची शिकवण त्यास मानवली नाही. जुन्या समाजव्यवस्थेच्या नाशाने गमावण्यासारखे अस्पृश्याजवळ मात्र काहीही नव्हते. म्हणून फुले व आगरकर यांची वढभंजनाची विचारसरणी अस्पृश्यांनी मोठ्या आवेशाने उचलून धरली. आगरकरप्रणीत व्यक्तिवादाची आंबेडकरांनी तरफदारी केली आहे. आगरकरप्रणीत विचार —- ‘कोणत्याही व्यक्तीला आपल्या जन्मसिद्ध हक्कांप्रमाणे वागण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. . . . समाजरचना समतेच्या पायावर करावयाची असल्यामुळे मानसन्मान, अधिकार व व्यवसाय यांच्या बाबतीत जात आड येता कामा नये. भेदभाव व्हावयाचा तो केवळ व्यक्तीच्या गुणभेदांमुळेच झाला पाहिजे. जन्मामुळे नव्हे’ —- हे सारे १९२७ साली महाड येथे झालेल्या (आंबेडकरप्रणीत) सत्याग्रह परिषदेत मंजूर झाले आहेत. आंबेडकरांच्या विचारात याप्रमाणे आगरकरांचा व्यक्तिवाद व फुले यांचा प्रतिकारवाद यांचा समन्वय आहे. आंबेडकरप्रभृती अस्पृश्य पुढारी हेच फुले व आगरकर यांचे खास वारसदार होत.”
आजचा सुधारक व आगरकरांचे विचार
स्वातंत्र्य चळवळीचे वेळी बाळ गंगाधर टिळकांनी प्रथम स्वातंत्र्य मिळविणे महत्त्वाचे आहे, सामाजिक सुधारणा नंतर होतच राहतील असा युक्तिवाद करून महाराष्ट्रातील त्यावेळेच्या समाजसुधारकांची तोंडेच बंद केली. उच्चवर्णीय लोक समाजसुधारणे ऐवजी ‘स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे म्हणू लागले. टिळकांच्या या शिकवणीमुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उच्चवर्णीयांचा बराच उत्कर्ष झाला व खरी समाजसुधारणेची त्यांची आस्था जवळजवळ लोप पावली. समाजसुधारणेकरता खालच्या समाजास आंबेडकरी चळवळीमुळे ज्या सवलती मिळाल्या त्याबद्दलच्या गैर समजामुळे आणखी त्यास खतपाणी मिळाले. आजचा सुधारक हे मासिक आगरकांचे समाजसुधारक विचार पुढे नेण्याच्या दृष्टीने काढले असले तरी त्यात येणाऱ्या बऱ्याच लिखाणात आगरकरांची समाजसुधारक प्रेरणा दिसत नाही. नलिनी पंडितांनी म्हटल्या-प्रमाणे आगरकरांची समाजात मूलगामी परिवर्तन करण्याची दृष्टी आ.सु.च्या बऱ्याच लेखकांस अजून मानवली नसल्याचे काही नवल नाही. आणि म्हणूनच आ.सु. त जे लिखाण येते ते जरी बुद्धिगामी असले तरी विद्वान लेखक जे विषय हाताळतात ते बहुतेक उच्चवर्णीयांच्या संबंधात असतात. मात्र अंधश्रद्धा, घातक ख्ढी वगैरे भंजना-करता त्यात काहीच येत नाही असे मात्र नाही. बौद्ध–दलित–आदिवासी इत्यादींच्या प्र नांवर कमीच लेखन त्यात पाहण्यात आले. कदाचित हा विषय आ.सु.च्या लेखकांस आजचा वाटत नसावा. मागे मी आ.सु.ला अमेरिकन निग्रोवर व दलितांवर एक लेख पाठवला होता. आ.सु.ने त्यातील अर्ध्यापेक्षा कमी भाग प्रसिद्ध करून मला शेवटी काय म्हणावयाचे होते ते छापलेच नाही. माझे बंधू (आ.सु.चे आजीव वर्गणीदार) अॅड. कांबळे अजूनही माझ्या लेखाचा उत्तरार्ध येण्याची प्रत्येक अंकात वाट पाहतात व न आल्यावर मला फोनने कळवतात, तरीपण अर्धाच का होईना लेख छापला ह्याबद्दल मी संपादकाचा आभारी आहे.
आ.सु.च्या जुलै २००१, अंकातले संपादकीय Think Beyond Agarkar’ या धर्तीवरील विचारप्रर्वतक वाटले. आर्थिक चर्चा सामाजिक अंगापासून सुटी न करण्याचा जो विचार संपादकाने मांडला आहे तो मला काहीसा हेन्री जॉर्ज (Henry George) अमेरिकन तत्त्ववेत्ता (Philosopher) ह्यांच्या विचारासारखा वाटला. पण हेन्री जॉर्जने समाजातील गरिबी हटविण्याकरता Socialistic pattern चे ‘Make Land A Public Property’ —- जमिनीचे राष्ट्रीयीकरण असा उपाय सुचवला होता; (त्यांची ‘Land’ म्हणजे All Natural Resources). भारतात तर आता मनमोहन सिंग व रावांच्या करणीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था येऊन ठेपली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत फार तर वरच्या वीस टक्के लोकांचाच फायदा होतो. तिच्यामुळे बहुसंख्य लोकांचे दारिद्र्य नष्ट होत नाही असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम ध्येय भारतात समाजवादी अर्थव्यवस्था स्थापण्याचे होते. राजकीय लोकशाहीला आर्थिक लोक शाहीची जोड मिळावी अशी त्यांची उत्कंठा होती.
आ.सु.चे संपादक लिहितात तसे आता ‘मजुरी’ करता ऊर फुटेतो प्रयत्न करून खरी तालीम घ्यावी लागेल. दलित-बौद्ध-आदिवासी लोकांकडे मुलांना एवढी मोठी तालीम देण्याची ऐपतच नाही. तेव्हा Privatization ने आता ज्या थोड्या- फार सरकारी नोकऱ्या त्यांना मिळतात त्या देखील जाणार. सरकारने ह्या कमजोर घटकांकरता Private industry मध्ये आताच्यासारख्या नोकऱ्या राखून न ठेवल्या तर भारतात या बेरोजगार लोकांकडून दंग्याचे वादळ उठेल. इतर देशांत असे दंगे आता सुरू झाले आहेत. इंग्लंडमध्ये मागच्या महिन्यात बॅडफर्ड व ओल्डम येथे तेथील भारतीय व पाकिस्तानी लोकांच्या दुसऱ्या पिढीतील बेरोजगार (unemployed) तरुण व स्थानिक गोरे लोक यांच्यात दंगे झाले. २०० लोक त्यात घायाळ झाले. दंग्याचे कारण हे की ह्या Asiatic (हिंदुस्तानी | पाकिस्तानी) तरुणांना नोकऱ्याच मिळत नाहीत. तिथल्या गोऱ्यांपेक्षा या Asiatic तरुणांत तीन पटीने बेकारी आहे.
भारताच्या राजकीय नेत्यांनी याची दखल घ्यावी. पण तसे पाहिले तर Privatization यशस्वी होण्यास देशात, जे मानसिक सामाजिक व आर्थिक स्थैर्य हवे ते भारतात नाही. भारताचा समाज homogeneous नाही. तो कितीतरी जातिधर्मात वाटला गेला आहे. आज तेथे जातिवाद, वर्गवाद, कर्मवाद, अंधश्रद्धा, बुवाबाजी, hero worship याचे प्रस्थ अगणित प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे भारतात आज भूक, गरिबी, बेइमानी, लाच, सामाजिक व धार्मिक द्वेष हे एवढे वाढले आहेत की त्यामुळे देशाची हालतच ‘पतली’ झाली आहे. फार पूर्वी शायर मजरूह सुल्तानपुरीने लिहिलेला एक शेर आठवतो. देशाच्या हालतीबद्दल ते म्हणाले होते.
“कहीं ताकत के पंजे में कलाई बदनसीबों की
कहीं दौलत की बांहों में बहू-बेटी गरीबों की”
देशाची आर्थिक सामाजिक स्थिती याहीपेक्षा खराब आहे. ह्या रोज ढासळणाऱ्या देशाच्या स्वास्थ्याकडे आ.सु.चे विद्वान लेखक व संपादक फुले-आगरकर-आंबेडकर प्रणीत समाजसुधारणा संबधित विषयावर देखील जास्त लिहितील यात शंका नाही. ‘ग्लोबलायझेशन’ सारखा दुसरा महासुर ‘घटना रिव्ह्यू’ भारतीय घटनेस बदलवून निधर्मीय भारतास सुरुंग लावण्यास दडून बसला आहे. फुले-आगरकर यांचा वारसा घेऊन त्याविरुद्ध लढा देण्यास सज्ज असणाऱ्या आंबेडकरीय-बौद्ध जनतेला आजचा सुधारकच्या आगरकरवादी प्रभृती मदत करतील अशी आशा आहे.
*[मधुकर कांबळ्यांना त्यांच्या मागील लेखाचे संपादन आवडले नाही व तो रोष त्यांनी व्यक्त केला, हे योग्यच झाले. त्यांच्या मागील लेखातील अमेरिकेतील काळ्यागोऱ्यांच्या वादाबाबतचा मजकूर गाळला, त्यात जागेची चणचण हा एक मुद्दा होताच, पण वेगळेही मुद्दे होते.
(क) आ.सु. भारतीय मराठी भाषिक समाजासाठी आहे. या समाजाच्या समस्यांमध्ये कमीजास्त महत्त्व कशाला द्यायचे याबद्दल प्रत्येक संपादकाचे जरा-जरासे(च) वेगळे आकलन असते. माझ्या नजरेला अमेरिकेतला काळेगोरे संघर्ष महत्त्वामध्ये हलका वाटला.
(ख) ह्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातले सवर्ण, दलित वगैरे सर्व लोक प्रामुख्याने एकाच वंशाचे आहेत. अमेरिकेत काळा-गोरा फरक चेहेऱ्या-वस्नही दिसतो. भारतात केवळ चेहेऱ्यावस्न हा दलित, हा उच्चवर्णी, हा कानडी, हा गुजराथी, असे भेद करता येत नाहीत. म्हणजे गटागटांमधील फरक हा पूर्णपणे कृत्रिम, पूर्णपणे मानवनिर्मित (मनुनिर्मित!) आहे.
(ग) अशा फरकांवर ‘दुर्लक्ष करणे’ (फरकांकडे दुर्लक्ष करणे, यालाच ‘समतेचे तत्त्व’ ही म्हणतात!) हा एक चांगला उपाय असू शकतो, असे माझे मत आहे. जीआयपी रेल्वेच्या सुरुवातीला जातीनिहाय डबे राखण्याचा प्रस्ताव आला होता व रेल्वेने तो झिडकास्न पहिला, दुसरा, इंटर, तिसरा असे वर्ग पाडले. रेल्वेच्या प्रवासात जातींचा फरक करता येईनासा झाला व सोबतच स्पृश्यास्पृश्य फरक इतरही जागी मंदावला.
(घ) केशवसुतांना आगरकरी कवी मानतात. त्यांचा ‘नवा शिपाई’ म्हणतो, ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत । सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत।।’ माझी इच्छा ही की भारतात तरी फरकांवर नजर न रोखता ‘माझ्या घरच्या’ सर्वत्र दिसणाऱ्या खुणा पाहणे सोपे आहे. जुन्या चुका उगाळत न बसता नुसत्या त्या नोंदून पुढची वाट जमेल तितकी बिनचूक करावी, हा ‘विवेक’ —- आणि आज अमेरिकन काळ्यांपर्यंत माझ्या घरच्या खुणा मला न शोधता येणे ही माझी मर्यादा!
– संपादक टेक्सास, अमेरिका

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.