शालेय शिक्षणाविषयी थोडेसे

१. आ.सु.च्या गेल्या काही अंकांतून शालेय शिक्षणाविषयी बऱ्याच चिंता व्यक्त झाल्या आहेत. “आम्हाला का विचारत नाही” असा प्र न जुलैच्या अंकाच्या पहिल्या पानावर पालकांतर्फे विचारला गेला आहे. ‘परभारे’ निर्णय घेतल्याबद्दल सरकारवर टीका आहे.
२. १९८६ साली सरकारने शिक्षण धोरणावर जाहीर चर्चेचे आवाहन केले व झालेल्या चर्चेवर आधारलेली स्परेखा प्रसिद्ध केली. या स्परेखेचे पुनरवलोकन करताना NCERT या सरकारी संस्थेने अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक-संस्था, गैरसरकारी संस्था यांच्यात चर्चा घडवून आणल्या व त्या आधारावर नवीन रूपरेखा तयार केली असा त्या संस्थेचा दावा आहे. या संबंधीची बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर मी एका शिक्षण-संस्थेच्या वतीने NCERT कडे या स्परेखेच्या प्रतीची मागणी केली व ती मला सहजपणे मिळाली. असे दस्तावेज जनतेला मुक्तपणे Internet वर मिळावेत असे प्रयत्न काही सरकारी खाती करताहेत. तेव्हा हे दस्तावेज उपलब्ध होत नाहीत अशी तक्रार पुढे राहणार नाही असे वाटते.
३. या स्परेखेत आदर्शवादी, गोंडस शब्दांची खैरात आहे. ही स्परेखा फक्त दिशा-निर्देश करते. त्यामागील तत्त्वज्ञान रेखाटण्याचे काम करते. अशा त-हेचा दस्तावेज तयार करणे ही एक कलाच आहे. त्यात गोंडस शब्दांची खैरात असणारच. शालेय शिक्षण राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे प्रत्येक राज्य सरकारने स्वतःच्या पसंतीनुसार, गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करायचा आहे.
४. ही रूपरेखा म्हणते की शिक्षणक्रमाद्वारा आनंदमय व तणावरहित बालपण टिकवले पाहिजे, देशाच्या बौद्धिक व सांस्कृतिक परंपरा मुलांच्या मनात बिंबवल्या पाहिजेत, मुलांना उत्तम सवयी लावल्या पाहिजेत, समाजातील कुरीतींपासून त्यांना परावृत्त केले पाहिजे, कायदा व सुव्यवस्था यांचा आब राखायला शिकवले पाहिजे माणसा माणसांत, स्त्री-पुरुषांत समानता असल्याचे बिंबवले पाहिजे, वगैरे. हे सर्व वाचताना छान वाटते. तक्रार करायला काही जागा आहे असे वाटत नाही.
५. या स्परेखेवर मुख्य टीका अशी आहे की ती शिक्षणाचे भगवीकरण करणारी आहे. ही टीका काही अंशी रास्त आहे हे पुढील अवतरणावरून दिसेल.
(25)A sizeable segment of the contemporary Indian society seems to have distanced itself from the religiophilosophical ethos (of the country).
(a) The contribution of India to the world wisdom also needs to be brought to notice explicitly.
(ग) Ayurveda: More complete discipline than the western.
(a) Samskrit: Contains great stores of knowledge and wisdom that needs to be enriched with whatever is best in modern disciplines of knowledge. (म्हणजे संस्कृतातील ज्ञानाला प्राधान्य, त्यात फक्त थोडी भर घालायची आवश्यकता आहे असा अर्थ निघतो). Samskrit is best suited for computer use (कोणी सांगितले?) — has attracted global attention because of interest in Yoga, Vedic mathematics,
Astronomy and Ayurveda.
६. या सगळ्यांत मला भगवीकरणापेक्षा अप्रस्तुतपणा जास्त दिसतो. शाळेत गणित किंवा रसायनशास्त्र शिकवताना कोणत्या ‘Indian Wisdom’ चा उपयोग आहे?
७. स्परेखेतील इतर मुद्दे असे:
(क) स्त्री-पुरुषांत उच्चनीचतेचा भाव दाखवणारी विधाने बाद करावीत. सर्व लोक समान असल्याचा भाव हवा.
(ख) अभ्यासक्रमाद्वारा पुढील गोष्टी साध्य व्हायला हव्या;
(अ) सर्वधर्म-समभाव, लोकशाही, न्याय, राष्ट्रीय एकता, देशभक्ती, देशाभिमान ही मूल्ये,
(आ) विद्यार्थ्याच्या गरजा, समाजाच्या अपेक्षा, समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा, आंतर-राष्ट्रीय दर्जा यांची पूर्ती,
(इ) जीवनावश्यक इतर बाबींचे ज्ञान म्हणजे आरोग्य, ग्राहकांचे अधिकार, शासकीय व बिगर शासकीय कार्यपद्धती वगैरेंचे ज्ञान,
(ई) विश्वमान्य मूल्ये म्हणजे सत्य, सदाचार, शांती, प्रेम आणि अहिंसा मनात बिंबणे
(उ) अर्थव्यवस्था व संचारव्यवस्था यांच्या जागतिकीकरणामुळे समाजात जे बदल झाले आहेत त्यांच्याशी समरस होऊन आपली वाट शोधणे.
(ग) शालेय शिक्षणाचा गाभा एकच हवा पण विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम आखले पाहिजेत
(घ) विद्यार्थ्यांच्या ज्ञानग्रहणाचे मूल्यांकन करण्याची पद्धत बदलायला हवी. परीक्षांबद्दल भीती वाटणार नाही, गुणसंख्येमुळे वरचढपणा–न्यूनगंड निर्माण होणार नाही असे बदल करायला हवेत. मूल्यांकनातून प्रगतीची दिशा विद्यार्थ्याला कळली पाहिजे. अशा पद्धतीत शिक्षकाने केलेल्या मूल्यांकनाला प्राधान्य राहील. तेव्हा शिक्षकांवर आपला विश्वास पाहिजे.
(ङ) या स्परेखेत १०+२+३ वर्षे या शिक्षणक्रमावर शिक्कामोर्तब आहे व तीन-भाषा फॉर्म्युलावरही शिक्कामोर्तब आहे. दुसऱ्या इयत्तेपर्यंत फक्त मातृभाषाच शिकवावी व तिसरी भाषा सहावीपासून शिकवावी.
(च) शालेय शिक्षणाविषयी १८ क्षेत्रांची यादी. (छ) व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करणे व तो करताना पर्यावरणाच्या संरक्षणावर भर.
(ज) असे शिक्षण देणारे शिक्षक तयार केले पाहिजेत.
८. या स्परेखेत धर्माच्या शिक्षणाविषयी असे म्हटले आहे की कोणत्याही धर्माच्या कर्मकांडाचे शिक्षण द्यायचे नाही तर सर्व धर्मांची मूलतत्त्वे एकच आहेत याची जाणीव व परधर्मीयांविषयी आदर विद्यार्थ्यांत निर्माण करायचा आहे. या करता वेगळा विषय आणि वेगळे तास ठेवायचे नसून इतर विषयांच्या शिक्षणातूनच हेही शिक्षण द्यायचे आहे. शंकरराव चव्हाण समितीने १९९९ साली व यूनेस्को ने २००० साली अशीच शिफारस केली आहे म्हणे.
९. या स्परेखेवर माझी प्रतिक्रिया अशी,
(क) यातील आदर्शावर आक्षेप घेता येत नाही. धर्माच्या बाबतीत वस्तु-स्थिती अशी आहे की खूप लोक आपापल्या धर्मांना चिकटून आहेत. विवेकवादाने त्यांच्या श्रद्धा नष्ट होणाऱ्या नाहीत. राजकीय कारणांमुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आहे. तेव्हा सर्वधर्मसमभावाची शिकवण आवश्यक आहे. सर्वच धर्मांतील सुज्ञ लोक यासाठी प्रयत्न करत आहेत. यात खाचखळगे पुष्कळ आहेत. पण सद्भावनेने प्रयत्न होणार असतील तर ते हवेच आहेत.
(ख) कोणत्याही प्रकारचा अभिमान शाळेत शिकवला जाऊ नये असे माझे मत आहे. ज्ञान मिळवणे हे विद्यार्थ्यांचे काम आहे. ते त्यांनी मोकळ्या मनाने मिळवावे. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला व त्याकरता कोणता देश अभिमानास पात्र आहे याच्याशी शालेय विद्यार्थ्याला काय काम?
(ग) अभ्यासाचा वाढता बोझा कमी करण्यासाठी इतिहासासारख्या विषयांचा बोझा कमी करावा या मताशी मी सहमत आहे.
(घ) रूपरेखेतील बाकीचे मुद्दे मला योग्यच वाटतात.
१०. स्परेखेच्या आदर्शाविषयी माझी तक्रार वर उल्लेखल्यापुरतीच आहे. प्र न आहे तो अंमलबजावणीतील अडचणींचा. शालेय विद्यार्थ्यांची संख्या वीस कोटी. तीस मुलांचा एक वर्ग केला तर ६६ लक्ष शिक्षक लागणार. शिक्षणाचे आदर्श समजून घेऊन शिकवणारे इतके शिक्षक कोठून मिळणार? इतक्या मोठ्या प्रमाणावर आधुनिक शिक्षण देण्याकरता लागणारा पैसाच सरकारजवळ नाही. शिक्षणाचे भगवीकरण होण्याची भीती फारशी नाही कारण शिक्षकांच्या पातळीपर्यंत ते फारसे पसरणारे नाही, गणित किंवा रसायनशास्त्र शिकवताना भगवीकरणाला जागाच नाही आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे गुजराथ आणि उत्तरप्रदेश सोडून भाजपचे राज्य कुठेही नाही. वाईट हे आहे की साधनांच्या कमतरतेमुळे चांगले आदर्श सुद्धा कार्यान्वित होणे कठीण आहे.
११. अशा परिस्थितीत पालकांची जबाबदारी मोठी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी International Herald Tribune च्या पॅरिस आवृत्तीत असा एक लेख होता की मुलांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी अकरा-बारा वर्षांच्या वयापर्यंत तज्ज्ञ शिक्षक फारसे आवश्यक नसतात तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत रस घेणारे, सतत शिकू इच्छिणारे आणि मुलांशी संवाद साधणारे आईबाप आवश्यक असतात. ज्या देशात शिक्षणाच्या सोयी उत्तम आहेत तिथे जर आईबापांचे महत्त्व इतके आहे तर ते आपल्याकडे खात्रीनेच जास्त आहे. आईबापांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात सक्रिय भाग घेणे फार आवश्यक आहे. विशेषतः जीवनमूल्यांचे शिक्षण पुस्तकातील धड्यांनी होत नाही. ते जिवंत उदाहरणांनी होते. त्यातील सौंदर्य मुलांना पटले तरच ती मूल्ये मुले उचलतील. मला असे वाटते की आईबापात एक महत्त्वाचा गुण हा हवा की कोणत्याही बाबतीत धडाकेबाज मते न बनवणे व अशी मते मुलांसमोर व्यक्त न करणे. अशी मते मुलांनी उचलली तर त्यांची ज्ञानलालसाच कमी होईल.
पुन्हा एकदा मूळ विषयाकडे म्हणजे शिक्षणपद्धतीच्या रूपरेखेकडे वळायचे तर असे म्हणता येईल की आ.सु.मध्ये व्यक्त केलेल्या चिंतांची जाणीव शिक्षण-यंत्रणेला आहे. त्यांनी आखलेली धोरणे योग्यच आहेत. ती फलद्रूप होवोत अशी इच्छा करू या.
१.पाटणकरांना वाटते त्यापेक्षा परिस्थिती बरीच बिकट आहे आणि म्हणून त्यांचा ‘सहिष्णु’ सूर मला पटत नाही. गोंडस साखरपेरणीची ‘कला’ वापस्न ‘भगवीकरणा’कडे नेणारा कल शिक्षकां-पर्यंत पोचणारच नाही, असे म्हणणारे पाटणकर नंतर मात्र धोरणे फलद्रूप होवोत असे म्हणतात. हे ‘सिनिकल’ आहे.
२.जगभरातली मुले इतिहास शिकतात, मग भारतीय मुलांनाच त्याचा ‘बोझा’ वाटून इतिहासावरचा भर कमी का करावा? जे इतिहास विसरतात त्यांच्या नशिबी तो इतिहास पुन्हा भोगणे येते, असे एक खरे (इतिहासात वारंवार आढळणारे) वचन आहे. पण प्र न ‘अभिमाना’चा आहे, आणि तो पाटणकरांनाही अनाठायी व गैर वाटतोच. इतर लोक मात्र इतकी सौम्य प्रतिक्रिया देत नाहीत. संजीवनी कुलकर्णी यांच्या ‘धोरणामागचे धोरण’ (पालकनीती १६ ऑगस्ट २००१) या लेखातील अवतरण पुढे आहे आणि ते अभिमानाचे दुष्परिणाम जास्त नीटसपणे रेखते. इतिहासशास्त्र्यांच्या एका सभेचेही वृत्त पुढील अंकात आहे.
३.विद्यागौरी खरे लिहितात, “भगवीकरणाची भीती न वाटणे मला समजू शकत नाही. शिक्षकांच्या पातळीपर्यंत ते पोचणार नाही असे त्यांना का वाटते? एक वेळ शिक्षणाबाबतचे इतर आदेश पाळले जाणार नाहीत पण हा आदेश नक्की पाळला जाईल.
भगवीकरणाचा पाया ‘अभिमान’ हाच आहे — चुकीचा अभिमान. आणि विद्यार्थी संस्कारक्षम असताना एखादा प्रभावी वक्ता त्यांना चुकीच्या दिशेने नेऊ शकतो. एखादा शिक्षक तर हे काम त्यांच्या नकळतही करू शकतो आणि सरकारी आदेश असेल तर उघडपणे—-उजळमाथ्याने करू शकतो. दोन महायुद्धांच्या मधल्या काळात आत्मविश्वास खचलेल्या जर्मनीला बळ देण्यासाठी ‘ज्यूंचा तिरस्कार’ हीच शिकवण हिटलरने वापरली होती. ह्याच ‘राष्ट्रभक्त’ विद्यार्थ्यांनी सापेक्षता सिद्धान्तावर व्याख्यान देणाऱ्या आई–न्स्टाईनला बर्लिनमध्ये धक्काबुक्की केली होती आणि त्याचे सिद्धान्त ‘ज्यूइश फिजिक्स’ म्हणून dismiss केले होते.”
४. कोणतेही ‘रंगीकरण’ शिक्षणक्षेत्रात नको. सध्या हा धोका ‘भगवा’ आहे, एवढेच. आज ‘गोंडस’ वाटणारे धोरण किती झपाट्याने विखारी ठरू शकेल याची कल्पना करायला बाबरी प्रकरण (बोझा न मानता!) आठवावे.
संपादक] काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.