‘धोरणामागचे धोरण’

१२ जून २००१ च्या ‘हिंदू’ मध्ये श्री. राजपूत यांचा लेख वाचायला मिळाला. Inculcating a sense of pride. श्री. राजपूत हे NCERT चे, या धोरणाचा आराखडा मांडणाऱ्या संस्थेचे प्रमुख आहेत, धोरण बनवण्याच्या कामात त्यांचा ‘प्रमुख’ सहभागही आहे. लेखात या धोरणामागचा खरा हेतू श्री. राजपूत यांनी स्पष्ट केलेला आहे, आणि तो आहे, लेखाच्या शीर्षकाचाच — राष्ट्रीय अस्मिता जागवण्याचा. श्री. राजपूत यांची नेमणूक हे धोरण ह्या हेतूनेच घडावे यासाठी झाली आहे असे वाचायला मिळाले. राजपूतांनी म्हटल्याप्रमाणे धोरण बनवताना अनेक चर्चा झाल्या पण प्रत्यक्ष धोरणात त्यांना स्थान मिळालेले नाही असेही अनेक लेखांमध्ये वाचले. या दोन्हीत किती तथ्य आहे किंवा नाही यांची आपल्याला सामान्यांना माहितीच नाही, यासाठी हा मुद्दा इथे बाजूलाच ठेवू.
श्री. राजपूत यांच्या लेखातही त्यांनी भारत कसा महान देश आहे, हे सांगितले आहे. इथे काय काय महान आहे, किंबहुना ‘होते’ याची मोठी जंत्रीच त्यांनी दिली आहे. “ताजमहाल, कुतूबमिनार इ. इ. वैभवशाली इमारती, उच्च परंपरा, जगात कुठे झाले नसतील असे गणिती, खगोलशास्त्रज्ञ, संगीतविशारद इ. इ. इ. जगाला दशमान पद्धती दिली ती आम्ही, पायथागोरसच्या खूप पूर्वी तो सिद्धान्त आम्हाला ठाऊक होता आणि भास्कराचार्यांचे गणित म्हणजे काय विचारता? ‘किती काव्यात्म तरीही तर्कशुद्ध!’ हे सगळे आपण विसस्न जातोय. इतिहास भग्न होणे हे या काळाचे गुणवैशिष्ट्यच म्हटले जाते. अशा परिस्थितीत राष्ट्रीय अस्मिता जाग-वण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तर या प्रयत्नाची किंमत समजून न घेता विरोधकांनी त्यावर शिंतोडे उडवलेत,” अशी तक्रारही श्री. राजपूत यांनी केलेली आहे.
राष्ट्रीय शिक्षणक्रमाच्या धोरणातही, इतिहासाच्या शिक्षण हेतूंमध्ये ‘अस्मिता जागवण्याचा’ उल्लेख केलेला आहे. परंतु तो इतर अनेक उद्देशांनी गुरफटलेला असल्याने स्पष्ट झालेला नव्हता. श्री. राजपूत यांचा लेख वाचल्यानंतर समजले की हाच सर्वांत महत्त्वाचा हेतू या धोरणामागे आहे. या हेतूबद्दल मला शंका आहे. देशाची अस्मिता देशवासीयांच्या मनात जागवावी की नाही? असा हा प्रन नाही. अस्मिता जरूर असावी आणि आहेही. पण हा इतिहासशिक्षणाचा हेतू कसा मानला जातो? इतिहासाचे शिक्षण हे अस्मिता किंवा अशा कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असायला हवे. एखादी घटना, वास्तव यांची समजूत होताना ती शक्य तेवढी स्वच्छ, व्यक्तिनिरपेक्ष असावी. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीची तर्कशुद्धता हवी. तरच तो इतिहासाचा अभ्यास ठरेल. अन्यथा तो कथाकादंबरीसारखा ‘रचित’ प्रकार होईल. व्यक्तिप्रेमाने भारावून जाऊन गायलेले पवाडे हे इतिहासाच्या अभ्यासातले फारतर एक मर्यादित साधन ठरते. तो इतिहास नाही.
आजच्या महाराष्ट्रातील पाठ्यक्रमातही काळाची दरी मुले कशी पार करतील असा विचारही न करता इ. तिसरीला आदिमानवाचा इतिहास आणि लगेच चौथीला शिवाजी महाराज येतात, तेव्हा त्यामागे मुलांनी इतिहासाचा ‘अर्थ’ समजायला शिकावे, त्यातले तथ्य जाणावे ह्यापेक्षा पवाडे गाण्याचीच इच्छा दिसते.
एक विचार करून पाहू. खऱ्या इतिहासाच्या अभ्यासाने नुसती अस्मिता कशी जागेल? त्याबरोबर अपराधीपण जागणार नाही का? आणि मग यातले काय मोठे असा बेरीज वजाबाकीचा हिशोब केला तर अखेर अभिमानाने छाती भस्न येईल की अपराधीपणाने मान खाली जाईल, हे सांगता येणार नाही. कारण इतर अनेक देशांप्रमाणे उत्तम उदात्त घटनांप्रमाणे अभद्र आणि भयंकर घटना आपल्याही इतिहासात आहेतच. इतिहास पहाताना हे दोन्हीही बघावे लागतेच. यासाठी यात स्वतःला गुंतवणे अभ्यासाच्या दृष्टीने योग्य नाही. तो अभ्यास म्हणूनच समजून घ्यावा. त्यातल्या समाजजीवनाच्या रीती-तहा, त्यांत घडलेले बदल पहावेत. मुख्य म्हणजे इतिहासाच्या अभ्यासाची तंत्रे आत्मसात करावी हे शालेय इतिहासातून अपेक्षित आहे. नाही तर एक आड एक छाती पुढे — मान खाली — छाती पुढे — मान खाली — असा अनंत प्रवास करावा लागायचा. ते इतिहासाच्या अभ्यासाकडून अपेक्षितच नाही. पण गंमत म्हणजे, अशी अडचण येऊ शकेल हे या धोरणाच्या गावीही नाही. श्री. राजपूतांच्या लेखातही याची पुसट शंकाही नाही. याचे कारण इतिहास याचा अर्थ फक्त आपला विजय, बुद्धिमत्ता, संशोधन, असा एकेरीच गृहीत धरलेला आहे. हानी, हत्या, निरपराध्यांचे शिरकाण, विषमतेचा भयचकित करणारा मनावरचा पगडा यांना त्यात जागाच नाही. या मागचे कारण काय असावे?
याच मुद्द्याला जोडून येणारी आणखी एक चीज वाचकांसमोर मांडते. आपल्या देशाच्या उच्च सांस्कृतिक परंपरेतून भारतीयत्वाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव दृढ व्हावी असे या लेखात म्हटलेले आहे. भारतीयत्वाची जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे भान प्रत्येकाला असायला हवे, याबद्दल दुमत नाही. श्री. राजपूत, इतर सर्व सहकारी, या धोरणाला मान्यता देणारे यांना एक सांगावेसे वाटते की भारत माझाही देश आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेमही आहे. भारतीयपण जन्मापासून प्रत्येक क्षणी मनाशरीरावर वागवणाऱ्या भारतीयाला भारताबद्दल प्रेम वाटते म्हणजे काय होते? या प्रेमाचा पोत मला माझ्या आईच्या प्रति वाटत असलेल्या जिव्हाळा, आदर, काळजीशी जुळतामिळता आहे. या जगात अनेक स्त्रिया आहेत. त्यातल्या काही माझ्या आईहून सुंदर, हुषार आणि श्रीमंतही असतील. पण माझी आई मला त्या कुणाही स्त्रीहून प्रिय वाटते. आणि याचे कारण ती सुंदर इ. असण्यानसण्यात नाहीच आहे. ते त्यापलिकडचे आहे. ती कुख्य असेल, कदाचित अशिक्षित असेल तरीही तीच सर्वांत सुंदर असेही म्हणायचे कारण नाही, त्याची गरजही नाही. कदाचित कुणाला तसे वाटेलही, पण तो तिच्याबद्दलच्या प्रेमभावनेचा आविष्कार असेल. आणि म्हणून दुसऱ्या एखाद्या उत्तम स्त्रीला मी माझ्या आईची जागा बहालही करणार नाही.
समजा भारत देशाएवढी उच्च परंपरा नसलेला एखादा देश असेल तरीही तिथल्या नागरिकांना स्वतःच्या देशाबद्दल आत्मीयता वाटतेच. त्याचा परंपरेशी संबंध नाही. भारतात फक्त उच्च परंपराच नाही, तर अनेक अडचणी, प्र नही आहेत. विषमता, भूकबळी, शिक्षणाची दुरवस्था आहे. ‘तहलका’ घडते. त्यावरची चर्चा बंद होते, तरीही, हा माझाच देश आहे ही भावना बदलत नाही.
हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला दिसते, ते धोरण बनवणाऱ्या धोरणींना का नाही दिसत? याचे कारण एकच आहे, यामागचा हेतू भारतीयत्वाच्या जाणिवेचा, अभिमानाचा, एकात्मतेचा नाहीच आहे. तो आहे, बालमनांना आणि सर्वांनाच ‘भारतीय उच्च परंपरा’ या शर्करावेष्टित रूपात अफूची गोळी देण्याचा म्हणजे मादक पदार्थांच्या परिणामात तर्कशुद्ध विचार करता येणार नाहीत. आणि “आमच्या परंपरा उच्च, पूर्वज उच्च आणि म्हणून आम्हीही उच्च” असा भयंकर दुष्परिणामी उच्चतागंड मुलामुलींच्या मनात वृद्धिंगत होईल. असे का घडवावे यामागे राज्यकर्त्यांचा मुलांकडे बघताना ‘catch them young’ असा खास व्यापारी दृष्टिकोण आहे.
(‘पालकनीती’च्या सौजन्याने)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.