खादी (भाग ५)

स्वावलंबन म्हणजे काय?

मागच्या लेखांकामध्ये दोनतीन महत्त्वाचे मुद्रणदोष राहिले आहेत, त्याचप्रमाणे त्याची भाषा निष्कारण बोजड झाली आहे. हा विषय लिहिताना तो कसा मांडावा ह्याची स्पष्ट कल्पना नसल्यामुळे, फार विस्तार करण्याची इच्छा मुळांत नसल्यामुळे आणि डोक्यांत विचारांची गर्दी झालेली असल्यामुळे लेखनात बांधेसूदपणा नाही, विस्कळीतपणा आहे ह्याची मला जाणीव आहे. लेखनातील ह्या दोषांकडे लक्ष न देता त्याच्या आशयाकडे पाहावे अशी वाचकांना नम्र विनन्ती आहे. पुस्तकाचा कच्चा खर्डा वाचकांपुढे ठेवल्यासारखे हे सारे लिखाण झाले आहे. आणखीही एक गोष्ट. लेखांक संपविताना जे मुद्दे पुढच्या लेखांकात येतील असे म्हटलेले असते त्यांऐवजी निराळेच मुद्दे अगोदर घ्यावे अशी इच्छा होते. त्यांचा क्रम बदलतो! प्रकाशित मजकुरावर आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांच्या साह्याने पुढची मांडणी करीत जावी अशी सुरवातीला कल्पना होती. परंतु वाचकांच्या प्रतिक्रिया पुरेशा प्रमाणात आलेल्या नाहीत. कदाचित माझी मांडणी पूर्ण झाल्यानंतर लिहू असा विचार पुष्कळसे वाचक करीत असावेत. तूर्त आजवर ज्यांना ज्यांना स्पर्श केला ते सर्व विषय बाजूला ठेवून स्वावलंबन म्हणजे काय ते पाहू.

कातो, समझबूझकर कातो । जो काते वह पहनें, जो पहने वे कातें।
हे गांधीजींचे वचन आहे. हे समजूनउमजून कातणे म्हणजे काय हे अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे असे काही कारणामुळे जाणवले. स्वतः कातून त्याचे वस्त्र वापरणे म्हणजे खादी. खादी म्हणजेच स्वावलंबन, खादी म्हणजेच स्वदेशी, खादी म्हणजेच ग्रामोद्योग. खादी, स्वदेशी, स्वावलंबन आणि ग्रामोद्योग ह्या सर्व संकल्पना एकमेकींचा पर्याय म्हणून वापरता येण्याजोग्या समान आहेत; नव्हे त्या एकस्प आहेत. समजूनउमजून खादी वापरणे म्हणजे स्वावलंबनाचा व्रत म्हणून स्वीकार करणे. जीवनशैली म्हणून खादी स्वीकारल्यामुळे स्वदेशी, ग्रामोद्योग ह्यांचाही अनायासे स्वीकार केला जातो. दुसऱ्यावर कमीतकमी प्रमाणात अवलंबून राहावे ह्यासाठी खादी वापरावयाची आहे. खादीचा स्पर्श शरीराला आल्हाददायक होतो म्हणून नव्हे तर श्रमप्रतिष्ठेचे, शोषणविरहित स्वावलंबी समाजरचनेचे प्रतीक म्हणून तिचा वापर केला गेला पाहिजे. जे परावलंबी असतात ते शोषणाला बळी पडतात. प्रत्येकाने स्वावलंबन केल्यास कोणीच कोणाचे शोषण करू शकणार नाही. शोषणविरहित समाज निर्माण करणे हे आपणा सर्वांचे ध्येय असावयास पाहिजे. जी यंत्रे अतिशय सुटसुटीत आणि दुस्तीला सोपी असतील ज्यांची दुरुस्ती लहान खेड्यांतले लोहार सुतार करू शकतील, तीच, तेवढीच आणि अत्यन्त आवश्यकता भासल्यासच वापरली जावी. ती गुंतागुंतीची असतील तर यंत्रज्ञाला इतरांना अडचणीत आणणे, ती वापरणाऱ्यांचे शोषण करणे सोपे जाते म्हणून त्या यंत्रांवाचूनच भागवले पाहिजे असा विचार स्वावलंबनाच्या बाबतीत मांडण्यात येतो. ह्याविषयीची वचने-वाक्ये पुष्कळांच्या परिचयाची असल्या-मुळे येथे शब्दशः उद्धृत करीत नाही. गांधीजींनी यंत्रांना विरोध करताना फक्त शिवणयंत्राचा त्यास अपवाद केला आहे. हा अपवाद केवळ नियम सिद्ध करण्यापुरता आहे. अन्यथा यंत्रांबद्दलचे त्यांचे मत शेवटपर्यंत बदलले नव्हते. यंत्रांमुळे यंत्रज्ञाला शोषण करणे तर सोपे जातेच पण त्यामुळे बेकारीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे, यंत्रांच्या निर्मितीत अग्निप्रयोग होणे अपरिहार्य असल्यामुळे आणि अग्निप्रयोगात हिंसा अंतर्भूत असल्यामुळे, ती खेड्यापाड्यांतून तयार होऊ शकत नसल्यामुळे यंत्रांचा वापर स्वावलंबनाला अमान्य आहे, निषिद्ध आहे. स्नायूंच्या वापरातून मिळणारी ऊर्जाच स्वावलंबनाच्या कल्पनेत बसते. त्यामुळे, वाफ, खनिज तेले आणि वीज ह्यांच्या योगाने निर्माण झालेली ऊर्जा वापरण्यावर बंधने आहेत. अगदी नाइलाज झाल्यास आपद्धर्म म्हणून वापरण्याची ती वस्तू आहे. स्वावलंबन ही जीवनशैली म्हणून स्वीकारल्यानंतर सगळी कामे स्वतः करावी लागतात. सगळीच्या सगळी कामे स्वतः करणे शक्य नाही. तरी आपल्या खेड्याच्या पंचक्रोशीत जे होईल तेवढेच वापरण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे.

कापूस पिकविणारा जो शेतकरी आहे त्याने स्वतःच्या शेतात पिकणारा कापूस वटून, पिंजून स्वतः कातले पाहिजे. आणि गावातल्या विणकराकडून ते विणून घेतले पाहिजे. समजूनउमजून कातण्याचे व्रत ज्यांनी घेतले त्यांच्यापैकी बरेचजण सुरुवातीला अस्यूत (ज्याला टाका घातलेला नाही असे, न शिवलेले) वस्त्र नेसत असत, दाढी वाढवीत इतकेच नव्हे तर डोक्यावरचे केस स्वतः कापत. ज्यांना शिंपी, न्हावी, धोबी ह्यांच्यावर अवलंबून राहावे लागते ते कसले स्वावलंबी असे त्यांना वाटे. स्वावलंबनाच्या कल्पनांनी भारलेले लोक चहा कॉफी वर्ज करीत (कारण ती परदेशी कंपन्या बनवीत आणि विकत). कपडे धुण्याचा साबण स्वतः तयार करीत कारण त्यासाठी कॉस्टिक सोडा ही एकच वस्तू बाजारांतून आणावी लागे.

खादी समजूनउमजून वापरणे हे अतिशय कठिण व्रत आहे. ते व्रत स्वीकारल्या-नंतर खेड्याच्या बाहेर तयार झालेला कच्चा माल तर सोडाच, पण सायकल आणि पिठाची गिरणी ही साधीसुधी साधने वापरण्यावर बंधन येते. कंदिलात जाळण्यासाठी लागणारे खनिज तेल खेड्यात काय आपल्या देशातच होत नसे. त्यामुळे कंदील बाद होतो. काही वर्षांनंतर १९५०-५१ त्या सुमारास वाला मगनवाडीमध्ये कंदिलात वनस्पतींपासून बनविलेले तेल वापरण्याविषयी प्रयोग झाले. गुजरातेत बार्डोलीला बैलांच्या मदतीने जाते फिरविण्याचा (बळदनी घंटी) प्रयोग झाला. त्याशिवाय मगन-वाडीत हातकागद करणे, तेल काढणाऱ्या घाणीत सुधारणा करणे, हाताने फिर-विण्याच्या जात्याला जुन्या बाजारातले बॉलबेरिंग बसवून त्याची कार्यक्षमता वाढविणे असे प्रयोग झाले. पण ते प्रयोग खेड्यापाड्यांपर्यंत पोचू शकले नाहीत.

तांब्यापितळेची भांडी खेड्यांत बनत नाहीत. त्यामुळे तेथे मातीचीच भांडी वापरणे योग्य. पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात छत्री वापरणे हा आपद्धर्म. (खादीच्या कापडाची, वेताच्या काड्यांची छत्री कोण बनवून देईल? माझ्या वडिलांचे एक शिक्षक चष्म्याची परदेशी भिंगे नाइलाजाने विकत घेत. चण्याची परदेशी फ्रेम विकत घेण्या-ऐवजी ते वेताच्या काड्या वळवून त्यांत ती भिंगे बसवीत आणि दोऱ्याने कानांना बांधीत असे आम्हाला कौतुकाने सांगितले जाई.) छत्रीऐवजी गोणपाट वापरू म्हटले तर ते स्वदेशी हवे—-शक्यतोवर पंचक्रोशीत बनलेले हवे. पादत्राणे वापरतानाही विचार करावा लागतो. टाकाचे निब परदेशी तर नाही ना? स्वदेशी निब मिळत नसेल तर निदान बोरू मिळतो काय हे पाहावे लागते. घर बांधावयाला काढले तर पंचक्रोशीत तयार होणारे सामान वापरावे लागते. त्यामुळे शहाबादी फरशी वापरता येत नाही. मंगलोरी कौले वापरण्यावरही निबंध येतो. कड्याकोयंडे, बिजागऱ्या कोठे बनलेल्या आहेत हे सर्व तपासून पाहावे लागते.

स्वावलंबनाचे व्रत आचरावयाला अतिशय अवघड आहे — सद्यःकालात त्याच्याशी पदोपदी तडजोड करावी लागते. तशी तडजोड केली की तुमचे मन तुम्हाला खाते. अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते. मी स्वतः हे सारे वर्षानु-वर्षे अनुभवले आहे.

मनुष्य निसर्गतः न्यायी आहे. त्याचा यंत्रांशी संबंध आला तर तो अन्यायी होतो. यंत्रे त्याला इतरांचे शोषण करावयाला लावतात; म्हणून यंत्रे नकोत असे गांधीजींना वाटे. गांधीजींचा यंत्रविरोध त्याही कारणासाठी होता. एकीकडे यंत्रांच्या वापराला विरोध आणि दुसरीकडे सिंगरच्या शिवणयंत्राचे गुणगान असे गांधीजींनी केले. किर्लोस्करांनी चरख्याचे एक सुधारलेले प्रारूप बनविले होते. त्या यंत्रांत बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती खेड्यापाड्यांतून होऊ शकणार नाही असे कारण देऊन त्या चरख्याचा स्वीकार करण्यास नकार देण्यात आला होता. (सिंगरच्या यंत्रामधला तो दोष मात्र कोणाला खटकला नाही!) स्वावलंबनावर देण्यात आलेला अतिरेकी भर आमच्या देशात यंत्रयुग येण्यास विलंब लागण्यास कारणीभूत झाला आहे. (यंत्र हा शब्द यम्+त्र अशा दोन पदांनी घडला आहे. यम ह्याचा अर्थ आवरणे, ताब्यात ठेवणे असा आहे. त्र हे पद साधन ह्या अर्थाचे आहे. यंत्र ह्या शब्दाचा धात्वर्थ आवरण्याचे साधन असा होतो. हे साधन माणसाने घडविलेले असल्यामुळे आणि ते पूर्णपणे त्याच्या काबूत असल्यामुळे ते माणसाच्या मनावर ताबा मिळविते असे मानणे — असे समजणे चुकीचे आहे असे माझे मत आहे. गांधीजींना मात्र तसे वाटत नसे. गांधीजींशी माझा ह्या बाबतीत स्पष्ट मतभेद आहे.

पूर्वीपासून आमच्या देशामध्ये स्वावलंबनावर भर दिला गेला त्यामुळे आम्ही यंत्रनिर्मितीत मागे पडलो आणि त्यामुळेच आम्ही इंग्रजांचे गुलाम राहिलो, असे मला वाटण्याचे कारण असे की यंत्रांची, यंत्रविद्येची —- वाढ ही मुख्यतः सुधारलेल्या शस्त्रांच्या गरजेतून झालेली आहे. गरज ही शोधाची जननी आहे हे आपण जाणतोच. युद्धांमुळे उत्पादनवाढीची गरज पडते. युद्धांमुळे तेवढ्यापुरते परस्परावलंबनाचे प्रमाण वाढते. स्वावलंबी समाज हा संघटित हिंसेपुढे टिकू शकत नाही. ज्याच्या ठिकाणी परस्परावलंबनाचा अभाव आहे अशा समाजाला अहिंसेचाच शस्त्र म्हणून वापर करावा लागतो. हिंसेपेक्षा अहिंसा कधीही श्रेष्ठच पण ती नाइलाजाने स्वीकारलेली नको. असो. पुढे स्वदेशीविषयीचे विनोबांचे मननीय उद्गार देत आहे. त्यांनी सदाचरणाची अकरा व्रते लोकात गुंफली आहेत. लोकातील व्रतांचा संदर्भ पुढच्या उद्गारांना असल्यामुळे तो लोक आधी देतो:
अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह । शरीरश्रम अस्वाद सर्वत्र भयवर्जन ।।
सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्शभावना। ही एकदश सेवावीं नम्रत्वे व्रतनिश्चयें।।
“शुद्ध स्वदेशीत यंत्रांना स्थान नाही. यांत्रिक कामांमध्ये भयंकर हिंसा होते. यन्त्रे बनवितांना आणि वापरतांना होणाऱ्या अपरिमित अग्निप्रयोगामुळे असंख्य जीव प्राणास मुकतात. गिरण्यांचे मालक स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब मजुरांचे हाल करतात. यंत्रांत निघणाऱ्या वस्तूंत हलक्या वस्तूंची भेसळ फार असते. वस्तूंत नसणारे सुंदर गुण तिच्या संबंधानें वर्णिले जातात. यंत्रांच्या मदतीने संपत्तीचें केन्द्रीकरण होऊन अस्तेयव्रताचा भंग होतो. यांत्रिक सामान उत्पन्न होऊ लागले म्हणजे त्याचा खप बेसुमार वाढतो, त्यामुळे अपरिग्रहव्रताचा भंग होतो. यान्त्रिक वस्तु वापरण्याची संवय लागली म्हणजे छानछोकीही वाढते. असली ही कृत्रिम शोभा ब्रह्मचर्यास बाधक आहे.” ह्या उताऱ्यावर वेगळे भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही. फक्त अस्तेय हा शब्द थोडा दुर्बोध असल्यामुळे त्याचा अर्थ परक्यांची वस्तू हरण न करणे असा आहे तेवढे येथे सांगतो.

हे स्वदेशीचे म्हणजेच समजून उमजून खादी वापरण्याचे व्रत ज्यांनी बुद्ध्या आणि मनःपूर्वक स्वीकारले, ती जीवनशैली म्हणून अंगीकारली–त्यांच्यापैकी बरेचसे अविवाहित होते आणि त्यांनी आपले एक बेट तयार करून घेतले होते. जे विवाहित होते त्यांच्या मुलांनी खादी बऱ्याच अंशी कर्मकांड म्हणून स्वीकारली. ती मुले—-जी आज पन्नाशी ओलांडलेली आहेत—-खादीच्या भावनेशी कितपत समरस होऊ शकली ते सांगणे कठीण आहे. अर्थात काही सन्मान्य अपवाद असणारच. माझी पिढी ही खादीवाल्यांची दुसरी पिढी आहे. आमच्या, आता तिशी-चाळिशीत आलेल्या मुलां पर्यंत आम्ही खादीविचार, म्हणजे स्वावलंबी होण्याची आकांक्षा, स्वावलंबी होऊ न शकल्याची खंत, ती अपराधीपणाची जाणीव पोचवू शकलेलो नाही. खादीविचार मुलांपर्यंत पोचू शकत नाही तेव्हा त्या विचारातच काही वैगुण्य आहे काय हे तपासण्याकरिता प्रस्तुत लेखांचा प्रपंच मांडलेला आहे.
आम्ही बहुतेक सारे पांढरपेशे आहोत. श्रमिकांशी मनाने एकरूप होण्याच्या आकांक्षेतून आमच्यापैकी काहीजण काततात. पण ती आकांक्षा कितपत फलद्रूप होते ही शंका कायमच आहे. कारण कातताना मिळणाऱ्या क्षणिक समाधानापलीकडे जाऊन श्रमिकांना बरोबरीच्या नात्याने वागविणारे, श्रमाच्या थोरवीचा संस्कार आपल्या मुलांपर्यंत पोचवू शकलेले माझे मित्र नगण्य आहेत. मी स्वतः त्यात अयशस्वी आहे हे वेगळे सांगणे नको. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये गेलो होतो. तेथे पाहिले तर असे आढळले की ज्या पिढीने खादीकार्यामध्ये स्वतःला झोकून दिले होते त्यांची बहुतेकांची मुले आज परदेशांत स्थायिक झाली आहेत. सूत कातण्याचे काम हा आम्हा पुष्कळांचा रिकामपणचा छंद झालेला आहे. व्रत राहिलेले नाही. समझबूझकर कातणारे अपवादभूत असतील.
मला खादीविषयी जे लिहावयाचे होते ते भावनाविवश होऊन लिहा-वयाचे नव्हते. तिचा तटस्थपणे अभ्यास करावयाचा होता. तेव्हा आता पुढे त्या कार्याला लागू. (क्रमशः)

मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.